मी मानिनी ! मी मर्दिनी ! भाग 20

मोहना आणि धोंडीबाच फुलत जाणार नात आणि त्यावर सुंदराची काय प्रतिक्रिया असेल.


(सदर कथानक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर असले तरी कोणत्याही ऐतिहासिक सत्याचा दावा करत नाही. सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)

मागील भागात आपण पाहिले.मोहना आणि धोंडिबा यांच्यात फुलू लागलेले प्रेम आता सगळ्यांच्या लक्षात येत होते.मोहनाने स्वतःला आवरायचे केलेले प्रयत्न फोल ठरले. आता या प्रेमाचे पुढे काय होईल? सुंदराचा प्रवास कुठे जाईल? पाहूया.


दर्शन करून बाहेर आल्यावर जरा वाईत फिरून येऊ अस सगळेच म्हणाले. बिजली आणि रूपाने बरोबर मोहना आणि धोंडीबाला बरोबर घेतले.सगळे बाजार पहात फिरू लागले.


तेवढ्यात मोहना धोंडीबाला म्हणाली,"तुम्ही मघाशी शिवाजीराजांच नाव घेतलं.तुम्ही त्यांच्या सैन्यात हाये का? राजांना तुमी पाह्यलंय का?"


तस धोंडीबाने पांडूकडे पाहिलं.पांडूने मान हलवली.धोंडिबा बोलू लागला,"आमी आता कामगिरीव हाये एवढंच सांगतो.शिवबाराजांच्या राज्यात रयत लयी खुश हाये बघा."


पुढे पांडू बोलायला लागला,"राजांचा कारभारच न्यायाचा आणि चोख."


तशी बिजली म्हणाली,"म्हंजी राक्षसांच्या राज्यात देवच जन्मला म्हणा की."


तसा धोंडिबा हसत म्हणाला,"आवो,आईसाहेब जिजाऊ म्हंजी प्रत्यक्ष जगदंबा आणि तिचा ल्योक म्हंजी तसाच असणार नव्ह."

हे ऐकून मोहना म्हणाली,"आऊसाहेब आणि राजांना बघायची इच्छा हाये.पुरी व्हईल का?"


तस पांडू म्हणाला,"नशिबात आसल तर व्हईल तुमची इच्छा पूर्ण."


अशा गप्पा रंगत आलेल्या असताना पांडू अचानक बाजूला गेला.आता फक्त हे दोघेच होते.धोंडीबाने तिला विचारलं,तलवार चालवायला कुठं शिकलात?"


मोहना हसत म्हणाली,"मला माझ्या आईने फक्त जन्म दिला,बाकी सगळ आक्काने शिकवलं.या जगात उभं रहायला,चालायला आणि लढायला पण."



धोंडिबा ती बोलत असताना तिच्याकडे एकटक बघत होता.हे लक्षात आल्यावर मोहना खाली नजर झुकवत म्हणाली,"काय पाहताय एवढ?"


तस धोंडिबा भानावर आला,"त्ये..आपलं.."


असे तो बोलत असतानाच बजाकाका ओरडला,"चला आवरा,निघायला पाहिजे आता.मुक्काम गाठायचा नव्ह."


सगळ्यांनी आवराआवर सुरू केली.धोंडिबा आणि पांडुसुद्धा त्यांच्या बरोबर निघाले.



पौष महिना असल्याने वातावरणात एक गोड गारवा भरून राहिला होता.शेत शिवारं फुललेली होती.गाड्यांच्या चाकांचा आवाज एका लयीत येत होता.या सगळ्या धामधुमीत दोन मनांत प्रेमाचे रंग फुलत होते.खुलत होते.


सुंदरा बकुळामावशीला म्हणाली,"मावशे, आता उद्याचा एकच मुक्काम असणार.जायच्या आधी देवीची ओटी भरायला पाहिजे.माझ्या सर्व लेकींना सुखरूप ठेवायची प्रार्थना करायची आहे."


सुंदरा दरवर्षी इथे देवीची खणा नारळाने ओटी भरत असे.सूर्य उताराला लागला आणि गाड्या घाट चढू लागल्या.आज खेळ नव्हता.सगळे निवांत होते.


मुक्कामी पोहोचताच,गाड्या सोडून पुरुषमंडळी विसाव्याला गेली.सुंदराशी जोडल्या गेलेल्या या प्रत्येकाची एक वेगळी गोष्ट होती.त्यातील दोघा तिघांना तर गावकुसाबाहेर उकिरड्यावर फेकलेल.तिथून त्यांना सुंदराने उचललं होत.अशी अनेकांना मायेची पाखरं तिने घातली होती.त्यामुळे ही माणसे तिच्यावर जीवापाड प्रेम करत.सगळे विसावले.



तेवढ्यात बकुळामावशी सुंदराकडे आली,"सुंदरा म्या काय म्हणते,आजच पुरणपोळी करते.मोहना एवढ्या संकटातून वाचली.गोडधोड करते.आजच काळुबाईची वटी भरू."


पुरणपोळी नाव काढताच छबु आणि बिजली धावत आले,"मावशे,पोळ्या करणार हायेस व्हय."


तशी बकुळामावशी म्हणाली,"बीजले,आधी देवीला निवद, आन मंग तुमी खायाच."


बकुळाने पोरींना हाताशी घेतलं.मोहना निगुतीने स्वयंपाक करत होती.आज पंगतीला तिच्या आवडीचं माणूस जेवणार होत ना.


पुरण शिजायला टाकलं,दुसरीकडे कटाच्या आमटीसाठी कांदा,खोबर भाजल जात होतं,तिसरीकडे पीठ मळत होते. गोळ्यामेळ्याने सगळा स्वयंपाक चालला होता.चुलीवर भराभर पदार्थ बनत होते.पोळ्या लाटायला सुंदरा स्वतः बसली.



बकुळामावशी म्हणाली,"सुंदराच्या पुरणपोळ्या इतक्या मऊ की जिभव ठिवली की इरघळती.पाटील आज दहा तरी खाणार बग."


असे बोलून अचानक ती गप्प झाली.तिच्या डोळ्यातून पाणी आलं,"माझी मेलीची जिभच वाईट,पोरीला नको त्यो इशय सारखा येतो."


तेवढ्यात छबु म्हणाला,"मावशे,लवकर आवर.देऊळ बंद व्हायला थोडा येळ रहायलाय."


तस बकुळामावशी पटापट नैवेद्य भरू लागली.नैवेद्य घेऊन मोहना आणि सुंदरा जाणार होत्या.तेवढ्यात सुंदरा म्हणाली,"धोंडिबा, तुम्हीपण चला.तुमच्यामूळ आज माझी मोहना वाचलीय."


मोहना,सुंदरा,पांडू,धोंडिबा,छबु आणि बजाकाका सगळे देवळात निघाले.वाटेने जाताना मोहनाकडे लोक वळूनवळून पहायचे.डाळींबी पैठणी नेसलेली मोहना अतिशय सुंदर दिसत होती.


देवळाचा कळस दिसला.सुंदराने हात जोडले आणि मनात प्रार्थना केली,"माझं धनी आणि माझ्या पोराला सांभाळ आई.माझ्या ह्या सगळ्या लेकीबाळींचे रक्षण कर.मला माझं सौभाग्य परत मिळू दे."


सगळेजण देवळात आले.नैवेद्य दाखवला.दर्शन करून बाहेर आले.तिथे एक म्हातारी भगतीन होती.तिला पाहून धोंडिबा पुढं झाला,खिशातून मोहोर काढली.मागे मोहना होतीच.


मोहोर देऊन तो पाया पडत असताना ती म्हातारी म्हणाली,"पुढल्या वर्षी नातू घिऊन ये रे लेकरा.सुखाने संसार करशील.मनात हाये ते सगळं भेटलं बघ तुला."


तस मोहना गडबडीत म्हणाली,"आये,अग मी तमासगीर हाये,तू म्हणती तस...."


म्हातारी तिला थांबवून म्हणाली,"पोरी देवीच्या दारात बोल गेलाय माझा.जा लेकरा सुखी रहा."


मोहनाने मान डोलावली पण तिच्या डोळ्यांत पाणी होत.ते पाहून धोंडिबाला खूप वाईट वाटलं.


सगळे दर्शन घेऊन आले.तोवर बकुळामावशीने ताट मांडायला घेतली.धोंडिबा आणि पांडूला खास मान होता आज.


पुरणपोळी वाढताना बकुळामावशी बोलली,"खा लेकरा.आईच्या हातची चव नसलं पण ह्या मावशीने पण मनापासून केलंय बघ सगळं."


हे ऐकताच धोंडीबाचा घास हातातच राहिला.आवंढा गिळत तो म्हणाला,"मावशे,आईचा पान्हासुद्धा लई दिस मिळाला न्हाई बग.पण माझ्या मावश्या आणि आजीनं ती कसर भरून काढली."


हे ऐकल्यावर बकुळामावशी त्याला अधिकच प्रेमाने आणि आग्रहाने वाढत होती.अगदी खेळीमेळीत सर्वजण आनंदात जेवत होते.


जेवणखाण आटोपलं आणि मोहना सवयीप्रमाणे चांदण्यात फिरायला निघाली.बरोबर हत्यारसुद्धा होतीच.देवीचा गड शांत पहुडला होता.आजूबाजूने यात्रेकरूंच्या राहुट्या आणि गाड्या,खेळण्यांची दुकान,प्रसादाची दुकान.त्याभोवती झोपलेली माणसे. तिथून थोड्या अंतरावर पसरलेल्या करवंदाच्या जाळ्या. त्यात तात्पुरता निवारा शोधलेली माणसे.



अस सगळं पहात मोहना फिरत होती.एवढ्यात तिला मागे हालचाल जाणवली.तलवार उपसून मोहना गर्रकन फिरली.मागे धोंडिबा उभा होता.तलवार बरोबर मानेपाशी थांबली.


मोहनाने तलवार खाली घेतली.घाम पुसत धोंडिबा म्हणाला,"आता डोकं उडवलं असत ना माझं."


तशी मोहना हसली,"काय करू,लहानपणापासून सवय आहे.तलवार आणि सावधगिरी यांची सोबत कायम असते."

तेवढ्यात विषय बदलण्यासाठी धोंडिबा म्हणाला, चांदणं किती छान पडलंय."


मोहना हसली,"रोज राती आम्ही खेळात नाचत असतो, चांदणं पहायला मिळतच नाही."


धोंडिबा थोडे थांबून म्हणाला,"ते बी खरच म्हणा.त्यात ह्या असल्या जुलमी राजवटीत जगणं मुश्किल झालंय. कोल्ह्याकुत्र्यासारखी माणसं मारली जात आहेत."


मोहना उदास हसली,"मराठी मुलुखाला हा शापच हाये, आपापसात भांडत बसतोय आपण.म्हणून तर परके येऊन राज्य करत्यात."


धोंडिबा तिचे बोलणे ऐकून म्हणाला,"तुम्हाला बरीच माहिती आहे.युद्धकला सुद्धा येते.तरी...."


मोहना म्हणाली,"तमाशात कशा?असेच ना?मला हे सगळं आक्काने शिकवलं.आजवर तमाशात काम करत असूनही कोणाची बिशाद झाली नाही अंगाला हात लावायची."


धोंडिबा परत म्हणाला,"त्ये हायेच ओ पण ह्ये तुमचं बोलणंसुदीक स्वच्छ हाये."


मोहना म्हणाली,"आमचा व्यवसाय असा,कधी गावाकडची रांगडी माणसं भेटतात,तर कधी अभिजन वर्ग.त्याप्रमाणे बोलावं लागत.वागावं लागत."



धोंडिबा पुढे म्हणाला,"तरी कधी अस नाही वाटलं का,इतर पोरींसारखा संसार असावा.हक्काचा जोडीदार असावा.पोरबाळ असावीत.नांदत घर असावं."



सुंदरा हसली,"तुम्ही एका तमासगीर बाईला बायको म्हणून स्वीकाराल?"



ती असे काही विचारेल याची कल्पना त्याने केलीच नव्हती.ती परत म्हणाली,"माझ्या डोळ्यात पाहून खरे उत्तर द्या."

काय असेल त्याच उत्तर?पुढे या प्रेमकथेच काय होईल?सुंदरा याचा स्वीकार करेल का?

क्रमशः



🎭 Series Post

View all