मी काट्यांतुन चालून थकले... भाग 14

मला माहिती आहे की तुला तुझी गैरसोय होते आहे म्हणून तु मला घेऊन जातो आहे, नाहीतर ज्या मुलाने चार पाच दिवसापासून फोन केला नाही


मी काट्यांतुन चालून थकले... भाग 14

आता मी माझे निर्णय स्वतः घेणार, कोणीही थांबवू शकत नाही मला आता, फार झालं ....

©️®️शिल्पा सुतार
.............

चार वाजले सविता बुटीक मधुन निघाली, तिने बाहेर आल्यावर सागरला फोन केला,

"हो मी येतोच आहे पाच मिनिटात, तू थांब",.. सागर आला

"चल आपण कॉफी घेऊया का?",.. सागर

"घरी चलतोस का सागर? इथून जवळच माझं घर आहे" ,.. सविता

"चालेल जाऊया आपण, त्या आधी कॉफी घेऊ मग घरीच जाऊ. म्हणजे मला कळेल तुझ घर कुठे आहे ते, काही लागल तर येता येईल",.. सागर

दोघं निघाले कॉफी शॉप वर पोहोचले, सागर ने दोन कॉफी सांगितल्या , सागर काहीतरी फोन वर चेक करत होता, सविता ने बघितल सागर खूप छान वाटत होता आज, अरे मी काय असा विचार करते आहे, माझा बालपणीचा मित्र आहे हा, किती पटायचं आमच्या दोघांच शाळेत असतांना, तिच्या मनात त्याला एक स्पेशल जागा होती तेव्हाही, एक छोटासा स्पेशल कोपरा सागर साठी होता , तो शाळेत आला नाही तर करमायच नाही , सागर अगदी प्रत्येक गोष्ट येऊन मला सांगायचा, शाळा संपली दोघांच कॉलेज वेगवेगळे झाले, तो होस्टेल वर होता, वर्षातून एक-दोनदा भेट व्हायची, तो गावी आला की मला भेटायला अगदी हमखास यायचा, घरी तासनतास बसायचा, रमेश दादा पेक्षा माझ्याशी खूप बोलायचा, पण माझं लग्न झाल्यापासून एकदाही भेटली नव्हती मी त्याला, जाऊ दे याच्या कडे आपण नको बघायला, काय वाटेल त्याला,

सविता ला घरची आठवण झाली, सविताने सासूबाईंना फोन करून सांगितलं,.." मी येते आहे जरा वेळाने घरी, सागर भेटला आहे इथे, जरा वेळ बोलते , मनु गेली का क्लास ला? ",

" हो गेली ती क्लासला, ये तू सावकाश",.. सुलभा ताई

"सासूबाई तुझ्या सोबतच आहेत ना सविता",.. सागर

" हो खूप चांगल्या आहेत माझ्या सासूबाई",.. सविता

"तू तुझ्याबद्दल काही सांगितलं नाहीस सागर, तुझं लग्न कधी झालं? ",.. सविता

" माझं लग्न झालं आणि घटस्पोट ही झाला आहे, मला मूलबाळ नाही, पाच वर्ष झाले या गोष्टीला, माझ लग्न उशिरा झाल, खूप शिकलेली होती माझी पत्नी , तिचे स्वप्न खूप मोठे होते, तिला परदेशात जॉब मिळाला, तिला तिकडे जायचं होतं, मी आईला सोडून जाऊ शकत नव्हतो, रोज भांडण व्हायच आमच, ईकडचे सगळे बंधन तोडून टाकायचे होते तिला , तिने अट घातली सोबत चल किवा घटस्फोट दे, मी घटस्फोट मागितला, आता तिचं लग्न झाल आहे दुसरीकडे, ती परदेशात सेटल झाली ",.. सागर

" मग आता तू एकटाच राहतोस का? ",.. सविता

" हो मी एकटाच आहे आता, माझे बाबा आपण शाळेत असतानाच वारले होते, आई पण आत्ताच दोन वर्षापूर्वी गेली, कामाच्या व्यापात स्वतःला इतका व्यस्त करून घेतल आहे मी की एकटेपणा विसरून जातो",.. सागर

" शाळेत असतांना किती गप्पा मारायचो ना आपण, अगदी घरी काय झालं ते सगळ एकमेकांना सांगायचो, किती समजून घ्यायचं त्याही वेळा तू मला",.. सविता

" हो ना सविता किती गम्मत यायची आपली, मी तुझी वेणी सारखी ओढायचो, तुझे केस आताही खूप सुंदर आहेत, मी तुला विसरू शकलो नाही सविता ",.. सागर

सविता सागर कडे बघत होती..

" म्हणजे सॉरी तस नाही सविता ",.. सागर

" अरे ठीक आहे सागर, एवढी काय फॉरमॅलीटी",... सविता छान हसत होती, सागर तिच्या कडे बघत बसला

कॉफी आली सविता कॉफी घेत होती

" किती साधी आणि छान दिसते सविता, आधी होती तशी, हीच लग्न झालं हे जेव्हा मला समजलं होतं तेव्हा किती धक्का बसला होता मला, खरंतर मीच मागणी घालणार होतो हिला, पण यांच्या घरच्यांनी लग्नाची घाई केली, आता आहे चान्स तर बोलून बघू का? पण सविताला आवडेल का हे? तिला वाटायचं की माझा नवरा नाही आहे सोबत तर सागर चान्स घेतो आहे, थोडे दिवस थांबतो सविताच्या मनात काय असेल माझ्याविषयी? तिला अस नको वाटायला मी गैरफायदा घेतो आहे, आता मला परत एकदा सविता ला गमवायच नाही, वेळ बघूनच बोलल पाहिजे",.. सागर

" काय विचार करतो आहे सागर? का बर गेला होतास तू कोर्टात?, माझ्या केस साठी का? ",.. सविता

" हो, तुझी केस फाईल केली, हे आहे कागदपत्र याच्यावर तु सही कर नंतर ",.. सागर

" तुझी फी किती आहे सागर?, ते पण सांग",.. सविता

" हो सांगेल ग फी, एवढी काळजी करू नकोस आणि मी काही एवढा परका नाही",.. सागर

" नाही रे तू तर मला अजिबात परका नाही, एका डब्यात जेवलो आहोत आपण, वर्गातील बाकीचे मुलं-मुली कुठे आहेत काही कल्पना आहे का? ",.. सविता

दोघेजण खूप छान गप्पांमध्ये रमले होते, किती बोलू नि किती नको असे झाले होते त्यांना, दोघ एकमेकासोबत खूपच कम्फर्टेबल होते, सविता ने फॉर्म वर सही केली, ती दोन मिनिट विचारात होती

" काय झाल सविता",.. सागर

" काही नाही रे पंधरा वर्षांचा आमचा संसार जरा सही करताना हात कापत होता एवढच",.. सविता

"आत्ता जर तुला ऑप्शन दिल येथे सही कर किंवा परत जा, तू काय करशील?",.. सागर

" मी सही करणं पसंत करेन, कारण मलाच माहिती आहे मी काय सहन केलं आहे तिकडे, अगदी एकतर्फी संसार होता रे माझा, आता परत नाही फिरायच, जे होईल ते ",..सविता

" मग आता परत दोन दोन दा तोच विचार करू नकोस, घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा आणि आनंदी राहा, उगाच स्वतःला गिल्टी समजू नकोस, तुला हि आनंदी राहायचा अधिकार आहे, तुझ्या लाईफ चे निर्णय तू घेऊ शकते ",.. सागर

" हो एकदम बरोबर, या पुढे विचार बंद ",.. सविता

" छान हसून दाखव बर मग आता", .. सागर

सविता आता हसत होती, मुद्दाम सागर काहीतरी जोक सांगत होता, तिच्या चेहर्‍यावर हसू बघून त्याला बर वाटल, ते दोघ तिथून निघाले, घरी आले, मनु नुकतीच क्लास हून आली होती

दोघं आत आले सागर जाऊन सुलभा ताईंना भेटला, मनु ही बाहेर आली

" आई मनु हे आहेत सागर माझ्या बालपणीचे मित्र",.. सविता

"सविता अगं आहो जाहो का घालते आहेस मला? सरळ सांगा हा सागर आहे",.. सागर

"ठीक आहे सागर",... सविता छान हसत होती,.. "आणि हा पेशाने वकील आहे, माझी आणि सतीशची केस याच्या कडे आहे, आज आम्ही भेटलो , त्याला फॉर्मवर माझी सही हवी होती, तर मी म्हटलं की चल घरी आईंची आणि मनुची पण ओळख होईल ",.. सविता

सागर ने पुढे होऊन मनुशी हात मिळवला, सुलभा ताईंच्या पाया पडला

"मनु काय करतेस तू, क्यूट लिटिल प्रिन्सेस ",.. सागर

" मी दहावीत आहे काका ",.. मनु

" हे घे तुला चॉकलेट ",.. सागर ने मनु साठी चॉकलेट आणले होते

" कसा सुरू आहे तुझा अभ्यास? क्लास वगैरे सुरू आहे ना?",.. सागर

"हो काका, तुम्ही आई च्या वर्गात होते का?",.. मनु

"हो दहावी पर्यंत एकत्र होतो आम्ही आणि तू मला अहो वगैरे म्हणू नको नुसत काका बोल ",.. सागर

" चालेल काका तू सांग आई कशी होती शाळेत",.. सागर

"आता आहे तशी अजिबात नव्हती, खूप खेळकर आनंदी आणि उत्साही होती ती, आम्ही कायम सोबत असायचो खूप मजा केली आहे आम्ही",.. सागर

" आई ला आता पुर्वी सारखी हसरी करू आपण काका",.. मनु

" हो बेटा ",.. सागर

सुलभा ताई सागर कडे बघत होत्या

" आई तुम्ही अगदी मला माझ्या आई सारख्या वाटत आहात, माझी आई आता दोन वर्षा पुर्वी वारली, आजारी होती ती, मी तुम्हाला भेटायला येत जाईल इकडे नेहमी, चालेल ना? ",.. सागर

" हो चालेल बेटा, तू खूप छान आहे स्वभावाने, मला मोकळ बोललेले लोक आवडतात ",.. सुलभा ताई

"हो ना मग आपल जमेल खूप",.. सागर

" सविता चहा कर",.. सुलभा ताई

"नको आम्ही आता कॉफी घेतली, नंतर कधी तरी, मी खास तुम्हाला दोघींना भेटायला आलो इथे, मी निघतो आता",.. सागर

" ठीक आहे येत जा रे",.. सुलभा ताई

हो..

" चल मनु येतो मी",.. सागर

" हो काका बाय ",.. मनु

"सविता उद्या सकाळी मी हे पेपर कोर्टात सब्मिट करतो आहे, नंतर सतीश ला नोटीस जाईल, तुला खूप ठाम रहाव लागेल ",.. सागर

" ठीक आहे चालेल सागर, हो आता माझा विचार पक्का आहे, खूप थँक्यू ",.. सविता

" थँक्यू काय बोलतेस, ओके वेलकम",.. सागर

सविता त्याला सोडायला बाहेर पर्यंत गेली, मनु सुलभाताई त्या दोघांकडे बघत होत्या, त्यांचा एकमेकांशी मोकळं वागण खुपच छान वाटत होतं

"आपल्या घरात असं कधी वाटलंच नव्हतं ना आजी? आई-बाबांना मी कधी बोलतांना बघितलं नाही",.. मनु

" हो ना, हा सागर छान आहे ",.. सुलभा ताई

सविता आता आली, त्या दोघी गप्प बसल्या

सागर गेला सविता मनु सुलभाताई भारावून गेल्या होत्या असे व्यक्तिमत्व आहे त्याचं,

"खरंच किती चांगला आहे ग हा सागर ",.. सुलभाताई

" खरच हा काका चांगला आहे",.. मनु

" तुम्ही बरोबर होता का ग शाळेत ",.. सुलभा ताई

" हो आई माझा बालमित्र आहे हा, रमेश दादा अजूनही बोलतो याच्याशी, नामांकित वकील आहे, खूप बिझी असतो तो, खूपच चांगला आहे स्वभाव" ,... सविता

" आई मला तुला एक गोष्ट सांगायची आहे आज शाळा सुटल्यावर बाबा आले होते मला भेटायला, ते मला काहीतरी सांगत होते की त्यांना माफीनामा हवा आहे",.. मनु

सुलभाताई आणि सविता एकमेकाकडे बघत होत्या

" आता हा कशाला गेला होता शाळेत मनूला भेटायला? ",.. सुलभाताई

"आई मला पण आज हे भेटले होते बुटीक जवळ",.. सविता

" आता काय प्रत्येकाला येऊन भेटतो आहे का हा? ",.. सुलभा ताई

"आणि हे बोलत होते की तुम्हाला ते घरी घेऊन जाणार आहेत, त्यांची गैरसोय होते आहे, बोलत होते आईला घेऊन जातो, मी सांगितलं की आई माझ्या सोबतच राहतील, तरी ते तुम्हाला फोन करणार आहेत, बघा तुमचा काय विचार होतो ते, तुम्हाला माझी बळजबरी नाही, पण एवढंच सांगते मी आणि मनू तुमच्याशिवाय राहू शकत नाही, पण हे पण आहे सतीश तुमचा मुलगा आहे, तुम्ही विचार करून निर्णय घ्या, यांचा फोन येणार आहे आज संध्याकाळी",.. सविता

सुलभाताई विचारात होत्या काय करावं? त्यांनी मनातच ठरवले मी मुळीच जाणार नाही सतीश कडे वापस, मी इथेच राहील सविता जवळ,

सविता आवरायला आत मध्ये गेली, मनु आजी जवळ बसलेली होती

" आजी हा सागर काका का किती छान आहे ग, हा काका आणि आई एकमेकाला आधीपासून ओळखतात ना, काका सोबत असल्यावर आई खुश असते, मला आईला नेहमी खुश बघायचा आहे",.. मनु

सुलभाताई पण विचार करत होत्या.. "सागर च लग्न झालं आहे का? सविताचा तो मित्र आहे म्हणजे तिच्याच वयाचा असेल, झालं असेल लग्न, काय माहिती आपण सविताला विचारू त्याच्याबद्दल माहिती",.. सुलभा ताई पण खूप खुश होत्या

सविता आवरून बाहेर आली,.." आज आईला सोडल आहे घरी, ठीक आहे आता तब्येत",.

"चला बरं झालं, कश्या आहेत आता त्या? ",.. सुलभा ताई

" ठीक आहे आई, मी बहुतेक उद्या आईकडे जाऊन येईल जरावेळ",.. सविता

हो चालेल..

"मी वेळेतच घरी येईल, दुपारच्या सुट्टीत जाऊन येईल मी आई कडे ",.. सविता

"अगं संध्याकाळी गेली तरी काही हरकत नाही मी आणि मनु आहोत घरी ",.. सुलभा ताई

त्या दोघी बोलत असतानाच फोन वाजला, सतीशचा फोन होता, सविताने फोन सुलभाताईंन कडे दिला

" बोल रे सतीश",.. सुलभा ताई

" आई कशी आहेस तू ",.. सतीश

"मी ठीक आहे, काही काम काढलं आज माझ्याकडे",.. सुलभा ताई

"आई तू माझ्याकडे राहायला येतेस का",.. सतीश

" नाही सतीश मी सविता सोबतच राहणार",.. सुलभा ताई

" असं काय करतेस आई, तू माझी आई आहे ना",.. सतीश

"चार-पाच दिवसांनी तुला आत्ता आठवलं का सतीश? त्या दिवशी तू काय बोलला होता की आई तुला जायचं तर जा, मला तुझी गरज नाही, मग आज का फोन केला आहे? ",.. सुलभा ताई

"आई तु त्या गोष्टीचा राग धरला आहे का मनात, मी तुझी माफी मागतो घरी ये",.. सतीश

" सतीश तु मला घरी बोलवुन काही उपयोग नाही, माझ्याकडून आता हल्ली काही काम होत नाही आणि सविता सगळं करते त्यामुळे मला स्वयंपाकाची ही सवय नाही, त्यामुळे मी तुझ्या काही उपयोगाची नाही",.. सुलभा ताई

" असं का बोलते आहेस आई ",.. सतीश

"मला माहिती आहे की तुला तुझी गैरसोय होते आहे म्हणून तु मला घेऊन जातो आहे, नाहीतर ज्या मुलाने चार पाच दिवसापासून फोन केला नाही, मी घरातुन जातांना माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही, माझी आठवण सुद्धा केली नाही तू, आता कसं काय म्हणेल की आई घरी चल, एक तर तुला स्वयंपाकासाठी मी हवी असेल किंवा घर कामासाठी ",.. सुलभा ताई

"नाही आई असं काही नाही, मला माहिती नाही तुझ्या मनात कोणी काय भरला आहे, का अस करते सविता? ",.. सतीश

" नाही माझ्या मनात कोणीच काही भरलं नाही, हे जे माझे विचार आहेत ते माझे स्वतःचे आहेत आणि माझ्या मनात कोण कशाला काही भरेल मला दिसत नाही का तू कसा वागतो घरात ते, तुला असं का वाटतं सतीश की तुझं काही चुकत नाही, मी अजिबात तुझ्याकडे येणार नाही आणि उगीच मला सारखा बोलवायचा फोन करू नको ",.. सुलभा ताई

सतीश चा नाईलाज झाला, त्याने फोन ठेवून दिला, काय करावं? आई सुद्धा माझ्याशी बोलत नाही, आता या कोणाचा विचार करून उपयोग नाही, मी नवीन काम शोधतो, अजून स्वयंपाक बाकी आहे, काय कटकट आहे, भाजी नाही, दूध नाही, सविता सगळ सामान आणत होती, होईल सवय, काम वाली ने सांगून दिल मॅडम नाही तर मी येणार नाही, एक एक लोक आपले रंग दाखवतात आता.
.......





🎭 Series Post

View all