Mar 04, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

मी कश्याला आरश्यात पाहू ग ! अंतिम भाग लेखक पार्थ

Read Later
मी कश्याला आरश्यात पाहू ग ! अंतिम भाग लेखक पार्थ


दुसऱ्या दिवशी पल्लवीचे सासू-सासरे गावाहून परतले. पल्लवीने स्वतःला सावरले आणि काहीच न घडल्यासारखे ती सासू-सासऱ्यांना सामोरी गेली.
दुपारी पल्लवीची सासू मेघा शेजारच्या घरी भेटायला गेली. शेजारच्या सारिकाकाकी पल्लवीच्या सासूची जवळची मैत्रीण होती. गावाहून खास तिच्यासाठी पल्लवीच्या सासूने ढाळे आणले होते.

" अग मेघा , मागच्यावेळीस तू तुझ्या सुनेचे खूप कौतुक करत होतीस. " सारिका म्हणाली.

" हो. आहेच माझी सून नक्षत्रासारखी. " मेघा म्हणाली.

" काल पावसात नक्षत्र दिसेनासे झाले होते. " सारिका म्हणाली.

" म्हणजे ?" मेघा म्हणाली.

" काल एका परपुरुषाला तुझ्या घरी येताना बघितलं. पल्लवी त्याच्या बाईकवरून उतरली आणि दोघेही घरी आले. शी बाई. आजकालची मुले. कसलं भान नाही काही नाही. राहत्या घराला ओयोची रूम करून ठेवलंय. मान्य पल्लवी विधवा आहे म्हणून काय सासरी असले धंदे करावे ?" सारिका म्हणाली.

सारिकाचे हे शब्द ऐकून मेघाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. कानात कुणीतरी गरम तेल ओतल्यासारखे वाटले. मेघा उठली आणि सरळ तिच्या घरी गेली.

***

संध्याकाळी पल्लवी घरी आली.

" कुणासोबत फिरत होतीस ?" मेघा म्हणाली.

" काय झाले आई ?" पल्लवी म्हणाली.

" तुला लाज नाही वाटत ? बाहेर परपुरुषासोबत संबंध ठेवतेस. " मेघा म्हणाली.

" मेघा , त्या मुलानेच हिला फसवले असेल. " अमोलराव म्हणाले.

" हिची अक्कल शेणात गेली होती का ?" मेघा म्हणाली.

" आई , तस काहीही नाहीये. तो फक्त माझा मित्र आहे. " पल्लवी म्हणाली.

मेघाने पल्लवीला एक जोरात थोबाडीत मारली.

" नवरा मेला म्हणून बाहेर सुख शोधू लागलीस ? तू या घराची सून आहेस हेदेखील विसरलीस ? उद्यापासून ऑफिस आणि मोबाईल बंद. " मेघा म्हणाली.

***
काही दिवसांनी..

पल्लवीशी काही संपर्क होत नव्हता म्हणून प्रेम कासावीस होत होता. त्याने पल्लवीच्या ऑफिसमध्ये चौकशी केली. सपनाकडून पल्लवीने जॉब सोडल्याचे कळले. मग प्रेम पल्लवीच्या घरी गेला. त्याने बेल वाजवली. पल्लवीने दार उघडले.

" हाय , कशी आहेस ?" प्रेम म्हणाला.

" प्रेम , तू इथे काय करतोय ? निघून जा प्लिज. " पल्लवी हळू आवाजात म्हणाली.

" तू नोकरी का सोडली ? फोन का उचलत नाहीये ?" प्रेम म्हणाला.

तेवढ्यात आवाजाने मेघा आणि अमोलराव बाहेर हॉलमध्ये आले.

" आलाच शेवटी प्रियकर भेटायला. " मेघा म्हणाली.

" तुझ्यासारख्या मुलांना चांगलाच ओळखतो मी. माझ्या सुनेला जाळ्यात अडकवू नको. " असे बोलून अमोलरावांनी प्रेमला धक्का दिला.

" काका , माझं प्रेम आहे पल्लवीवर. ऐकून तरी घ्या."
अमोलने प्रेमला थोबाडीत मारली.

" दूर रहा माझ्या सुनेपासून. " अमोलराव ओरडले.

तेवढ्यात त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते जमिनीवर कोसळले.

***

प्रेमने लगेच रिक्षा बोलवून अमोलरावांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. पल्लवी आणि मेघा दोघीही खूप घाबरलेल्या होत्या. पण प्रेमने सर्व परिस्थिती उत्तमप्रकारे हाताळली.

" आता अमोलराव सुखरूप आहेत. जर लवकर ऍडमिट केले नसते तर विपरीत घडले असते. " डॉक्टर म्हणाले.

पल्लवी गोळ्या आणायला मेडिकल स्टोरमध्ये गेली. प्रेमही तिच्या सोबत गेला. खाली गेल्यावर प्रेमने तिचा हात धरला आणि तिला बाजूला आणले.

" काय करतोय प्रेम ?" पल्लवी म्हणाली.

" पल्लवी , तुझे माझ्यावर प्रेम नाही का ? " प्रेम म्हणाला.

" आहे. पण मी माझ्या सासूसासऱ्यांच्या विरोधात नाही जाऊ शकत. " पल्लवी म्हणाली.

" हे कसले प्रेम ? तू स्वतःच्या प्रेमासाठी सासूसासऱ्यांच्या विरोधात जाऊ शकत नाहीस?"
प्रेम म्हणाला.

" तुझ्यावर प्रेम आहे माझं पण सासूसासऱ्यांवर जास्त आहे. स्वार्थी नाही बनू शकत मी. तू प्लिज माझ्या नादाला नको लागूस. कुणीतरी दुसरी शोध. " पल्लवी म्हणाली.

प्रेमने पल्लवीचा हात सोडला. दोघांनी औषधे विकत घेतली. नंतर पल्लवी वॉशरुममध्ये गेली आणि प्रेम एकटाच औषधे घेऊन वरती आला.

***

" तू यांचे प्राण वाचवले त्यासाठी मी तुझी आभारी राहीन पण माझ्या सुनेच्या आयुष्यातून निघून जा बाबा. नातेवाईक तोंडाला काळं फासतील आमच्या. हात जोडते. " मेघा रडत म्हणाली.

प्रेम काहीच बोलला नाही.

***

अमोलरावांची प्रकृती सुधारली. त्यांना डिस्चार्ज भेटला. घरी आल्यावर त्यांनी मेघाला एकांतात बोलावले.

" मेघा , मला वाटत प्रेम आणि पल्लवीचे लग्न लावून द्यावे. " अमोलराव म्हणाले.

" का ? त्याने तुमचे प्राण वाचवले म्हणून ?" मेघा म्हणाली.

" नाही. आपण पल्लवीला आपल्या मुलीसारखी मानतो ना. जर आपली मुलगी विधवा असती तर तिचे दुसरे लग्न लावून दिले नसते का ? की आयुष्यभर तिचे पांढरे कपाळ बघत बसलो असतो ? मुलगी मानण्यात आणि असण्यात फरक असतो. आपलं वय झाले आहे. पण ती पोर तरुण आहे. अख्ख आयुष्य बाकी आहे तिचं. जीवनात जोडीदार हवा असतो. आपल्या म्हातारपणीची सोय व्हावी म्हणून आपण तिचे जीवन बरबाद करू शकत नाही. प्रेम चांगला मुलगा आहे. तो पल्लवीला सुखात ठेवेल. नातेवाईक विरोध करतील पण पल्लवीच्या सुखासाठी मी सर्व सहन करेल. " अमोलराव म्हणाले.

" खरं आहे तुमचं. स्वार्थी बनलो होतो आपण. पल्लवीला विचारावं लागेल की तिला मुलगा आवडतो का ? जर आवडत असेल तर लग्न लावून देऊ दोघांचे. " मेघा म्हणाली.

" मला नेहमीच मुलगी हवी होती. पल्लवीचे लग्न लावून देऊन मीही कन्यादानाचे पुण्य पदरात पाडून घेईल. " अमोलराव म्हणाले.

***

घरभर पसारा पडला होता आणि प्रेम बेडवर झोपला होता. तेवढ्यात बेल वाजली. प्रेमने दार उघडले. समोर पल्लवी होती.

" तू का आली आहेस इथं ?" प्रेम म्हणाला.

" आत तरी बोलव. " पल्लवी म्हणाली.

" ये. " प्रेम म्हणाला.

" किती पसारा करून ठेवलाय. " पल्लवी म्हणाली.

" पत्ता कुणी दिला ?" प्रेम म्हणाला.

" तूच सांगितला होता एकदा. " पल्लवी म्हणाली.

" मी चाललो शहर सोडून. तुला आणि तुझ्या फॅमिलीला त्रास नको माझा. " प्रेम म्हणाला.

" म्हणजे आपला संसार या शहरात नसेल का?" पल्लवी म्हणाली.

" म्हणजे ?" प्रेम म्हणाला.

" घरून परवानगी मिळाली आहे. लग्न करशील माझ्यासोबत ?" पल्लवी म्हणाली.

" तुझी ती खडूस म्हातारी सासू मेघा तयार झाली ?" प्रेम म्हणाला.

पल्लवीने त्याला हलकेसे मारले. प्रेमने पल्लवीचा हात धरला आणि कपड्यांमधून वाट काढत तिला आरश्यासमोर आणले.

" हा चेहरा बघ आरश्यात. इतक्या सुंदर चेहऱ्याला कुणी नकार देऊ शकेल का ? करेल मी लग्न आणि तुझे सासूसासरेही आपल्या सोबत राहतील. " प्रेम म्हणाला.

पल्लवी लाजली आणि प्रेमने तिचे नाजूक गुलाबी ओठ ओठात घेतले.

मी आरश्यात पाहू लागले ग
पण हा आरसा नवीन आहे ग
ज्याच्या मिठीत स्वर्ग गवसे ग
त्याच्या डोळ्यात मज मी दिसे ग
सख्याची सुंदर नेत्रे समोर असताना
मी कश्याला आरश्यात पाहू ग
मी कश्याला आरश्यात पाहू ग !

समाप्त


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

सुकृत

Engineer

जय श्री राम

//