मी मानिनी ! मी मर्दिनी ! भाग 8

खविसखान सामोरा आला. पुढे सुंदराचे काय होणार?



(सदर कथानक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर असले तरी कोणत्याही ऐतिहासिक सत्याचा दावा करत नाही. सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)

मागील भागात आपण पाहिले की सुंदराच्या हातून सुनंदा वाचली पण त्यामुळे सुंदराला मात्र गाव सोडावे लागले. खविसखान सुंदराला शोधत तिच्या मागावर निघाला आता पाहू या पुढे.


इकडे महिपतीमामा सुंदराला घेऊन बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी जवळपास पंचवीस मैल लांब एका देवराईत आश्रय घेतला. खविसखान व त्याची माणसे चारही बाजूला शोध घेत होती.

दौलतीने सुद्धा आपली माणस कामाला लावली. सुंदरा स्वतःसाठी नाही तर आपल्याबरोबर असलेल्या लोकांसाठी काळजीत होती. यातून पुढे काय होणार? हा प्रश्न तिचे मन पोखरत होता.

सुनंदा आणि तारा तिला धीर देत,"आक्का,काहीही झालं तरी आम्ही तुमच्याबरोबर आहे."

सुंदरा त्यांना काळजीने म्हणे,"माझ्यामुळे तुमचा जीव धोक्यात आला."

तेव्हा तारा हसून म्हणाली,"आक्का अग रोज भयभीत होऊन जगण्यापेक्षा वाघासारख लढून मेलेलं काय वाईट?"


महिपतीमामा मात्र अत्यंत सावध होते. कोणत्याही क्षणी सुभेदार आपल्याला गाठू शकतो हे त्यांना पक्क ठाऊक होतं. जवळपास तीन दिवस खविसखान सुंदराला शोधत होता.

तो प्रचंड चिडला होता,"जमी खा गई,या आसमा निगल गया उसको। आम्हाला ती हवीय."

दौलतीने आपल्या माणसांना सांगितलं,"काहीही करा आणि सुंदराला शोधून हजर करा."अशी सगळीकडे शोधाशोध चालू होती.

एक दिवस गावतुन एक माणूस गडबडीत शिधा घेऊन चालला होता. दौलतीच्या माणसांनी ते हेरलं. त्यांनी गुपचूप पाठलाग सुरू केला. तो स्वार सावध होता. देवराईजवळ येताच तो थांबला. आपला पाठलाग होतोय त्याच्या लक्षात आलं.


त्याने तसाच देवराईला वळसा घालायचं ठरवलं. इकडे शिधा संपला होता. खायला काहीही नव्हतं. माणूस अजून कसा आला नाही?

तेव्हा महिपतिमामाकडे जाऊन सुंदरा म्हणाली,"मामा,काही दगाफटका झाला नसेल ना?जाऊन पहायचं का गावात."

मामा हसले,"पोरी युद्धात खूप सावध रहावं लागतं, आपण बाहेर पडणे म्हणजे आपला ठावठिकाणा स्वतः जाहीर करणे. उद्या सकाळपर्यंत वाट पाहू."

त्या रात्री सगळे उपाशी झोपले.

महिपतीमामाच्या तालमीत तयार झालेला हेर हुशार होता. त्याने रात्रभर दौलतीच्या माणसांना गोलगोल फिरवलं.पहाट व्हायच्या वेळेला मागावरची माणसं पेंगुळली आणि संधी मिळताच तो देवराईत शिरला.


देवळाजवळ पोहोचताच त्याने सांगितलं,"आज मोठ्या मुश्किलीने वाचलोय, शत्रू आपल्या अगदी उंबरठ्यावर येऊन उभा आहे."


सुंदरा हे ऐकून अधिकच काळजीत पडली. इकडे दौलतीच्या माणसांना हुलकावणी बसली. तरीही त्यांना संशय आला होता की नक्कीच या देवराईच्या आसपास काहीतरी आहे. त्यांनी ताबडतोब खबर द्यायला कूच केले.


दुसरीकडे महिपतीमामांनी हैबतीला सांगावा पोहोचवायला पाठवलेला स्वार जिवाच्या आकांताने प्रवास करत होता. लवकरात लवकर हैबतीला निरोप द्यायला हवा होता. दौलतीने आपल्या हेरांकडून आणलेली बातमी ऐकली.


पण घाई न करता आधी खात्री करून घ्या असे सांगितले. आता सगळीकडून संकट जवळ येत होते. कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकत होते. देवराईत आसरा घेऊन चार दिवस झाले होते. एका जागेवर जास्त थांबणे म्हणजे धोका वाढणे. लवकर जागा सोडायला हवी. पण बाहेर दौलतीने माणसे पेरली होती. अत्यंत हुशारीने त्यांना गाफील ठेवून बाहेर पडायचं अशी योजना महिपतीमामांनी आखली.


आता या जागेतून हेरांच्या नजरेला हुलकावणी देऊन बाहेर पडायला हवे. त्यासाठी महिपतीमामांनी योजना आखली. त्यानुसार आधी सुनंदा व तारा दोघी काही मोजक्या लोकांबरोबर बाहेर पडतील. त्यानंतर मग हळूहळू एकेकजन बाहेर पडेल. दोन मैल दूर भैरोबा आहे. तिथल्या देवळात भेटायचं ठरलं.


त्यानुसार सुनंदा व तारा बाहेर पडल्या.
. देवराईतून बाहेर येताच त्यांना दौलतीच्या माणसांनी हटकल,"अय! इकडं कुणीकड?"

तसा बजाबा पुढं झाला,"मुजरा सरकार! आवो शेजारच्या गावातली मंडळी हायेत. महादेवाला आलतो."

तस तो हेर संशयाने बघत म्हणाला,"गाडीत कोण हाय?"

तेव्हा बजाबा परत मुजरा करत म्हणाला,"देशमुखीन बाई आहे खुद्द."

हे बोलल्यावर मात्र दौलतीची माणस गप्प बसली. सुनंदा व तारा दिलेल्या ठिकाणी पोहोचल्या. आता उरलेल्या लोकांना बाहेर पडायचं होत. त्याप्रमाणे महिपती मामा आणि बकुळा सुंदराला घेऊन बाहेर पडले. बाकीचे वेगवेगळ्या वाटेने निघाले.


महिपतीमामांनी बेमालूम वेषांतर केले होते. धनगरांच्या वेशात त्यांना कोणीही ओळखले नाही. इकडे खविसखान सुद्धा त्यांना शोधत होताच. तेवढ्यात त्याची नजर एका घोडेस्वारावर पडली. त्याने इशारा केला. त्याप्रमाणे तो घोडेस्वार पकडला गेला.

खविसखाना समोर स्वाराला पेश केलं. खान पुढे झाला त्याने विचारलं,"कहा जा रहे हो?"

स्वाराने अदबीने उत्तर दिलं,"पडोस गाव,उधर मेहमान हाये ना."

खान परत गरजला,"खर बोल,नही तो गर्दन मारू."


स्वाराने परत उत्तर दिलं,"खानसाब गरीब बंदा हु,खोट नाय बोलत."

खानाने इशारा केला तस स्वाराला सोडलं. बाहेर पडताच त्याने वाट बदलली. आपला माग काढला जातोय हे त्याने ओळखलं. दौलतीच्या माणसांनी आख्खी देवराई पालथी घातली पण आत कोणीच नव्हत. माघ पौर्णिमा जवळ आली होती.


भैरोबा, खंडोबा मात्र देवळात गेली चारशे वर्ष अंधाराची अमावस्या होती. इकडे खविसखानाने स्वाराचा पाठलाग करायला मोजके हेर पाठवले होते. भैरोबाच्या देवळात पोहोचल्यावर सुंदराला खूप सुरक्षित वाटलं.


मनापासून हात जोडत ती म्हणाली,"देवा! आरे कधी संपणार हे सगळं?"

गावोगावी जत्रा आणि यात्रेची तयारी सुरू झाली. पण पोरी माहेरी जाऊ शकत नव्हत्या. का? अहो का काय? वाटत एखाद्या शैतानानी गाठलं तर. जत्रेत एखादा सुलतानी फेरा आला तर.


इकडे खविसखान वडगावजवळ आला. वडगावच्या शिरकाईची जत्रा माही पुनवेच्या आठ दिवस आधी असायची. खविसखान हसला,"जत्रा मे बहोत माल आयेगा, जो अच्छा लगे उठाकर लाव।"



किती ही विकृती. काय हे हाल महाराष्ट्रातील लेकीबाळींचे. दुसऱ्या दिवशी वडगावात जत्रा भरली. लपत छपत माहेराला आलेल्या लेकी आणि नवीन आलेल्या सुना देवीची ओटी भरायला बाहेर पडल्या.


कोणी नवस फेडायला येत होतं तर कोणी बोलायला. देवीच्या जत्रेच उत्साही वातावरण सगळीकडेच होत. पोरीबाळी,लेकिसुनांचे हसण्या खिदळण्याचे आवाज येत होते. गावातील लोक एकमेकांना भेटत होते. अचानक गलका झाला. घोड्याच्या टापांचे आवाज येऊ लागले. क्षणात जत्रा उधळली. सगळीकडे हाहाकार उडाला.


सापडेल तेवढ्या पोरीबाळी उचलल्या गेल्या. काहीजणी सैरावैरा जंगलात पळाल्या आणि वाचल्या बिचाऱ्या. खानाला नजराणा पेश करायला हबशी उतावीळ झाले. कुलीन पोरी आता पुढे कुठे जातील? हा सगळा अंधकार मिटणार कधी?


सगळ्यांना पकडून खानाच्या शामियान्यात आणले. भेदरलेल्या, घाबरलेल्या या मुलींचे भविष्य काय?
खान जोरात हसला,"ये तीन हमे चाहीए,बाकी उठालो जिसे जो पसंद हो."


कानात शिसे ओतावे तसे ते शब्द काळीज चिरीत होते. आता यातील प्रत्येकीच्या नशिबी होता फक्त आणि फक्त वनवास.


खानाने निवडलेल्या तिन्ही पोरींना बाजूला केले. रडून अश्रूसुद्धा सुकले होते त्यांचे. गिधाडांच्या तावडीत सापडल्यावर लचके तोडले जाणारच. खविसखान तर परका पण...दौलती सारखे आपलेसुद्धा यात सामील होते. ती रात्र फक्त आणि फक्त किंकाळ्यानी भरली होती. ज्या ऐकून सह्याद्रीचे कान फाटले. तो आकांताने ओरडत होता माझ्या मदतीने लढा लेकरांनो.


सकाळी खविसखान उठला. त्या तिन्ही पोरी उदवस्त नजरेने पडून होत्या.

खविसखानाला त्याच्या मुनीमने विचारलं,"सरकार यांचं काय करायचं?" खविसखान म्हणाला,"बेच दो या नोच लो."


त्या पोरींना जनान्यात नेलं. इकडे खानाच्या हेरांनी भैरोबाच मंदिर हेरलं. सुंदरा सापडली. वाऱ्याच्या वेगाने ते ही बातमी द्यायला धावत आले. खविसखान ही बातमी ऐकून खुश झाला. प्रत्यक्ष मला आव्हान देणारी नक्की आहे तरी कोण? तिला सोडणार नाही. असे म्हणत त्याने सैन्याला हुकूम दिला.


खविसखान आणि दौलती दोघेही निघाले एका वाघिणीच्या शिकारीला. आजवर कित्येक पोरीबाळी वासनेला बळी पडल्या. सुंदराने आपल्या डोळ्यांनी हे सगळं पाहिलेलं होत.


इकडे महिपतिमामांनी लांबूनच घोड्याच्या टापांचा आवाज ऐकला. मामा धावत आले,"पोरी घात झाला,गनीम आला."


सुंदरा म्हणाली,"मामा! किती पळणार आपण आणि कुठवर? कधीतरी हे होणारच होत."


तारा आणि सुनंदासुद्धा पुढं आल्या,"आक्का,आज मरताना पण चार जण घेऊन जाऊ बरोबर."


आपल्यासाठी जीव टाकणाऱ्या ह्या सगळ्यांना पाहून सुंदराला भरून आलं.आपल्याला इतका जीव लावणाऱ्या ह्या माणसांना मरणाच्या दारात लोटायचं? या सगळ्यांचा काय दोष? केवळ आपल्यावर जीव लावला हा? पण आता विचार करायला वेळ नव्हता. सुंदराने काहीही ठरवलं तरी ही लोक तिची साथ देणारच होती. तेव्हा सुंदराने एक निश्चय केला. ती महिपती मामांशी बोलायला गेली.


काय ठरवलं असेल सुंदराने? पाहूया पुढच्या भागात

क्रमशः


🎭 Series Post

View all