मी मानिनी ! मी मर्दिनी ! भाग 22

सुंदराच्या प्रवासात आणखी काय घडणार?

(सदर कथानक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर असले तरी कोणत्याही ऐतिहासिक सत्याचा दावा करत नाही. सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)

मागील भागात आपण पाहिले की सुंदराने एका धटिंगणाला चांगला धडा शिकवला.आता वडगावला जायच्या प्रवासात आणखी काय घडेल?



सुंदराने सांगितलेली हकीकत ऐकून मोहना आणि बिजली चिंतेत पडल्या.कारण साप कधीही पलटून वार करतो हे त्यांना अनुभवाने माहीत झाले होते.

बिजली सुंदराला म्हणाली,"आक्का,आता तो गेलाय,पण परत हल्ला करणार नाय कशावरून?"

तसे सखारामने त्याला दुजोरा दिला,"बिजली बरोबर बोलतेय,रात्री आणखी कुमक घेऊन त्याने हल्ला केला तर?"


सुंदराने मोहनाकडे पाहिले. मोहना बोलू लागली,"आपल्याला ही जागा सोडावी लागलं,आपण रस्त्याच्या मार्गाने जायच."

तसे बजाकाका बोलला,"रस्त्यावर आपल्यावर हल्ला करणं त्यांना सोपं न्हाय जाणार का?"


मोहना फक्त हसली.जेवणखाणे आटोपून सगळे रातोरात निघाले.इकडे बिजलीचा अंदाज बरोबर ठरला होता.त्याने दोन गावे पुढे जाऊन कुमक मागवली.


सुभानराव जोशात म्हणाला,"चला र आता परत,फरफटत त्या नाचीला घिऊन यिवू.तिच्या आख्ख्या फडाला पेटवून देऊ."


कुमक घेऊन सुभानराव पोहोचला. तिथे फक्त राख आणि मोडलेल्या चुली होत्या.तस सुभानराव चवताळला,"रातीच तोंड काळ केलं,जंगलाच्या वाटेनं चला.भिऊन तिकडूनच पळाले असणार."


रात्रभर जंगलात फिरूनही सुभानरावच्या हातात काहीही लागले नाही.त्याने दातओठ खातच जावळीची वाट धरली.


मोहनाने बांधलेला अंदाज अचूक ठरला.पाठलाग न होता त्यांनी भोर गाठले.निरा नदीच्या काठावर वसलेले टुमदार भोर, पहाटेच्या प्रहरी सुंदर दिसत होते.गावाबाहेर मुक्कामाची जागा पाहून गाड्या थांबल्या.रात्रभर प्रवास झाल्याने सगळे दमले होते.बकुळामावशी लगेच खाली उतरली. चुलीला जागा पाहिली. पाणी भरायला पोरींना पिटाळून ती दूध मिळतेय का हे पहायला बजाकाकाला सांगून आली.



पोरींना सुंदरा बरोबर घेऊन निघाली.हिवाळ्याच्या दिवसांमुळे सगळीकडे हिरवळ अजून टिकून होती.झरे,ओढे,नद्या खळाळत वहात होत्या.नदीच्या पाण्याचा खळखळ आवाज,पाखरांची किलबिल,सगळे कसे अगदी चित्रासारखे भासत होते.



सगळ्यांनी आंघोळी उरकल्या.पाण्याचे हंडे भरले आणि परत निघाल्या.एवढ्यात रूपाच्या पायात काहीतरी अडखळल.अजून थोडा अंधार होता.त्यामुळे नीट अंदाज घ्यायला रूपा खाली वाकली.


खाली बसताच तिने हाक मारली,"बिजली,मोहना,लवकर या.इथं बघा काय हाये."


सगळेजण धावत पळत तिथे पोहोचले.एक सुंदर विशीची तरुणी विवस्त्र त्या नदीपात्रात पडलेली होती.तिच्यावर काय प्रसंग गुदरला असेल हे अनुभवी सुंदराने ओळखले.तिने पटकन खांद्यावरचे ओले लुगडे त्या पोरीच्या अंगावर टाकले.


सुंदरा ओरडली,"मोहना,तिला उचलून घ्या,दोघींनी धरा नीट.अजून श्वास चालू आहे तिचा."


मालू,पारूआणि इतर तिघी-चौघींनी त्या पोरीला पकडले. मुक्कामी या सगळ्या पोहोचल्यावर पुरुष माणसे नदीवर गेली.


सुंदराने बकुळामावशी आणि बजाकाकाला आवाज दिला,"मावशे, आंबे हळद गरम कर. पोरगी थंडीत पडून असल्याने गारठली आहे. तिला जरा शेकल की बरे वाटेल."


बकुळा तिच्याकडे पाहून म्हणाली,"बिचारीला कुणी या अवस्थेत सोडलं असलं काय माहित?"


मोहना चिडून म्हणाली,"मावशे,सैतानांच्या राज्यात हे असंच चालायचं."


त्या मुलीला शेकून आंबेहळदीचा लेप लावला.त्यानंतर सगळेजण खाऊन झोपी गेले.रात्रभर प्रवास केल्याने सगळेजण गाढ झोपले होते.


हळूहळू हळूहळू दिवस वर सरकत होता.तेवढ्यात मोहनाला बाहेर हालचाल जाणवली.कोणीतरी चालत असल्याचा भास झाला.मोहना तलवार घेऊन बाहेर आली.मोहनाने हळूच अंदाज घेतला,तिला कोणीही दिसले नाही.तरीही सगळ्या राहुट्या भोवती फिरून तिने खात्री करून घेतली.दुपार होत आली होती.सगळेजण जागे होऊ लागले.


सुंदराने आवाज दिला,"पोरींनो, आवरा,आता निघायला पाहिजे."


तेवढ्यात बिजली म्हणाली,"आक्का, ह्या पोरीचं काय करायचं?तिच्या घरचे तिला शोधत असतील."

सुंदरा हसली,"अश्या अभागी पोरींना कोणी शोधत नाही.तिला आपल्यासोबत घ्या.शुद्धीत आल्यावर बघू."

वडगावच्या दिशेने मुक्काम हलवायची तयारी झाली.
सुंदराने मालूला बोलावलं,"मालू,या पोरीला तुमच्या गाडीत ठेवते.तिच्यावर नीट लक्ष ठेव.काय प्रसंग आलाय तिच्यावर काय माहित?"


मालू म्हणाली,"मी ठिवते लक्ष तिच्यावर नको काळजी करुस."


आता मुक्काम हलला.इकडे पांडू आणि धोंडिबा बहुरूपी बनून जावळीच्या हद्दीत घुसले.जावळीचा चंद्रराव मोरे स्वराज्याची आगळीक काढत होता.स्वराज्यातील गुन्हेगारांना अभय देत होता.त्याला धडा शिकवायचा राजांनी बेत आखला होता.त्याअंतर्गत गुप्तहेर कामगिरीवर होते.धोंडिबा आणि पांडू त्यातीलच.असे अनेक अनामिक झपाट्याने स्वराज्यासाठी काम करत होते.



सुंदरा आणि मोहना पुढील प्रवासाची योजना आखत होते.मोहना म्हणाली,"आक्के,वडगावला जाऊन परत माघारी सातारला यावं लागणार."


सुंदरा म्हणाली,"होय,यावेळी सुपाऱ्या इकडच्याच आहेत जास्त."

तशी रूपा बोलली,"म्हंजी,हा हेलपाटा म्हणायचा मग."


तेवढ्यात मोहनाचे डोळे चमकले,"आक्के, इथून राजगड जवळ आहे.आपण जाऊया का राजांना भेटायला?"


सुंदरा हसली,"आपल्याला लाख वाटेल,पण आपली भेट घेतील का ते?"


रूपा मध्येच म्हणाली,"भेट नाही झाली तरी राजगडाच्या पायथ्यावर डोकं टेकवून येऊ की.एका शेतकरी बाईशी बदअंमल केला म्हणून चौरंग करायची शिक्षा देणारा राजा देवच की.देव नाही भेटला तर पायरीवर डोकं ठेवू."


पोरींचा उत्साह पाहून सुंदरा म्हणाली,"मग आजचा मुक्काम शिवापुरात नको,राजगडाच्या पायथ्याला करू."


तशी मोहना उत्साहात म्हणाली,"हो,तसेच करूया.आधी शिवापुरात दर्शन घेऊ आणि मग पुढला पल्ला गाठू."



सूर्य मावळायला गाड्या शिवापुरात पोहोचल्या.तिथे दर्शन घेतल्यावर सुंदराने एका आजीला विचारले,"आजी,इथून राजगड किती लांब आहे."


आजी सावध झाली,"तुला का ग चवकशा?राजगडाव काय असली नाच गाणी व्हत नस्त्यात. आमच्या राजाला हे आवडत बी नाय आणि खपतबी नाय."


तेवढ्यात म्हातारीचा मुलगा दर्शन करून आला,"आये,कोणाला रागावती?काय पायजे आक्का?"



तशी मोहना पुढे झाली,"दादा,आमी तमासगीर हाये,पर शिवबाराजांची किरत ऐकून आलोय,दर्शन घ्याच हाये."


तो हसला,"अस व्हय,आवो इथून सहा मैल गडाचा पायथा हाये,आमचा दादाबी शिलेदार हाये राजांचा.भेट झाली तर आमचाबी मुजरा सांगावा."



त्याच्याकडून रस्ता विचारून सुंदरा आणि मोहना परत आल्या.गाड्या राजगडाच्या मार्गावर निघाल्या.


अंधार पडायला लागला.रानात गार वारा वहायला लागले.चार तासांच्या प्रवासानंतर दुरून राजगडावच्या मशाली दिसू लागल्या.मोहनाने तिथूनच राजाला मनात मुजरा घातला.पायथ्याच्या गावात येऊन गाड्या थांबल्या.


तस त्या गावातील पाटील आणि त्यांचे शिपाई पुढे आले,"कोण हाये,इथं कशापायी मुक्काम करताय?"


सुंदरा खाली उतरली,"राजसनी भेटायचं होत."


तसे पाटील परत म्हणाले,"झडती घ्या रे यांची."


सुंदराने डोळ्याने ईशारा केला.पाटलांनी झडती घेतली.पाटलाचे शिपाई ओरडले,"पाटील!हत्यार हायेत गाडीत,गडाव घातपात करायचा बेत दिसतोय यांचा."



प्रसंग पाहून मोहना पुढे झाली,"पाटील,समदीकड काय राजांच्या स्वराज्यातील माणसं न्हाईत,आवो बाईची अब्रू कवडीमोल झालीय.आन राज परक्या बाईला आई मानत्यात. राजांच्या पायावर स्वतः डोकं उतरवून ठिविन. पण एकदा ऐकून घ्या."


एवढे सांगितल्यावर पाटील वरमले,"बोला,पर तमाशाच्या गाड्यात भाल, तलवारी कशाला?कोण चालवत ह्या?"


बिजली म्हणाली,"कोण म्हंजी?आमी चालवतो.ही मोहना एकावेळी चार जणांना ऐकत न्हाय."


तस पाटलाचे शिपाई हसले,"उगा फुकाच्या बाता नको करू."


रूपा चिडली,"मग हत्यार दे,आन ये की मैदानात."


पाटलाने मोहनाला इशारा केला.मोहनाने तलवार घेतली.तिला चार शिपायांनी घेरले.तलवार सुरू झाली.वाऱ्याच्या वेगाने मोहना फिरत होती.काही कळायच्या आत चारही जण निशस्त्र झाले.


पाटील भानावर आले,"शाबास पोरी!शाबास!जिकलस तू.अशी मर्दानी पाहायली नव्हती कधी.कोण हाये तुझा वस्ताद?"


तशी मोहनाने सुंदराकडे ईशारा केला.पाटील म्हणाले,"खुशाल रातभर रहा आक्का,आणि शिरप्या,पळत वाड्याव जा.पाटलीन बाईंना सांग पन्नास माणसं हायेत पंगतीला."



सुंदरा पुढे झाली,"दादा,मुक्कामाला जागा दिली.आता पुढचे नको."


तस पाटील म्हणाले,"आक्का,दादा म्हणालीस नव्ह,मग एकडाव माहेरपण घे,न्हाई म्हणू नग.उद्या मी स्वतः येतू की गडावर."


असे म्हणताच सुंदरा तयार झाली.गाड्या पाटलाच्या वाड्याकडे वळल्या.पाटील स्वतः मोहना आणि सुंदराबरोबर चालत होते.एक तमासगीर बाई माहेरवाशीण म्हणून चालली होती.हेच तर आहे माझ्या शिवबाराजांचे स्वराज्य.सुंदरा मनात म्हणाली.


पाटलांच्या वाड्यावर सुंदराचे कसे स्वागत होईल?गडावर राजांची भेट होणार का?पाहू पुढील भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all