मी नाही समजू शकलो तुला

एकमेकांना समजून घेतलं तर ते नात फुलत.एक लघुकथा


खरचं नातं कोणतही असो आपण मनापासून निभावलं, एकमेकांना समजून घेतलं,एकमेकांना जपलं तर आयुष्यातली मजा अनुभवता येते. नाहीतर ते नातं ओझं वाटायला लागते आणि त्या नात्यातली किंवा जगण्यातली मजाच संपते.

वेद तापाने फणफणला म्हणून नयनने  विराजला फोन केला.

"विराज.. अरे, आज थोडा लवकर येशील का घरी?"

"अगं नयन तुझं नेहमीच आहे, मी काम करू का नको, काय करायचं आहे घरी येऊन. माझं काम होतं का घरी? तुमच्या सगळ्यांचा एवढा आवाज असतो ना, की माझं डोकं दुखायला लागतं. ठेव तु फोन मला बरीच कामं आहे."

नयन काही बोलायच्या आतच विराजने फोन ठेवला. नयनने निरजकडे बघितलं आणि म्हणाली,. 

" निरज, तू जरा आपल्या वेदचं डायपर आणतो का प्लिज?"

"हो मम्मा, थांब."

तेवढ्यात वेदला जाग आली आणि तो खूप रडायला लागला. नयनने कसंबसं त्याला शांत केलं. पर्स उचलली आणि त्याला घेऊन हॉलमध्ये आली.

नयन कुठे तरी जात आहे हे बघून सासूबाई बोलल्या,...
" अगं तिन्ही सांजेला कुठं चाललीस लेकरांना घेऊन? तुला साधं कळत नाही, दिवा बत्तीची वेळ झाली.दिवा लाव आधी. मग जा."

नयन देवघरात गेली. वेद अजूनही रडत होता. नयनने दिवा लावला. निरजने शुभम करोति म्हटली आणि नयन लगेच दवाखान्यात निघाली.

नयन डॉक्टरकडे गेली. त्यांनी काही औषध लिहून दिली. ती औषध घेऊन नयन घराकडे निघाली.

इकडे विराज घरी आला.तेवढ्यात त्याच्या आईची बडबड सुरु झाली.

"काय आजकालच्या सूना.. रात्र नाही बघत.... दिवस नाही बघत... उचलली बॅग की गेल्या बाहेर. आठ वाजत आहे ,मात्र अजून चूल नाही पेटली घरात."

" आई तुला भूक लागली असेल तर काही मागवू का?"

" कशाला हवयं बाहेरचं....थोडा वेळ थांब ,नाही तर फोन लाव महाराणीला कधी येताय म्हणून."

तेवढ्यात दारावरची वेळ वाजली... टिंग टाँग..टिंग टाँग...विराज धावतच गेला आणि दार उघडले...त्याने वेदला कडेवर घेतले तो झोपी गेला होता. विराजने त्याला बेडरुममधे नेऊन झोपवले.

" बापरे केवढं अंग तापलय  त्याचं. मला नाही सांगता येत का तुला?"

नयनने फक्त विराजकडे बघितले आणि काहीच न बोलता ती आत गेली. हातपाय धूऊन ती स्वयंपाकघरात गेली. तिने वरण भाताचं कुकर लावलं. वांग्याची भाजी केली. पोळ्या करायला सुरुवात केली.तो पर्यंत सासूबाई स्वयंपाक घरात आल्या .

" तुला माहित आहे ना, मला नाही आवडत ती वांग्याची भाजी, माझ्यासाठी पिठलं आणि भाकरी कर."

नयनने मान हलवली, चार पाच पोळ्या करून बाकी कणकेचा गोळा फ्रीजमध्ये  ठेवला. नंतर भाकरी करायला घेतली आणि पिठलं केलं. सर्व आवरे पर्यंत रात्रीचे साडेनऊ वाजले. जेवायला बसणार तोच वेद उठला आणि रडायला लागला. नयनने हातचा घास खाली ठेवला आणि पळत गेली. त्याला औषध दिलं. आणि तो शांत झाला. तोपर्यंत यांची जेवण आटोपली.

मग सासूबाई बेडरुममधे आल्या....

"अगं नयन ते सगळं आवरून घे , तसच पडलंय.त्याला घेईल विराज." बोलून झोपायला निघून गेल्या.

नयनला खूपच वाईट वाटलं....कारण तिच्या पोटात अन्नाचा कण नव्हता.ती अजुन उपाशी होती याचं कुणाला काहीच घेणं देणं नव्हतं.


नयन उठली. वेदला विराजकडे दिलं , स्वयंपाक घरात गेली. सगळं आवरून घेतलं तोपर्यंत अकरा वाजायला आले. ती ताट वाढून घेणार तेव्हा विराज वेदला घेऊन बेडरूममधून बाहेर आला. कारण वेद रडायला लागला आणि शांत बसत नव्हता.म्हणून विराज चिडला होता.

" घराच्या बाहेर गेलो की ऑफीसच काम, घरी आलो की ह्याच रडणं ... नुसता वैताग आलाय. जराही जीवाला शांतता नाही.असं वाटतं कुठे तरी निघून जावं."

विराजचे बोलणे ऐकताच नयन किचनच्या बाहेर आली. पदराला हात पुसत " द्या त्याला माझ्याकडे, जा तुम्ही करा आराम."

तिने वेदला  घेतले, किचनमध्ये गेली.ताटात फक्त वरण भात घेतला, वेद अजूनच जोरात रडायला लागला होता. नयनने कसे बसे दोन घास खाल्ले आणि पाणी पिले. ताट बेसिन मध्ये ठेवलं आणि  बेडरुममधे गेली.

त्या दिवशी वेद साधारण दोन वाजेपर्यंत झोपला नाही. नयन त्याला इकडून तिकडे फिरवू लागली. बऱ्याच वेळानंतर  तो  तिच्या खांद्यावर झोपी गेला.

दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे नयन बराच वेळ झोपली. कारण रात्रीची झोप तिच्या डोळयात तर होतीच आणि ऑफिस आणि शाळेला सुट्टी देखील होती.

सकाळी सकाळी सासूबाई किचन मध्ये गेल्या आणि ओरडल्या,..." हे काय? रात्रभर भांडी तशीच ठेवली, घासली नाही. काय करावं बाई या नयनचं ,काय संस्कार देऊन पाठवलं हिला सासरी. एवढी साधी अक्कल नाही की रात्रीची भांडी रात्रीच घासून घ्यावी."

नयनला सासूबाईंच्या ओरडण्याने जाग आली. ती उठली आणि सकाळची कामं आवरायला सुरुवात केली. तिच्या मनात आलं की," एखाद्या दिवशी राहील तर काय फरक पडतो? आणि नाही आवडतं तुम्हाला सासूबाई तर तुम्ही केलं तर बिघडते कुठे?" पण उगाच वाद नको म्हणून ती काहीच  बोलली नाही.आज मात्र वेद एकदम फ्रेश दिसत होता. त्याचा ताप देखील उतरला होता. उठून मस्त खेळायला लागला.

सगळ्यांचा नाष्टा झाला, घरातली कामं आवरली आणि जेवणाच्या वेळी विराज म्हणाला,
" नयन अगं संध्याकाळी लवकर आवर जरा, ऑफिसची पार्टी आहे. माझं सहा महिन्यात प्रमोशन झालं. आणि हो....जरा चांगले कपडे घाल. शोभली पाहिजे मला तू. नाहीतर येशील काकूबाई सारखी. माझी इज्जत ठेव जरा."

" विराज काय बोलतोय तू हे? कधी चुकीचे वागले का मी?  आणि  तुझी इज्जत...." बोलतांना तिचं लक्ष
मुलांकडे गेलं आणि ती शांत झाली.  तेवढ्यात सासूबाई बोलायला लागल्या.

" विराज मेहनत घेतली म्हणून यश मिळालं तुला. नयन तुम्ही कुठे ही जा. माझे जेवण मात्र लवकर बनवून घे नयन. तुम्ही मग रात्री उशिरा आलात तरी चालेल."

" हो , आई असं कधी झालयं का? की, नाही बनवून गेले जेवण आणि तुम्हाला करावं लागलं."

एवढं बोलून नयन उठली, दुपारची कामं आटोपली. मुलांना झोपू घातलं. काम आवरता आवरता चार वाजले. मग चहा पाणी केले. तेव्हाच स्वयंपाक करायला घेतला. साधारण सहाच्या सुमारास सगळं आवरून पोरांना तयार केलं.आणि स्वतः तयार झाली,  या सगळ्यात सात कधी वाजले कळलं नाही.

" नयन तुला दहा दिवस आधी सांगितले तरीही तू लवकर आवरणार नाही." विराज जरा रागातच बोलला.

"विराज... अरे, तू थोडी मदत केली तर काही बिघडेल का तुझं?".

"रोज ऑफीसला जायचं आणि एक दिवस मी घरी आराम केला तर सलते तुझ्या डोळ्यांत."

"विराज तुझ्या माहितीसाठी  सांगते, मी ही जॉब करत होते आणि घरचे सगळं सांभाळून. मी मशीन नाही रे!"

"हे बघ ते मला माहित नाही. मी काहीच करणार नाही. तुला जमत नव्हतं  हे सगळं तर लग्न कशाला केलसं?"

"विराज... गोष्ट कुठली कुठे नेतोस.जरा हळू बोल मुलं आहेत घरात."

" नयन,....हे तुला कळायला पाहिजे बोलताना. उगाच डोकं फिरवू नकोस माझं."

तेवढ्यात नीरज बेडरूममध्ये आला आणि दोघं शांत झाले. सगळे तयार होऊन पार्टीला गेले.

एका मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी होती. विराजचे सगळे कलिग आले होते. त्यांच्या बायका पण सोबत होत्या. एक दोन सोडल्या तर सगळ्यांच्या बायका नोकरी करत होत्या. विराजचे नवीन ऑफिस असल्यामुळे  बायकोची ओळख करून देताना विराजला जरा ऑकवर्ड फील झाले. कारण नयन खुप शिकलेले होती मात्र आता ती घरीच होती. हे नयनच्या लक्षात आलं आणि   आपल्यामुळे त्याला खाली बघावं लागलं आहे हे तिला कळलं. तिच्या चेहऱ्यावर एक नाराजी आली.

त्या ऑफिसमध्येच नयनची एक बेस्ट फ्रेंड काम करत होती. गप्पा गोष्टी चालल्या होत्या. दहा बारा जणांचा ग्रुप होता. सगळे एकमेकांना बायकोची ओळख करून देत होते,त्याच्या बद्दल  सांगत होते.  तेव्हा एका कलिगने विचारले,  "विराज अरे तू वहिनी बद्दल काहीच बोलला नाहीस?"


"अरे... मित्रा तिच्यात काही नाही असं बोलण्यासारखं, ती नाही करत कुठे काम."

त्याचं हे वाक्य पूर्ण होत नाही तोच रियाने बोलायला सुरुवात केली.

"विराजला तारीफ करायला नाही आवडत. मी ओळखते नयनला लहानपणापासून. मी सांगते नयन बदल.. लहानपणापासून एक जिद्दी ,भरपूर आत्मविश्वास  आणि अतिशय उत्साही असणारी ही  मुलगी आयुष्यात आमच्यापुढे कधी निघून गेली  समजलं नाही. जेव्हा तिने तिचं मोठ पॅकेज असणारी नोकरी सोडून दिली ते केवळ मुलांसाठी."

सगळे ऐकत होते. रिया पुढे बोलली,...

"सडेतोड उत्तर देणारी, कुणालाही न जुमानता तिच्या स्वप्नांना पूर्ण करणारी. कॉलेज मध्ये असताना दरवर्षी  पहिला क्रमांक पटकवणारी आमची नयन.घरची जबाबदारी  सांभाळत अगदी आनंदात जगत आहे, तिच्या मनाला मारून. तिच्या घरी कुणी नाही मुलांना बघायला अस सांगून  तिने नोकरी सोडली."

" आज विराजचे प्रमोशन आहे, सहा महिन्यात त्याला बढती मिळाली. का?... तर त्याने रात्र दिवस काम केले. कारण त्याला घरचं काही पहायची गरज नव्हती. कदाचित नयन नसती तर  विराजवर घरची जबाबदारी पडली असती आणि त्याला एवढा वेळ मिळाला नसता."

" अरे वा! मग तर सगळं क्रेडिट वहिनींना." त्यातूनच कुणीतरी बोललं.

पार्टी झाली, सगळे आपापल्या  घरी परतले. संपूर्ण रस्ता विराज चूप होता. तो एका शब्दानेही काहीच बोलला नाही. इकडे नयनच्या मनात मात्र विचारांनी घेराव घेतला. रिया उगाच बोलली, चुकलच तिचं. विराजला राग आला असेल का? त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर?

घरी पोहचलो... तोपर्यंत रात्रीचे साडेअकरा वाजले . मुलं गाडीतच झोपली. विराज गाडीतून खाली उतरला आणि पहिल्यांदा विराज ने गाडीचा दरवाजा उघडला आणि बोलला,..." हळू उतर... तू फक्त वेदला घे,पर्स राहू दे इथेच मी आणतो"

नयनने विराजकडे बघितले. ती आत गेली.विराजने निरजला उचलले आणि घरात घेतले. बेडरूममध्ये गेल्यावर नयन कपडे बदलायला गेली, लगेच वेद उठला आणि रडायला लागला. यावेळी मात्र विराज अजिबात चिडला नाही त्याने त्याला उचलले आणि डायरेक्ट टेरेस वर नेले. तो वर चंदा मामा  बघून गप्प बसला. सगळीकडे चांदण्याचा लख्ख प्रकाश पडला होता. विराज वेदला घेवून झोपाळ्यावर बसला आणि वेद आकाशाकडे बघता बघता झोपी गेला.

बराच वेळ झाला  ..विराज वेदला घेऊन घरात आला नाही म्हणून दोघांना बघायला नयन वर गेली.

ती विराज जवळ गेली आणि वेदला उचलणार तोच विराज ने तिचा हात धरला.

"अगं बस ना जवळ जरा. किती दिवस झाले आपण असे एकत्र बसलो नाही. किती रम्य वाटतेय ना इथे?"

नयन त्याच्याकडे बघत झोपाळ्यावर बसली.  त्याने अजूनही तिचा हात हातातच ठेवला होता. त्याने तिच्याकडे बघितले आणि  तो एवढच बोलला, " आय एम रिअली सॉरी नयन."

"विराज हे काय? काय झालं आज तुला?"

"अगं खरं तर मी हे आधीच करायला पाहिजे होतं.मी किती दिवस झाले खूप चिडचिड केली तुझ्यावर मात्र तू एका शब्दानेही काहीच बोलली नाही. अगं मी हा कधी विचारच केला नाही की तू ही थकत असशील, तू ही दमत असशील, तुला ही कामाचा कंटाळा येत असेल."

"मी मुलांना दोन  मिनिट घेतलं तर माझी चिडचिड होते कारण ते रडतात... ओरडतात मात्र तू दिवसभर ते सगळं सहन करून सुद्धा एक शब्द बोलत नाही. जशी ती तुझी आहे तशी माझी पण आहे. मग ती जबाबदारी तुझी एकटीची कशी? आई घरात असताना देखील तुला नोकरी सोडून घरात बसावं लागलं. तसं पहिलं तर आईने  ही जबाबदारी घ्यायला पाहिजे होती. पण तिने नकार दिला. पण तू  त्यावेळी तुझं स्वप्न, तुझं अस्तित्व सगळं सोडून मुलांचा विचार केला.मात्र एका शब्दानेही काहीच बोलली नाहीस."

नयन फक्त त्याच्याकडे बघत होती.

"नयन , मला दिसतं सगळं घरात काय चाललयं. मला कधी कधी चीड येते आईची पण आई चुकीची असून सुद्धा तू उलट उत्तर देत नाहीस. खूप सहनशीलता आहे गं तुझ्यात."

"आज जे रिया बोलली,  ते शंभर टक्के खरं बोलली. खरचं आज मी जे काही आज आहे ते केवळ तुझ्यामुळे.  माफ कर मला... मी तुला नाही समजू शकलो."

" विराज... अरे माफी कसली मागतो? संसार हा दोघांचा असतो. त्यात माझं तुझं असं नसतं. आणि तू चिडचिड करतो, राग मलाही येतो पण मी तुला बोलले  तर उगाच  वाद होतील आणि मग आपल्या मुलांवर याचा परिणाम होईल म्हणून मी गप्प असते रे."

"खरचं अगं तू खूप ग्रेट आहेस. एक चान्स दे मला यापुढे मी नाही दुखवणार तुला कधी आणि तुझ्या भावनांना."

"विराज,...चल आता बराच उशीर झालायं. अरे तू माझ्या मनासारखं नाही वागलास तरी चालेल मात्र मला समजून घेतलं ते लाखमोलाचं आहे मला."

दोघं  टेरेसवरून खाली आले, बरीच रात्र झाली होती. त्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा तिला प्रेम आणि आदर दिसला. त्या दिवसानंतर विराजने कधीच नयनचं मन दुखावलं नाही.

खरचं संसाराची गाडी ही एकट्याने ओढून चालत नाही एकमेकांना समजून घेणं आणि एकमेकांचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो.
धन्यवाद!
©®कल्पना सावळे,पुणे