मी मानिनी ! मी मर्दिनी ! भाग 17

सुंदराच्या आयुष्यात मोहनच्या आणि त्या अनामिक स्वराच्या प्रेमाने नवे वळण येणार का?


(सदर कथानक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर असले तरी कोणत्याही ऐतिहासिक सत्याचा दावा करत नाही. सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)


मागील भागात आपण पाहिले,सुंदराने गावाची मदत करायचे ठरवले.हबशी चाल करून येत आहेत हे समजल्यावर जास्तीत जास्त लोकांना गावाबाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेण्यात मदत करायचा निर्णय सुंदराने घेतला.आता पाहू पुढे.



पाटील आता काळजीत पडले.शत्रू अगदी जवळ आला होता.आता पळून जाणे अशक्य होते.चारही बाजूने घेरल्याने आता शरण जाणे अथवा लढणे एवढे दोनच पर्याय शिल्लक होते.


पाटलांनी गावातील तरुणांना एकत्र बोलावलं,"गड्यांनो,आपल्याला चारी बाजूनी घेरलं हाय,रुमाल बांधून शरण गेलो तर जीव वाचलं पण अब्रू जाईल."


तस एक पोरगेला तरुण उठला,"पाटील बिनाअब्रूच जीन काय कामाचं? आपुन लढायचं."


याला सगळ्यांनी त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला.

सुंदरा पुढं झाली,"आपुन नीट लढाई केली तर यातून वाचू."


पाटील बोलले,"आक्का म्हणतीय ते खरं हाय.आधी ज्यांना लढता येत न्हाई त्यांना झाडावर चढवा,कुठं लपवता येत का बघा."


इकडे हबशी आता निसश्चिंत होते.कारण आजवर अस घेरलं की गावकरी आपोआप रुमाल बांधून शरण येतात हे त्यांना ठाऊक होतं.त्यांच्या प्रमुखाने वाट पहायची ठरवली.


एवढ्यात जंगलातून एक सुंदर बाई आणि तिच्या बरोबर चारपाच माणसं येताना दिसली. हबशी प्रमुख जरा बिचकला.जसजशी ती बाई जवळ येऊ लागली तिचे लावण्य पाहून तो मंत्रमुग्ध झाला.


सुंदरा जवळ आली आणि मुजरा करून म्हणाली,"मुजरा सरकार! म्या सुंदरा सातारकर."


तिचा मधाळ आवाज ऐकून हबशी प्रमुख अर्धा गार झाला.त्याने जवळ जात विचार,"तो फिर? तुम क्या कर रही हो यहा?"


तस कुरळ्या केसांच्या बटांशी खेळत सुंदरा म्हणाली,"आवो या गावात तमाशाचा खेळ व्हता आमचा.पर गावातील माणसं कुठं पळाली काय माहित?"


तस हबशी प्रमुखाने तिच्या गळ्यावर तलवार लावली,"झूठ मत बोल। तू उनसे मिली हुई नही है ना। "


सुंदराने हलक्या हाताने तलवार बाजूला केली,"सरकार आवो मला व काय देणंघेणं यांचं.त्यापरिस तुम्हाला खुश केलं तर बिदागी भेटलं."


तसा तो चिडला,"बाजू हट, पेहले गाववालो को पकडणे दो।"



तस नाजूक बोट त्याच्या गालावर फिरवत सुंदरा म्हणाली,"आवो कोंबड्या पकडायला वाघ कशाला पायजे,तुमच्या लोकसनी पाठवा की तवर जरा आमचा नाच बगा."



तसा तो पाघळला,"शिपाही सब लोगोको पकड के लाव।तबतक हम जरा...." सुंदराने इशारा करताच पेटी,ढोलकी आणि वाद्य तयार झाली. खेळ सुरू झाला.




इश्कच्या खेळाचे जाळे सुंदराने हुशारीने फेकलं होत.इकडे गावातील तरुण आणि सुंदराने तयार केलेल्या पोरी लढाईला तयार झाल्या.हबशी जंगलात घुसले. दाट जंगलात डोळ्यात बोट घातलं तरी काही दिसणार नाही एवढा अंधार होता.तीस-चाळीस हबशांच्या त्या तुकडीने जंगलात शोध घ्यायला सुरुवात केली.


राधिका आणि तिच्या साथीदारसुद्धा तयार होत्या.पाटलांनी इशारा करताच एकेक हबशी घेरून मारायला सुरुवात झाली.जंगलात झटापट सुरू झाली.त्यात काही गावातील तरुणसुद्धा मरत होते.इकडे सुंदराने मद्याचे पेले भरायला सुरुवात केली.सुंदराचे सौंदर्य अदा, त्यात मद्य यांचा अंमल चढू लागला.



जंगलात मात्र लांडग्यांच्या कत्तलीला सुरुवात झाली.राधिका एखाद्या यौध्याला लाजवेल असे लढत होती.तिच्याबरोबर सोबतीला असणाऱ्या ह्या शूर पोरी लढताना पाहून आख्खे गाव जिगरीने लढू लागले.



आता काहीही झालं तरी हार पत्करणे नाही. हबशीसुद्धा काही कमी नव्हते.त्यांनी अनेकांना मारले.काहींना पकडले.पण हळूहळू हळूहळू त्यांच्या लक्षात येऊ लागले.आपल्यावर वेगळे करून हल्ला होतोय.


त्यांच्यातील एकजण ओरडला,"सब एक जगह इकठ्ठा हो जावो। ये सब चाल है।" सगळे एकत्र झाले.आता खरी हातघाईवर लढाई होणार .



सुंदराने खूप हुशारीने हबशांच्या प्रमुखाला मद्यधुंद केले होते. सगळेजण गाण्याच्या तालावर डोलत होते.आत जंगलात मात्र हातघाईची लढाई सुरू झाली.


तेवढ्यात सुंदराचे गाणे चालू असताना एक हबशी जखमी अवस्थेत जंगलातून पळत आला,"बचाव!बचाव! दगा हो गया।"



रक्तबंबाळ सैनिक पाहून म्होरक्या उठला.त्याच्या बरोबरीने थांबलेले सैनिक घेऊन तो जंगलात घुसला.पूर्ण मद्यावर झिंगलेले सैनिक जायच्या आधीच पिऊन पडत होते.या गडबडीत सुंदराकडे लक्ष न देताच म्होरक्या पुढे चालत होता.सुंदरा आणि तिचे साथीदार बरोबर एकेक गाठून मुंडकी मारत होते. ह्या लढाईत जीव ओतून सुंदरा आणि तिचे साथीदार लढत होते.



गावकऱ्यांना हबशानी घेरले. राधिका आणि तिच्या साथीदार पाटलांच्या आणि गावकऱ्यांच्या बरोबरीने लढत होत्या. साठ-सत्तर हबशी अजून होते.तलवारी,दांडपट्टे,भाले फिरू लागले.कत्तली सुरू झाल्या.


तेवढ्यात हबशांच्या प्रमुखाने यांना गाठलं.त्याच्या बरोबरचे अर्धे सैन्य गायब झालेले आणि समोर लढणाऱ्या पोरी पाहून त्याला समजले की सुंदराने आपल्याला मूर्ख बनवलं आहे.आता मात्र तो संतापाने वेडापिसा झाला.



त्याने तलवार काढली,"हमे धोका देनेका नतिजा अब पुरे गावको भूगतना पडेगा। सबको मार डालो।"


पाटील त्वेषाने लढत होते.गावातल्या तरुणांनी हबशांच्या सैन्याची धूळधाण उडवली होती.एवढ्यात एका हबशी सैनिकाने मागून पाटलांच्या पाठीवर वार केला.


पाटील कोसळलेले पाहून त्याने पाटलांच्या मुलीकडे हात झेपावला.ते पाहताच राधा वाघिणीच्या वेगाने धावली.तलवारीच्या एकाच वारात त्या सैनिकाचा हात खांद्यापासून वेगळा झाला.


तेवढ्यात दोन हबशी धावून आले.राधिका एकटी त्यांना भिडली.पाटील आणि त्यांच्या मुलीला वाचवत राधिका लढत होती.इकडे हबशी सैन्य कमी होऊ लागले.


सुंदराने बरोबर भाला पेलला आणि अचूक फेकला दुसऱ्या क्षणी हबशी प्रमुख कोसळला. ते पाहून बाकीचे मागे फिरू लागले.


एकच क्षण..राधिका मागे वळली आणि सप...असा आवाज झाला.पाटलांवर वार झाला.दुसरा वार व्हायच्या आधीच राधिका पुढे आली.तलवारीचा वार झेलत तिने समोरच्या सैनिकाचे मुंडके उडवले.



प्रमुख पडलेला पाहून सैनिक परत फिरले.त्यांची मुंडकी उडवली जाऊ लागली.एकही सैनिक त्या किर्रर्र जंगलातून जिवंत जाऊ शकला नाही.


थोड्याच वेळात सगळं शांत झालं. गावकरी गोळा झाले.रक्ताच्या थारोळ्यात पडलेली राधा पाहून आख्ख्या गावातली लोक रडू लागली.


सुंदरा राधाकडे धावली,"राधा उठ!तुला काही नाही होणार."


तशी राधा हसली,"आक्के आग कुठंतरी खंगत मेले असते,त्या माझ्यासारख्या पोरीसाठी आख्खा गाव रडतोय."


असे म्हणून राधाने प्राण सोडले.पाटील आणि गावकऱ्यांनी राधाला सन्मानाने अंत्यसंस्कार दिले.स्वतः पाटलांनी सगळे विधी केले.


एवढं सांगून सुंदरा थांबली.सगळ्या पोरी रडत होत्या.सुंदराने सुद्धा डोळ्यातलं पाणी थांबवलं नाही.


ती बीजलीकडे पाहून म्हणाली,"तेव्हापासून प्रत्येक जत्रेत त्या गावात आपल्याला साडी चोळी आणि पूजेचा मान असतो."


हे सगळं सांगेपर्यंत संध्याकाळ झाली.मोहना सर्वांना म्हणाली,"चला!आवरा की लवकर.खेळ करायला पायजे का नाय? संपली आक्काची गोष्ट सांगून."



सगळ्याजणी भराभर पांगल्या. सर्वांनी रंगपटाची तयारी सुरू केली.लोककलावंत काळजात किती दुःख असलं तरी मायबाप रसिकाला कायम आनंदाचे क्षण दयायला तयार असतो.पोरी तयार झाल्या.


कनादीत खचाखच लोक भरले होते.सुंदराच्या फडाबाबत कितीही अफवा असल्या तरी फडातील पोरींच्या अदा आणि नाचावर जनता कायम खुश असे.

मोहना आणि बिजली समोर आल्या.ढोलकीवल्याने थाप दिली.तुणतुणे सुरात डोलू लागले.पायांनी वेग घेतला आणि मोहनाने समोर पाहिले,तोच सकाळी भेटलेला स्वार पुढं बसलेला.


त्याच्याकडे पाहून नजरबंदी झालेली मोहना गाऊ लागली,


सख्या, राजसा, माझ्या दिलवरा.
नका रोखून ठेऊ नजरा.
डोळ्यात तुमच्या गहिऱ्या,
हरवून बसले सजना.


गोड मिशीतल हसणं,
माझ्या ध्यानातून जाईना.


रोखून पाहणं आन गाली हळूच हसता.
तुमी शेजारून जाता काळजाची तार छेडता.
सख्या, दिलवरा,माझ्या प्रियकरा.
यावं लवकर,न्यावं तुमच्या घरा.


संपुर्ण खेळात आज मोहनाने अदा आणि नाचाने सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं.बिजलीला जाणवत होतं.ही नेहमीची मोहना नाही.


समोर बसलेला गडीसुद्धा मोहनच्या नजरेत बंद झाला होता.मोहनाच लाडिक हसत,तिरपा कटाक्ष टाकणं त्याला घायाळ करत होत.तारुण्याची आणि प्रेमाची नशा दोन्ही बाजूनी चढत होती.



आजवर कोणाही आशुक मशुकाला आसपास फिरकुसुद्धा न देणारी मोहना याच्या भोकरावाणी डोळ्यात फसली.इकडे तोसुद्धा आजवर कधीच कोणाच्या वाटेल न जाणारा.गावातल्या कित्तीतरी पोरी त्याच्या एका नजरेसाठी जीव टाकत.आज मात्र तो स्वतःच जीव हरवून बसला होता.



हे नवे वळण सुंदराच्या आयुष्यात काही घडवेल का? पुढे काय होणार?

क्रमशः

🎭 Series Post

View all