मी मानिनी ! मी मर्दिनी ! भाग 32

सुंदरा आणि मोहना जावळीच्या दिशेने,नवी आव्हाने झेलत.

(सदर कथानक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर असले तरी कोणत्याही ऐतिहासिक सत्याचा दावा करत नाही. सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)


मागील भागात मोहना आणि सुंदरा जंगलाच्या वाटेने वेषांतर करून जावळीत प्रवेश करायला निघाल्या.बकुळाने फड घेवून जावळीची सिमा ओलांडली. आता पुढे काय होणार?


सगळी रात्र झाडावर बसून काढल्यावर सकाळी सगळे जागे झाले.मोहनाने सगळ्यांना हळूच उठवले.सखारामने सर्व वस्तू खाली उतरवल्या.छोट्याशा मंदिरात कोंडलेल्या शेळ्या बाहेर काढल्या.मोहनाने सुंदराला हाक मारली,"आक्का,ये आक्का.उठ लवकर."

सखाराम,छबु आणि सुंदरा जागे झाले.मोहनाची जखम अजून ताजी होती.त्यात असा प्रवास.त्यामुळे तिला त्रास होत होता.सगळेजण पुढच्या प्रवासाला निघाले.इकडे बिजली आणि मार्तंडने गावातील तरुणांना विश्वासात घेतले.काही विश्वासू माणसे निर्माण केली.कारण इथून कुमक पाठवताना हे सगळे आवश्यक होते.


सुंदरा आणि मोहनाचा प्रवास मात्र अवघड होता.सगळेजण जंगलातून चालू लागले.तेवढयात सुंदराला काहीतरी पायाखालून गेल्याचे जाणवले.सळकन साप निघून गेला.

मोहना घाबरली,"आक्का,जपून.पाऊल ठेवताना सर्वांनी जपून ठेवा."तेवढ्यात तिकडून माणसे चालल्याची चाहूल लागली.सगळेजण सावध झाले.

तो आवाज जवळ येत होता.सगळेजण झाडीत लपले.शेळ्या तशाच होत्या.तेवढ्यात शेळ्या बघून समोरचा म्हणाला,"मकसूद, ह्ये देख बकरी हाये.चल एक घिऊ."

तेवढ्यात दुसरा म्हणाला,"ये,आर आधी ह्या सगळ्या पकडलेल्या बकऱ्या पोचवा.मंग बाकीच."

तिसरा म्हणाला,"व्हय,मुबरकखान आणि खविसखान च्या फर्माईश हाये.ह्या येळी कवळा आन झालेला दोन्ही माल पायजे."

तेवढ्यात एकजण बोललाच,"मकसूद,पर ह्या तर आपल्या मूलखातल्या पोरीबाळी है।"

तेव्हा मकसूद ओरडला,"हळू,अब्दुल आर कोणी सून लेगा।"

महादू हसला,"आर आपुन हुकमाच ताबेदार.उचल म्हणलं की उचलायची पोरगी."

अब्दुल चिडला,"अरे,पर आपुन जनावर नाय ना.मला शिवबाराज म्हणत्यात ओ अच्छा लगता है।दुसरोकी औरत माँ है।"

तेवढ्यात मकसूद ओरडला,"लवकर चला.आपला माग काढत कुणी यांना सोडवायला यायचं.मागच्या येळी माहीत हाये ना?काय झालेलं?"

महादू म्हणाला,"म्हणून तर ह्या येळी जंगलातून चाललोय आपुन."


तेवढ्यात मोहना गरजली,"थांबा,खबरदार पुढे आलात तर."

आवाज ऐकून एकजण घाबरला,"भूत,भूत!आर हिथ भूत हाये."

मकसूद चिडला,"चूप,एकदम चूप.कोणाची गूस्ताकी हाये ही?"

मोहना तलवार घेऊन समोर आली,"मी हाये, गुमान ह्या पोरींना सोडून द्या.नाहीतर मुंडकी उडवीन एकेकाची."

महादू हसला,"ये पोरी,खुळी झालीस का काय?आग नुसती तलवार धरता आली म्हंजी तू आठ दहा जणांना मारू शकती अस वाटल का काय तुला?"

महादूच्या बोलण्यावर सगळे हसू लागले.तेव्हा मोहना गरजली,"मग येळ नका घालवू.या समोर.बघू काय व्हतंय?"


महादू हसला,"घेरा र हिला.हिलापण याच पोरींमधी देऊन टाकू."

मोहनाला घेरून आठ जण उभे राहिले.तलवारी उपसल्या गेल्या.तेवढ्यात मोहनाने शिट्टी वाजवली.एका क्षणात सगळीकडून दगड भिरकावले जाऊ लागले.गोफणीच्या दगडांनी डोकी फुटायला लागली.काही कळायच्या आत ते आठही जण मारले गेले.

महादू आणि मकसूद बघतच राहिले.मोहना म्हणाली,"चल आता या कोण येतंय?"


तसे महादू आणि मकसूद चिडून धावून गेले.मोहनाची तलवार विजेच्या चपळाईने चालू लागली.काही वेळातच मोहनाने त्या दोघांना नरकाची वाट दाखवली.

अब्दुल एकटा उरला होता.त्याने तलवार खाली केली,"मै लढेगा नही ताई.तुला काय पायजे ते घेऊन जा."


तेवढ्यात झाडीतून सखाराम,छबु आणि सुंदरा बाहेर आले.सुंदरा म्हणाली,"अब्दुल,ज्याच्या काळजात शिवबाराजे आहेत तो असे वाकडे वागणार नाही."

अब्दुल एकदम खुश झाला,"मतलब,आप सब महाराज के आदमी है?"

सखाराम हसला,"तस समज."

अब्दुल गडबडला,"फिर जंगल मै?"

छबु म्हणाला,"मिया,त्ये सांगतो नंतर आदि ह्या पोरींना सोड."


अब्दुल स्वतःच्या डोक्यात चापट मारत म्हणाला,"भुलक्कड हाये मी.ह्या सगळ्या पल्याड गावातल्या पोरी हायेत."अब्दूलने त्यांना मोकळे करताना माहिती दिली.


सुंदरा म्हणाली,"अब्दुल,आम्हाला जावळीचा रस्ता दाखवशील?"

मोहना तिला गप्प करत होती.अब्दूलने ते पाहिलं,"आक्का,ह्ये काम मजबुरीत करायचो मी.घरी बुढी हाये,बहिणी हायेत तीन.अल्ला कसम, आपको जावळी लेकर जाउगा।"


अब्दूलने सगळ्या पोरींना मोकळे केले.आता ह्या पोरी आणि अब्दूलबरोबर चालायला सुरुवात झाली.डोंगर चढून जायला रात्र झाली.डोंगरावरून गावातले दिवे दिसत होते.त्यातली एक चुणचुणीत पोरगी मोहनाला म्हणाली,"आक्के,त्ये बघ आमच गाव."


सुंदराने न थांबता गावात जायचा निर्णय घेतला.डोंगर कड्यावर वसलेल्या ह्या गावापर्यंत कसाई पोहोचले. सुंदरा हा विचार करत असताना अब्दुल म्हणाला,"आपा, जावळीतली सगळी गाव अशी होरपळली हाये.डोंगरात असू नायतर रस्त्याव."


सुंदरा खिन्न हसली.सगळे वेगाने डोंगर उतरत असताना गुरगुर ऐकू येऊ लागली.तशी एकजण म्हणाली,"लांडग हायेत.नका घाबरू.विळ हायेत क?एकेकाला कापून काढू."

तस सखारामला हसू आलं,"जनावर कापू शकता ना,मंग ह्ये माणसातल लांडगबी कापून काढायला शिका."

सगळेजण झपाझप उताराने जवळजवळ धावत होते.गाव जवळ येऊ लागले तसे लांडग्यांचे आवाज बंद झाले.

गावातील घरे दारे बंद होती.तेवढयात एका पोरीने हाक मारली,"आये,दार उघड."

तशी भर्रकन तिची आई बाहेर आली.समोर पोरीला बघून ती धावत सुटली.पटापट मुके घेऊ लागली.जरावेळाने तिचे लक्ष सगळ्यांकडे गेले.तशी तिने लोकांना आवाज दिले.दार उघडली. माणसे बाहेर आली.तिथेच अंगणात सगळे जमले.

त्यातील एक म्हातारा बोलला,"पोरींनो,तुम्हाला महादेवाने वाचीवल बघा."

तशी त्यातली एक पोरगी म्हणाली,"महादेवाने न्हाई,पार्वतीन. आन ही बघ पार्वती."


तिने मोहनाला हाताला धरून पुढे आणले.त्यानंतर सगळी हकीकत ऐकल्यावर त्या गावातील लोक सुंदराला म्हणाली,"ह्या बदल्यात काहीपण माग सुंदराक्का."

सुंदरा हसून म्हणाली,"जंगलातून आलोय,लई भुका लागल्यात."

एवढे ऐकताच एक म्हातारी उठली,पदर खोचित म्हणाली,"पोरी थोडा येळ द्ये आता गरमागरम वाढतो बघ."

तशी म्हातारीची सून म्हणाली,"आत्या,आवो आम्ही हाये की भक्कम."

चांदण्यांच्या प्रकाशात सगळ्या गावाच्या प्रेमात न्हालेले ते जेवण अमृताहून गोड लागत होते.


इकडे फड थांबला.रूपा बकुळामावशीला म्हणाली,"मावशे,सुंदराक्का आणि मोहना उद्या मुक्कामावर पोचतील ना?"

बकुळामावशी हसली,"नको काळजी करू.माझ्या वाघिणी बरोबर पोचतील बघ उद्या.काही होणार नाही त्यांना."


तरीसुद्धा बकुळामावशी स्वतः चिंतेत होती.सुंदरा सुखरूप पोहोचावी अशी मनोमन प्रार्थना करत ती झोपायचा प्रयत्न करू लागली.


इकडे सुंदरा आणि मोहनाला मात्र जंगलातील चालीने छान गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली.मोहना तर गाव बघूनच खुश झाली.उतरत्या छपराची कुडाची घर,गोठे,आजूबाजूला दाट जंगल.


तेवढ्यात एक पोक्त जाणती आणि खानदानी स्त्री समोर आली,"आम्ही गुणवंताबाई मोरे.ह्या गावच्या पाटलीन.खरंतर आजवर असे हल्ले झाले नाहीत.पर आता गावात तरुण पोर आणि बापे नाहीत.त्ये बघून डाव साधला."


तशी सुंदरा हसली,"गुणवंताबाई,राग मानू नका पर आई काळूबाईने स्वतः राक्षस मारला.आवो तिकडे जिजाऊ आऊसाहेब स्वतः तलवार आणि लेखणी घेऊन उभ्या आहेत.आपल्यासारख्या जाणत्या स्त्रीने तेच काम इथे करावे."


पाटलीनबाई पुढे झाल्या,"आक्का,म्या शब्द देते तुला.ह्या गावच्या रक्षणासाठी आता आम्ही उभ्या राहू."

क्रांतीची ज्योत अशी पेटत असलेली पाहून सुंदराचा उर भरून आला.


अब्दूलला बोलवून सुंदरा म्हणाली,"अब्दुल,आता निघायला हवे.बकुळामावशी आणि सगळेजण मुक्कामावर पोहोचतील.आपल्यालासुद्धा पोहोचायला हवे."


सुंदरा आणि मोहनाची ओटी भरताना एक म्हातारी बोलून गेली,"देवीआई सगळ्या इच्छा पुऱ्या करील बघ तुमच्या.ही म्हातारी मरतानाबी देवीकडं हेच मागण मागल."


गावकरी गाव संपेपर्यंत पोहोचवायला आले.काल वाचवलेल्या पोरीच्या एक आठ वर्षांची पोरगी होती.गंगू नावाची.ती पटकन धावत आली,मोहनाच्या कंबरेला मिठी मारत म्हणाली,"आक्का, म्याबी तुझ्यासारखी तलवार शिकणार आन राक्षसांना मारणार."


मोहनाने गंगूला पोटाशी धरले.जड अंतकरणाने सगळ्यांनी गावाचा निरोप घेतला.


आता रस्ता दाखवायला अब्दुल बरोबर होता.त्यामुळे चिंता नव्हती.फडातली माणसे सुद्धा मुक्कामाच्या दिशेने निघाली.मोहना आणि सुंदरा आता कोणत्याही आव्हानाला सिद्ध होत्या.जावळीच्या मोहिमेत काहीही झाले तरी स्वराज्याची सेवा करायला मिळणार होती.आजवरच्या जन्माचे सार्थक होणार.


नाईकांच्या योजनेनुसार सगळे आतापर्यंत घडत होते.त्यांचे हेर आणि माणसे चारही बाजुंनी जावळीच्या दिशेने येत होते.


पुढे ह्या मोहिमेत काय होईल?सुंदरा आणि मोहनाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल?

वाचत रहा. मी मानिनी...

क्रमशः

🎭 Series Post

View all