मी मानिनी! मी मर्दिनी भाग 2

सुंदराच्या आयुष्यातील एक वेगळा संघर्ष कसा आहे ते पाहूया

हौसाची सुंदरा झाली. त्यामागची गोष्ट आपण मागील भागात जाणून घेतली. सगळीकडे माजलेली मोगलाई,सतत येणारी सुलतानी झेलत अश्या कित्येक सुंदरा हाल होऊन मरत होत्या. नुसता घोड्याच्या टापेचा आवाज आला की जीव घाबरा होई. तसाच घोड्याचा टापेचा आवाज जवळ येत होता.सुंदरा सावध झाली. आता पुढे काय होणार?

जंगलातल्या पुढच्या वळणावर सुंदराच्या ताफ्याला घेरले. पंचवीस हत्यारबंद हबशी.
त्यांचा म्होरक्या गरजला,"रुको,हमे तलाशी लेनी है।"

सुंदरा खाली उतरली ,अदबीने मुजरा करत म्हणाली,"सरकार,क्या हुआ।हम गरीब तमासगीर है।जाने दिजीए हुजूर।"
तो खुनशी हसला,विचित्र नजरेने सुंदराकडे पहात म्हणाला,"तुम्हारे पास बहोत कुछ है।"

त्याची गलिच्छ नजर झेलत सुंदराने गळ्यातले दागिने उतरवले.दागिने समोर ठेऊन तिने परत विनंती केली,"हुजूर अभी इतना लेकर जाने दिजीए।"

म्होरक्या परत गरजला,"साली****खिचके बाहर निकालो,अभी याहापे मजा लेंगे हम।"

असे म्हणतात हशबी पुढे सरसावले. पहिल्या गाडीत सुंदराच्या ताफ्यातील मुली होत्या. आता सगळं लुटलं जाणार. विचित्र वासना भरल्या नजरेने सगळे पुढे आले. गाडीच्या पडद्यातून एकाने हात आत घातला.
तेवढ्यात अल्ला!!बचाव!मर गया!असे ओरडत तुटलेल्या हाताने तो हशबी मागे सरला. रक्ताची चिळकांडी उडत होती. मनगटापासून तुटलेला हात घेऊन तो सैनिक गुरासारखा ओरडत होता.

ते पाहताच म्होरक्या रागाने लाल झाला. तलवार उपसत तो ओरडला,"मार डालो सबको। किसिको मत छोडना।"

समशेरी उपसून,वासनेने भरलेले डोळे रोखून हबशी चालून गेले. अचानक....गाड्यांचे पडदे भिरकावले गेले. तलवारी उपसल्या. आई तुळजाभवानीचा गजर करत सपासप वार झाले. सगळीकडे रक्ताचा चिखल झाला. थोड्याच वेळात पंचवीस हबशी कापले गेले. मोहनाने तलवार म्यान केली आणि सुंदराकडे वळली.
तोंडावरचे रक्त पुसत सुंदरा म्हणाली,"चला र गाड्या पाणवठ्यावर घ्या,हात धुवा आणि चुलंगण मांडा."
सगळेजण गाड्यात बसले आणि सुंदराचे मन मात्र परत भूतकाळात घिरट्या घालू लागले.
हौसाने सुंदरा हे नाव स्वीकारलं पण तीच प्राक्तन मात्र स्वीकारायला मन तयार होत नव्हते. कुलीन शेतकऱ्याची पोर ती. असा देहाचा मांडलेला व्यापार पाहून मनात रोज हजारो प्रश्न उठत. आया बहिणींना सोडवणारा कोणीच नाही का?कधी आणि कोण संपवेल हा अत्याचार? तरी गाणं गाणाऱ्या गायिकांना थोडी बरी वागणूक असे. तरीसुद्धा कधीही जनान्यात उचलून नेतील याचा भरवसा नाही. या सगळ्यावर उपाय काय?तो उपाय काहीही असू दे.

उपाय एकच होता स्वसंरक्षण शिकणे. पण एका नाचगाणं करणाऱ्या बाईला हे सगळं शिकवणार कोण? स्वतःच्या आत्मसन्मानाचे संरक्षण करायचे असेल तर हे सगळं शिकायला हवं. तलवार,दांडपट्टा, घोडेस्वारी,लाठी सगळं सगळं यायला हवं. तिने बजाबा म्हणजे हौसाच्या सुंदरा झाल्यानंतरच्या प्रवासात कायम साथ देणारा विश्वासू सेवक. त्याला ती आपल्या बापाच्या जागी पहात असे. म्हातारा बजाबा सुद्धा तिला होता होईल तेवढं जपत असे.


एक दिवस सुंदरा बजाबाला म्हणाली,"काका!काहीही करा पण मला युद्धकला यायला पाहिजे."

"पोरी,हे कसं जमणार पण? ह्यो सुभानराव तुला लिहायला शिकीवतो त्ये त्याच्या फायदा हाय म्हणून,त्यो तुला तलवार चालवायला शिकू देणार न्हाई."

सुंदरा विचारात पडली,"तेही खरच आहे काका,पण काहीतरी मार्ग निघेलच."

सुंदरा आता अठरा वर्षाची झाली.आज मी माझ्या आई बापासोबत असते तर...माझं लग्न झालं असत.
संसार असता.हे सगळे स्त्रीसुलभ विचार तिला आतून पोखरून काढत. अशातच एक दिवस फड बुऱ्हाणपूरला होता. सुंदरा गात होती. लावणी नाचणाऱ्या नर्तकीपेक्षा सुंदराच्या आवाजातील नजाकत जास्त मोहक होती. समोरच बसलेला एक तरुण सतत तिच्याकडे टक लावून पहात होता.फडाचा कार्यक्रम संपला. संध्याकाळी एका वतनदाराच्या खाजगी गाण्याच्या बैठकीला जायचं होतं. खरतर हा प्रकारचं सुंदराला अजिबात आवडत नसे. पण...आलिया भोगासी,असे म्हणून ती अनेकदा जिवंत मरणाला सामोरे जात असे.


ती रात्र मात्र हौसा उर्फ सुंदराचे नशीब बदलणार होती. त्या रात्री बैठक सुरू झाली. समोर तोच तरुण बसलेला. नाच गाणं रंगात येऊ लागलं. गुलहौशी लोकांचे चाळे वाढू लागले.

सुंदरा भान हरपून गात होती,"दिलवरा न्या मजसी प्रीतमंदिरा"

आणि अचानक..एकाने सुंदराचा हात धरला. त्याक्षणी सुंदराने सनकन कानाखाली वाजवली. एका क्षणात मैफिल शांत झाली. आपण भयंकर चूक केल्याची जाणीव क्षणात सुंदराला झाली. आता तिच्याबरोबर फडातील सगळ्यांचे जीव धोक्यात होते.

ज्याला कानाखाली मारली त्याने तलवार उपसली,


"साली,दीड दमडीची तमासगीर,आता इथे तुला*****."असे बोलून तो पुढे झाला.आता सगळं संपलं.

एवढ्यात पुढे झालेला त्याचा हात थांबला आणि एक धारदार आवाज गरजला,

"माग सरखा दौलतराव, ती एक कलाकार हाय".

दौलतराव चवताळला,"अशा नाचार आणि गाणाऱ्या शंभर मोहराना पाच मिळत्यात हैबती."

त्यावर तेवढंच तिखट उत्तर आलं,"व्हय पर ही त्यातली हाये का? न्हाई नव्ह? मग ?

दौलतराव चरफडत माग फिरला. सुंदराला पहिल्यांदा तिच्या भाऊ आणि बापानंतर खऱ्या पुरुषाचं दर्शन झालं. तीच मन आज थाऱ्यावर नव्हतं. सगळे फडावर आले पण सगळीकडे चर्चा होती ती फक्त आणि फक्त हैबतीची.


हैबती,गावरान देखणं मराठी रूप. अक्कडबाज मिशी,धारदार नाक,काळेभोर डोळे,कसरतीने कमावलेलं शरीर. कोणत्याही तरुणीला मोह पडावा असा. बुऱ्हाणपूर जवळ एका गावच्या पाटलांचा पोरगा. तलवार चालवण्यात विजेहून चपळ,दांडपट्टा असा फिरवणार की हवा पण कापली जाईल. असा हैबती त्याच्यावर आज जादू केली होती. हो जादूच. सुंदराच्या तपकिरी खोल डोळ्यात हैबती पुरता बुडाला होता. त्याचे पाय आपोआप फडाकडे चालू लागले. फडावर हैबतीला पाहताच सगळे गडबडीने पुढे झाले. बकुळामावशीने पुढं होऊन त्याला आत बोलावलं.

मावशीने सुंदराला हाक मारली,"सुंदरा!आग ये सुंदरा, जरा बाहेर तरी ये,पाटील आल्यात."

सुंदरा हळूच बाहेर आली.समोर हैबतीला पाहून काय बोलावे सुचेना.

तरीही ती म्हणाली,"पाटील आज तुम्ही या सुंदराला वाचवलं,इथून पुढं ही सुंदरा तुमच्यासाठी काहीही करेल."

हैबतीच भान हरपलं होत. सुंदराला इतक्या जवळ पाहून. तो हसत म्हणाला,
"न्हाई जी,म्या आपलं मला जे वाटलं ते केलं,तसबी त्यो दौल्या लै माजलाय बघा."

ते ऐकून बकुळा मुजरा करत म्हणाली,
"तस नाही पाटील ह्या मोगलाईत आमच्यासारख्या जीवांची किंमत ती काय?पण तुम्ही आज जे केलं ते..".

हैबतीचा पाहुणचार करून सगळे झोपले. सुंदरा मात्र अजूनही गुंग होती ती हैबतीच्या विचारातच. ही इष्काची आग दोन्हीकडे लागली होती. पुढील सहा महिने फड याच भागात असणार होता.


सुंदराचे मन असे भूतकाळात गुंतलेले असताना अचानक तिला मोहनाने हाक मारली,
"मावशी!अग ये मावशी!कुठं हरवलीस?"


सुंदरा भानावर आली.बजाबा मात्र हसला,
"पोरी हैबती पाटील आठवला ना?"
सुंदराने मान नकारार्थी हलवली आणि मोहनाकडे वळून म्हणाली,"बोल काय झालं?"

मोहना रडक तोंड करत म्हणाली,"आग सगळी भुकेली हाये,चल लवकर जेवयला."

सुंदरा उठू लागताच मोहना परत म्हणाली,"मावशे,हैबती पाटील कोण ग?"

सुंदरा रागावली,"कोणी नाही,बजाकाका म्हातारा झाला,काहीबाही बोलत असतो".

मोहना तिच्या जवळ गेली.सुंदराकडे पाहिलं,"मावशे तुझं मन आणि शब्द जुळत नाहीत बघ."

बकुळामावशी तू तरी सांग हैबती पाटील कोण?बकुळाने सुंदराकडे पाहिलं.सुंदराने मान हलवली.

बकुळा रागावून म्हणाली,
"सगळं सांगते,पण आधी सगळ्यांना जेऊ तरी घाला,की हबशाना मारून पोट भरली?"
सगळे हसत खेळत जेवण करू लागले.मोहना मात्र विचारात गुंग होती कोण असेल हैबती?सुंदरामावशीचा काय संबंध असेल?आता तो कुठे असेल?
मोहनच्या मनातील प्रश्नांची उत्तरं तिला लवकरच मिळणार होती.पण मोहना नक्की कोण?हैबती कुठं असेल?ह्याची उत्तर आपल्याला लवकरच मिळतील

🎭 Series Post

View all