Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

मी मेल्यावर कळेल तुम्हाला...

Read Later
मी मेल्यावर कळेल तुम्हाला...


कथेचे शिर्षक:- मी मेल्यावर कळेल तुम्हाला...
विषय:- आणि ती हसली
फेरी:- राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा"सिया ऊठ, चल आपल्याला जायचंय. सियाsssये सियाsss चल उशीर होतोय."
सियाने खूप प्रयत्नाने डोळे उघडायचा प्रयत्न केला.
"आताच तर झोपलेय मी, जरा शांत झोपू देत नाही हा माणूस." म्हणत तिने किलकिल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघितलं आणि धाडकन उठून बसली.
"कोणsss..कोण आहेस तू? असा सरळ माझ्या बेडरुममध्ये कसा आलास? तुझी हिम्मत कशी झाली, असं माझ्याच बेडरुममध्ये घुसून मला हात लावायची?" सिया त्या व्यक्तीवर ओरडत होती. तिने बाजूला बघितलं तिचा नवरा मस्त घोरत गाढ झोपला होता.
"अहोsss अहो उठा ना."
'काय बिनघोर झोपलाय हा माणूस, कुणी घरात घुसलाय तरी शुद्ध नाहीये.' मनात नवऱ्याला शिव्या देत त्याला गदागदा हलवत ती उठवत होती. तिला उठवणारा माणूस गालात हसत होता.
"ये तू हसतोस काय असा, चल चालता हो इथून नाहीतर मी ओरडेल जोरजोरात."
"ओरड की, काही फायदा होणार नाही." तो माणूस शांतपणे म्हणाला.
सिया ओरडली, पण कुणालाचं ऐकू गेलं नसावं असंच वाटलं, कारण हॉलमध्ये सासूबाई आणि दोन मुलं झोपलेली होती. सासूबाईंना गाढ झोप लागत नसे, मुलाला मोबाईल गेम खेळायची सवय आणि मुलीला रिल्स बनवायची पण...
'आज मुलं लवकर कशी झोपली?'

"झालं असेल तुझं सगळं करुन तर चल आता." तो माणूस थोडा वैतागत म्हणाला.
"अरे पण कुठे आणि तू आहेस कोण?"
"स्वर्गात... मी यमदूत, तुला न्यायला आलोय." तो माणूस हसत म्हणाला.
"अरे ये भंकस नको, डोक्यावर पडलायंस का, मूर्खासारखा काय बोलत आहेस?" सिया थोडं घाबरत आणि थोडं गोंधळून म्हणाली.
"नाही,आता तू पडणार आहेस, त्या तिथल्या नळावर पाय घसरुन आणि मग मी तुला घेऊन जाणार, हाहाहाहा." तो बाथरूममधला नळ दाखवत विक्षिप्त हसला.
"अरे काही काय बोलतोस असं कसं मरेल मी? आणि कशावरुन तू यमदूत आहेस?" सिया थोडं घाबरतच म्हणाली.
त्याने समोर बोट फिरवलं एका स्क्रीनवर दृश्य दिसायला लागलं टीव्ही लावल्यासारखं, सिया बाथरुममध्ये निपचित पडली होती, तिचा नवरा, मुलं आणि सासूबाई जोरजोरात रडत होत्या. डॉक्टर आले त्यांनी तिला मृत घोषित केलं.
सियाने बघितलं त्या मेलेल्या सियाच्या अंगावर तेच कपडे होते जे ती घालून होती, बाकीच्यांचेही सगळे कपडे झोपताना आता जे घालून झोपले तेच. सियाला आता घाम फुटायला लागला.
"आता पटली का खात्री? चल आता उशीर होतोय."तो म्हणाला.
तसं सिया रडायला लागली,"अरे असं कसं नेऊ शकतोस तू मला, काही नोटीस पिरियड वगैरे असतो की नाही. असं अचानक..."
"ये मी काही तुला नोकरीवर नाही ठेवलंय नोटीस पिरियड द्यायला, मी असाच येतो अचानक आणि घेवून जातो, चल आता बस वीस सेकंद उरलेत तुझ्याकडे. "
अरे नाही ना, असं का करतोयस? अरे माझा मुलगा दहावीत आहे,तो माझ्याशिवाय अभ्यास करत नाही रे, सासूला उद्या डायलीसिसला न्यायचं आहे, मुलीची उद्या इंजिनीअरिंगला ऍडमिशन करायची आहे, नवऱ्याने आजपर्यंत कुठलंच बिल भरलेलं नाही. मला सगळी बिल भरायची आहेत आणि मी गेले तर... अरे घरात किराणा भरायचा आहे, भाजीपण नाहीये घरी, आठ दिवसापासून बरं नव्हतं, तर मी भाजी आणलेली नव्हती. अरे हा माणूस काहीच करत नाही, याला तर साधा टॉवेल सापडत नाही कधी, माझी मुलगी घोड्यासारखी वाढलीय पण साधा चहा बनवता येत नाही. मुलगा तर विचारुच नकोस, त्याची बॅग भरण्यापासून सगळं मला बघावं लागतं, कधीकधी तर वाटतं राहू दे बाबा मीच शिकते तुझ्याऐवजी शाळेत जाऊन. " सिया वैताग वैताग करत आठवत, रडत एकेक गोष्ट सांगत होती.
"एवढा वेळ नाहीये तुझ्याकडे चल ऊठ लवकर." तो म्हणाला.
तसं ती जोरात चिरडली, "मजाक वाटतेय तुला? अरे मी मेले तर माझं घर कोण सांभाळेल, सकाळी मुलांना कोण उठवेल, सासूबाईच्या हातात सगळं कोण देईल, नवऱ्याच्या जेवणाचं काय? वेळीअवेळी खाल्ल्यावर त्याची शुगर वाढते. अरे घरात दोन लोक आले, तर सामान आणावं लागेल, या आठ दिवसांत माझ्या घराची अशी अवस्था झालीय. आता मी मेले तर सगळी व्यवस्था कोण करेल? ती म्हातारी सासू, हा नवरा की माझी मुलं?"
तिने डोकं पकडलं आणि रडत भिंतीला टेकून खाली बसत म्हणाली.
"मी आले तेव्हापासून नवऱ्याने साधी साखर पण विकत आणली नाहीये रे, कुठलं बिल कुठे भरायचं त्याचे ऍड्रेस, फोन, अँप,पासवर्ड काहीच माहिती नाहीये त्याला. मी गेले तर कसं करेल तो माझ्या मैयतीची आणि तेरवीची तयारी? शक्य नाहीये रे. तू कर ना काहीतरी. बघ घरात खूप धूळ साचलीय, फ्रीज खूप घाणेरडा झालाय, उरलेलं अन्न तसंच त्यात कोंबल जातंय आठ दिवसापासून, घरात जाळे लोंबताहेत, चार लोक घरात आले तर म्हणतील किती गलथान बाई होती ही, तू कर ना काहीतरी अड्जस्ट प्लिज." म्हणत सिया रडायला लागली जोरजोरात.

"अरे तूच तर म्हणतेस ना नेहमी, मी मेल्यावर कळेल तुम्हाला, मग आज मरायला का रडतेय, त्यांचं ते बघतील ना." यमदूत समजावून सांगत म्हणाला.

"अरे ते धमकी द्यायला नवऱ्याला, पण मी गेले तर काहीच नाही होऊ शकत रे. माझा नवरा, माझी मुलं कसं करतील रे सगळे. मी त्रासली की, ओरडते असं पण म्हणून काय खरंच नेणार तू, माझी सासूबाई रोज मरण मागते तिला ने ना रे." सिया केविलवाण्या आवाजात म्हणाली.

" पण तू तर सारखी म्हणतेस मी मेले तर बघा, एकदाची निवांत झोप दे रे देवा आणि आता खरंच नेतोय, न्यायला आलोय तर तुला मरायला वेळ नाहीये."

"हो नाहीच आहे माझ्याकडे वेळ, जबाबदाऱ्या आहेत रे, मी असं पळून नाही जावू शकत सगळं सोडून. माझी मुलं रस्त्यावर येतील रे, नणंद माझे सगळे दागिने,साड्या घेवून जाईल, आणि हा माणूस देऊन देईल सगळं. माझ्या मुलीसाठी काहीच उरणार नाही बघ."
यमदूत हसला. सिया भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे बघत होती. त्याचं हसणं बघून तिला वाटलं, "आता हा नेतोच की काय मला?"
या टेन्शनमध्ये सिया दोन्ही गुडघ्यात मान घालून रडत त्याची विनवणी करत होती.

"मला वेळ दे रे अजून...प्लिज."


"बरं... देतो तुला संधी." तिला आवाज आला सोबतच कुणी तिला हलवत होतं,
"सिया काय झालं?, प्रिशा, परेश अरे बघा रे आईला काय झालंय तर?"
नवऱ्याचा आवाज ऐकून तिला आपण खरंच मेलो की काय वाटलं एक क्षण.

तिने डोळे उघडून बघितलं, नवरा समोर दिसत होता, मुलेही धावत आले होते, तिने स्वतःला चाचपडून बघितलं, आपण जिवंत आहे याची खात्री झाल्यावर ती प्रसन्न हसली.
तोवर तिच्या नवऱ्याने काळजीने तिला जवळ घेतलं होतं आणि तिला पाणी पाजत होता.

तिने आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं. तिला हसतांना बघून त्याने डोक्याला हात लावला,
"तुला हसायला येतंय. अगं आमची हालत बघ कशी झालीय, एक क्षण तरं वाटलं मी तुला... ते काही नाही, तू तुझी काळजी घे, आपण फुल टाइम कामासाठी बाई ठेवू, यापुढे तू फक्त्त आराम करायचास.
प्रिशा घरातली कामं शिक थोडी, परेश स्वतःचं स्वतः करत जा, आईसाठी नर्स ठेवूया आणि मी... मी शिकेल सगळं फक्त्त तू तुझी काळजी घे गं..."


सियाला मनातून आनंद होत असला तरी खूप हसायला येत होतं. रात्री झोपताना ती खूप वैतागून नवऱ्यावर ओरडत झोपली होती. गेले आठ दिवस तिला बरं नव्हतं आणि ती बेडवर पडून होती. कुणी तिला त्रास देत नव्हतं, तसं पूर्ण आराम करु देत होते, पण घर कुणीच आवरत नव्हते. हवं ते ऑर्डर करुन खात होते. ते सगळे बघूनच ती वैतागली होती.
"मी मेले तर कळेल तुम्हाला म्हणून."

खरंच, तिला तर मरायलाही वेळ नव्हता हा विचार करुन तिला अजून अजून हसायला येतं होतं. तिने सगळ्यांना आता बघितलेलं स्वप्न सांगितलं. तिचं ते स्वप्न असलं, वरवर सगळे खळाळून हसले तरी मनातून सगळे घाबरले होते.

खरंच ती असते म्हणून घराला घरपण असते... तिला जपा... ती गेली तर तुमचं जीवन किती कठीण होऊन बसेल याचा विचार करा.


समाप्त...

©®पल्लवी चरपे
टीम :- अहमदनगर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//