मी कशाला आरशात पाहू ग भाग 2

कमलचा नवा प्रवास सुरू

मी कशाला आरशात पाहू ग (प्रशांत कुंजीर)भाग 2

मागील भागात आपण पाहिले की कमलचे लग्न झाल्यावर सासरी जाच सुरू झाला. त्यात तिचे बाळ गेले. आप्पा तिला न्यायला आले. आता पाहूया पुढे.


"खबरदार जर आज गेलात तर परत ह्या घराचा उंबरा बघू नका सूनबाई!" सासू म्हणाली.

आण्णा कुलकर्णी मात्र मुलाला आणि बायकोला ओळखून होते. त्यांनी कमलला मानेने खुणावले. कमल समान घेऊन आली. ती घराबाहेर पडताना आण्णांच्या पाया पडली.

कमल भरलेल्या डोळ्यांनी आणि जखमी मनाने तिथून बाहेर पडली.

गाडीत ती एकदम गप्प बसून होती. पोरीची अवस्था पाहून आप्पांना रडू येत होते. घरी आल्यावर सामान ठेवले आणि तिने अडवलेला अश्रूंचा बांध फुटला. कावेरीबाई तिला जवळ घेऊन समजावत होत्या.


तिच्या अंगावर असणारे व्रण त्यांना बरेच काही सांगत होते. काही दिवस गेल्यावर शेजारी पाजारी कुजबुज सुरु झाली.

"जावई बापू,पोरीला सासरी पोहोचवायला हवे. जनरीत सोडून चालते का?" कावेरीबाई आप्पांना समजावत होत्या.

कमल भेदरलेल्या नजरेने आप्पांकडे पाहत होती."पोरी,आता नाही. तुझ्या मनावर झालेल्या जखमा मला वाचता येतायेत." आप्पा तिच्या डोक्यावर हात ठेवून निर्धाराने म्हणाले.


आप्पा त्याच दिवशी जाऊन पुढील शिक्षणासाठी हिंगण्याला प्रवेश घेऊन आले.

त्यांनी कमलला सांगितले,"पोरी,शिकून स्वतः च्या पायावर उभी रहा."

कमल संस्थेत आली. तिथे तिच्यापेक्षा कठीण परिस्थितीतून आलेल्या मुली,बायका पाहून खंबीर होत गेली.

कमल बी. टी. झाली आणि तिला कोयना खोऱ्यात एका हायस्कूल मध्ये काम करायची संधी चालून आली.

"आप्पा,काय करू? स्वीकारू का नोकरी?" तिने विचारले.

"तू जो निर्णय घेशील त्याला माझा पाठिंबा असेल. तसेही मी दोन वर्षांत निवृत्त्त होईल." आप्पांनी पाठिंबा दिला.

कमल होकार कळवून रुजू व्हायला निघाली. कोयना धरणाचे काम चालू होते. त्याच्या अंतर्भागात असलेले एक टुमदार पण दुर्गम गाव.

भोवताली असलेला हिरवा निसर्ग आणि स्वच्छ वाहणारी कोयना पाहून कमल स्वतः चे दुःख विसरली. चापून चोपून नेसलेली पांढरी नऊवार,कपाळावर लावलेले बारीक कुंकू आणि चेहऱ्यावर असणारे स्निग्ध भाव.

लवकरच कमल त्या ग्रामीण भागातील मुलांची आवडती शिक्षिका झाली. अण्णांच्या संस्थेत घेतलेले शिक्षण वापरून सुईन झाली.

तरीही अनेकजण विचारत,"तुमचं मालक काय करतात बाई?"


कमल गप्प बसत असे. बाई एकट्या आहेत हे हळूहळू लोकांना समजले. तसे काही लांडगे टपून बसले. शाळेत येता जाता तिला त्रास देऊ लागले. कमलला भीती वाटू लागली.

एक दिवस ती रस्त्याने चालली असताना तिथल्या एकाने तिचा हात धरला,"बाई,चला की मजा करू."

कमल घाबरून काही बोलणार तेवढ्यात.

"मेल्या,बाईंचा हात पकडतू व्हय. थांब तुजा मुडदा बसिवते." लक्षीने हात धरणाऱ्याला मुस्काटात मारली.


लक्षीचा अवतार बघून तो पळून गेला. कमल रडताना पाहून लक्षी म्हणाली,"घाबरु नका. ही लक्षी हाय ना तुमच्या पाठीशी."

कमल शाळेत गेली. संध्याकाळी कमल स्वयंपाक करत असताना लक्षीने आवाज दिला,"बाई, हायसा नव्हं घरात?"


कमलने आवाज दिला,"लक्षे,ये चहा ठेवते."

लक्षी आत आली,"बाई,चा नग,वाईच तापावर काय औषिध आसल तर द्या की."


कमल घाबरून तिच्या अंगाला हात लावू लागली.

लक्षी हसली,"आव मला काय नाय झालं. ते धरणावर सायेब हायेत ना. त्यांना लई कणकण भरली हाय. भला माणूस."

कमलने काढा बनवून दिला. कसा द्यायचा ते समजावले आणि लक्षी निघून गेली.


दुसऱ्या दिवशी कमल शाळेला जायला निघाली तेव्हा लक्षी येऊन थांबली.

कमल भरभर चालत असताना लक्षीने आवाज दिला,"आव मास्तरिन बाय, वाईच थांबा की."

कमल थांबल्यावर लक्षी जवळ आली. तिने ओंजळ भरुन मोगऱ्याची फुले दिली.

"पाटलांनी दिल्यात. तुमि काल आऊषिध दिलं ना म्हणून." लक्षी फुले देऊन निघून गेली.


मोगरा पाहून कमलच्या डोळ्यात टचकन पाणी आले. त्यानंतर कमल काही पदार्थ केला तर आवर्जून लक्षी जवळ देत असे. तिने लांबून लक्षीच्या साहेबाला पाहिले होते.

श्रीधर पाटील एक तरुण इंजिनियर होता. तो सुद्धा कमलची लक्षीकडे चौकशी करायचा. दोन तरुण मने अनामिक ओढीने ओढली जात होती.

पुढे काय होईल? कमलवर काही संकट येईल का? श्रीधर आणि कमलचे काय होईल?

©® प्रशांत कुंजीर

🎭 Series Post

View all