मी कशाला आरश्यात पाहू ग! पार्ट 1 ( लेखक : पार्थ )

.
खरच खूप सुंदर आहेस तू
कसे वर्णावे सौंदर्य शब्दांमध्ये
ईश्वराची सुंदर निर्मितीच तू
मांडावे कसे ते काव्यांमध्ये

पाहता तुला मी खुलूनि गेले
तुझ्याच विचारात गुंफूनि गेले
हास्य तुझे मनमोहक ते पाहुनी
उगाचच का रे मी गेले लाजूनी

नयनांना प्रसन्नता देणारे रूप
भासतो कामविश्वाचा नरभूप
गालावरची ती जीवघेणी खळी
पाषाणहृदयी उगवते प्रेमकळी

एकटीच मी तुला आठवून हसतेय
पुन्हा पुन्हा तुझ्याच प्रेमात पडतेय
माझे हृदय मी तुला हरवुनी बसलेय
तू मात्र फक्त स्वप्नातच मज छळतोय

प्रेमा तुझा रंग कसा
नेहमीच हवाहवासा
दूर असूनही जवळ भासणारा
प्रेमाचा तो गोड अर्थ सांगणारा !

©® पालवी

***

तिने कविता पोस्ट केली. दोन मिनिटातच पहिली समीक्षा आली.

" खूप सुंदर कविता मॅडम. "

" प्रेमा " नावाच्या एका स्त्रीने ती समीक्षा दिली होती. हल्ली ती महिला वाचक सातत्याने प्रत्येक कथा-कवितेवर समीक्षा देत होती. त्यामुळे नकळतपणे ती महिला वाचक पल्लवीच्या ओळखीची झाली होती.

" सुनबाई , चहा. " सासूबाईंचा आवाज कानावर पडला.

पल्लवी उठली आणि लगेच स्वयंपाकघरात गेली. चहा बनवून तो लगेच तिने सासूबाईंना दिला. मग सासऱ्यांसाठी पोहे बनवले. त्यांच्या रोजच्या गोळ्या काढल्या. त्या सासऱ्यांना नाश्त्यासोबत दिल्या. सकाळची सर्व कामे आटपून पल्लवी ऑफिसला गेली.

***

" काय ग रमा , आज नवीन साडी ?" लंचब्रेकमध्ये नेहाने विषय काढला.

" अग काल आमच्या लग्नाचा वाढदिवस होता ना म्हणून ह्यांनी नवीन साडी घेऊन दिली. " नेहा म्हणाली.

मग बाकीच्या सर्वजणी आपापल्या पतींनी दिलेल्या भेटवस्तूबद्दल बोलू लागल्या. पल्लवी मूकपणे या गप्पा ऐकत होती. ती अचानकपणे जेवायची थांबली. तिचे डोळे पाणावले पण तिने स्वतःला सावरले.

" ऐका ना , माझी तब्येत बरी नाही. तुम्ही माझा डब्बा शेअर करा. " पल्लवी अचानकपणे उठून म्हणाली.

सर्वांना काहीतरी कारण देऊन पल्लवी वॉशरूममध्ये आली. रडू लागली. आरश्यात तिने तिचे कोरडे रूप पाहिले. मग नेत्रातील आसवे पुसून तिने ब्लॉगवर एक चारोळी लिहिली ,

मी कशाला आरश्यात पाहू ग
माझा सखाच या जगात नाही
मी कशाला साजशृंगार करू ग
कुणासाठी करावे हेच कळत नाही

तिने ही चारोळी ब्लॉगवर प्रकाशित केली. तेवढ्यात तिची खास मैत्रीण सपना तिथे आली.

" पल्लवी , बाकीच्यांच्या गप्पा ऐकून इथे आलीस ना ? तुझ्या पतीचे निधन होऊन तीन वर्षे झाली. लग्नानंतर लगेच त्याचा अपघात झाला आणि तू विधवा झालीस. तुम्हाला सोबत पुरेसा वेळही भेटला नाही. एकमेकांना समजूनही घेता आले नाही. हक्काचे प्रेमही भेटले नाही. पण तू आजही त्याच्या मातापित्याची सेवा करत आहेस. तू दुसरे लग्न का करत नाहीस ? तू तेवीसच वर्षाची आहेस अजून. " सपना म्हणाली.

" माझ्या सासूसासऱ्यांचा एकुलता एक मुलगा होता माझे पती. जर मी दुसरे लग्न केले तर माझ्या सासूसासऱ्यांना कोण सांभाळणार ? माझे आईवडील लहानपणीच वारले. मामामामींनी मला वाढवलं. पण लहानपणीपासून मला परक्याचीच वागणूक भेटली घरी. मामी माझा सतत छळ करत. मामा व्यसनी होते. म्हणून मी सर्व छळ मूकपणे सहन केला. लग्नानंतर सासूसासऱ्यांनी आईवडिलांचे प्रेम दिले मला. माझ्या पतीसोबत मला फक्त तीन महिन्यांचा सहवास लाभला. पण त्यांनीही मला खूप प्रेम दिले. आज ते या जगात नाहीत तर मी त्यांच्या आईवडिलांना कस एकटं वाऱ्यावर सोडून देऊ ?" पल्लवी म्हणाली.

" खरं आहे ग. पण प्रत्येकाला साथीदार हवा असतो. किती दिवस एकटी जगशील ?" सपना म्हणाली.

" आपल्या हातावर देव रेषा ओढून देतो. त्याहून जास्त कुणाला भेटत नाही आणि कमीही भेटत नाही. मी माझी नियती स्विकारली आहे. " पल्लवी म्हणाली.

थोड्या वेळाने पल्लवी परत कामाला लागली. घरी रात्री झोपताना तिने ब्लॉग उघडला. पल्लवी एक सुप्रसिद्ध लेखिका होती. ती " पालवी " या टोपणनावाने लेखन करत. प्रेमा नावाच्या स्त्री वाचकाची नवीन समीक्षा आली होती.

तू तुझ्याचसाठी आरश्यात पहा ग
तू तुझ्यासाठी शृंगार करून बघ ग
जरी नसला सखा या जगी तुझा
स्वतःचीच साथीदार बनूनि जग ग

ती समीक्षा वाचून पल्लवीच्या मुखावर स्मितहास्य उमटले.

क्रमश...

🎭 Series Post

View all