मी कशाला आरशात पाहू गं (डॉ सुप्रिया दिघे) भाग ४ अंतिम

Personality Is Real Beauty

मी कशाला आरशात पाहू गं भाग ४


आपलं मन मोकळं केल्यावर रेखा खूप रडली. निशाने रेखाला मोकळं होऊ दिलं. रेखा शांत झाल्यावर निशाने बोलायला सुरुवात केली,


"रेखा स्वतःचं आयुष्य उध्वस्त केलंस, पण त्यासोबत तू तुझ्या मुलांचं आयुष्य सुद्धा उध्वस्त केलंस. तुझ्या मुलांना आईची गरज होती, पण तू त्यांचाही विचार केला नाहीस. रेखा आपल्याला मुल व्हावं म्हणून माझ्याकडे दररोज बायका रडत येतात. तुला ते सुख मिळालं तरी तू खुश नाहीयेस.


तुला भरलेलं घर मिळालं होतं. प्रेम करणारा नवरा, आई म्हणायला मुलं होती. तू मात्र सुख वेगळ्याच गोष्टीत शोधत बसली होतीस. स्वतःच्या रुपावर इतका गर्व करत बसलीस त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष केलंस. 


थोडी शिकली असतीस, तर चांगलं, वाईट यातील फरक कळला असता. निदान या सगळ्याचा परिणाम काय होईल? याचा विचार करता आला असता. एकच चूक तू दोनदा केलीस. आता डिप्रेशन मध्ये जाऊन काय उपयोग? सगळंच गमावून बसली आहेस. आता जे झालं ते झालं, आता इथून पुढे काय करायचं? ते ठरव. आता रडून, पश्चात्ताप करुन काहीही होणार नाही. तुला काही मदत लागली तर मी आहेच.


रेखा माणसाने समाधानी रहायला शिकलं पाहिजे. तुझी भेट होण्याआधी सायलीने मला विचारलं होतं की, तुम्ही इतक्या आनंदी कश्या राहतात? तुमच्या आयुष्यात अडचणी येत नाहीत का?


तर मला तिच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला आवडेल. रेखा तुला तर माहीत आहे की, मी आरशात स्वतःला कधीच न्याहाळले नाही. मी सुंदर कशी दिसेल? यासाठी कधीच प्रयत्न केले नाहीत. माझं व्यक्तिमत्त्व सुंदर कसं बनेल? हा विचार करुन व्यक्तिमत्त्व सुंदर घडवलं. 


स्त्रीरोगतज्ञ होईपर्यंत लग्न न करण्याचा निर्धार मी केला होता. तसंही माझ्याकडे बघून लग्नाला कोणी होकार देत नव्हते. स्वतःच्या पायावर उभे राहिले होते. आई-पप्पांना आनंदी कसं ठेवता येईल? हा विचार करत होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर पाच वर्षांनी उदय सोबत लग्न झाले. 


लग्नानंतर एका वर्षाने आमच्या दोघांचा अपघात झाला, त्यात माझ्या गर्भाशयाला इजा झाली. त्या अपघातात मी माझे मातृत्व गमावून बसले होते. उदयसोबत लग्न करताना आम्ही दोघांनी एकमेकांचे व्यक्तिमत्त्व बघितले होते, आम्ही जर सौंदर्य बघून लग्न केले असते, तर त्या अपघातानंतर आमचा संसार टिकला नसता.


दररोज कमीत कमी एका पेशंटची डिलिव्हरी करुन एका आईला जन्म देणारी मी स्वतः मात्र कधीच आई बनू शकत नाही. सायलीला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल.


मी मला माझ्या कामात गुंतवून घेतलं. पेशंटच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मी आनंदी होऊ लागले. माझे घरचे माझ्यामुळे खुश आहेत. मी आतून आनंदी राहण्याचा प्रयत्न करते. जे आहे त्यात खुश राहण्याचा प्रयत्न करते.


दरवर्षी कुठेतरी फिरुन येते. स्वतःला प्रसन्न ठेवते. आई होऊ शकले नाही म्हणून काय झालं? उदय सारखा समजूतदार जोडीदार तर मला मिळाला आहे. 


प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख असतंच. सगळ्यांना सगळंच मिळतं असं नाही, पण माणसाने समाधानी राहणे गरजेचे आहे. चेहऱ्यावरील सौंदर्य कायमस्वरुपी टिकत नाही, पण तुम्ही जर व्यक्तिमत्त्व सुंदर बनवले तर ते कायम टिकतं. 


व्यक्तिमत्त्व सुंदर बनवण्यासाठी आरशात बघण्याची गरज नसते आणि म्हणूनच मी म्हणेल की,

'मी कशाला आरशात पाहू गं."


समाप्त.


©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all