मी मानिनी ! मी मर्दिनी !भाग 18

मोहनाच्या जीवनात फुलत असलेले रंग उमलतील का?


(सदर कथानक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर असले तरी कोणत्याही ऐतिहासिक सत्याचा दावा करत नाही. सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)


मागील भागात आपण पाहिले की,राधिका ने गाजवलेल्या शौर्याची जाणीव ठेवून गाव या सगळ्यांचा सन्मान करते.इकडे मोहनाच्या मनात प्रेमाचे अंकुर फुलू लागले.मोहनाने अस प्रेमात पडलेले सुंदराला चालेल का? काय होणार पुढे?


खेळ संपला तरी मोहना वेगळ्याच तंद्रीत होती.शेवटी बिजलीने तिला धक्का मारला,"संपला बर का खेळ.गेले सगळे."


मोहना खुदकन स्वतःशीच हसली.तिला स्वतःला काय होतंय तेच कळेना.या आधी कितीतरी जणांनी मोहनावर जीव ओवाळून टाकला होता.मोहना कोणालाही बधली नाही.आज मात्र त्याच्या टपोऱ्या डोळ्यातील खोल हरवली होती. सारख गाणं गुणगुणत तिला तो डोळ्यासमोर दिसत होता.



इकडे त्याची अवस्थासुद्धा वेगळी नव्हती.एवढ्यात सोबतीचा दोस्त म्हणाला,"धोंड्या,कुठं हरवलास लेका." तस तो सावरून म्हणाला,"कुठं न्हाई पांडू,चल जतरत फिरून यिवू जरा."


(धोंडू आणि पांडू एका खास मोहिमेवर होते.) त्यामुळं धोंडू म्हणाला,"पांड्या ,गड्या जरा जपून."असे म्हणत दोघे निघाले.



मोहना तयार होत असताना अगदी निरखून आरशात पहात होती.हसत होती.आजची मोहना वेगळीच होती.यात्रेत तीन दिवस मुक्काम असणार होता.तो खेळाला रोज येईल का? विचार डोक्यात येताच मोहनाने जीभ चावली.


आपलं अस उघड्यावर जिणं, विंचवाच बिऱ्हाड पाठीवर.आपण असा वेडा विचार करायचा नाही.

तेवढ्यात रूपाने तिला आरशात बघताना पाहिलं,"बया!बया! तीट लाव मोहने. नजर नको लागायला."

तशी मोहना चिडली,"रूपे,आता गप बसती का? चुरचुरू बोलू नग."


तेवढ्यात बिजली आली,आवरा ग,आता .लवकर जाऊ, म्हंजी समदीकड फिरता यील."


सगळ्याजणी यात्रेत फिरायला निघाल्या.यात्रेत तो भेटेल का? मोहना स्वतःच्या मनात आलेल्या विचारांनी चमकली.आपण असे वाहवत जाणे बरे नाही.स्वतःला आवरलं पाहिजे.मनातले विचार झटकत ती चालू लागली.


यात्रेत मस्त बांगड्या, बारक्या पोरांचे कपडे,आणि काय काय होत.सगळं पाहून मोहनाला विचार आला,\"हे सगळं आमच्यासाठी नाही.\"


इतक्यात रूपा म्हणाली,"मोहना,आग तिकडं बघितलं का कायतरी माकडाचे खेळ हाय,चल जाऊ." सगळ्याजणी निघाल्या.


एवढ्यात पांडूने तिला पाहिलं,"तो जोराने म्हणाला,"धोंडिबा, आर ये धोंडिबा इकडं तरी बग मर्दा."


एवढ्या जोरात त्याने हाक मारली की मोहना आणि धोंडिबा दोघांनी एकाच वेळी मागे पाहिलं. डोळ्याला डोळे भिडले,भोवताली सगळे विश्व दोघेही विसरले.


तेवढ्यात बीजलीने धक्का मारत खाकरून म्हंटल,"बया रूपे आग चल की लवकर.आटिप बया. इथंच काय उभी रहायली."


तशी मोहना भानावर आली.धोंडिबा!मनात ते नाव उच्चारताच तिला खडा लागल्यासारखे झाले.


"धोंडिबा नाव काही शोभत न्हाई,पावण्याला." रूपा तिच्यासमोर मुद्दाम बोलली.


तशी मोहना रागावली.सगळे गप्प झाले.एवढ्यात माकडांचा खेळ सुरू झाला.


खेळ रंगात आला होता.माकडांच्या गंमती पाहून लोक हसत होती.पैसे टाकत होती.भान हरपून खेळ पहात होती.एवढ्यात गलका उठला.


धावा!वाचवा! सगळीकडे पळापळ सुरू झाली.एक मस्तवाल बैल गर्दीत घुसला होता.समोर येईल त्याला शिंगाने उडवत होता.जखमी करत होता.सगळेजण सैरावैरा पळत होते.एरव्ही चार चार गडयाना भारी पडणारी मोहना थिजल्यासारखी झाली होती.


बैल वेगात धावत येत होता.बिजली तिला खेचत होती.बैल फुरफुरत येताना पाहून बिजली घाबरून बाजूला झाली.आता मोहना मरते की जगते हा विचार करून तिने डोळे बंद केले.


एवढ्यात एक बहाद्दर चित्त्याच्या चपळाईने धावला.काही कळायच्या आत त्याच्या मर्दानी मिठीत मोहना सामावली.उतारावरून खाली घरंगळत जाताना त्याची भक्कम छाती,उष्ण श्वास आणि घट्ट पोलादी मिठी.मोहनाला कोणीतरी पहिल्यांदा एवढ्या जवळ आणि अशाप्रकारे स्पर्श केला होता.मोहना आणि तो एकमेकांत हरवले.


झालेल्या जखमा विसरून मोहना त्याच्याकडेच बघत होती.एवढ्यात बिजली आणि रूपा पळत आल्या.त्याच्या दोस्तानेसुद्धा धाव घेतली.



बिजली जोरात ओरडली,"मोहने,आग ठीक हायेस ना."


मोहना मात्र नजरबंद होऊन त्याच्याकडे पहातच राहिली.एवढ्यात त्याच्या दोस्ताने जोरात हलवलं तसा तो भानावर आला.


रूपा म्हणाली,"पावन,लै उपकार झालं बघा तुमचं.आमी तमासगीर हाये,तुमी याना आमच्याकडं."

"व्हय व्हय",अस म्हणत त्याचा मित्र त्याला घेऊन गेला.


मोहनाला रूपा आणि बिजलीने एका बाजूला बसवलं.आता ती थोडी सावध झाली.त्याचा तो उष्ण श्वास,मर्दानी गंध तिला संपुर्ण व्यापून उरला होता.



इकडे तोसुद्धा संमोहित झाल्यासारखा झाला होता.तिच्या टपोऱ्या डोळ्यात हरवून गेला.तिच्या केसातून येणारा मंद सुवास,तिच्या मुलायम अंगाचा रेशमी स्पर्श त्याला वेड लावत होता. मदनाची बाधा दोन्ही बाजूने झाली होती.


रूपा आणि बीजलीने ओळखलं की मोहना स्वतःला हरवून बसली आहे.मोहनाने भानावर आल्यावर स्वतःला समजावलं.तो कोण?कुठला?आला असेल यात्रेला.कदाचित त्याला बायकपोर असतील.नसली तरी माझ्यासारख्या पोरीला तो फक्त उपभोग म्हणूनच तर पाहिलं ना.



इकडे त्याची अवस्था अशीच होती.इंद्राच्या अप्सरा फिक्या पडतील एवढी सुंदर आहे ती.तिला भेटायला,प्राप्त करायला कितीतरी तालेवार झुरत असतील.तिच्या अवतीभवती फिरत असतील.ती माझा विचार कशाला करेल.नकोच तो विचार.पांडूला भूक लागली होती.दोघे हळूच यात्रेतून बाहेर पडले.


यात्रेत फिरून रूपा,बिजली आणि मोहना परत आल्या.सुंदराने विचारलं,"इतका वेळ का लागला."


तशी रूपा म्हणाली,"आक्का माकडांचा खेळ बघत थांबलो.त्यात वेळ गेला बघ."


तशी सुंदरा म्हणाली,"बरं, आता जरा आराम करा.अजून दोन दिवस इथं खेळ करायचे आहेत आपल्याला."


सुंदरा गेली तस बिजली आणि मोहनाने तिला खुणावल.तेव्हा रूपा बोलू लागली,"आक्का किती काळजीत असते माहीत हाये ना.आता हे सगळं सांगून तिच्या जीवाला घोर नको.चला जरा पडू या."



रात्रीच्या खेळाची तयारी करताना मोहना तयार होत होती.मनात मात्र त्याचेच विचार होते.त्याच ते घट्ट मिठी मारणं. तिला लागू नये म्हणून धडपडण, सगळं नको म्हंटल तरी पुन्हा डोळ्यासमोर येत होतं.आज तो खेळाला येईल का?हा विचार मनात आला की जीव कावराबावरा होत होता.



इकडे तोसुद्धा बैचेन होता.त्याची अवस्था पाहून पांडू म्हणाला,"चल जाऊया का खेळाला. लै आठवण येतीय ना."


तस तो म्हणाला,"आपुन कामगिरीवर हाये,हे सगळं नको.पण मन आवरत नाही गड्या."


तस त्याच्या पाठीवर हात टाकत पांडू म्हणाला,,"आपण फक्त तिला पाहून परत येऊ.हो-नाही करताकरता तो तयार झाला.दोघे निघाले.


खेळ सुरू झाला.कनादीत पाय ठेवायला जागा नव्हती.तरीसुद्धा मोहनाचे डोळे भिरभिरत होते.तिला बैचेन वाटत होतं.ढोलकीची थाप पडली.नाच रंगू लागला.


एवढ्यात तो समोर बसलेला दिसला.पाय आणि मन दोन्ही आता वाऱ्याच्या वेगाने धावू लागले.समोर बसलेल्या त्याच्यावर नजर खिळवून मोहना गाऊ लागली.


राजसा सख्या दिलवरा,
हात हातात घ्या हो जरा..
घट्ट आवळून मिठीत धरा,
खेळ इशकाचा करु या पुरा.


मोहनाची अदा, नाच आणि तिचे रोखून बघणे.त्याचा श्वास जणू रोखून धरत होते.प्रेमाची नशा दोघांनाही चढली होती.


स्थळ,काळ,समाज या सगळ्यांपेक्षा प्रेम सरस ठरले होते.दोघांनी घातलेले संयमाचे बांध तुटले होते.आता दोघांनाही कोणीच थांबवू शकणार नव्हते.मोहनाचा गोड गळा आणि प्रीतीची अनावर भावना मिळून वेगळेच रसायन श्रोत्यांना ऐकायला मिळत होते.


व्ह्टाच डाळींब लाल,
खोलते तुम्हांसाठी राजसा.
रस कवळा गोड हा ताजा,
प्रितीने चाखाना जरासा.


लोक ऐकून खुळावली होती.एकेक शब्द,अदा आणि नाच सगळं काही अप्रतिम आणि दैवी.कारण ते समोरच्या प्रियकराची।आराधना करायला एक प्रेयसी गात होती.


आपण वहात चाललोय हे कळत असूनही दोघांनाही नेमकं कस थांबावं ते कळत नव्हतं.जसजशी रात्र चढत होती,तमाशाच्या खेळात रंग भरत होता आणि त्याच बरोबरीने प्रीतीचा गहिरा रंग मोहना आणि धोंडिबा यांच्या डोळ्यांतून हृदयात उतरत होता.


भोवताली असलेले विश्व विसरून दोघेही भान हरपून केवळ आणि केवळ एकमेकांना पहात होते.काळ जणू या दोन्ही प्रेमिकांसाठी थांबून राहिला होता.हळूहळू हळूहळू रात्र संपली.खेळ संपत चालला.मोहना भानावर आली.कितीही झालं तरी आपल्यासाठी प्रेम,संसार हे सगळं नाही.ह्या जळजळीत सत्याची जाणीव होऊन मोहना मनाची कवाडे बंद करत होती.


हा प्रेमाचा अंकुर फुलेल का?मोहनाने केलेला निर्धार टिकेल का?
क्रमशः

🎭 Series Post

View all