Feb 29, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

मी कशाला आरशात पाहू गं (डॉ सुप्रिया दिघे) भाग १

Read Later
मी कशाला आरशात पाहू गं (डॉ सुप्रिया दिघे) भाग १

मी कशाला आरशात पाहू गं भाग १


"उदय मंदिराच्या इथे गाडी थांबवा. आज सोमवार आहे, तर महादेवाच्या पाया पडून आशिर्वाद घेऊयात." निशा उदयकडे बघून म्हणाली.


"तू देवाचा आशिर्वाद घे. मला पंधरा मिनिटांत एक ऑनलाईन मिटिंग आहे. मी घरी जातो, तू चालत ये." उदयने मंदिराच्या बाहेर गाडी उभी करत सांगितले.


निशाने मान हलवून होकार दर्शवला आणि ती गाडीतून खाली उतरली. 


"सर देवाला मानत नाहीत का?" अचानक आवाज आल्यामुळे निशाने मागे वळून बघितले.


यावर निशा म्हणाली,

"उदय देवाला मानतात, पण त्यांना एक अर्जंट ऑनलाईन मिटिंग होती. मला इथे आल्यावर फ्रेश वाटतं, मग मी लवकर इथून निघत नाही. उदयला हे ठाऊक असल्याने ते मला सोडून गेले. घर इथे जवळच आहे, मग मी पायीच जाईल. सायली तू इथे नेहमी येते का?" 


"नाही. मी कधीतरी इकडे येते. बऱ्याच वेळेपासून माझी मावशी मंदिरात आली आहे. ती घरी न परतल्याने मी तिला बघायला आले. मावशीची मनस्थिती ठीक नाहीये." सायलीने सांगितले.


"मावशी इथेचं आहे ना?" निशाने विचारले.


"हो, तिकडे कोपऱ्यातील बेंचवर एकटीच बसली आहे." सायली एका बेंचकडे बोट दाखवून म्हणाली.


"त्यांना इथे शांत वाटत असेल. चल मंदिरात जाऊन पाया पडू आणि मग मावशीची भेट घ्यायला जाऊ." निशा म्हणाली.


निशा व सायलीने गाभाऱ्यात जाऊन महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले. निशा हात जोडून १२ ज्योतिर्लिंग श्लोक म्हणाली. 


गाभाऱ्यातून बाहेर पडल्यावर सायली निशाकडे बघून म्हणाली,

"मॅडम तुम्ही एक प्रथितयश स्त्रीरोगतज्ज्ञ असून सुद्धा देवाला इतकं मानतात. देवाच्या नुसत्या पायाचं पडल्या नाहीतर श्लोकही म्हणाल्या."


यावर निशा हसून म्हणाली,

"सगळ्यात आधी मी एक माणूस आहे. देवाने प्रसन्न होऊन मला काहीतरी द्यावे म्हणून मी श्लोक म्हणाले नाही, तर माझे मन त्यामुळे प्रसन्न झाले."


"मॅडम तुमचे विचार किती छान आहेत. मी ऐकलं आहे की, डॉक्टरचं आयुष्य खूप तणावग्रस्त असतं. शिवाय तुम्हाला रात्र पहाट कधीही हॉस्पिटलला जावे लागते. आताही तुम्ही हॉस्पिटल मधून आल्या आहात. तुमच्या चेहऱ्यावर दिवसभराचा थकवा अजिबात जाणवत नाही.


मी तुम्हाला जेव्हाही कधी बघते, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक स्माईल असते. मॅडम तुम्हाला आयुष्यात कधी काही अडचणी आल्याच नाहीत का? किंवा दररोज सगळं तुमच्या मनासारखं घडतं का?" सायलीने विचारले.


निशा हसून म्हणाली,

"सायली दुःख किंवा संकटं प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. सगळ्याच गोष्टी आपल्याला हव्या तश्या घडत नाहीत. आपण यावर नक्कीच बोलूयात. तू मावशीला घरी घेऊन जायला आली होती ना? मग आपण तिथेच बसून बोलूयात."


निशा व सायली मावशी बसली होती, त्या बेंचकडे गेल्या.


"मावशी अग दुपारपासून तू इथे येऊन बसली आहेस. मोबाईलही घरीच ठेवून आलीस. घरी यायचा विचार आहे की नाही?" सायलीच्या बोलण्यात काळजी दिसून येत होती. 


सायलीच्या आवाजाने मावशीच्या विचारांची तंद्री भंग पावली. मावशीने सायलीकडे बघितल्यावर निशा व तिची नजरानजर झाली. निशा आश्चर्याने सायलीच्या मावशीकडे बघत होती. 


सायलीची मावशी उठून उभी राहिली, ती निशाजवळ आली व तिने निशाला मिठी मारली. सायलीच्या मावशीच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर सुरु झाला होता. 


सायली गोंधळून गेली होती.


निशा व सायलीची मावशी एकमेकींना ओळखत असतील का? बघूया पुढील भागात…


©®Dr Supriya Dighe


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//