मी काट्यांतुन चालून थकले... भाग 19

"हो मला लिहून द्यायचं आहे त्याशिवाय मला पत्र मिळणार नाही, माझं खूप नुकसान होईल आणि मनु च्या शिक्षणाचा खर्च करायला माझी काही हरकत नाही


मी काट्यांतुन चालून थकले... भाग 19

आता मी माझे निर्णय स्वतः घेणार, कोणीही थांबवू शकत नाही मला आता, फार झालं ....

©️®️शिल्पा सुतार
...........

सविता घरात आली अजून तिची धड धड थांबली नव्हती ती सरळ बाथरूम मध्ये निघून गेली, फ्रेश होऊन आली मनू काहीतरी शाळेच सांगत होते त्याकडे सुद्धा सविताचा लक्ष नव्हतं, सुलभाताई काहीतरी सांगत होत्या सविता नुसतं हो ला हो करत होती स्वयंपाक झाला, जेवून घेतलं त्या तिघींनी

"आई काय झालं आहे तुला? बरं नाही वाटत का?",.. मनु

"ठीक आहे मी काय झालं",.. सविता

"अगं मी केव्हाची बोलते आहे तुझ्याशी? तुझं लक्षच नाही",... मनु

" काही झालं नाही मी ठीक आहे, दमली आहे इतकच झोपते मी" ,.... सविता रूम मध्ये गेली तिला झोप येत नव्हती


या आधी कधीच मला असं फिलिंग आलं नव्हतं, खूप छान वाटत आहे आज, माझ कोणी तरी आहे या जगात, सतीश साठी मला कधी अशी फिलिंग आली नाही, धडधड वाटली नाही त्याच्या सोबत, की सतीशने कधी मला महत्व दिल नाही, आमच नात कधी फुलल नाही बहरल नाही,

सतिश शी लग्न जमलं तेव्हाही किती मैत्रिणी चिडवत होत्या, किती स्वप्नं बघितले होते मी सुखी आयुष्याचे, प्रत्यक्षात लग्ना आधी एकदाही सतीश मला भेटायला आला नाही की फोन ही केला नाही, बाकीच्या मैत्रिणींचे नवरे मागे मागे यायचे त्यांना फिरायला न्यायचे, त्यांचा शब्द झेलायचे, गिफ्ट गजरे आणायचे, किती मजा यायची त्यांची तेव्हा मी निर्णय घ्यायला हवा होता, पण वाटल सतीश बिझी असेल कामात, लग्न झाल्यानंतर असं काहीही झालं नाही, ना लाड ना कौतुक, साधे दोन प्रेमाचे शब्द नाही, सतीश ने पहिल्यापासून माझा राग राग केला,

पहिल्या रात्रीची उत्सुकता होती त्यातही सतीशला रंग भरता आले नाही, पहिल्यांदा माहेरी गेल्यानंतर ही किती मैत्रिणी चिडवत होत्या, पण त्यांना काय सांगू मी असं काहीच नव्हतं भावनिक नातं आमच्यात, झाला होता तो फक्त शृंगार त्यात मला काही समजलं नव्हतं, केवळ सतीश ला हवा होतं म्हणून आमच्यात संबंध निर्माण झाले, मनु चा जन्म झाला त्यानंतरही सगळं सतीश च्या मनाप्रमाणे सुरू होतं, मला काही भावना आहेत मलाही प्रेमाची गरज आहे हे त्याला समजतच नव्हतं, त्याची इच्छा महत्वाची, माझ्या इच्छेच काय?? मी पण एक माणूस आहे,

आज सविताचे खूप डोळे भरुन येत होते, सागर समोरून विचारतो आहे मला लग्नासाठी, त्याच्या बरोबर राहायचं आहे मला, अनुभव घ्यायचा आहे प्रेमळ संसाराचा, स्वतःचे लाड करून घ्यायचे आहेत,

काय करू होकार देऊ का त्याला? का वाट बघायची मी दुसऱ्याची? होईल तेव्हा होईल घटस्फोट, नेहमी दुसऱ्याचा विचार केला आहे मी , पण त्यांनी केला का कधी माझा विचार? जे होईल ते होईल मी आता सागर शी लग्न करणार आहे मला चांगलं वाटतं त्याच्या सोबत

सुलभा ताई आत आल्या, सविता अजून झोपलेली नव्हती

"काय झाल ग सविता? आज कशात मन नाही तुझ? कोणी काही बोलाल का तुला? , सतीश भेटला का रस्त्यात? , तू आता सतीश कडे लक्ष देवू नको बर",.. सुलभा ताई

"आई मला बोलायच आहे तुमच्या शी थोड, मला माहिती नाही तुम्हाला हे आवडेल की नाही मी बोललेलं, पण तुम्ही मला जवळच्या वाटतात ",... सविता

" बोल ग काय झाल? ",... सुलभा ताई

" आई आज मला सागर भेटला होता, तुम्हाला माहिती आहे आम्ही शाळेपासून सोबत आहोत पूर्वीपासून सागरला मी आवडायची, त्याने मला लग्नासाठी विचारलं, त्याच विचारात आहे मी काय करू? ",.. सविता

" तुला काय वाटत आहे सागर बद्दल?",.. सुलभाताई

" मला तो पूर्वीपासून आवडत होता आता मला समजत नाही आहे काय करू? अजून तर माझा सतीश सोबत घटस्फोटही झाला नाही आणि लगेच पुढच्या लग्नाचा विचार मला पटत नाही आहे हे, पण मला सागर सोबत सुद्धा राहायचं आहे ",.. सविता

"जर तुझा तुला सागर सोबत रहायला काही प्रोब्लेम नसेल तर तू बाकीचे विचार नाही करायला पाहिजे, तुला आणि सागरला पटत असेल तर तुम्ही पुढचा विचार करायला काही हरकत नाही, घटस्फोट तर काय आता होईल सतीश जरी माझा मुलगा असला तरी तुला होणारा त्रास मी बघितला आहे, तुला नवऱ्याचं प्रेम अस मिळालंच नाही, तुझे सासरे खूप चांगले होते आमच्या दोघांचं खूप पटायचं, खूप छान नात होत आमच, नवऱ्याचे प्रेम नवऱ्याचा आधार किती महत्त्वाचा असतो, मी तर प्रत्येक गोष्टीवर यांच्यावर अवलंबून होते, आणि हे ही सगळे निर्णय मला विचारुन घ्यायचे , यांनी पण खूप छान साथ दिली मला, त्यांच्या आठवणींवर मी पुढचं आयुष्य काढू शकते, कोणाची तरी साथ असण गरजेचे आहे हे मला चांगल्या रीत्या माहिती आहे , अस एकटी तू किती दिवस आयुष्य काढशील? याआधी पण तुला असं एकटीने जगणं होतं, सतीश ने तुला हवी तशी साथ दिलीच नाही, तुलाही आनंदी राहण्याचा अधिकार आहे, तू तुझा निर्णय घेऊ शकते, सागर चांगला मुलगा आहे आहे मी विशेष त्याला भेटलेली नाही पण एका भेटीतच मला समजलं की तो तुझी चांगली काळजी घेईन, खरं सांगू का? पहिल्यांदा जेव्हा सागर आपल्या घरी आला होता तेव्हा मला मला वाटलंच होतं की सागर किती चांगला आहे, तो जर तुझ्या आयुष्यात आला तर किती चांगलं होईल ",.. सुलभाताई

"आई खरं सांगा तुम्ही रागवल्या नाही आहात ना? ",.. सविता

"नाही ग मी कशाला रागवेल तू उगीच घरात इतर विचार करत बसण्यापेक्षा तुझा आणि सागर चा विचार कर, काही हरकत नाही पुढे जायला",.. सुलभाताई

"आई तुम्ही किती छान समजून घेत आहात मला मला तर खूप भीती वाटत होती की मी तुम्हा दोघींना ही गोष्ट कशी सांगणार आहे",.. सविता

" पण तुझ्या मनात काय आहे सागर विषयी",.. सुलभाताई

" मला सागर सोबत राहायचं आहे पण मला थोडा वेळ हवा आहे, घटस्फोट झाल्यानंतर मी सागरला हो बोलेल",.. सविता

" चालेल बघ तुला कसे योग्य वाटते पण पुढे जायला काही हरकत नाही ",.. सुलभाताई

सविताला आता जरा बोलून बरं वाटत होतं तिला शांत झोप लागली

सविता सकाळी लवकर उठली मनु साठी शाळेचा डबा तयार केला, नाश्त्यासाठी बनवलं, मनू उठली तेवढ्यात

" बरं वाटत आहे का आई? ",.. मनु

"हो मनु ठीक आहे मी ",.. सविता

" काय होत होतं ",.. मनु

"सांगेन तुला नंतर तुझ्याशी सुद्धा बोलायचं आहे मला",.. सविता

" काही प्रॉब्लेम आहे का?",.. मनु

" नाही ग काहीही प्रॉब्लेम नाही ठीक आहे",.. सविता

"आई तू तुझा वेळ घे, नाश्त्याला काय केलं आहे? मला उशीर होतो आहे ",.. मनू

सविताने मनूला सुलभा ताईंना नाश्ता दिला तिघींचा चहा नाश्ता झाला, मनू शाळेत गेली सविता आवरायला आत मध्ये आली, तिला कालच्या सागर ने दिलेल्या गिफ्ट ची आठवण आली, पर्स मधून तिने गिफ्ट बाहेर काढलं, छान चौकोनी बॉक्स होता, ज्वेलरी आहे वाटत, गिफ्ट उघडलं आत छान नाजूक अशा चार सोन्याच्या बांगड्या होत्या, गिफ्ट बघून सविता आश्चर्यचकित झाली, किती सुंदर आहे या बांगड्या, खूप महाग असतील, मि या नाही घेऊ शकत, सागर भेटला की वापस करून देऊ त्याला, काय करूया बांगड्या सोबत घेऊ का? की कपाटात ठेवून देऊ? तिने दोन मिनिट बांगड्या घालून बघितल्या, अतिशय छान दिसत होत्या त्या तिच्या हातात, एकदम मोहात पडली ती त्या बांगड्यांच्या, दुसऱ्या क्षणाला तिने त्या बांगड्या काढल्या, सागरही असाच आहे, अगदी मोहात टाकतो तो, पण मी या बांगड्या वापस करणार आहे, जेव्हा लग्न होईल तेव्हा बघू, सविताने बांगड्या व्यवस्थित कपाटात मागच्या बाजूला ठेवून दिल्या, कपाटाला लॉक लावलं, ती बुटीक कडे निघाली,

रमेश दादा चा फोन आला,...

"निघाले का तुम्ही लोक घरातुन?",... सविता

"आम्ही अकरा वाजता जाणार आहोत दवाखान्यात त्यानंतर दुपारी येवू आम्ही तिकडे घरी, तू किती वाजता येणार आहेस घरी?" ,... रमेश दादा

"मला चार वाजतील",... सविता

"ठीक आहे आम्ही थांबतो घरी जावून", सुलभाताई असतीलच ना घरी?",... रमेश दादा

"हो त्या आहेत घरी ",... सविता

काय करू सागर ला फोन करून बघू का?... तिने सागरला फोन लावला, सागरला सविताचा फोन बघून खूप आनंद झाला,

" बोल सविता ",.. सागर

" काय झालं सागर का हसतो आहे ",.. सविता

"तुझा फोन आला हे बघून मला खूप आनंद झाला, मी हसत नाही, आज माझं नशीबच भारी की सकाळी सकाळी मॅडमचा फोन आला",... सागर

"पुरे ह सागर",... सविता

"बोल ना काय म्हणते आहेस गिफ्ट आवडलं का माझं?",.... सागर

"त्यासाठीच फोन केला होता, एवढ्या महाग बांगड्या मी नाही घेऊ शकत",... सविता

"काय झालं? डिझाईन नाही आवडली का? ",... सागर

"तू मुद्दामून करतो आहेस सागर, तुला माहिती आहे मला काय म्हणायचं आहे",... सविता

" असू दे ग सविता तु एवढा बारीक विचार करत बसू नको, पहिल्यांदा रमेश दादा सोबत तू मला भेटली होती पोलीस स्टेशनला, तेव्हाच बघितलं होतं मी तुझ्या हातात बांगड्या नव्हत्या, तेव्हाच ठरवलं पहिलं गिफ्ट तुला सोन्याच्या बांगड्या द्यायच्या",.... सागर

" पण मी नाही घेवू शकत त्या बांगड्या ",.. सविता

"दिल्या आहेत मी तुला आता त्या बांगड्या, वापरून टाक आता, उगीच हो नाही करू नकोस, मला वाटलं तू म्हणशील चारच का आणल्या अजून चार हव्या होत्या, खर्च होईल या भीतीने मी केवढा घाबरलो होतो",... सागर

" काहीही काय रे सागर, सारखी काय गंमत",... सविता

"हे बघ सविता टेन्शन घेऊ नकोस, मस्त वापरून टाक बांगड्या आता, ठीक आहे तू असं मला बोलते आहे गिफ्ट नको, नंतर तू या वस्तूंसाठी माझ्याशी भांडशील ",... सागर

" नाही रे बाबा भांडण मुळीच नको, आपल्यात काही मिळालं नाही तरी चालेल पण भांडणाला खूप जीव भीतो माझा, ब्युटिक आलं आहे, मी जाते आत मध्ये ",.... सविता

" ठीक आहे गुड डे",... सागर


सतीश सकाळी ऑफिसमध्ये पोहोचला सचिन साहेब यायचे होते अजून, जरा वेळाने सचिन सर आले, सतीश केबीन मध्ये गेला,

" काय सतीश काय काम काढलं",... सचिन सर

" सर तुम्ही बोलले होते ना की तुम्ही मला लेटर देणार आहात की मी स्वतः हुन रिजाइन केल अस ",.. सतीश

" आहे हो देणार आहे मी, तू पत्र आणलं का तुझ्या वकिलांकडून लिहून की तू मनूच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलतो आहेस",... सचिन सर

"सर मी उचलणार आहे मनुच्या शिक्षणाचा खर्च, पण मी लिहून नाही आणलं ",... सतीश

" एक काम करायचं मग ते लिहून आणायचं स्टॅम पेपर वर आणि इथे सबमिट कर",... सचिन सर

" पण सर कोर्ट केस सुरू झाली नाही अजून",... सतीश

" तुझ्या कोर्ट केस चा इथे काय संबंध? जर तुला लेटर हवा असेल तर मला तू पेपर्स सब्मिट कर ",... सचिन सर

" ठीक आहे मी येतो जरा वेळाने",... सतीश ऑफिस मधुन निघाला, त्याने वकीलाला फोन केला, पेपर वर लिहून हव आहे मला

"पण अस कस आधी लिहून देतात तुम्ही ",.. वकील

" मी करणार आहे खर्च माझ्या मुलीच्या शिक्षणाचा काही फरक पडत नाही द्या पेपर तयार करून ",.. सतीश

वकिलांनी त्याला ऑफिसमध्ये बोलवलं,..." तुम्हाला नक्की लिहून द्यायचं आहे का तुम्ही मनूच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहात अस ",..

"हो मला लिहून द्यायचं आहे त्याशिवाय मला पत्र मिळणार नाही, माझं खूप नुकसान होईल आणि मनु च्या शिक्षणाचा खर्च करायला माझी काही हरकत नाही, जरी मला दोन वर्ष सर्विस नसली तरी माझं सेविंग आहे तेवढं, मी मनूला ला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकतो ",.. सतीश

" ठीक आहे मग तुमची हरकत नसेल तर मी लिहून देतो, सही शिक्का आणून देतो, तुम्ही खाली सही करा आणि ऑफिसमध्ये सबमिट करा",... वकील

ठीक आहे.. सतीश

दुपारून सतीश पेपर घेऊन ऑफिसमध्ये पोहोचला, सचिन सरांकडे त्याने पेपर सबमिट केले, सरांनी त्याला लिविंग लेटर दिला सतीश घरी आला,..." चला आता उद्यापासून नोकरी शोधायला काही हरकत नाही",

सचिन सरांनी रूपाला फोन केला,..." सतीश ने मनूच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे म्हणून मी त्याला लिविंग लेटर दिलं",

"हे खूप चांगलं झालं आहे सचिन, एक फार मोठा टेन्शन होतं सविताला कमी झालं ते आता, आपण हे बुटीक सुरू करू, सविता च घर व्यवस्थित चालेल, तशी आपली काही गरज नाही तिला, तिच्या घरचे समर्थ आहेत तिला सपोर्ट करायला, पण आपल्याकडून होईल तेवढं करु या, मेन म्हणजे सविता खूप हुशार आहे तिचंही मन लागून राहील बुटीक मध्ये ",... रूपा

"हो बरोबर बोलते आहेस तु रूपा, होईल तेवढं करायचं आपण",.. सचिन

"काय झालं ते शॉप मिळाला का रेंट ने",... रूपा

" बरं झालं तू आठवण दिली मी ब्रोकर ला फोन करतो",.. सचिन

चार-पाच चांगले मोठे मोठे शॉप रेडी होते, लगेच बघायला बोलवलं होत त्यांनी

"उद्या जाऊन बघून या तुम्ही शॉप, ब्रोकर येईल सोबत, तसं तू सविताला सांगून दे रूपा",.. सचिन

" हो चालेल लगेच पैसे द्यायचे आहेत का त्याला",.. रूपा

" तू पैशाचं काही काळजी करू नको मी बघतो तो व्यवहार तू आणि सविता जाऊन आधी शॉप पसंत करा तो एरिया आवडतो आहे का ते बघा आणि तू केली का चौकशी होलसेल सप्लायर ",.. सचिन

" हो दोन तीन आहेत सप्लायर त्यांचा माल बघितले आहेत मी सुंदर ड्रेस मटेरियल आहेत रेडी कुर्ते आहेत",.. रूपा

" छान बरीच तयारी झाली आहे",.. सचिन

" हो आपल्याला निदान पुढच्या पंधरा दिवसात तरी थोडंसं तरी काम सुरू करावे लागेल, टेलर मशीन लागतील",.. रूपा

बऱ्यापैकी ठरलं होतो आता बुटीक च.... एक एक प्रश्न मार्गी लागत होते
.....


🎭 Series Post

View all