Feb 23, 2024
नारीवादी

मी कशाला आरशात पाहू ग अंतिम भाग

Read Later
मी कशाला आरशात पाहू ग अंतिम भाग

मी कशाला आरशात पाहू ग ( प्रशांत कुंजीर) अंतिम भाग

मागील भागात आपण पाहिले श्रीधरने कमलचा जीव वाचवला.
त्यानंतर त्याला कमल आवडू लागली. त्याने घरी तिच्याबद्दल सांगितले. आता पाहूया पुढे.


श्रीधर परत आला. इकडे कमलने बदली करून घ्यायचे ठरवले.

लक्षी एक दिवस भाकऱ्या करताना म्हणाली,"कमल मास्तरिन लई चांगली हाय. पर ती आता दुसरीकं जाणार."

श्रीधरने ऐकले आणि तो अस्वस्थ झाला. दुसऱ्या दिवशी कमल शाळेतून परत येताना तिला लांब श्रीधर उभा असलेला दिसला. ती खाली मान घालून चालू लागली.

श्रीधर समोर आला,"कमल थांब,इथून निघून जाऊन मनातील प्रेम मिटेल का? मला तुझ्याशी लग्न करायचे आहे ."


कमलच्या डोळ्यात अश्रू होते,"श्रीधर,तुम्ही मला वाचवले. सगळ्या गावात लोक नाही ते बोलत आहेत. माझी लायकी नाही तुमची अर्धांगिनी बनायची. मला जाऊ द्या."


कमल वेगाने निघून गेली. श्रीधर घरी आला. पाहतो तर भिंतीवर त्याचे आणि कमलचे नाव लिहिले होते. तो रागाने नाव पुसू लागला.

तेवढ्यात लक्षी आली. लक्षी ठसक्यात म्हणाली,"सायेब,आस नाव पुसू नगा. तेच नाव लगीन पत्रिकेत लिवा. मंजी घुबड गप बसत्याल."

श्रीधर चिडला,"लक्षे,तू तुझे काम कर."


दुसऱ्या दिवशी कमल शाळेत गेली. सगळीकडे तिचे आणि श्रीधरचे नाव लिहिले होते. तिला प्रचंड अपराधी वाटत होते.

चिटणीस बाई म्हणाली,"मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली."


तेवढ्यात दुसरा एक जण बोलला,"आपण इंजिनियर साहेबा सारखे देखणे नाही."


कमल रडत बाहेर पडली. तेवढ्यात मुख्याध्यापक येताना दिसले.

त्यांनी कमलला सांगितले,"कमल तू आता घरी जा बाळ."

कमल तशीच घरी निघाली. गालावर उष्ण अश्रू ओघळत होते. आजच हे गाव सोडून जायचा तिने निश्चय केला.


कमल घरी गेली. खोलीच्या बाहेर आप्पा आणि कावेरीआजी उभे होते.


कमल पळत जाऊन आप्पांना बिलगली,"आप्पा,मी काहीच केले नाही. तुमची कमल तुमची मान खाली जाईल असे काही करणार नाही."

आप्पा डोक्यावर हात फिरवून तिला समजावत होते. तेवढ्यात एक खणखणीत आवाज घुमला.


"आप्पा, सुभद्राबाई पाटलीन लई खमकी आन तिची सून आशी रडकी चाललं का? तिकड ते पोरग रडत बसल आन हिकड ही जायचं म्हणती."


कमलने वळून पाहिले. समोर एक करारी पण मायाळू स्त्री उभी होती.


आप्पा हसले,"पोरी,आम्हाला सगळे ठाऊक आहे. तुझा श्रीधर तुझी वाट बघतोय."


कमल धावत गेली. श्रीधर खोलीत बसला होता. कमल आलेली पाहून तो झटकन उभा राहिला. त्याने मान खाली केली.

कमल जवळ आली,"माझ्या श्री च्या डोळ्यात माझी किंमत असेल तर मला जगाने सांगायची गरज नाही."

एवढे बोलून कमल त्याच्या मिठीत विसावली."आजी,अग आवर लवकर. तिकडे सगळे खोळंबले आहेत. राज्य कबड्डी असोसएशनच्या मार्फत पहिली प्रशिक्षिका म्हणून सत्कार आहे विसरलीस." नातू आवाज देत होता.


कमलने फणेरी पेटी बंद केली. श्रीधरजवळ जाऊन म्हणाली,"अहो,इकडे या. मला कुंकू लावायचे आहे."


श्रीधर समोर येऊन उभा राहिला. कमल त्याच्या डोळ्यात पाहून कुंकू रेखत होती.


तेव्हा तिच्या मनात एकच गाणे वाजत होते. मी कशाला आरशात पाहू ग......एखाद्या स्त्रीच्या कर्तबगारीवर तिच्या वडिलांचा,पतीचा विश्वास असेल तर तिला कोणत्याही आरशाची गरज नाही.

स्वयंसिद्धा ती असतेच पण त्याचा हात हाती असेल तर आणखी खुलते.

©® प्रशांत कुंजीर.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kunjir Prashant Vishwanath

Primary Teacher

Primary Teacher In Z P Pune A Writer,A Poet An Anchor

//