Jan 29, 2022
कथामालिका

मी काट्यांतुन चालून थकले... भाग 4

Read Later
मी काट्यांतुन चालून थकले... भाग 4


मी काट्यांतुन चालून थकले... भाग 4

आता मी माझे निर्णय स्वतः घेणार, कोणीही थांबवू शकत नाही मला आता, फार झालं ....

©️®️शिल्पा सुतार
.............

सविता, सुलभा ताई फिरून घरी आल्या, सतीश घरी आलेला होता, मनु अभ्यास करत होती

"काय कुठे दौरा होता, एखाद्या दिवशी घरी लवकर याव तर घरी चहाही मिळत नाही",.. सतीश

" बाबा तुम्ही करून घ्यायचा ना मग चहा, आई काही किचन सोबत घेवून गेली नव्हती" ,.. मनु

"हो आता मी किचनची कामे करत बसू का? , मग तुझी आई काय करणार? , काही काम आहे का तिला? " ,.. सतीश

" अस का बोलतात तुम्ही बाबा नेहमी? , स्वयंपाक करण काय फक्त आईच काम आहे का?, तिला तीच आयुष्य आहे, गेली ती फिरायला तर काय झाल? , तुम्ही नेहमी एवढे काय बोलतात तिला, आणि बायकांन विषयीचे तुमचे विचार मला पटत नाही बाबा, तुम्ही नेहमी आम्हाला कमी समजतात ",... मनु

" मनु जाऊ दे ग, परत नको ग भांडण, तू घेणार का चहा, आई तुमचा ठेवू का चहा",... सविता वैतागली होती

सविता चहा ठेवायला आत गेली,

"थोडी भजी कर आज सविता, भूक लागली आहे ",... सतीश

सविता ने चहा भजी आणली, सगळ्यांना चहा दिला

सतीश ने भजी खाल्ली,..." काय ग फक्त बटाट्याची भजी केलीस, दोन तीन प्रकार करायचे ना",

" बाबा आता एवढ खावून घ्या, उद्या पासून आई बिझी आहे, मग तक्रार करायची नाही ",... मनु

" म्हणजे?, कुठे चाललीस सविता तू ", ... सतीश

"आईला बुटीक मध्ये जॉब मिळाला आहे , पेमेंट ही चांगला आहे, शिवाय जास्त काम केल तर इन्सेंटिव्ह ही आहे ",.... मनु

"कधी झाल हे?, मला काही बोलली नाहीस तू?, मग हो सांगितल का सविता ",.. सतीश

" हो आहो, आज दुपारी गेली होती मी इंटरव्ह्यूला, मला खुप आवडल ते काम, मी उद्या पासून जॉईन होते तिकडे ",... सविता

"काय म्हणून? टेलर म्हणून का? ",.. सतीश

" हो, अहो मी डिझायनर आहे, त्यांना माझ्या डिझाईन खूप आवडल्या ",... सविता

" काही गरज नाही ह्या जॉबची, घरातल्या घरात शिवण काम करते ते ही मला आवडत नाही, उगीच तिकडे जायच नाही कामाला ",... सतीश

" अहो ते काही अस तस बुटीक नाही, श्रीमंत लोक येतात तिथे, ऑर्डर्स खुप असतात, खूप शिकायला मिळेल मला तिकडे " ,.. सविता

"मग तू काय तिथे श्रीमंत लोकांच्या सेवेसाठी जातेस का? तिथे मॅडम मॅडम करायला, हे बघ सविता तुझ काही स्टेटस नसेल पण माझ आहे समाजात स्थान, नाही म्हणजे नाही ",... सतीश

" काय बोलतात तुम्ही अहो ",... सविता

सतीश रागाने बघत होता

" चांगल आहे काम तिकडे, माझ्या डिझाईन शिवण काम आवडल त्या लोकांना ",... सविता

" नाही म्हटल ना मी या पुढे हा विषय घरात नको",... सतीश

" सतीश अरे करू दे तिला काम, आवडत तिला, तेवढाच वेळ जाईल तिचा, हुशार आहे सविता ",.. सुलभा ताई

"आई तू यात पडू नकोस",..... सतीश

" का करू नको काम, आई तू कर काम स्वतःच्या पायावर उभा राहण चांगल आहे आणि हे तुझ आवडत काम आहे अजिबात कोणाला घाबरू नकोस, तुला वाटत तेच कर ",... मनु

" कोणाला म्हणजे काय? माझ्या बद्दल बोलते ना मनु तू? ",.. सतीश

" हो बाबा मी तुमच्या बद्दल बोलते आहे, आई ही एक सेपरेट व्यक्ति आहे तिला तीच जगू द्या, तुम्ही तिच्यावर मालकी हक्क दाखवू नका नेहमी, सारख काय तुम्ही बोलाल ते करायच तिने, तुमच चुकत आहे तिला पाठींबा द्यायचा सोडून तुम्ही तिचे पाय मागे खेचता आहात ",... मनु

"माझी बायको आहे ती, तीच चांगल वाईट कळत मला, शिवण कामाला कसला पाठींबा आलाय, मला नाही आवडत",... सतीश

" हो का बाबा, बायको बायको करतात कधी प्रेमाने वागले नाहीत मग बाबा तुम्ही बायकोशी, तिला सपोर्टची गरज आहे, चांगल आहे हे काम, तिला तीच काम करू द्या, पहिली गोष्ट तुमच्या परवानगीची गरज नाही, आई तिचे डिसिजन घेवू शकते, उगीच मध्ये मध्ये करू नका ",.... मनु

"खूप बोललीस मनु आम्ही आमच ठरवू ",... सतीश

" बाबा तुम्ही तुमच्या सोयी नुसार आई बद्दल डिसिजन घेतात, तुम्हाला वाटल तेव्हा ती तुमची बायको, तुम्हाला काही करायचा असेल तर तुम्ही विचारतात का तिला?, तीच मत घेता का तुम्ही?, आईने मात्र तुम्ही जे बोलला ते करायच, तुम्ही तीच ऐकत नाही अस कस चालेल? ",.... मनु

" तू सविताच्या मनात काही काही भरवू नको मनु, मी सांगून ठेवतो सविता तेच करेन जे मी बोलतो आहे ",... सतीश

" नाही मी माझ्या मनाप्रमाणे करेन मला हव ते, मला आवडत शिवण काम, मी उद्यापासून जाणार बुटीकला",... सविता

मनु सुलभा ताई कौतुकाने सविता कडे बघत होत्या

"अस किती कमवणार आहेस तू सविता, माझी बरोबरी करते का? घर चालेल का तुझ्या पैशातुन? ",.. सतीश

"नाही तुमची बरोबरी नाही करत मी, तुमच काम मला येवू शकत पण माझ शिवण काम तुम्हाला येणार नाही, मी स्पेशल आहे ",.... सविता थोडी धीट होत होती

"खूप बोललीस सविता नसेल पटत तर रहायच नाही इथे, घरी जायच माहेरी निघून, हे घर माझ आहे, आली मोठी डिझाईनर ",.... रागाने सतीश आत निघून गेला, रात्री न जेवता झोपला तो

" आई अहो हे जेवले नाहीत आज",.. सविता

" जाऊदे तू विचार करू नको, भरपूर भजी खाल्ली आहे त्यांने",... सुलभा ताई

तरी सविताला काळजी वाटत होती, काय वाढून ठेवले आहे पुढे

दुसर्‍या दिवशी सतीश लवकर आवरुन ऑफिसला गेला, सविता आवरुन बुटीकला गेली, खूप छान वाटल पाहिल्या दिवशी कामावर, मी पण काहीतरी करते ही भावना खूप छान होती , मॅडम खूप चांगल्या होत्या, सविताच काम परफेक्ट होत, तिने डिझाईन आयडिया दिल्या कस्टमरला, त्यांना खूप आवडले सजेशन्स, संध्याकाळ केव्हा झाली समजल नाही, येतांना सविता भाजी घेवून आली, आल्या आल्या स्वयंपाक करून घेतला,

" कस वाटल आई आज फर्स्ट डे?, कस होत तिथल वातावरण",.. मनु

" खूप छान वाटल, बाहेरच जग खूप वेगळ आहे, खूप वेगळे लोक आहेत जगात, त्यांना आपल्या हुशारीच कौतुक आहे, मला माहिती नव्हत बराच खर्च करतात बायका साड्या कपड्यांवर, आपण खूप साधे राहतो , मला ना खूप काही करायचा आहे मनु, स्वतःच बुटीक सुरू करायचा आहे, डिझायनर व्हायच आहे",.. खूप भरभरून बोलत होती सविता, तिच्या डोळ्यात स्वप्नं होते

सासुबाई मनु मस्त ऐकत होत्या,

" खूप मोठी हो पोरी, मी आहे तुझ्यासोबत",... सुलभा ताईंनी आशीर्वाद दिला,

सतीश आला ऑफिस हून तो रागावलेला होता, कोणाशी बोलला नाही तो , त्यामुळे छान वाटत होत घरात, जेवण झाल सतीश जावून झोपला, एकदा ही सविताशी कामाबद्दल बोलला नाही तो, सविता ने ही काहीही सांगितल नाही, रात्री झोपतांना ही सविता आपल्या कामाचा विचार करत होती

नेहमी प्रमाणे सकाळी सविता उठली,.. फोन वाजता होता, पटकन मोबाईल घेवून ती बाल्कनीत गेली तिच्या भावाचा फोन होता

"सविता ताई आईला बर नाही, अचानक छातीत दुखत होत, अ‍ॅडमिट केल आहे काल रात्री, माईल्ड अ‍ॅटॅक आला आहे, संध्याकाळी लगेच ऑपरेशन आहे, तुझी आठवण काढते आई, जमल तर येवून जा ना आज",... रमेश दादा

"हो येते मी, तू काळजी करू नकोस, कोणत हॉस्पिटल ",... सविता

सविता हॉल मध्ये येवून बसली सासुबाई आल्या जवळ,.. " काय झाल ग? कोणाचा फोन होता? ",..

सासुबाईंच्या प्रेमळ बोलण्याने सविता रडायला लागली, काय झाल तिकडे ते सांगितल, तिचा आवाज ऐकून सतीश उठून बसला

"काय कटकट आहे, एक दिवस ही नीट झोपायला मिळत नाही या घरात" ,.. सतीश

"अरे सतीश उठ सविताच्या आईला हार्ट अ‍ॅटॅक आला आहे समजून घे जरा, सविता तू जायची तयारी कर लगेच, सतीश तूही जा सोबत ",... सुलभा ताई

"जायची म्हणजे कुठे जाते आहे सविता तू",.. सतीश

"कुठे म्हणजे काय हॉस्पिटलला",.. सविता

" का तिचा भाऊ नाही का तिथे",.. सतीश

"हो आहे तो पण सविताची आई मुलीची आठवण काढत होती, जायला हवं तुम्ही दोघांनी ",.. सुलभा ताई

" काही गरज नाही कोणी जायची आणि मला अजिबात वेळ नाही, घरच कोण आवरणार, माझ्या चहा नाश्ताच बघा, उशीर होतो आहे मला ",.. सतीश

"अरे सतीश काय अस? एवढा कसा कोडगा झाला आहेस तू ",... सुलभा ताई रागावल्या

"आई तू यात पडू नको मला माहिती आहे सविताला का फोन आला असेल, म्हणजे हॉस्पिटलचा खर्च आपण करायचा ",... सतीश

"काय बोलतोस तू सतीश, ते लोक श्रीमंत आहेत, त्यांना आपल्या पैशाची गरज नाही, सविता मुलगी आहे त्या घरची, तिची आई आठवण काढत असेल, समजून घे",.. सुलभा ताई

" मुलगी आहे तर राहिली ना इतके दिवस लग्नाआधी माहेरी आता लग्न झालं आहे म्हणा तीच, तिला मोकळ सोडा",... सतीश

"तुझे आई वडील आहेत, तसेच तिचे आहेत, अस कस सतीश तू बोलतोस ",... सुलभा ताई

मनू आली बाहेर,.." काय चाललय आज सकाळी सकाळी" ,

सुलभा ताईंनी सांगितल सगळ,

"बापरे कशी आहे आजी आता ",.. मनु

" संध्याकाळी ऑपरेशन आहे",.. सुलभा ताई

"एवढ काय काम आहे घरी, आम्ही आवरु आमच तू जा आई आणि बाबा तुम्ही तुमचे काम करत चला आता",... मनु

" मी नाही म्हणतो आहे समजल का सविता, अजिबात घराबाहेर पाउल टाकायचा नाही, कालही अस केल तुम्ही माझ ऐकल नाही, आज जर घराबाहेर गेलीस तर तिकडे रहायचं, समजल का सविता ",... सतीश

" बाबा काय हे अस तुम्ही आईशी अस वागू शकत नाही, प्रसंग काय आहे तुम्ही का अस करता आहात? , तुम्ही बघताय का आई रडते आहे, तिला आता हॉस्पिटल मध्ये असण गरजेच आहे, तुम्ही का नको जाऊ बोलता आहात ते नीट सांगा ",... मनु

" आम्ही दोघांनी काय करायचा हा आमचा प्रश्न आहे मनु, तू आईची वकिली कमी कर, मला अजिबात शिकवायच नाही काही ",.. सतीश

" मी आईची बाजु घेणार, चुकीच्या गोष्टी चुकीच्या असतात, बाबा तुम्ही तुमच वागण बदला, चुकता आहेत तुम्ही",... मनु

" खूप बोलतेस मनु तु आता हल्ली, तुला धडा शिकवायला हवा, हे मी आधीच करायला पाहिजे होत", ... सतीश मनुला मारायला धावला, त्याने मनुला मारायला सुरुवात केली, मनुने त्याला ठकलल, सतीश बाजूला जावून उभा राहिला पण तितक्या वेगाने तो आला, परत मनुला दोन फटके मारले

सविता मध्ये पडली, सुलभा ताई मध्ये आल्या, सविताला ही दोन दणके बसले, सतीश मनुला खूप मारत होता, मनु खूप ओरडत होती, शेवटी सविताने सतीशला ढकलून दिले तो बाजूला जावून पडला,

तो चवताळून उठला,

"आताच्या आता सविता मनु या घरातून बाहेर निघायच काय, हे घर माझ आहे, तुम्हाला कुठलीच गोष्ट ऐकायची नाही ना माझी मग इथे माझ्या घरातही राहायचं नाही, खूप कमावते ना तू सविता, खूप हुशार आहेस ना तू, मग या तुझ्या पोरीला घेऊन निघायचं तू, बघू कशी करतेस तू तीच शिक्षण तिचा सांभाळ तिचं लग्न ",.. सतीश

" सतीश अरे अस का बोलतोस, कुठे जाणार स्वतः च घर सोडून सविता आणि मनु ",.. सुलभा ताई

" आई तुला ही पटत नसेल तर तू ही नीघ, तू सदोदित तिची बाजू घेते, कोणी नको मला, मी राहीन एकटा, सुखी राहीन मी ",... सतीश

" अहो काय बोलताय तुम्ही",... सविता

" बरोबर ऐकल तू सविता, मला तुझ मनुच अजिबात तोंड ही बघायचा नाही या पुढे, तुला रहायच असेल तर रहा, पण माझ ऐकाव लागेल तुला, मनुला सोडून ये तुझ्या आईकडे ",.. सतीश

" अहो कशी राहील मनु तिकडे आई बाबा इकडे असतांना, लहान आहे ती, काय अस करताय ",... सविता

"मग तू ठरव काय करायचं ते, मनु सोबत तू ही जातेस का? की मनुला पाठवते ",.. सतीश

" आमच नाही का हे घर, वर्षोनुवर्षे संसार केला हो मी इथे, या घरासाठी खस्ता खाल्ल्या आहेत , जीव लागलाय यात, घरातील एकुण एक वस्तू नीट ठेवली आहे, सजवली आहे, तुम्ही सारखे काय मला माहेरी जायला सांगतात, अस टोकाचा निर्णय घेवू नका, मी माफी मागते तुमची",... सविता

" आरामात बसुन खाल्ला ना इतके वर्ष म्हणे खस्ता खाल्ल्या, काही उपयोग नाही सविता नेहमीच झाल आहे तुम्ही दोघी माझ ऐकत नाही, निघायच इथून, नाहीतर माझ्याहून कोणी वाईट नाही",... सतीश

" ठीक आहे मी पण जाते मनु सोबत, मी तिला एकट नाही सोडू शकत, जन्म दात्याने नाकारले तिला, आता काय करणार? ",... सविता

सविता ही चिडली होती यावेळी, तिने आत जाऊन तिची बॅग भरली,.." चल मनू तुझे कपडे आणि पुस्तक घे सोबत, आपण निघतो आहोत लगेच इथून, नेहमीचंच झालं आहे यांचं, दर दोन-तीन महिन्यांनी घराबाहेर काढतात, खूप हातापाया पडले की घरात घेतात, भांडण मार रोजचा आहे, आता बास, आता नाही सहन करायच, आपण आता इथून निघायचं",..

सुलभाताई सविताकडे आशेने बघत होत्या..

" आई आवरा तुम्हीपण तुम्हीही येता आहात माझ्यासोबत, माझ्यासोबत यायचं आहे ना तुम्हाला? ",.. सविता

" हो मला यायचं आहे तुझ्यासोबत, मी माझे कपडे घेऊन आलेच, तू जाऊ नकोस तोपर्यंत, तू नाहीस तर इथे राहण्यात काही अर्थ नाही ",.. सुलभा ताई

"हो मी थांबली आहे, मनु मदत कर आजीला ",.. सविता

सतीश रागाने आत निघून गेला, सविताने एकदा मन भरून घर बघून घेतल, तिच्या डोळ्यात पाणी होत, सुलभाताई सविता आणि मनू कपडे घेऊन घराबाहेर निघाल्या, स्वतःच्या आई ला थांबवल नाही सतीशने

............

बरोबर आहे का सविताचा निर्णय? सविताला आसरा मिळेल का? आता तरी सविता मनु सुलभा ताई आरामात राहतील का? काय होईल पुढे?
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now