मी मानिनी! मी मर्दिनी! भाग 1

इतिहासातील अनेक अनाम विरांगणांच्या कार्याला स्मरून लिहिलेली कथा
सदर कथेला इतिहासाचा आधार घेतला आहे.यात कोणतेही ऐतिहासिक सत्य सांगण्याचा दावा नाही.महाराष्ट्रात 300 वर्षांपूर्वी शिवराय नावाचा तेजसुर्य जन्मला.पण...त्याआधी असणारी यवनी काळरात्र आणि तिला छेदणाऱ्या राजांवर जीव ओवाळून टाकणारी रयत.याचा संदर्भ घेऊन कथा लिहिली आहे.


सन 1602,ठिकाण जावळीच्या जंगलात,महिना मार्गशीर्ष दिवस अमावस्येचा.त्या निबीड अरण्यातून तामसगीरांचा तो ताफा चालला होता.बैलगाड्या आणि मेण्यातून स्त्रिया आणि बाकीचे पायी चालत होते.

"आर ये शिरपा!लवकर गाडी हाण बाबा.या जावळीच्या जंगलात दिवसा काही दिसना,"सुंदरा जोरात ओरडली.

सुंदरा सातारकर पन्नाशीच्या उंबरठ्यावर असूनही नजरेतील तेज अजून कायम.चेहऱ्यावर बरेच काही भोगल्याच्या, अनुभवल्याच्या खुणा,अजूनही अटकर बांधा असलेली सुंदरा.सुंदराने आयुष्यात एवढे काही पाहिले होते की अंधाराला घाबरण शक्यच नव्हतं.मग कोणाला घाबरत होती सुंदरा?का एवढी कावरी बावरी झाली होती.याला कारण होते यवन.गेली तीनशे चारशे वर्ष मराठी मुलुखाचा मसनवटा केला होता या परकीय लोकांनी.लेकिबाळी भरदिवसा नासवल्या जात.दूर नेऊन विकल्या जात.पण...यवन किती झाले तरी परके.इथे आपलेसुद्धा लचके तोडायला तयारच होते की.


अश्या आठवणींच्या इंगळ्या मनाला डसू लागल्या की सुंदराचे मन चाळीस वर्षे मागे धावत जायचे.सुंदरा..हे नावसुद्धा तिला शिसारी आणायचे पण..काय करू शकणार होती ती?चाळीस वर्षांपूर्वी तरी काय करू शकली?मौजे बुरकेगाव.पुण्याच्या पश्चिमेला वसलेले टुमदार खेडे.शंभर उंबरा असलेले
मावळखोऱ्यातील एक सुंदर गाव.याच गावात हौसा रहायची आपल्या आई वडिलांसोबत. शेतकरी माय बाप आणि त्यांची चार भावांच्या पाठीवरची लाडकी बहीण हौसा.सगळं कसं साजिर गोजिर.पण..हा पण अनेक आयुष्य बदलून टाकणारा होता.सभोवती असणारी परिस्थिती भयंकर.कधी,कुठून आणि कसा सुलतानी फेरा येईल याचा नेम नाही.तरीसुद्धा मावळी मुलुखातली ही साधीभोळी माणसं तग धरून होती.तशातच एक दिवस विपरीत घडलं.

हौसाच्या थोरल्या भावाच लगीन ठरलं.आता लगीन ठरलं म्हंजी आनंदाची गोष्ट.हौसा,तिचे भाऊ,आई आणि बाप खुप आनंदी होते.पत्रिका वाटल्या,हळद लागली आणि लग्नाला जायला वऱ्हाड निघालं.दोन दिवसांचा पल्ला होता.नवरीच्या गावात नुसती लगीनघाई उडालेली.सगळा मानपान आणि रितिभाती सांभाळत लग्न लागत होतं.लग्नात नवरीच रूप रखुमाई सारख दिसत होतं.लग्न लागलं.पाठवणीची वेळ झाली.सगळे वऱ्हाडी निघाले.पहिला मुक्काम सुखरूप पार पडला.

तेवढ्यात गावातून खबर आली.नवी मोहीम निघाली.हे ऐकताच हौसाच्या बापाने घाई केली.सगळं वऱ्हाड भराभर रस्ता उरकत होत.एवढ्यात दुरून घोड्याच्या टापांचा आवाज येऊ लागला.बैलगाड्या पळत होत्या.थोड्याच वेळात वऱ्हाड घेरलं.हौसाच्या बापाने आपला फेटा काढून खानाच्या पायावर ठेवला.

मोठया आर्जवान म्हातारा म्हणाला,"खानसाब!डाग दागिन घ्या,पर

..."खुनशी हसत त्या हबशाने फेटा उडवला,"लूट लो सबकुछ"

हुकूम ऐकूनच हौसा बाप कोसळला.त्याही गोंधळात धाकटा भाऊ हौसाला घेऊन रानात लपला.नवी नवरी गेली,तरुण पोर संपली.उरली फक्त म्हातारी माणसं आणि जखमी तरुण.हौसा थोरले दोन भाऊ गेले.हौसाच तोंड धाकट्याने दाबलं होत.वाचलेले वऱ्हाड गावात आलं.गावावर अवकळा आली.
हौसाच्या बापाला हा धक्का सहनच झाला नाही.

"विठ्ठला कुठेयस रे बापा!द्रौपदीची अब्रू राखलीस पण गरिबाला इसरलास पांडुरंगा".हा विलाप उभ्या गावाला पिळवटून काढत होता.

हौसाच्या बाळजीवाला काही कळत नव्हतं.नुसती भेदरून गेली होती पोर.त्या दिवसाला हळूहळू विसरले सगळे.अहो असे रोज दरोडे पडत होते.रडणार तरी किती?रडायला डोळ्यात अश्रूसुद्धा शिल्लक नव्हता.सगळीकडे नुसता हाहाकार उडालेला.हौसा आता दहा वर्षांची झाली.तिच्या लग्नाचा विचार केला तरी बाप दचकून उठायचा.त्याला मारले गेलेले लेक आणि पळवलेली सून समोर दिसायची.
म्हातारा आपलं दुःख पांडुरंगाला सांगायचा,

"इठ्ठला आरे कधी संपणार हे सगळं?कुठं लपून बसलास रे बापा."
हळूहळू हळूहळू झालेली घटना गाव विसरू लागलं.धरून तरी किती ठेवणार.शिवारात राबायच आणि अस मरून जायचं.म्हणता म्हणता सहा महिने गेले.पेरण्या झाल्या.वारीचे दिवस आले.हौसाच्या बापाने वारीची तयारी सुरू केली.जाताना हौसाच्या तोंडावरून हात फिरवत म्हणाला,"पोरी पंढरपुरावरून काय आणू ?"हौसा रडत म्हणाली,"मला काय नग,तू फक्त लवकर ये रे बाबा".बाप वारीला गेला.हौसा आणि तिचे भाऊ आईसोबत शेतात कष्ट करू लागले.गेले दोन तीन दिवस पाऊस नुसता धो-धो कोसळत होता. सगळं गाव घरात दबा धरून बसलेलं.अशातच आसमान कोपलेलं असताना सुलतानी धाड आली.गावातल्या प्रत्येक घरातुन पोरंबाळी,लेकिसूना आणि तरणे म्हातारे सगळ्यांना खेचून बाहेर आणलं जात होतं.सगळ्यांना चावडीवर जनावरसारखं उभं केलं.हबशी म्हाताऱ्या लोकांना मारून टाकत होते.तरुणांना पकडत होते.लेकिसुनांचे काय??हाच प्रश्न गेली चारशे वर्ष महाराष्ट्रातल्या प्रत्येक बाईच्या काळजात सलत होता.सुंदर पोरींना आत डांबत होते.इतरांना तसेच बांधत होते.हौसाजवळ हबशी जाताच हौसाचा भाऊ उसळला,"तिला हात लावू नगस."पुढच्या क्षणी हौसाच्या भावाचं डोकं धडापासून वेगळं झालं.सगळा गाव लुटला गेला.हौसा आणि तिच्या आईची ताटातूट झाली.हौसा सारखी रडत होती.बापाला हाक मारत होती.सगळी माणसं जनावरसारखी बांधून घेऊन चालले होते.
आपल्या लेकरांचे हाल पाहून रडत होता सह्याद्री आणि टाहो फोडत होत्या कृष्णा ,कोयना,भीमा,भामा.रात्रभर चालून थकव्याने हौसा झोपी गेली.

दुसऱ्या दिवशी हौसाला जाग आली तेव्हा ती निराळ्याच जागेवर होती.तिच्या आईच,भावाचं,गावातल्या माणसांच काय झालं?तिला काहीही कळत नव्हतं.आजूबाजूला कितीतरी पोरी,बायका होत्या.सगळ्या हौसाकड पहात होत्या.हौसा खूप घाबरली होती.ती रडू लागली,"मला आईकड जाऊ द्या,माझा भाऊ कुठंय?मला इथं नाही रहायचं."तेवढ्यात एक मध्यमवयीन माणूस फूड झाला.त्याने हौसाकड पाहिलं आणि म्हणाला,"आता हेच तुझं घर आणि मी तुझा आई,बाप आणि मालक."हौसा रडत उठली,"माझा बाप वाट बघत असलं,म्या जाते घरी."असे म्हणून हौसाने पुढे पाऊल टाकताच तिच्या जोरदार कानाखाली बसली.हौसाच डोकं भिंतीवर आदळल. डोळ्यापुढे अंधारी आली.थोड्या वेळाने हौसा एका खोलीत होती.डोक्यावर पट्टी बांधलेली.सगळं अंग ठणकत होत.तिच्या शेजारी तिच्या आईच्या वयाची एक सुंदर बाई बसली होती.हौसा तिला हात जोडून म्हणाली,"मावशे!मला घराकडं जाऊ दे की,माझा बाप आला आसल ग वारीवरून."त्या बाईच्या डोळ्यात पाणी आलं.हौसाच्या डोक्यावरून मायेन हात फिरवत ती म्हणाली,"पोरी!आता परतीची वाट नाही,सगळं संपलं."हौसाला आता थोडं थोडं समजलं.आपल्याला विकलं गेलं.विकलं..आजही तो शब्द कानात शिसे ओतावे तसा काळीज जाळत जातो.हौसाच्या.. नाही सुंदराच्या. त्या घटनेने एक कुलीन शेतकऱ्याची पोर बाजारात आली.तमासगीर झाली.हौसाची सुंदरा झाली.तिला डोळ्यांच्या पाण्यात परत तो प्रसंग दिसू लागला.बकुळामावशी.भांगेत उगवलेली तुळसच.
सुरुवातीला काहीही न ऐकणाऱ्या हौसाला तिने समजावलं,"माझं ऐक पोरी,नाच गाणं शिक."
हौसा रडत म्हणाली,"मावशे आग!"बकुळा तिला जवळ घेत म्हणाली,"नाही ऐकलं तर तुला खानाच्या जनान्यात विकतील,त्यापेक्षा हे बर, माझं ऐक पोरी".
बस...तो पोरी शब्द ऐकून हौसाने स्वतःला बकुळामावशीच्या हवाली केलं.


भाकरी रांधणारे हात पायात चाळ बांधू लागले.विठुरायाच्या भजनात खुलणारे स्वर लावणी आळवू लागले.हौसा...आई बापाने हौसेने ठेवले नाव पुसून गेलं.मागे उरली सुंदराबाई सातारकर.डोळे वहात असताना सुंदरा अक्षरशः सुन्न झाली होती.जुनी भळाळती जखम परत परत ताजी होत होती.जितक्यांदा आठव यायचा तितक्यांदा रक्त वहात रहायची.सुंदरा टक्क जागी होती.हळूहळू हळूहळू दिवस मावळू लागला आणि घोड्यांच्या टापांचा आवाज येऊ लागला.भीतीच सावट गडद होऊ लागलं. पुढे काय होईल?सगळ्यांच्या डोळ्यात भीती दाटली होती.


🎭 Series Post

View all