मी मानिनी ! मी मर्दिनी ! भाग 21

सुंदरापुढे येणारी नवी संकटे तिला कुठे घेऊन जातील

(सदर कथानक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर असले तरी कोणत्याही ऐतिहासिक सत्याचा दावा करत नाही. सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)

मागील भागात आपण पाहिले की मोहनाने अचानक एक प्रश्न धोंडीबाला विचारला.त्या प्रश्नाचे नक्की काय उत्तर तो देईल.ही प्रेमकथा आता काय वळण घेईल.पाहूया.


तमाशातील बाईला तुम्ही बायको म्हणून स्वीकाराल?

सुंदराने विचारलेल्या प्रश्नावर धोंडिबा मंद हसत म्हणाला,"येळ आली की मी ह्याच उत्तर नक्की देईल.आज मला कामगिरी महत्वाची हाये,शिवबाराजांच्या स्वराज्य निर्माण करायच्या कामापुढं दुसरं काही नाही."


मोहनाने त्याच्या डोळ्यात पाहिले,"ह्या मोहनाने आजवर कोणाला जीव लावला नाही.तुमची वाट आयुष्याच्या शेवटापर्यंत पहायची तयारी आहे माझी."


धोंडीबाने मोहनाचा हात हातात घेतला,"हा धरलेला हात सोडणार नाही.फक्त माझ्यावर विश्वास ठेव."


त्या चांदण्यात कितीतरी वेळ गप्पा रंगल्या.आजवर मोहना कोणत्याही पुरुषाबरोबर एवढे मनमोकळे बोलली नव्हती.

धोंडिबा म्हणाला,"उद्या आम्ही जावळीच्या खोऱ्याकडे जातोय.परत भेट लवकर व्हायची नाही."


मोहना हसत म्हणाली,"रोज भेट होण्यापेक्षा आपल्या माणसाची आठवण काळजात जपून प्रेम करत राहणे महत्वाचे."


नीरव शांततेत दोघांनाही एकमेकांची मने कळत होती.आयुष्यभर जपला जाणारा बंध आपसूकच जुळला होता.थोड्यावेळाने मोहना परत जायला निघाली. पण आता परत जाणारी मोहना पूर्णपणे बदलून गेली होती.



दुसऱ्या दिवशी धोंडिबा आणि पांडू सगळ्यांचा निरोप घेऊन निघाले.सुंदरा धोंडीबाकडे पहात राहिली.का कोण जाणे आज हैबती पाटलांची आठवण मनात दाटून येत होती.दोघेही निघून गेले.मोहनाला एकदम रिते झाल्यासारखे वाटले. तरीही मनातील भावना तिने दिसू दिल्या नाहीत.


धोंडिबा गेल्यावर रूपा म्हणाली,"मोहना,आठवण येत का?तुमच्यात काय बोलणं झालं?"

मोहनाने तिला सगळे सांगितले.तेवढ्यात सुंदरा आत आली.मोहनजवळ बसून तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहिली.दोघींमधला हा मायेचा बंध त्यांचा एकमेव आधार होता.


बजकाकाने आवाज दिला,"सुंदराक्का,सुंदराक्का, कुठं हायेस?आज निघायचं ना?"


ती हाक ऐकून सुंदराने आवाज दिला,"बजाकाका, इकडे आहे मी.निघायची तयारी करा.आता थेट वडगाव मुक्काम.मध्ये सुपारी नाही कुठलीही."

सगळ्यांनी आवराआवर करायला सुरुवात केली.वडगाव पुणे परगण्यातील गाव.इथून पोहोचायला चार मुक्काम पडत होते.सुपारी नसली तरी राक्षसांची बोलावणी असायचीच.

वडगावला जाईपर्यंत कोणतेही संकट येऊ नये,\"आई काळुबाई पाठीशी रहा ग बाई\",सुंदराने मनोमन देवीची प्रार्थना केली.थंडीचे दिवस असल्याने घाट उतरून अंबाडे गावात मुक्काम करायचा ठरलं.


गाड्या जुंपल्या आणि प्रवास सुरु झाला.हसतखेळत आपली दुःख विसरून जगायचं आता सगळे शिकले होते.पायथ्याशी पोहोचेपर्यंत अंधार पडू लागला.गावाबाहेर मोकळी जागा पाहून गाड्या थांबल्या.सुंदराने उतरून जागा पाहिली,त्यानंतर गाड्याचे बैल सोडले.


बायजमावशी म्हणाली,"सुंदरा,गावापासून लांब जागा हाय,पाणी आणि वाणसामान आणायला लांब जावं लागलं."

सुंदरा म्हणाली,"मावशी,सुपारी नसताना गावाजवळ मुक्काम करायचा म्हणजे सापाच्या शेपटावर पाय देऊन तो का चावला?अस विचारल्यासारखे आहे."

मोहना पुढे झाली,"मावशे,आक्का बरोबर बोलतीय, आजची रात तर काढायची."


तेवढ्यात सुंदराने छबुला आवाज दिला,"छबु,बिजले, गणपा आणि सखाराम तुम्ही गावात समान आणायला जा,मोहना तू तीनचार पोरी घेऊन पाणी भरायला जा.बाकीच्यांनी तंबू लावायला घ्या.थंडीचे दिवस आहेत."


सुंदरा सगळ्या सूचना देऊन कामाकडे वळली.

" रूपा, ये रूपा!",मोहनाने आवाज दिला.रूपा पळतच आली,"

अग,जरा दम खा की.काय वाघ बिघ लागला का काय माग?"

मोहना हसत सुटली,"वाघ परवडला,पण सुंदराक्का नको.पाणी भरायला उशीर झाला तर ती काय करेल."

रूपा आणि आणखी दोन पोरींना घेऊन मोहना निघाली.इकडे बिजली आणि छबु निघणार एवढ्यात सुंदराने आवाज दिला,"बीजले,थांब मीसुद्धा येते बरोबर."


बिजली म्हणाली,"तू?कशाला?आराम कर की आक्के."


तरीही सुंदरा सोबत निघालीच.
अंबाडे गाव पुण्याच्या बाजूने मांढरदेव घाटाच्या पायथ्याला असलेलं टुमदार गाव.बागायती भाग,शेतीभाती, आंब्याची झाड.असे निसर्गाच्या कुशीत वसलेले गाव.सुंदरा,गणपा,सखा आणि छबु व बिजली गावात आले.गावातील वाण्याचे दुकान कुठे आहे ते सखरामने एकाला विचारलं.सांगितल्यानुसार सगळे चालू लागले.


वाण्याच्या दुकानात पोहोचल्यावर सुंदराने यादी सांगितली.वाणी लाळ गाळत वाणी सुंदराकडे पहात होता.


बिजली खाकरून म्हणाली,"आवो आजोबा,सामान देताय नव्ह."


तसा म्हातारा ओशाळला,"देतो की पण एवढी घाई कशाला?"

सुंदरा हसून म्हणाली,"मग घरी नेता की काय आम्हाला,तेवढीच वहिनीची ओळख होईल."


वाणी पटापट सामान भरू लागला.एवढ्यात एक घोडा दुकानासमोर येऊन थांबला.

घोड्यावर बसलेल्या स्वाराने वाण्याला जोरात म्हंटल,"आज लयी स्पेशल गिऱ्हाईक आल्यात रे.माल.... नीट ईक त्यासनी."



त्यावर त्याच्या बरोबर असलेले फिदीफिदी हसू लागले. सुंदराने संयम राखून सामान घेतलं.ते सगळे निघणार एवढ्यात त्यांना घोडेस्वारांनी घेरले.


सुंदराकडे बघत तो म्हणाला,"आवो बाई,तहानलेल्या माणसाला पाणी पाजाव, पुण्य लागतंय."


तशी बिजली चिडली पण सुंदराने तिला डोळ्यांनी गप्प बसवलं.गावातून भराभर वाट चालायला सुरुवात केली.


त्या घोडेस्वाराने छबुचा हात धरला,"बाई,दूध न्हाय तर निदान ताक तरी द्या की,गॉड मानून घिऊ आम्ही."


सुंदराने वर पाहिलं,"आम्हाला जाऊ द्या.आमची माणसं वाट पहात असतील."


तो छद्मी हसत म्हणाला,"जावा,पर याला सोडा हिथ,थोड्या वेळाने मन भरलं की दिन पाठवून."


असे म्हणून तो पुढे वाकला आणि छबुने त्याच्या मानेला विळखा घालून त्याला खाली पाडला. इकडे सुंदरा,बिजली,गणपा,सखा यांनी तलवारी काढल्या.एका क्षणात त्यांनी घोड्यावरचे स्वार लोळवले.


छबु हसत म्हणाला,"रावसाहेब ताकद हातात असतीय, कमरेखाली न्हाई."


झालेल्या अपमानाने तो प्रचंड चिडला.पण यांची तयारी पाहून गप्प बसणे योग्य हे त्याने ओळखले.


बिजली म्हणाली,"आक्का,यांचं आता काय करावं?"तसा सखाराम म्हणाला,"डोस्के उडव,आन दे फिकून गावाबाहेर."


त्याला स्वतःचा मृत्यू पुढे दिसू लागला.सुंदरा हसली,"यांची घोडी,हत्यार,रोख ऐवज सगळं काढून घ्या आणि द्या सोडून."


ते चारही जण अपमानित होऊन निघाले.सुंदरा सर्वांना घेऊन मुक्कामावर आली.


सुंदराने अपमानित केलेला दुसरा तिसरा कोणी नसून जावळी खोऱ्यातील एक माजलेल्या वतनदाराचा भाऊ होता.मोऱ्यांच्या जावळीत लपून असे अनेक लांडगे स्वराज्यातील आया बहिणींवर भ्याड हल्ले करत असत.


झालेला अपमान गिळत तो साथीदारांना घेऊन जावळीच्या वाटेला लागला. इकडे मोहना पाणी भरायला गेली.गावाबाहेर असलेल्या विहिरीवर पाणी भरत असतानाच मोहना आजूबाजूला पहात होती.सह्याद्रीच्या कातळातून वाहणारे गोड पाण्याचे झरे आणि इथली दुधदुभती यामुळे मावळे अत्यंत काटक आणि शूर असत.पण हे सगळं धाडस,शौर्य अस परक्यांची गुलामी करण्यात चालले होते.


मोहना उदास होत स्वतःशी म्हणाली,\"हा एवढा भक्कम, अजिंक्य सह्याद्री अजून किती वर्षे गुलामीत झिजणार?\"


असे विचार करत असतानाच तिच्या कानावर आवाज आला,"पोरी जरा पाणी देती का प्यायला."


मोहना मागे वळली,एक अस्ताव्यस्त दाढी वाढलेला, डोळे खोल गेलेला,कृश म्हातारा तिच्यासमोर उभा होता.मोहनाने पाण्याचे भांडे समोर ठेवले.तो कसनुस हसला आणि थोडं तिरक झाला.


त्याचा एक हात मनगटापासून तुटलेला होता.मोहना म्हणाली,"माफी करा बाबा,ते लक्षात आलं नाही."


असे म्हणून तिने स्वतः पाणी पाजले."म्हातारा उठला,मोहनाच्या जवळ गेला.तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाला,"केलेल्या पापाची शिक्षा हाय पोरी,नग वाईट वाटून घेऊ."एवढे बोलून म्हातारा पुढे निघून गेला.


रूपाने तिला आवाज दिला,"मोहने,चल पाणी घिऊन जायचं ना?आक्का वाट बघत आसल.उशीर झाला तर काळजी करत बसलं."


मोहनाने होकारार्थी डोके हलवले.मोहनाच्या डोळ्यासमोरून म्हाताऱ्याचा आगतिक चेहरा जातच नव्हता.मोहना आणि रूपा पाणी घेऊन आले.बकुळामावशी आणि बजाकाकाने चूल पेटवली होती.मस्त मिरचीचा खर्डा, पिठलं आणि भाकरीचा फक्कड बेत होता.नुसत्या वासाने भूक खवळली होती.


मोहना लगेच म्हणाली,"मावशे,पिठलं झणझणीत बनव चांगलं."


तशी रूपा म्हणाली,"व्हय,चांगलं डोळ्यातून पाणी आलं पायजे खाताना."


तेवढ्यात सुंदरा पोहोचली.सुंदराला यायला इतका उशीर झालेला पाहून मोहना चिंतीत होती.सुंदराने घडलेली सगळी हकीगत सांगितली.


बिजली म्हणाली,"आक्का म्हणाली म्हणून सोडला त्याला.नाहीतर मुंडकच उडवलं असत."


तेवढ्यात बजाकाका म्हणाला,"पोरींनो,खायच्या वेळेला या गोष्टी नको.चला जेवायला."


सुंदराला कुटुंबासारखे प्रिय असणारे हे सगळे खेळीमेळीत जेवत होते आणि यांना कुणाची नजर लागू नये अशी प्रार्थना करत सुंदराचे मन चिंतेत हुरहूरत होते.

वडगावपर्यंत सुंदरा सुखरूप पोहचेल का?धोंडिबा कोणत्या कामगिरीवर असेल?वाचत रहा पुढील भाग.

क्रमशः

🎭 Series Post

View all