मी मानिनी ! मी मर्दिनी ! भाग 41

मोहना कामगिरी फत्ते करेल का? धोंडिबा आणि सुंदरा वाचणार का?

भाग 41

(सदर कथानक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर असले तरी कोणत्याही ऐतिहासिक सत्याचा दावा करत नाही. सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)

मागील भागात राजगडावरून मोहीम सुरू झाली.महाराज निसाणी घाटाच्या मार्गे येणार होते.इकडे नाईकांनी रंगो वाकड्याला धडा शिकवायची योजना आखली.सुंदरा आणि धोंडिबा जंगल वाट रोखून बसले.आता ह्या मोहिमेत पुढे काय थरार रंगेल?


महाराजांनी फौजेच्या दोन तुकड्या केल्या.एक तुकडी रडतोंडीच्या घाटातून जावळीवर चालून जाईल आणि खुद्द महाराज महाबळेश्वर पठारावरून निसाणी घाटातून जावळीवर हल्ला करतील अशी योजना आखली.फौजेने जावळीकडे कूच केले.इकडे मोहना आणि बिजली दबा धरून होत्या महादेवाच्या मंदिराच्या जवळ.आज नाईकांनी दिलेली एक कामगिरी फत्ते करायची होती.

मोहना म्हणाली,"बिजले सावध रहा.तुला काही व्हायला नको."

बिजली हसली,"नको भिऊ,काय व्हत नाय मला.चिमणी हाय की माझ्यासोबत."

तेवढ्यात मोराच्या ओरडण्याचा आवाज आला.सगळे सावध झाले. रंगो वाकडा मोऱ्यानी मनाई करूनही आज बाहेर आला होता.वासनेच्या आगीत आंधळा झालेल्या त्याला कालपासून ती ओलेती बाई दिसत होती.सोबतच्या साथीदार शिपायांना म्हणाला,"तुमि हिकड लांब थांबा.म्या इशारा करताच तिला उचलून सरळ निघायचं."

शिपाई हसले,"न्हाय एवढं जोखमीच काम हाय, आमाला..."

तसे वाकडा हसला,"ह्या पन्नास मोहरा ठीव.आन बाई वापरून झाली की चाखायला मिळल."

हे ऐकून मोहनाचा हात तलवारीवर जात होता.तरीही तिने स्वतःला सांभाळले.इतक्यात रंगो वाकड्याला ती येताना दिसली.तशीच ओली, टंच.ती जवळ येताच वाकडा जवळ गेला,"लई थंडी वाजत आसलं,गरम करू का थोड."

ती पटापट देवळाला फेऱ्या मारत होती.इकडे लांबून चारही सैनिक मिटक्या मारत तिला पहात होते.अचानक मागून हालचाल झाली.काही कळायच्या आत चारही जणांचे गळे चिरले.वाकड्याला आता अनावर होत होते.त्याने देवळाच्या मागे तिचा हात धरला आणि शीळ मारली.पटकन घोंगडी आली.काही कळायच्या आत वाकडा घोंगडी खाली आला.डोक्यावर एक फटका बसला आणि अंधार झाला.

सुभाण्याने रंगो वाकडा पाठकुळी टाकला.जंगलात नाईकांच्या पुढे मुटकुळ टाकून मोहना म्हणाली,"नाईक,ह्याला आताच मारते."
नाईक म्हणाले,"पोरी जरा थांब.त्याला संपवायचा पण असा नाही. त्याच्याकड वाड्यात ये जा करायचं परवानगी पत्र हाय."बहिर्जी पुढची योजना आखत होते.


इकडे सुंदरा आणि धोंडिबा जंगलात दबा धरून होते.धोंडिबा सुंदराला म्हणाला,"आक्का,किती दिस आस तमाशात जगणार हायेस?तुला न्हाई वाटत का एका जागी घर असावं?"

सुंदरा शांत होऊन म्हणाली,"पोरा, माझं रूप म्हणजे शाप आहे.एका खऱ्या मर्दावर मी प्रेम केलं,पण त्याच्या घराची माझ्यासाठी धूळधाण झाली."

एवढे बोलून सुंदरा गप्प झाली.एवढ्यात एक हेर धापा टाकत आला.धोंडिबा आणि सुंदरा झाडावरून खाली उतरले,"काय बातमी हाय?"

हेर बोलू लागला,"मुबारक येताना गाव लुटीत निघालाय.कित्येक पोरीबाळी त्याने पकडल्यात."

सुंदरा चिडली,"आता इथून पुढे काहिही लुटायला ना मुबारक उरेल ना खविसखान.कोणतीही हौसा आता सुंदरा होणार नाही."

हेर बातमी देऊन निघून गेला.इकडे नाईकांनी रंगो वाकड्या जवळ असलेले पत्र काढून घेतले,"मोहना,राज उद्या जावळीपर्यंत पोहोचतील.त्या आधी वाड्यात आपली माणसं पेरायची."

मोहना म्हणाली,"जशी आज्ञा नाईक."

मोहना आणि चिमणी ते पत्र घेऊन वाड्यात घुसल्या.सोबत अब्दुल आणि सखाराम होता.मोहना म्हणाली,"अब्दुल आणि सखाराम तुम्ही घोड्यांच्या पागेत लपा.आम्ही चोर दरवाज शोधून ठेवतो."


चंद्रराव मोरे,त्याचे काका हनुमंतराव,त्याचे भाऊ आणि मोऱ्यांच्या दरबारातील काही शुर वीरांची मसलत सुरू झाली.हनुमंतराव म्हणाले,"भोसले दोन्ही बाजूंनी हल्ला करत्याल.रडतोंडी आन निसाणी दोन्हीकड पहारा वाढवा."

जावळीची तटबंदी मजबूत होती.चंद्रराव म्हणाले,"देशपांडे,वाड्यात गनीम घुसू देऊ नका."

तसा तो शूरवीर म्हणाला,"छातीचा कोट करतील आमची माणसं.वाड्याच्या मुख्य दरवाजावर तेलाने उकळलेली कढई ठेवू.त्याचे तोंड बरोबर बाहेर उघडत."


ही भयंकर योजना ऐकून मोहना गडबडीत मागे फिरली आणि घात झाला.चिमणी आणि मोहना सापडल्या.हनुमंतराव मोरेंनी आज्ञा दिली,"ह्या दोघींना कोठडीत डांबा. गनिमाचा समाचार घेतला की मग पाहू यांच्याकडे."


जावळी संरक्षण करण्यासाठी सिद्ध होत होती आणि शिवबाराजे वाऱ्याच्या वेगाने जावळी घ्यायला झेपावत होते.मुबारक आणि खविसखान एका गावात थांबले. खविसखान म्हणाला,"अब जावळी पास आहे.ह्या गावातून जेवढ्या पोरी सापडतील त्या उचला."

खविसखान तंबूत वासना शमवून बाहेर आला.मनाशी म्हणाला,"जी आग सुंदराबाई मधी हाय.किसी और मे कहा?"


मुबारक आणि खविसखान दोघेही रस्त्यात येईल ते लुटत होते.हनुमंतराव मोरे आपल्या निवडक सैनिकांना गोळा करत होते.हनुमंतराव म्हणाला,"भोसले लई गनिमी कावा म्हणून ओरडत्यात. जावळीत दावू त्यांना.चोर दरवाजे धरून रहायचं.भोसल्यांची फौज आत घुसली की जंगलातून बाहेर यायचं आन हल्ला करायचा."दोन्ही बाजूंनी तयारी चालूच होती.



नाईक अस्वस्थ येरझाऱ्या घालत होते.मोहनाकडून कहिही सांगावा आला नव्हता.मोहना संकटात तर नसेल ना?ही शंका सतत सतावत होती.एवढ्यात हेर आला,"रडतोंडी घाटात चकमक सुरू झालीय.मोरे मजबूत हाय तिकड."

तेवढ्यात दुसरा स्वार येऊन पोहोचला,"राज पठारावरून निघालं, निसाणी घाटातल्या चौक्या राजांनी उदवस्त केल्या.आता राज थेट जावळीवर चालून येणार."


हे ऐकताच नाईकांनी खुणेची शीळ वाजवली.पटापट मावळे गोळा झाले.नाईक बोलू लागले,"राज आल,चला आवरा.आता लढायची तयारी करा."

ह्या सगळ्या गडबडीत रंगो वाकडा निसटला.नाईक वेगाने राजांच्या सोबत लढायला निघाले.इकडे मोहना.घाबरली नव्हती.ती चिमणीला म्हणाली,"काही करून इथून निसटल पाहिजे.आपल सैन्य आणि राजांचा जीव धोक्यात हाय."


चिमणी म्हणाली,"तिकड वर बग मोहना,बारीक खिडकी दिस्तीय."मोहना म्हणाली,"पण तिथवर चढायचं कस?"

चिमणी हसली,"आता ह्यो पटका बांधलाय डोक्याव त्याचा ऊपेग कदी व्हणार मग."

मोहना विसरली होती की त्या पुरुषी वेशात होत्या.दोघींनी योजना आखली.एवढ्यात लांबूनच,"हरहर महादेव,जय भवानी अशा घोषणा ऐकू येऊ लागल्या.मोहना म्हणाली,"चिमणे घाई कर,राज पोहोचलं."


मुबारक आणि खविसखान जंगल जवळ आल्यावर थांबले.सुंदरा विचारात पडली,"धोंडिबा,हे आत का येत नाहीत?नक्कीच पाणी मुरतंय."

तेवढ्यात मोऱ्यांचा स्वार येताना दिसला.मुबारक म्हणाला,"अब जाना पडेगा.फर्मान मे लिखा है इस के साथ आये."

मुबारक आणि खविसखानाने निवडक पन्नास सैनिक पकडुन आणलेल्या कैद्यांसाठी ठेवले आणि ते निघाले.जंगलात शिरतात चारही दिशांनी बाण येऊ लागले.सैनिक कोसळू लागले.मुबारक ओरडला,"पेडके पीछे छुपो."सैनिक घाबरले होते.तेवढ्यात रुपाजी,सुंदरा आणि धोंडिबा ह्यांनी खानाला घेरायला.सुरुवात केली.सगळ्या बाजूंनी सैनिक पाहून मुबारक समजला बहिर्जी भारी ठरले होते.


महाराज जावळीत पोहोचले.जोरदार चकमकी सुरू झाल्या.मावळे लढत होते. मोऱ्यांच्या फौजेत सुद्धा मराठेच त्यामुळे माघार कोणी घेत नव्हते.तेवढ्यात महाराजांनी पाहिले एक तलवार विजेच्या वेगाने तळपत होती.महाराजांनी बहिर्जी नाईकांना बोलावले,"बहिर्जी,हा कोण समशेर बहाद्दर?"

बहिर्जी म्हणाले,"राज,ह्या देहाला मुरारबाजी देशपांडे म्हणतात."

राजे म्हणाले,"बहिर्जी ह्यांना जिवंत पकडावे."बहिर्जी निघाले.मुरारबाजी आवेशाने लढत होते. बहिर्जी चारही बाजूंनी फास आवळत चालले.थोड्याच वेळात मुरारबाजी कैद झाले.त्याबरोबर मोऱ्यांच्या फौजेने आत आसरा घेतला.


मोऱ्यांच्या गढीवर हल्ला करायला मावळे सज्ज झाले.इकडे मोहना आणि चिमणी बाहेर पडले.मोहना म्हणाली,"चिमणे,तू नाईकांना सांगावा दे."

चिमणी म्हणाली,"व्हय,स्वतःला जप.येते म्या."

मोहना सावधगिरीने पुढे निघाली.राजांनी गढीचा दरवाजा तोडायचा हुकूम दिला.मावळ्यांनी सागवानी ओंडके घेतले.दरवाजाला धडक दिली तेवढ्यात वरून उकळते तेल सांडू लागले.मावळे भाजून निघत होते.एका बाजूला उकळते तेल दुसरीकडे वरून येणारे बाण.राजांनी मागे व्हायचा इशारा दिला."बहिर्जी, काहिही करून ती कढई उडवली पाहिजे."

बहिर्जी म्हणाले,"व्हय,पर आत कस जाणार?थोडा येळ लागलं."

चिमणी चोर दरवाजाने बाहेर पडली.तिला सैनिकांनी पाहिले.चिमणी वेगाने धावत होती.पाठीत दोन बाण घुसले होते.तरीही चिमणी धावत पोहोचली,"नाईक,नाईक."

बहिर्जी चिमणी जवळ गेले,"चिमणे,मोहना कुठाय?"चिमणी हसली,"ती कढई पडल तवर थांबा.मोहना कामगिरी फत्ते करल."


इकडे सुंदरा समोर आली.जंगलात तिला पाहून खविसखान हसला,"उस दिन गावके सामने नंगा छोडा था,अब रंडी बनाके रखूंगा."

सुंदरा म्हणाली,"ह्यावेळी वाघीण एकटी नाही.तुझ आणि तुझ्या मुबारकच नरड फोडणार."

तेवढ्यात धोंडिबा म्हणाला,"आणि ह्या वाघिणीच्या बछडा,ह्यो महादेव हाय आज बरोबर."सुंदरा त्याच्याकडे पहात राहिली.मायलेक भेटले होते.मरण समोर असताना.काय होईल पुढे?मोहीम.कशी फत्ते होईल?


वाचत रहा.
मी मानिनी....
क्रमशः



🎭 Series Post

View all