Jan 29, 2022
कथामालिका

मी काट्यांतुन चालून थकले... भाग 2

Read Later
मी काट्यांतुन चालून थकले... भाग 2

 

मी काट्यांतुन चालून थकले... भाग 2

आता मी माझे निर्णय स्वतः घेणार, कोणीही थांबवू शकत नाही मला आता, फार झालं ....

©️®️शिल्पा सुतार
.............

सविता किचन मधे आवरत होती, सतीश उठला, पुढे येऊन पेपर वाचत बसला, सविताने येऊन चहा दिला, सविता पोळ्या करायला आत गेली, मनु बाजूला बसुन नाश्ता करत होती

"कधी आहे प्रीलिम्स मनु, प्रॅक्टिकल वगैरे झाले का? आणि आता अभ्यासाकडे सिरीयसली लक्ष दे, दहावीच वर्ष ना तुझ ",...... सतीश

" आठवड्यातुन एकदा मुलीला विचारलं परीक्षा कधी आहे म्हणजे झालं का बाबा तुमचं कर्तव्य पूर्ण, माझी परिक्षा मागच्या आठवड्यात संपली, त्या नंतर शाळेत मीटिंग होती, मी किती सांगितल होत तुम्हाला की या वेळवर तरी तुम्ही आले नाहीत तिकडे, सगळ्यांचे बाबा आले होते, शेवटी मी टीचर ला खोट सांगितल की तुम्ही गावाला गेले अस ",........ मनु

" सविता काय करते दिवस भर घरी तिला घेवून जायचं ना, मी बिझी असतो ",...सतीश

" आई आली होती माझ्या बरोबर, ती असतेच नेहमी शाळेत मीटिंगसाठी, पण मलाही असं वाटतं ना बाबा की कधीतरी तुम्ही याव शाळेत, ऑफिसच्या पार्ट्यांना वगैरे तुम्ही न चुकता जातात, वर्षातून एकदा शाळेत एखाद्या मीटिंग साठी आलं तर काही हरकत नाही",... मनु

"सविता...... सविता...... इकडे ये आधी, हे बघ मनु काय बोलते आहे मला, डोक्यावर बसून ठेवला आहे तिला खूप तू, मोठ्यांशी कस बोलाव समजत नाही का तुला मनु, सविता तूच शिकवते ना मनु ला या सगळ्या गोष्टी, आता माझ ऑफिस पार्टी सगळ काढणार आहात का तुम्ही ",..... सतीश खूप चिडला होता

" काय झालं मनु? काय बोललीस तू बाबांना ",.... सविता घाबरली होती

" काय चुकीचे बोलली मी बाबा, तुम्हाला वेळ आहे का माझ्यासाठी, आईसाठी, आजीसाठी, तुम्ही तुम्हाला हवं तसं जगतात, उशिरा घरी येतात, आल्यावर चिडचिड करतात, आम्हालाही तुमचा वेळ हवा असतो, आम्हाला तुमचं प्रेम हवं असतं, सोबत हवी असते, पण नाही तुम्हाला तुमच आयुष्य हवं तसं जगायचं आहे, मग उगाच काळजी असल्यासारखा का दाखवतात ",...... मनु

" मनु तू गप्प बस",..... सविता घाबरलेली होती

" छान वळण लावला आहे मुलीला, एकही दिवस सरळ जात नाही या घरात, एकतर सविता तू माझ्याशी भांडते नाहीतर मनू तरी, एकदा सांगून तरी द्या तुम्हाला मी आवडत नसेल तर",....... सतीश

" अहो मी कुठे भांडते तुमच्याशी ",.... सविता समजुतीने घेत होती

" आमच्या आवडीनिवडीचा प्रश्न नाहीये बाबा, तुम्हालाच आम्ही आवडत नाही म्हणून तुम्ही आमच्याशी असं वागतात",...... मनु

सतीश रागाने आत निघून गेला.....

सविता अजूनही घाबरलेली होती,.... "कशाला बोलतेस ग तू मनु यांना ",..

"आई यात जेवढा दोष बाबांचा आहे तेवढाच दोष तुझाही आहे, तू बाबांच्या वाईट वागण्याला कधीच विरोध केला नाही, त्यामुळे त्यांना असं वाटतं की ते जे वागतात ते बरोबरच वागतात, आणि तुझा छळ वर्षं वर्ष होतो आहे, तू पूर्वीच त्यांना सांगितलं असतं की हे असं वागलेल मला चालणार नाही, तर थोडा फरक पडला असता, अजूनही विचार कर ",..... मनु

"आता काय विचार करणार ग मी, लग्नाला एवढे वर्ष झाले",..... सविता

" हेच तर चुकत ना आई तुझ, तू एवढी हुशार आहेस स्वतःला कमी काय समजते, घरातलं सगळं तूच करते, कपडे पण शिवते, कमी का असेना पण पैसे तुलाही मिळतात, मग काय एवढा त्रास सहन करते तू ",....... मनु

" मग काय करू मी तू सांग, यांच्याशी भांडत बसू का, मला घरात शांत हवी आहे",..... सविता

" छान छान शिकवत रहा आईला, एक दिवस काय दिवे लावणार आहे हि मुलगी काय माहिती, म्हणे घरात रहात नाही मी, हे अस वातावरण असलं तर कोण घरात राहील",...... सतीश रागाने बूट सॉक्स घालत होता

" आहो केवढे चिडू नका तुम्ही, नाश्ता करून घ्या",.... सविता घाबरली होती तिला माहिती होत आता काहीही होवू शकत

" सतीश अरे दोन घास खाऊन घे ",.... सुलभा ताई

" बघितलं का आई या दोघी कशा वागतात माझ्याशी, आणि तुला नेहमी माझीच चूक दिसते",...... सतीश

सविता आतून नाश्त्याच्या प्लेट घेऊन आली तिने प्लेट सतीश समोर धरली

" खा तुम्हीच",....... सतीश अतिशय रागात होता, तो निघाला ऑफिस ला जायला, तस सविता ने त्याची वाट अडवली,.." अहो राग डोक्यात घालून जाऊ नका",..

सविता माझी वाट सोड, तरी सविता बाजूला झाली नाही, त्याने सविता ला ओढत रूम मध्ये नेल दोन फटके ठेवून दिले, बाहेर पर्यंत आवाज आला,

" घरात आवाज कमी ठेवायचा समजल ना, की अजून समजावून सांगू",.... सतीश

मनु सुलभा ताई एकमेकींकडे बघत होत्या, सुलभा ताई बेड रूम कडे गेल्या,... "सतीश सतीश अरे काय अस वागतोस, सविता",..

आई चा आवाज ऐकुन सतीश गप्प झाला

बाहेर येवून सतीश रागाने ऑफिस ला निघून गेला, नेहमीच होत त्याच हे, काहीही झालं की राग सविता वर निघायचा,

सविता बराच वेळ आत बसली, तिचे हात पाय थरथरत होते, घाबरून गेली होती ती, काय होईल अजून संध्याकाळी काय माहिती, मनु ला उशीर होईल म्हणून ती बाहेर आली तिचे डोळे सुजलेले होते, किचन मधे जावुन तिने मनु ला डब्बा दिला, सुलभा ताईंना नाश्ता दिला , तू घे सविता, प्रेमळ शब्दांनी सविता तिथे सासुबाईंन जवळ बसली आणि रडायला लागली

" आई आता प्लीज हे रडणं वगैरे बंद कर आणि स्वतःचा विचार कर जरा, मी काय सांगते आहे तिकडे लक्ष दे, तू बाबांन विषयी पोलिसात तक्रार करायला पाहिजे ",...... मनु

" काय तक्रार करणार ग, आणि किती वेळा, तुम्ही लोक भांडतात आणि मला भोगाव लागत, तरी पण ग तू बाबांना असं बोलायला नको होतं, नको भांडत जाऊ यांच्याशी, बघितल ना त्यांनी सगळा राग माझ्यावर काढला ",....... सविता

"आई किती दिवस तू असं बाबांना घाबरून राहणार आहे, तू त्यांच्या हात तिथल्या तिथे का नाही पिरगळला, जाऊ दे तुला सांगून उपयोग नाही काही, तुला पटणार नाही, मला डबा दे लवकर मला उशीर होतो आहे शाळेत जायला",....... मनु

सविताने मनुचा डबा भरून दिला, मनू शाळेत गेली सविता सुलभा ताई जवळ येऊन बसली,.." आई आपल्या घरात शांती मुळीच नाही, आज हे शांत होते तर मनु चिडली, बघितल ना कुठे च्या कुठे गेला विषय",..

"अगं पण मनू बरोबर बोलते आहे, सतीश जरी माझा मुलगा असला तरी मला माहिती आहे की त्याचं वागणं मला आवडत नाही, तो चुकतो आहे, तू जर पूर्वीपासूनच त्याला बोलत असती तर तुझा त्रास थोडा कमी झाला असता, सतीशला आता तुला बोलायची, राग काढायची सवय झाली आहे, उठता-बसता तुला चुका दाखवतो तो, मारतो, तुझं काम कसं चुकीच आहे हेच सांगत असतो तो, तू थोडा विरोध करायला शिक, सुरुवातीला जाईल कठीण, होईल भांडण पण आता त्या गोष्टीला काही इलाज नाही",...... सुलभा ताई

" आई मला नाही जमणार हे, बोलू उद्या यांना जे बोलायचं आहे ते, मला उलट उत्तर देता येणार नाही ",...... सविता

" मग तुझी परिस्थिती कोणीच बदलू शकत नाही सविता, स्वतःसाठी स्वत च उभ रहायचा असत ग, कधी समजणार तुला काय माहिती",...... सुलभा ताई

सविता आवरायला आत गेली
.................

डोर बेल वाजली, वरच्या भाभी त्यांची मुलगी पौर्णिमा आली होती, पौर्णिमाच एका महिन्याने लग्न होतं आणि पुढच्या आठवड्यात साखरपुडा होता तिच्या साड्यांवर ब्लाऊज शिवायचं काम सविताला मिळालं होतं, तिने खूप आग्रह केल्यावर सविता ने ही ऑर्डर घेतली होती,

डोळे पुसून सविता बाहेर येऊन बसली,

" काय झालं सविता कामात होतीस का? तू रडत होती का?, चेहरा का असा दिसतो? ",... भाभी

" नाही हो भाभी मी कशाला रडेल, थोडं काम करत होती थकली आहे एवढं",.... सविता

"आम्ही अजून दोन-तीन साड्यांवर ब्लाऊज शिवायला आणले आहेत, होतील का हे उद्यापर्यंत अर्जंट होते, लगेच कार्यक्रम आहे ",... भाभी

" हो होतील ना, का नाही, खूप सुरेख आहे साड्या ",... सविताने रिक्वायरमेंट लिहून घेतल्या

बऱ्याच वेळ बसल्या होत्या त्या दोघी छान गप्पा मारत, त्यांना चहा केला सविता ने, पोर्णिमा ने होणार्‍या नवर्‍याचे फोटो दाखवले सविता ला, मग त्या वापस गेल्या..

" आई आता मला खूप काम आहे, आत्ताच पोळ्या करून घेऊ का मी आपल्या",...... सविता

सविता चा मूड बदलला हे बघून सुलभा ताईंना बर वाटत होत

"एक काम कर तु शिवणकाम करायला घे मी करेन बारा वाजता पोळ्या",... सुलभा ताई

" चालेल आई ",..... सविताने घेतलेली ऑर्डर पूर्ण करायला घेतली, अर्धा तास झाला असेल सतीशचा फोन आला, सतीशचा फोन बघून सविताला आश्चर्य वाटले ज्या पद्धतीने आज सकाळी भांडण झालं होतं तिला वाटलं आता सात आठ दिवस तरी सतीश तिच्याशी बोलणार नाही, आत्ता फोन आला म्हणजे नक्कीच त्याला काहीतरी माझ्याशी काम असेल, सविताने फोन उचलला...

"सविता आज संध्याकाळी माझ्या ऑफिस मधले माझे बॉस आणि त्यांची पत्नी आपल्याकडे जेवायला येतील, छान घर आवरून ठेव, दोन-चार चांगले पदार्थ कर, बिर्याणी ही कर, आणि तू साडी घालू नकोस मस्त कॉटनचा सलवार ड्रेस घाल आणि मनु ला म्हणा जरा तोंड बंद ठेव, मला आनंदी वातावरण हवा आहे घरात ",... सविता हो नाही म्हणते आहे की नाही, तिला वेळ आहे की नाही, हे पण बघायला सतीश थांबला नाही, त्याने फोन ठेवून दिला, जणू सतीश ने जे सांगितल ते करायला हव हा नियम त्याने सविता ला घालून दिला होता

शिवण काम बाजूला ठेवून सविता उठली, सासूबाई टीव्ही बघत होत्या,.... "काय झालं? झालं का शिवून ब्लाऊज",..?

"नाही आई यांचा फोन आला होता, संध्याकाळी पाहुणे येत आहेत, घरी स्वयंपाक करावा लागेल, घर आवराव लागेल" ,.... सविता

"कोण येत आहे? , अग पण तुझी ऑर्डर? ही महत्त्वाची होती ना"?,... सुलभा ताई

" यांचे बॉस आणि त्यांच्या पत्नी येता आहेत, हो करेन मी ती बरोबर पूर्ण, दोनच ब्लाऊज शिवायचे आहेत, बाकीचे झाले आहेत, रात्री जागून करेन काम, मी जरा बाहेर जाऊन सामान घेऊन येते, आई काय करू या स्वयंपाक ",...... सविता

सुलभा ताई सविता ने मिळून पदार्थ ठरवले

सविता मार्केटमध्ये गेली, भाज्या फळं मिठाई बासमती राइस सगळं घेऊन आली, तोपर्यंत मनू ही आली होती शाळेतुन

" काय आई आज खूपच सामान आणल आहे, आज काय विशेष ",... मनु

" हो आज बाबांच्या ऑफिस मधले लोक येणार आहेत संध्याकाळी जेवायला आणि मनू तू प्लीज शांत राहणार आहेस आज संध्याकाळी, मला घरात अजून भांडण नको आहे, काही बोलू नको बाई पाहुण्यांसमोर बाबांना ",... सविता

" अरे वा म्हणजे आज आमची आई बेस्ट कुक आहे तर, आई म्हणजे तू मलाच नेहमी शांत बसायला सांगते, एकदा बाबांना बोलून बघ की असं की शांत रहा जरा आणि तू कशाला स्वयंपाक करते आहे, बाबा बोलतात ना तुला की तुला काहीच येत नाही, त्यांना सांगायचं ना की हॉटेलमध्ये चार पदार्थ मागवून घ्या, असं चालतं का म्हणून",.... मनु

" मनू जा बरं तू आवर, नको बोलू ग अस काही",.... सविताला टेन्शनच आलं होतं

या आजकाल च्या मुली चांगल्या धडाकेबाज आहेत, आपल्याला नाही बोलता येत असं फाडफाड समोरच्याला, विचार करून सविताने आवरायला घेतलं, सगळ्यात शेवटी घर आवरु, आधी स्वयंपाक करायला घेऊ, पनीरची भाजी, भरलेली भेंडी, व्हेज बिर्याणी, दहिवडी, गाजरचा हलवा, पोळ्या, कोशिंबीर, भजी असा भरगच्च मेनू ठरवला होता, कमीत कमी चार पाच तास तरी स्वयंपाकाला लागणार होते, पण मुळातच सुगरण असलेल्या सविताला स्वयंपाकाचं काम काही अवघड नव्हतं, दोन-तीन तासातच तिचा सगळा स्वयंपाक झाला, पोळ्या शेवटी करू म्हणून तिने शेवटी घर आवरायला घेतलं, नंतर गरम गरम पोळ्या करून घेतल्या, स्वतःच आवरलं मागच्याच आठवड्यात घेतलेला छान कॉटनचा ड्रेस घातला, थोडासा मेकअप केला सविताने, एकदम छान दिसत होती ती , वेल मेंटेन सुंदर सविता आरश्यात बघत राहिली स्वतः कडे, केसही छान होते तिचे, सविताने बाहेर येऊन सासुबाई आणि मनूला तयारी दाखवली, हसर्‍या चेहर्‍या मागे तिने दुःख लपवले,

"किती छान दिसते आहेस ग सविता तु",... सुलभा ताई

"हो आई तू अशीच रहात जा नेहमी",.. मनु

सविता खुश होती,.. "तुम्ही दोघींनी पण आवरून घ्या आता आणि मनु लक्षात आहे ना उगीच वाद घालू नको संध्याकाळी",..

"हो ग आई, कितीवेळा सांगशील",... मनु

............

घर कस असाव जिथे प्रेम आपुलकी वाटायला पाहिजे , आरामात रहाता यायला पाहिजे , पण जिथे रोज त्रास आहे तिथे रहाण्यात काय अर्थ आहे..... काय वाटतय तुम्हाला सविता ने स्टँड घ्यायला पाहिजे का?,....

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now