Oct 25, 2020
स्पर्धा

मी नैराश्यावर केलेली मात

Read Later
मी नैराश्यावर केलेली मात

शितल ठोंबरे... ( हळवा कोपरा )

 

मी नैराश्यावर केलेली मात

 

 

 

नमस्कार..... माझं नाव सौ. निर्मला सुधीर सातपुते... आज मी तुमच्या समोर व्यक्त होण्याचा एक छोटासा प्रयत्न  करlत आहे.... सध्या नैराश्य आणि त्यातून लोकांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिका यावर सतत चर्चा सुरु आहेत... आणि म्हणूनच मला माझी आपबिती तुमच्या समोर मांडण्याची तीव्र इच्छा झाली... असं म्हणा की ती सांगण्यापासून मी स्वतःला  रोखूच शकले नाही....

वयाच्या 20व्या वर्षी आईबापाने ठरवून दिलेल्या मुलाशी माझं लग्न झालं... घरची परिस्थिती जरी बेताची असली तरी प्रत्येक आईवडील आपल्या मुलांच्या लग्नासाठी काही स्वप्नं पाहतात... तशीच काही स्वप्नं माझ्या आईबापाने माझ्यासाठी पाहिली होती... आपली मुलगी सुखी व्हावी यासाठी लाखात एक वर शोधण्यासाठी त्याची धडपड होती... आणि तसं स्थळ त्यांना भेटलही... सुधीर सातपुते...एसटी मध्ये ड्रायवर... चांगली सरकारी नोकरी... एकुलता एक मुलगा... घरी फक्त सासूसासरे... जमिनीचा छोटासा तुकडा पण त्यातही जमेल तसं पिकवत...सासू सासरे गावी... शहरात  घर स्वतः चं... एकंदरीत सगळंच सुरळीत सुरु होतं...

 

माझ्या आईबापाने माझ्या साठी राजाच शोधला होता... आणि लग्नानंतर मी त्याची राणी झाले... लग्नानंतर चे ते गुलाबी दिवस.... असं वाटत होतं आपल्या सारखं आपणच... खरं च आयुष्यातले ते सगळ्यात सुंदर दिवस होते....

 

आमच्या संसार वेली वर एक सुंदर कळी उमलली... शरयू... आम्हां दोघांचा जीव की प्राण... आजी आजोबाची लाडकी शरयू...

 

पण म्हणतात या काळाचं चक्र कधी ही फिरू शकतं... माझ्या ही बाबतीत तेच झालं... आमच्या सुखी संसारात तिचा प्रवेश झाला... तिचा म्हणजे दारूचा... खिशात असणाऱ्या पैशाने... मित्र वाढले... आणि वाढणाऱ्या मित्रांची संगत त्यांना तिच्या पर्यंत घेऊन गेली.... मी खूप समजविण्याचा प्रयत्न केला... पण मी थोडीच घेतो... ती ही कधीतरीच.... असं काहीबाही बोलून माझी बोळवण केली जायची....

 

पण ही कधी तरी ची दारू रोजची व्हायला फार दिवस नाही लागले... सासूसासरे आणि मी त्यांना दारू पासून दूर ठेवण्याचा आतोनात प्रयत्न करत होतो... पण आम्हाला त्यात यश आलं नाही... तुमच्या  लाडक्या लेकी साठी तरी दारू सोडा सांगितले... पण त्याचाही परिणाम शून्य...

 

आता तर कामावर ही दारू पिऊन जाऊ लागले... कामावर त्यांना वारंवार ताकीद देऊ लागले... तुझं वागणं असंच राहिलं तर कामावरून काढून टाकू... अशी धमकी ही दिली... पण दारूच्या आहारी गेलेल्या माझ्या नवऱ्याला दारूशिवाय दुसरं जग नव्हतं...

 

आणि व्हायचं तेच झालं... ड्युटी वर असताना पिउन गाडी चालवली... त्यात ब्रेक वर चा कंट्रोल सुटला... आणि गाडीचा अपघात झाला....नशिबाने कोणतीही जीवित हानी नाही झाली... पण त्यांचं काम मात्र कायमच सुटलं... पण दारू ने काही साथ सोडली नाही...दोन वेळच्या जेवणाची सुद्धा वाताहत होऊ लागली.... 

 

माझं शिक्षण जेमतेम त्यामुळे नोकरी मिळेना... शेवटी चार घरची धुणीभांडी करायला सुरुवात केली... शेवटी पदरात सोन्यासारखी लेक होती... तिच्याकडे पाहून कामाला सुरुवात केली... माझ्या येणाऱ्या  पगारावरही  त्याचा डोळा असायचा... कधी माझ्याहाती येतो अन तो कधी हिसकावून घेतो...

तो पगारही त्याला कमीच पडे... स्वतः तर काम करत नव्हता... पण मी कमावलेले पैसे ही आम्हाला मिळू देत नव्हता... मी माझ्या लेकी साठी पैसे लपवून ठेवी...पण त्याला त्याची खबर लागायची... भांडण करून तो माझ्याकडून पैसे घेऊन जाई...

 

पैश्यासाठी माझ्या वर हात टाकायलाही मागे पुढे पहात नसे... पण लेकी कडे पाहून मी गप बसे.. त्याचा मार शिवीगाळ सगळं सहन करीत असे...

 

त्या दिवशी तर त्याने कहरच केला... मी पैसे देत नाही म्हटल्यावर त्याने बाहेर चोरीचा प्रयत्न केला... पण पकडला गेला... आणि चार दिवस तुरुंगाची हवा खाऊन आला... दारू मुळे तो निर्लज्ज झाला होता... पण मी... मला हे सगळं आता असह्य झालं होतं...

 

असा काय बरं गुन्हा केला होता मी... म्हणून माझ्या संसाराची अशी वाताहत झाली... आपलं दुःख सांगायचं तरी कोणाला... आईबापाला त्रास द्यायची अजिबात इच्छा नव्हती... सासूसासरे ही हतबल होते... मदत मागावी तरी कोणाला... तो तुरुंगातून परत आला खरा पण शेजारी पाजारी माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागले... कदाचित त्याच्या बरोबर त्यांनी मला ही चोर गृहीत धरलं होतं... त्यांच्या नजरा मला टोचत होत्या... इतक्या की आता हे सगळं मला असह्य झालं...

 

मला नैराश्याने ग्रासलं... जीवन नकोसं वाटू लागलं... आयुष्य भर मानाने जगत आले होते... आणि आता हे असलं आयुष्य नकोसं झालं... यातून सुटका मिळवायची असेल तर एकच उपाय आहे तो म्हणजे मृत्यू..... आपण मेलो म्हणजे सगळे प्रश्न सुटतील... सगळा त्रास संपेल... वारंवार मरणाचे विचार माझ्या मनात घिरट्या घालू लागले... इतके की एक दिवस त्या विचारांनी माझ्यावर विजय मिळवला...

 

मुलीला झोपवून मी पंख्याला साडी बांधली... मुलीचे भराभर मुके घेतले... तिला डोळे भरून पाहिली... आणि साडीचा फास गळ्यात अडकवला... तोच मुलीला जाग आली... मला त्या अवस्थेत पाहून त्या नाजूक जिवाने मला प्रश्न केला... आई तू  काय खेळते आहॆस??  झोका झोका??  आणि ते पण एकटी... जा बाबा मी तुझ्याशी बोलतच नाही असं आपल्या लेकीला एकटं टाकून कोणी खेळत का??

मला पण खेळायचा आहे झोका... दे बरं माझ्या पण गळ्यात... उंच उंच झोका घेऊयात आपण.... तीने हसून आपले हात माझ्यासमोर पसरले.....

बापरे ! हे काय करत होते मी... या अल्लड जीवाला कोणाच्या जीवावर सोडून जातं होते... ज्या माणसाला स्वतः ची शुद्ध नाही तो माझ्यानंतर माझ्या लेकीचे काय हाल करेल?? 

नाही हा मार्ग मुळीच योग्य नाही... मी जगेन माझ्या लेकीसाठी जगेन... आणि माझा संसार मी पुन्हा पहिल्यासारखा करेन... परिस्थिती शी हार मानून नाही चालणार... मला जगावचं लागेल... माझ्या परिवाराला पुन्हा उभं करण्यासाठी...

त्या दिवशी मी प्रतिज्ञा केली... निराश होऊन मरणाचा दरवाजा पुन्हा कधीच ठोठावणार नाही... तेव्हापासून मी एक एक क्षण आपला संसार सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करू लागले.. डॉकटरांच्या मदतीने खूप प्रयत्नांनी नवऱ्याची दारू सोडवली... त्याला पुन्हा माणसात आणलं... खूप वेळ लागला... पण मी प्रयत्न करत राहिले हार नाही मानली... साधा सोपा नव्हता तो प्रवास... पण तरी मी लढले... आणि जिंकले...

माझ्या आजूबाजूला अशी कितीतरी कुटुंब होती... ज्यांची दारूपायी वाताहत झाली होती...मी  त्यांच्या साठी कामं करायचं ठरवलं... दारूबंदी बरोबरच महिलांना त्यांच्या पायावर उभं राहता यावं यासाठी मी प्रयत्न करू लागले... यात माझ्या नवऱ्याची मला मदतच झाली... आज कितीतरी परिवारांना आम्ही या दारूच्या विळख्यातून बाहेर काढलं आहे...

आत्महत्या करण्याचे विचार करणाऱ्या महिलांना त्यांच्या या विचारापासून परावृत्त केलं आहे... मी माझ्या नैराश्यातून बाहेर पडले.. आणि
माझ्या सारख्या नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत... देवाच्या कृपेने आम्हाला त्यात यश ही येत  आहे....

तुम्ही ही तुमच्या आजूबाजूला डोळस पणे पहा आणि मदतीचा हात पुढे करा.... माझ्या मुलीमुळे मी वाचले... पण तुम्ही ही कोणाचं आयुष्य असंच वाचवू शकता......

माझ्या सारखी एक गृहिणी अशिक्षित महिला जर यातून बाहेर पडू शकते तर... तुम्ही तर सुशिक्षित आहात... यातून नक्कीच बाहेर पडाल अशी आशा करते...

आयुष्य खूप सुंदर आहे.... आणि ते एकदाच मिळत... कोणत्याही समस्येचं समाधान मृत्यू होऊच शकतं नाही.... जो लढला तो जिंकला आणि य जगात ताठ मानेने जगला.... 

खरंच आहे... नैराश्य माणसाला आयुष्यातून उठवू शकतं... पण जो यावर मात करू शकला तो स्वतः च आयुष्य तर सुधारेलच पण... इतरांच्या आयुष्यात ही प्रकाश आणेल...

सत्य घटनेवर आधारित 

कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा पण लेखीकेच्या नावासहित
धन्यवाद

शितल ठोंबरे (हळवा कोपरा )

 

Circle Image

Shital Prafful Thombare

Teacher

आयुष्य जगताना आलेल्या अनुभवांना शब्दांत मांडायला आवडते