मी मानिनी ! मी मर्दिनी ! भाग 23

शिवबाराजे भेटतील का सुंदराला?इथून पुढे काय वळण येईल?

(सदर कथानक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर असले तरी कोणत्याही ऐतिहासिक सत्याचा दावा करत नाही. सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)

मागील भागात सुंदराने सर्वांच्या आग्रहाखातर राजगडावर जायचे ठरवले.त्यानंतर राजगडाच्या पायथ्याशी झालेल्या चकमकीत मोहनाने गाजवलेले शौर्य पाहून पाटील त्यांना वाड्यावर घेऊन गेले.आता पाहूया पुढे.


एक तमासगीर आणि तिचा फड घेऊन पाटील वाड्यावर येत आहेत.

बातमी कळताच लक्ष्मीबाई बाहेर आल्या,त्यांनी कुणबीनीना आवाज दिला,"सगुणे, गोदे, बायजे उठा, चुलीतला निखारा पेटवा.सैपकाची तयारी करा."

सगुणी पाटलीनबाईंची विश्वासू होती.ती लक्ष्मीबाईंना म्हणाली,"त्या नाचीसाठी सैपकाची तयारी,आवो काय बोलताय?"


पाटलीनबाई रागावल्या,"म्या सांगते तेवड ऐका,पाटलांनी ठरवल म्हंजी तसच कायतरी आसल नव्ह."


इकडे सुंदरा मात्र थोडीशी घाबरली होती.गेली वीस वर्षे तामसगीराचे जगणे अनुभवल्याने असे घरी येणे स्वीकारले जाईल का? पाटलांच्या धाकाने अन्न मिळेल,पण त्या घरातील बायकांचा आदर मिळेल का? अशा अनेक शंका सुंदराचे मन पोखरत होत्या.


एवढ्यात वाडा आल्याची वर्दी मिळाली.गाड्या थांबल्या.पाटील सुंदराला म्हणाले,"आक्का, हितच थांबा,मी आलोच."


पाटील आत आले.त्यांनी लक्ष्मीबाईंना हाक मारली,"पाटलीनबाई,ह्या जानकोजीन आजवर कोणत्या बाईकड कधी वाकडी नजर केली न्हाय,आजसुदीक म्या त्यासनी आक्का म्हणून घिऊन आलोया."


लक्ष्मीबाई म्हणाल्या,"तुमी हे सांगायला होव का?आवो तुमच्या हातून आस कस घडलं."


लक्ष्मीबाई स्वतः बाहेर आल्या.गोरीपान,तजेलदार डोळ्यात तेज असणाऱ्या सुंदराला त्या पहातच राहिल्या.सुंदराच्या चेहऱ्यावर घरंदाज आणि खानदानी रुबाब होता.त्यांनी स्वतः हाताला धरून सुंदराला आत नेले.पाठोपाठ सगळे वाड्यात आले.


लक्ष्मीबाई हसत म्हणाल्या,"आड वक्ताला आल्यासा, तवा जास काय करायच जमलं न्हाई."


सुंदराने त्यांचे हात हातात घेतले,"वहिनीसाहेब, तुम्ही एवढा मान सन्मान दिला,इथेच पोट भरलं."


वाड्यात मध्यरात्री पंगत बसली.घरच्या गायीचं घट्ट कवडी दही,लोणचे,पापड,आंबेमोहोराचा भात, भाकरी आणि झुणका असा जेवणाचा थाट पाहूनच सगळे खुश झाले.


पाटलांनी सांगितले,"पोटभर जेवा."

तशी रूपा म्हणाली,"पाटीलबाबा आवो एवढं झ्याक खायला आहे तर पोट रिकामं कशाला ठिवू."


मोहनाने तिला नजरेने रागावले.पाटील मोहनाकडे पहात म्हणाले,"बरं का पाटलीनबाई,ह्या एकट्या वाघिणीने चार जणांना लोळवल, हायेत कुठं?"


बोलताना पाटलांच्या डोळ्यात पाणी आले.ते पाहून मालू म्हणाली,"का ओ, कोणाची याद आली काय?"


तशी सगुणा वाढताना म्हणाली,"नगा इशय काढू,दोघासनी लई तरास व्हतो."


तेव्हा रूपा म्हणालीच,"लक्ष्मीवैनी,कायतरी तुमच्या मनात साचलं हाये?मोहनाने तलवार चालवल्याव पाटील लई खुश झालते.पण का?"



एक उसासा घेऊन लक्ष्मीबाई म्हणाल्या,"सगळं सांगते,आदी खाऊन घ्या पोटभर."


साक्षात अन्नपूर्णा असणाऱ्या लक्ष्मीबाईंच्या वाड्यातून आजवर कधी कोणी उपाशी गेले नाही.सगळेजण मन लावून आणि पोटभर जेवले.पुरुष माणसांची व्यवस्था बाहेर चौकातच केली होती.स्त्रियांना पाटलीनबाई स्वतः आत घेऊन गेल्या.चौसोपी भक्कम वाडा पाहून सुंदराच्या मनातली हैबतीची आठवण अलगद अश्रुंच्या रूपाने बाहेर आली.


सगळ्याजणी आता निवांत झाल्या.उद्या सकाळी मोजकेच लोक गडावर जाणार होते.इतक्यात रूपाने विषय काढला,"जेवताना पाटीलबाबांच डोळं भरून आलं.त्ये का ?"


पाटलीनबाई बोलू लागल्या,"म्हंजी बघा या गोष्टीला पंचवीस तीस वरीस झाले.आमच तवा नवीनच लगीन झालं व्हत.या एवढया मोठ्या वाड्यात सासूबाई, आजसासू,दिर,जावा आणि नणंद मातर एकच.आंबिका नाव व्हत त्यांच.नावाप्रमान साजऱ्या दिसायच्या वन्स.माझ्यापरीस दोन वर्षांनी लहान.आम्ही आमच्या आबांच्या घरी घोड्याव बसायचो,तलवार चालवायचो,बाण चालवायचो.एक दिवस आंबिका वन्स गप्पा मारीत असताना त्यांना म्या हे सांगितलं.त्या हट्ट धरून रहायला, वैनीला सगळं येत,मलाबी शिकवा समद.पर आमचे मामंजी लई कडक.त्ये रागावले. पोरीच्या जातीला भाकऱ्या थापाय आल्या की बास.मला वाईट वाटलं पर सासुरवाशीण काय करणार व्हते म्या. पुढं वरीसभराणी वन्स सासरी गेल्या.त्यानंतर त्या यात्रला आल्या व्हत्या.


दिवस लई बेक्कार चालल्याल,पर पाटलाच्या लेकीबाळींना कोण हात लावणार.ह्या भ्रमात राहील मामंजी.आम्ही दहा बारा जणी यात्रेहुन येत होतो.राक्षसांनी घेरलं.चौघे जण व्हते.एकेका पोरीला पकडायला लागले.म्या वन्सना घिऊन गाडीतून उडी मारली.आमी चारपाच जणी गावाकडं पळत सुटलो.दोघांनी पाठलाग सुरू केला.त्यांनी गाठायच्या आत मी एकीला दुसऱ्या वाटेनं पुढं पाठवलं.त्या दोघांशी आम्ही लढू लागलो.माझ्याकडं खंजीर असायचा कायम.आबांनी दिलेला.मी त्यातल्या एकाशी लढत असताना दुसऱ्याने वन्सना उचललं. मी नुसत्या खंजीराने जास्त लढू शकत नव्हते.मी त्याला जखमी करून गावाकडं पळत सुटले."




असे म्हणून लक्ष्मीबाई थोडं थांबल्या.तेवढ्यात सगुणा म्हणाली,"वैनी ,तरास व्हत आसल तर नगा सांगू."


आवंढा गिळत लक्ष्मीबाई म्हणाल्या,"नाही,तरास कसला?तर म्या गावकड पळत सुटले आणि त्ये राक्षस वन्सना घेऊन गेले.तोवर मामंजी आणि हे पोहोचले.म्या तिथंच बेसूद पडले,दुसऱ्या दिशी मला जाग आली.वन्स, वन्स,म्या फक्त रडत व्हते.


माझ्याबरोबर असणाऱ्या बायकांनी मी केलेला प्रतिकार घरी सांगितलं व्हता. वन्स गेल्याची हाय खाऊन ह्यांचे आबा वारले.तवापासून जानकोजी पाटील कोणत्याही बाईत आपली बहीण बघत अस्त्यात. म्हणून ह्या पोरीला लढताना बघून त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या असणार."


सुंदराने त्यांचा हात हातात घेतला,"वैनी,राक्षसांच्या राज्यात बाईच्या अब्रूला,शरीराला काही किंमत नाही."


तस सगुणा बोलली,"पर आता राजगडाव देव हाये,आन त्याच्या राज्यात प्रत्येक बाई सुरक्षित हाये."


बाकीच्या सुद्धा म्हणाल्या,"व्हय शिवबाराज आणि आऊसाहेब असताना कोणाची बिशाद."



तेवढ्यात बकुळामावशी रागावली,"ये पोरींनो झोपा की आता,उद्या गडाव जायचं हाये."


तशा सगळ्या झोपी गेल्या.पहाटे जात्याच्या घरघर आवाजाने सुंदराला जाग आली.सुंदरा उठली,हातपाय धुतले आणि जाते ओढणारी शेजारी बसली.जात घरघर फिरत होते आणि सुंदराच्या तोंडातून आपोआपच ओव्या येऊ लागल्या.


मालन बसली दळायला,वव्या माहेरच्या गाती.
जात फिरत गरागरा,किरत माहेरची गाजती.


गडामंदी गड बाई माझ्या राजाचा राजगड,
माह्यारी जायची बाई वाट माझ्या अवघड.


राजा नांदतो गडावर जणू शिवाचा अवतार,
तिथंच शिलेदार माझा सर्जा आबदार.


शिलेदार भाऊ माझा त्याची किरत सांगू किती.
ओव्या गात फिर गर गर ,जात माझं हत्तीरथी.


तोवर आख्ख्या वाड्यातल्या बायका अवतीभवती जमल्या.एवढ्या सुंदर आवाजात ओव्या ऐकताना सगळ्या भान हरपल्या होत्या.


जात थांबलं.गोदा नावाची म्हातारी पुढे झाली.तिने मायेने सुंदराच्या तोंडावरून हात फिरवला,"लेकी,किती गॉड गळा हाये तुझा.मन पाखरू व्हवून कवाच माह्यारी गेलं."



इकडे सगळेजण तयार झाले.निरसे दूध,लोणी आणि थालिपीठ अशी न्याहारी खाऊन सगळे तृप्त झाले.

पाटलांनी आवाज दिला,"आक्का,आवरलं का?तांबडं फुटायच्या आत गडाचा दरवाजा गाठायला पायजेल."


सुंदरा बाहेर आली.आंबिकाच लुगडं तिला हट्टाने नेसायला लावलं होत लक्ष्मीबाईंनी. तिला पाहताच पाटलांच्या डोळ्यात पाणी जमा झाल.


ते लपवत त्यांनी आवाज दिला,"अय शिरप्या,आटिप लवकर.आक्का,मोजकीच माणसं घ्या.समद्यासनी न्हाई जाता याच."



सुंदरा,मोहना,मालू,बकुळा,छबु,बायजा आणि बजाकाका एवढे निघाले.




मोहनाच्या मनात एकच होत राजे भेटावेत त्यांच्या पायाची धूळ माथ्यावर लावावी.जिथं धोंडिबा डोकं टेकवतो त्या देवाला डोळे भरून पहावे.


तेवढ्यात छबु म्हणाला,"आक्के, आपुन चाललोय खर,पर आपल्यासारख्या लोकांना भेट देत्याल का?"


तेव्हा जानकोजी पाटील हसले,"आवो,प्रत्यक्ष शिवाचा आवतार त्यो,कुणाला आस दूर लोटणार न्हाई.पावलं टाका बिगिबिगी."



डोंगर चढायला सुरुवात झाली.ह्ये एवढा मोठा गड बघून पोटात खड्डा पडत व्हता पर राजांची भेट घ्यायची ह्या जिद्दीने पेटून सगळे गड चढू लागले.


चारही बाजुंनी निबिड अरण्य,सह्याद्रीच्या कातळ कड्यांची अभेद्य तटबंदी असलेला देखणा राजगड पाहूनच मोहनाचे मन हरकून गेले होते.जंगलात चालताना प्रत्येकाकडे भाला होता.जनावर अंगावर येऊ शकत होती.झपाझप पावलं बालेकिल्ल्याच्या दिशेने पडत होती.


मोहना म्हणाली,"पाटीलबाबा,राज मला घेत्याल का त्यांच्या सैन्यात?"



तस जानकोजी हसले,"पोरी,स्वराज्याची सेवा काय फकस्त लढाई करून करता येती अस न्हाई,तू एवढ्या पोरींना वाचवते,तीपण स्वराज्याची सेवा हाये की.आन काय सांगावं, राज देत्याल बी एखादी कामगिरी."


मोहना मनाने केव्हाच गडावर पोहोचली होती.राजगड तिला मंदिरासारखा भासत होता.झपाझप सर्वजण किल्ल्यावर जायला पाय उचलत होते.



सुंदराला शिवबाराजे भेटतील का?स्वराज्याची सेवा करायची मोहनाची इच्छा पुरी होईल का?

🎭 Series Post

View all