मी कशाला आरशात पाहू गं भाग ३
"रेखा तुझ्या आयुष्यात नेमकं काय घडलं होतं?" निशाने विचारले.
"निशा मॅडम आपण घरी जाऊन बोलूयात का? इथे या सगळ्या विषयावर बोलणं बरं दिसणार नाही." सायलीने सुचवले.
"हो. आपण तिघी तुझ्या घरी जाऊयात. माझ्या घरी गेलो असतो, पण उदय घरी आहेत. उदय समोर रेखा सगळं काही बोलू शकणार नाही. मी उदयला घरी जायला उशीर होणार असल्याचे कळवते." निशाने सांगितले.
निशा, सायली व रेखा सायलीच्या घरी गेल्या. सायलीची आई व निशा एकमेकींना एकाच कॉलनीत राहत असल्याने आधीपासून ओळखत होत्या. सायलीने आईला निशा व रेखाच्या मैत्रीबद्दल सांगितलं.
"मावशी तुला जर फक्त निशा मॅडम सोबत बोलायचं असेल तर तसं सांग. तुम्ही दोघी एका रुममध्ये बसून बोलू शकतात." सायली म्हणाली.
यावर रेखा म्हणाली,
"नाही नको. तुम्ही दोघी इथे थांबा. मला नेमकं काय म्हणायचं आहे, हे तुम्हाला दोघींनाही कळलं पाहिजे.
निशा मी अकरावी आर्टसला ऍडमिशन घेतलं. मला शिक्षण घेण्यात काहीच रस नव्हता, पण कॉलेज लाईफ कसं असतं? हे अनुभवायचं होतं. आपल्या चाळीतील मुलं माझ्या मागेपुढे फिरायची, पण आता कॉलेज मधील मुलेही मागेपुढे फिरावीत, म्हणून कॉलेजमध्ये जाताना मेकअप करुन जायचे.
पहिल्याच दिवशी माझी व सोनलची भेट झाली. सोनल बाजूच्या चाळीत रहायला होती. सोनल माझ्यासारखीचं होती. तू जशी नेहमी मला ओरडायची त्याउलट ती मला प्रत्येक गोष्टीला प्रोत्साहन देत होती. चार मुलांनी आपल्याकडे बघावं म्हणून काय करायला पाहिजे? हे ती मला शिकवत होती.
मुलांशी गोड बोलून त्यांच्या पैश्यांनी कँटीनमध्ये नाश्ता करणे, थिएटर मध्ये जाऊन मूव्ही बघणे. हे सगळं आम्ही दोघी करायचो. आमचा एक ग्रुप तयार झाला होता, त्यात तीन मुलं आणि तीन मुली होत्या. आम्ही कॉलेज लाईफ एन्जॉय करत होतो.
कॉलेजमध्ये जाऊन मी काय करते? हे घरी काहीच माहिती नव्हते. माझ्याकडे वेगवेगळे कपडे, चप्पल कुठून येतात? हेही आईने कधी विचारले नाही. मी फक्त सुंदर दिसते, यातच त्यांना कौतुक वाटत होते.
पहिल्या वर्षाला असताना माझी व संकेतची ओळख झाली. संकेत आमच्या कॉलेज मधील नव्हता. संकेत व माझी ओळख आमच्या कॉमन मित्राने करुन दिली. संकेतला माझी दुखती रग माहीत झाली होती. माझ्या सौंदर्याचं थोडं कौतुक केलं आणि माझ्यावर थोडे पैसे खर्च केले की खुश होऊन जातं होते.
संकेतकडे बाईक होती. मला बाईकचं आकर्षण होतंच. संकेत मला बाईकवर घेऊन लांब फिरायला घेऊन जायचा. शॉपिंग, मूव्ही, बाहेर खाणं व्हायचं. संकेत श्रीमंत बापाचा मुलगा होता. मी संकेतवर प्रेम करायला लागले होते.
कॉलेज ट्रीपच्या नावाखाली संकेत व मी दोघेच लोणावळ्याला गेलो होतो. आमच्यात जे घडायला नको होतं तेच घडलं. जे घडलं ते इतकं आवडलं होतं की, आमच्यात वारंवार तेच घडत होतं. परिणामी मला दिवस गेले होते. आईला हे कळलं तेव्हा मी खूप मार खाल्ला होता. बाबांनी काहीतरी सेटींग लावून अबोर्शन करुन घेतलं. संकेत तेव्हापासून गायब झाला होता.
माझं कॉलेज बंद झालं होतं. बाबांनी नातेवाईकातील स्थळ बघून माझ्या मनाविरुद्ध लग्न लावून दिलं. माझा नवरा दिसायला चांगला नव्हता तसेच त्याला जेमतेम पगार होता, त्यात घर चालणं मुश्किल होतं. मला जसं आयुष्य हवं होतं, तसं मिळालं नव्हतं. मी अजिबात खुश नव्हते, पण आता कोणाला सांगूही शकत नव्हते.
लग्न झाल्यावर वर्षातचं मुलगी झाली आणि दोन वर्षांनी मुलगा झाला. नवऱ्याचे प्रमोशन झाल्याने पगार वाढला होता, पण मुलं झाल्याने खर्चही तेवढेच वाढले होते. मी संसार करत होते, पण त्यात खुश नव्हते, समाधानी नव्हते. नवरा मला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होता. मी कधीच माझ्या नवऱ्यावर प्रेम केलं नाही. मला तो कधीच आवडला नाही.
माझी मुलगी मागच्या वर्षी इंजिनिअर झाली, ती नोकरी करत आहे. मुलगा इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात आहे. माझ्या घराची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली आहे.
सहा महिन्यांपूर्वी मॉलमध्ये सोनल व माझी अचानक भेट झाली. सोनल व संकेत एकमेकांच्या संपर्कात होते. संकेतने सोनलकडून माझा फोन नंबर मिळवला व मला एक दिवस आग्रह करुन भेटायला बोलावले. संकेतचेही लग्न झालेले आहे, त्यालाही मुलं आहेत.
संकेतला भेटल्यावर माझ्या असं लक्षात आलं की, मी अजूनही संकेत मध्येच अडकले आहे. मी फक्त संकेतवरचं प्रेम केले होते. हळूहळू माझ्या व संकेतच्या भेटी वाढल्या होत्या. फोन, मॅसेज हे सुरुच होतं. थोडक्यात काय तर आमचं नात जिथे संपलं होतं, तिथून पुन्हा सुरु झालं होतं. मी पुन्हा आनंदी राहू लागले होते.
एका महिन्यापूर्वी माझ्या मुलीने मला व संकेतला एकत्र बघितलं, मग तिने माझ्या नकळत माझा मोबाईल चेक केला. मला विचारल्यावर मी सगळं खरं सांगून टाकलं. माझ्या नवऱ्याने मला घरातून बाहेर काढलं आणि घटस्फोट दिला. माझी मुले माझा तिरस्कार करायला लागली.
मी संकेतला फोन केला, पण तो आताही मला सोडून गेला. निशा मी माझ्या सौंदर्याला एवढं महत्त्व द्यायला नको होतं. स्वतःला सुंदर समजता समजता सगळंच गमावून बसले. जे सुखाचे दिवस होते, त्यात दुःखी होत बसले. माझ्या भावाने मला घरात घ्यायला नकार दिला."
निशाची या सगळ्यावर प्रतिक्रिया काय असेल? बघूया पुढील भागात…
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा