मी मानिनी ! मी मर्दिनी ! भाग 7

सुंदराला पुन्हा एकदा नशीब त्याच जुन्या वाटेवर घेऊन जाईल का?


 (सदर कथानक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर असले तरी कोणत्याही ऐतिहासिक सत्याचा दावा करत नाही. सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)

मागील भागात आपण पाहिले की हैबती पाटील मोहिमेवर निघाले. सुंदराने त्यांना निरोप दिला. इकडे सुगीचे दिवस असल्याने सगळं गाव शेतीच्या कामात गुंतल होत. आता पाहूया पुढे...


मोहिमेवर आल्यापासून हैबती अस्वस्थ होता. दौलतीने मोहिमेवर न येणं आणि खविसखान मागे थांबणं. या दोन्ही गोष्टी त्याच्या डोक्यातून जात नव्हत्या. नक्कीच काहीतरी भयंकर घडणार असे त्याला वाटत होते. इकडे दौलतीने गावात चौकशी करायला सुरुवात केली. उरलेल्या म्हाताऱ्या लोकांना आणि बायकांना त्याने सुंदराविरुद्ध भडकावणे सुरू केले. एक तमाशात नाचणारी बाई आता गावच कर्तेपण पेलणार का?


सुनंदा आणि तारा मात्र गावातल्या बायकांना समजावत. आता पाटील गावात नाही. आक्का सगळं नीट सांभाळतील. तरीही जुनी लोक सुंदरपासून जरा लांबच रहात.

इकडे खविसखान मागे थांबला होता. हा खविसखान म्हणजे अक्षरशः नावाला जागणारा होता. कित्येक संसार त्याने धुळीला मिळवले होते. दौलतीने ठरवलं,सुंदराचा काटा काढायचा तो सुभेदाराच्या मदतीने तेसुद्धा हैबती मोहिमेवर असताना.

त्यासाठीच तो सतत खविसखानाला भेटत होता. त्याची मर्जी संपादन करत होता. एकदिवस असाच तो सुभेदाराच्या गढीवर गेला.

खाणं पिणं झाल्यावर खविसखान त्याला म्हणाला,"पाटील बहोत दिन हुए कुछ नया नहि चखा।"


बस्स...दौलतीचे डोळे चमकले. त्यानं जाळ विणायला सुरुवात केली,"हुजूर हमारे गाव मे कूच चिजे है चखणे लायक।"

ते ऐकताच खविसखान म्हणाला,"तो फिर पेश करो।"

दौलती मुजरा करत हाताने इशारा करत म्हणाला,"बस दो दिन हुजूर।"

दौलती आनंदात बाहेर पडला. बरोबर वर्मावर बोट ठेवलं होत त्याने. गावात आल्यावर दौलतीने आपली माणस सगळीकडे पेरली. थेट सुंदराला हात लावणं धोक्याच होत. सुंदराला चूक करायला भाग पाडायची. सुभेदाराच्या डोळ्यात एकदा सुंदरा भरली की पुढच काम आपोआप होणार होत.


दौलतीच्या माणसांनी हेरलं,तारा आणि सुनंदा सुंदराच्या जिवलग मैत्रिणी होत्या. या दोघींना हात लावला तर सुंदरा नक्की प्रतिकार करणार. सुनंदा आणि ताराची नीट माहिती काढायला दौलतीने परत माणसे पाठवली. ताराचे भाऊ आणि वडील मोहिमेवर गेले होते. सुनंदाच्या घरी फक्त म्हातारा बाप आणि चार बहिणी होत्या.


शेतावर कापणी, मळणीची कामे जोरात सुरू होती. सुंदरा सगळीकडे जातीने लक्ष देत होती. सुगीच्या भरभरून दानामुळं सगळे आनंदात होते. तारा आणि सुनंदा रोज सुंदराकडे जात. एक दिवस सकाळी सुंदरा शेतावर जायच्या तयारीत असताना लांबूनच तारा पळत येताना दिसली.


ती जोरात ओरडत होती,"आक्का! आक्का! सुनंदाला वाचवा."


सुंदराला काहीतरी घडल्याच लगेच लक्षात आलं. ती जवळ जाईपर्यंत तारा कोसळली.

ताराला आधार देत सुंदरा विचारू लागली,"काय झालं? सुनंदा कुठेय?"

तारा अतिशय घाबरली होती. सुनंदा...हबशी...सुभेदार...ती घाबरत बोलत होती. क्षणात सुंदराच्या लक्षात सगळा प्रकार आला.

इकडे सुनंदा सुद्धा शक्य तितका प्रतिकार करत होती. तिला घेरल्याबरोबर तिने ताराला पुढे जायचा इशारा दिला. जवळपास पंधरा हबशानी सुनंदाला घेरले होते.


तिने गोफण उचलली आणि गरजली,"खबरदार एक पाऊल पुढं टाकाल तर,एकेकाचे डोस्के फोडील."

ते ऐकून त्यांचा म्होरक्या हसत होता,"हा!हा!हा! जानेमन अब तुम्हे सिधा महल लेकर जायेगे।"


त्यासरशी सुनंदाने गोफणीतून दगड भिरकावला. सह्याद्रीची वाघीण लांडग्यांना अशी शरण जाणार नव्हती. सुनंदाने ठरवलं प्राण गेला तरी यांच्याबरोबर जाणार नाही. इकडे तारा आणि सुंदरा वेगाने हालचाली करत निघाल्या. घोड्याला टाच मारली. महिपतिमामा सुद्धा सोबत होतेच. गावाबाहेर सुंदरा आणि मामांनी हबशाना गाठलं.


सुंदरा जोरात गरजली,"खबरदार! तिला हात लावाल तर हात कलम केले जातील."


सुंदराने तलवार उपसली. महिपतिमामा दांडपट्टा सावरून सज्ज झाले. ताराने गोफण काढली. चारही बाजुंनी हल्ला चढवला. युक्तीने सर्वांनी मिळून लढा दिला. एकेक जण धारातीर्थी पडत असलेला पाहून म्होरक्या मागे फिरला. सुनंदा जखमी झाली होती. तारा आणि सुंदराने सुनंदाला सावरलं. सगळे गावाकडे यायला निघाले.


सुंदरा गावात आली. सगळेजण घाबरले होते. थेट सुभेदाराच्या माणसांवर हल्ला झाला. आता नक्कीच गावावर हल्ला होईल. म्हातारी कोतारी माणसे आता फक्त देवावर भरोसा ठेवून होती. आता मात्र सगळे एकमेकांना धीर देत होते. आख्ख्या गावात फक्त आणि फक्त दौलती खुश होता. त्याने टाकलेला डाव यशस्वी झाला होता.


आता फक्त लागलेल्या आगीत तेल ओतणे एवढेच काम होते. महिपती मामा सुद्धा सावध झाले.

सुंदराला ते म्हणाले,"पोरी आता नक्कीच प्रतिहल्ला होणार. आपल्याला लवकरात लवकर हैबती पर्यंत बातमी पोहोचवायला हवी."


सुंदरा पदराने घाम पुसत असताना म्हणाली,"खरय मामा! पण मला त्यावेळी फक्त सुनंदा दिसत होती."


सुनंदा आणि तारा दोघीही म्हणाल्या,"आक्का,आता मात्र आपल्याला सावध राहायला हवे."


महिपतीमामा म्हणाले,"आधी गावातल्या पोरीबाळीना सुरक्षित हलवावे लागेल.त्याबरोबरच आपल्याला सुंदराला इथून हलवायला लागेल.पोरी तयारी कर."


झालेल्या प्रकाराने बकुळा आणि बजाबासुद्धा घाबरले होते. सुंदराने सगळी बांधाबांध केली.लवकरात लवकर गाव सोडणे आवश्यक होते.

दौलतीने लगेच स्वतः सुभेदाराच्या भेटीसाठी प्रयाण केले. अत्यंत कुटील योजना त्याने डोक्यात तयार केली होती. हबशी मार खाऊन खविसखानाच्या गढीवर पोहोचले. आजवर सुभेदाराच्या वाटेला कोणीही गेलं नव्हतं.त्याला वाटेल ती पोरगी उचलून आणावी. मन भरलं की बाजारात विकावी. आज पहिल्यांदा कोणीतरी समशेर उचलली होती.


त्याने रागाने विचारलं,"किसने की ये हिम्मत? कोण है जिसने हमारे सिपाही को मारा।"


तो घाबरलेला हबशी कसबस म्हणाला,"कोई औरत हे सरकार।"


हे उत्तर ऐकताच खविसखान पिसाळलेल्या लांडग्यासारखा गुरकावला,"औरत! किसकी औरत! कहासे आयी।"


तेवढ्यात दौलतीने आत प्रवेश केला,"ते मी सांगतो सरकार!"


गर्रकन मागे वळत खविसखान म्हणाला,"बोलो! जलदी बताव! किसने किया है यह?"


तसा दौलती हळूच म्हणाला,"हैबती पाटलाने ठेवलेली बाई आहे सरकार,सुंदरा नाव आहे तीच."


खविसखान हसला,"मतलब फक्त नाम की सुंदरा है या...." तसा दौलती पुढे झाला,"नाही सरकार,बाई दिसायला बी लै टेचदार हाये,तिची हौस पुरवाया तुमीच पायजे."


खविसखान हसला,"तो फिर देर क्यू? चलो उठाकर लाते है।"


दौलती परत मुजरा करत म्हणाला,"तुम्ही कशाला कष्ट घेता सरकार.मी हाये ना."


खविसखान ओरडला,"नही! ऐसी खास चिजे हम खुद जाकर लाते है। फ़ौज को तयार करो।"


दौलतीने टाकलेला डाव यशस्वी झाला होता. सुंदराला परत बाजारात बसविण्याची त्याची प्रतिज्ञा सत्यात उतरताना दिसत होती.

इकडे महिपती मामा आणि सुंदराने गाव सोडायची तयारी केली. लगोलग गावातील तरुण पोरींना सोयऱ्या धायऱ्या कडे धाडलं. म्हातारी माणसं आणि आजारी लोक फक्त गावात उरली.

सुनंदा आणि तारा सुंदरसोबत जायला तयार झाल्या. सुंदराने त्यांना समजावलं पण त्या बरोबर निघाल्याच. महिपतिमामा, मामी,बकुळा,बायजा आणि हैबतीच्या बरोबर पहिल्यापासून मळ्यात काम करणारे काही विश्वासू लोक घेऊन सुंदरा गाव सोडून निघाली.


मुलाला बरोबर घेतलेलं पाहून मामा म्हणाले,

"पोरी,बाळाला त्याच्या आजोबांकडे दे.पाटील घराण्याचा वंश धोक्यात यायला नको."


सुंदराने सहा महिन्यांच्या त्या बाळाला एकदा छातीशी लावलं,

"बाळा!आता परत मी भेटेल की नाही माहीत नाही.या आईला विसरू नकोस."


तिने बाळाला एका विश्वासू कुणबीनीकडे सोपवलं,"मामंजिना माझा दंडवत सांग."

सुंदराकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता संकट कोणत्याही क्षणी दारात येऊ शकत होत.

इकडे खविसखान सुंदराला मनात जुळवत होता. हैबती पाटील जिच्यावर भाळला ती काही और असणार. तिला भोगायच मग बघू पुढे. वाटेत येईल त्या गावतील सापडतील त्या पोरी बाळी उचलून,देवळे फोडून सुभेदार पुढे जात होता.


म्हातारी माणसं आणि अनाथ झालेली मुलं रडत होती.


महादेवा!!धाव रे!


असा आकांत मांडत होती. तो ऐकायला जात होता फक्त सह्याद्रीला आणि त्याच्या लेकींना म्हणजे भीमेला,कृष्णेला,कोयनेला आणि सह्याद्रीच्या कुशीतून बाहेर पडलेल्या प्रत्येक जीवनवाहिनीला.


खविसखान हैबती पाटलाच्या गावाच्या वेशीवर पोहोचला. त्याने हैबतीच्या वाड्यावर निरोप दिला. सुंदराला आमच्या हवाली करा. हैबतीचे आबा वेशीवर सामोरे आले.


त्यांनी झुकून मुजरा केला,"सुभेदार ती बाई आता गावात न्हाई,त्यांनी सांच्याला गाव सोडल."


खविसखान चिडला,"त्याला हैबतीची भीती होतीच. तरीही त्याने धान्य लुटलच. तोवर सुंदरा कोणत्या बाजूला गेली याची बातमी दौलतीच्या माणसांनी काढली .

सुंदरा आपला स्वाभिमान आणि अब्रू वाचवू शकेल का?

क्रमशः




🎭 Series Post

View all