मी कशाला आरशात पाहू गं (डॉ सुप्रिया दिघे) भाग २

Personality Is Real Beauty

मी कशाला आरशात पाहू गं भाग २


सायली निशा व आपल्या मावशीकडे आश्चर्याने बघत होती.


निशाने सायलीच्या मावशीला शांत करत बेंचवर बसवले.


"सॉरी मॅडम. मावशीची मनस्थिती ठीक नसल्याने ती तुम्हाला वेगळं कोणीतरी समजली असेल." सायली म्हणाली.


"सायली मावशीसाठी पाणी घेऊन ये. मी इथे आहे." निशाने सांगितले.


सायली पाणी आणण्यासाठी निघून गेली.


"रेखा ही काय अवस्था करुन घेतली आहेस? तुझी मनस्थिती ठीक का नाहीये?" निशाने विचारले.


"मला माझ्या रुपाचा गर्व होता, त्याच रुपामुळे माझी ही अवस्था झाली आहे. 'रेखा तासनतास आरशासमोर घालवत जाऊ नकोस, त्यापेक्षा पुस्तकाची चार पानं वाच.' असं तू कित्येकदा सांगायचीस, पण मी तुझं कधीच ऐकलं नाही. त्याचेच फळ मला भोगायला लागले आहे." रेखाने शून्यात बघत सांगितले.


तेवढ्यात सायली पाण्याची बाटली घेऊन आली.


अर्धी बाटली पाणी रेखा एका दमात पिऊन गेली.


"सायली रेखाची अवस्था अशी का झाली आहे? नेमकं तिच्या बाबतीत काय घडलं आहे?" निशाने विचारल्यावर सायलीच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले होते.


"मॅडम तुम्ही मावशीला ओळखता का?" सायलीने विचारले.


"हो. रेखा आणि मी एकाच चाळीत वाढलो. आम्ही वर्गमैत्रिणी होतो, एकाच बेंचवर बसायचो. रेखाची व माझी भेट झाली, तेव्हा मी सहा वर्षांची होते. रेखा माझ्यापेक्षा एक वर्षाने मोठी आहे. रेखाला अभ्यासात कधीच रस नव्हता. मी गृहपाठ पूर्ण केल्यावर ती माझा बघून पूर्ण करायची. अभ्यास करायला शांतता मिळावी म्हणून आम्ही राणे आजींच्या खोलीत जायचो, त्या तिथे एकट्याच रहायच्या. 


मी अभ्यास करत बसायचे आणि रेखा आरसा घेऊन स्वतःच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत बसलेली असायची. मी रेखाला गंमतीने 'आरसा' म्हणायचे. रेखाचे स्वतःवर खूप प्रेम होते. आम्ही एकेक वर्ग पुढे जात होतो, पण रेखा काही बदलली नव्हती. रेखाच्या आई वडिलांनाही ती सुंदर असल्याचे कौतुक होते.


रेखा जेमतेम पास होत होती. तिला कितीही रागावले, समजावून सांगितले, तरी ती अभ्यास करत नव्हती. आम्ही दोघी दहावी पर्यंत एकत्र होतो.


बाबांची बदली झाल्याने आम्ही पुण्यात आलो. कॉलेज सुरु झाल्यावर कधी मुंबईला जाऊन चाळीत जाता आलंच नाही. जेव्हा वेळ मिळाला, तेव्हा चाळीतील लोकांचं पुनर्वसन झाल्याचे कळले. त्यावेळी कोणाकडेच मोबाईल नसल्याने संपर्क होऊ शकला नाही. रेखाला किती वर्षांनी बघत आहे. सगळं खरं पण रेखाला सख्खी बहीण तर नव्हती, मग तू तिला मावशी कोणत्या नात्याने म्हणत आहेस?" निशा म्हणाली.


"मॅडम तुमच्याकडे बघून तुम्ही चाळीत वाढला आहात, असं वाटतंच नाही. तुमचं बरोबर आहे. रेखा मावशीला सख्खी बहीण नाही. माझी आई व रेखा मावशी मावस बहिणी आहेत. 


दोन महिन्यांपूर्वी रेखा मावशीचा घटस्फोट झाला, तेव्हापासून रेखा मावशी डिप्रेशन मध्ये गेल्यासारखी वागत आहे. रेखा मावशीच्या नवऱ्याने तिला धक्के मारुन घराबाहेर काढलं." सायलीने सांगितले.


"सायली अग मग त्याच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करायची होतीस ना. कोणत्याच नवऱ्याला बायकोला धक्के मारुन बाहेर काढण्याचा अधिकार नाही. बरं रेखाला मुलं आहेत का? ते कुठे आहेत?" निशाने विचारले.


"मावशीला एक मुलगा व एक मुलगी आहे. ते दोघेजण त्यांच्या वडिलांकडे राहतात. रेखा मावशीला आई म्हणायला सुद्धा त्यांना लाज वाटते. रेखा मावशीच्या मुलांचं कुठेच चुकत नाहीये. आता काही वेळापूर्वी तिच्या मुलीचा फोन आला होता. मावशीची चौकशी करत होती. 


मावशीला एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे घेऊन जाण्यासाठी तिने पैसे पाठवले. आता हे सगळं असं का? याचं उत्तर तुम्ही मावशी कडूनच घ्या. मला काहीच सांगता येणार नाही. माझी आई हळवी आहे, म्हणून ती मावशीला घरात राहू देत आहे." सायलीने सांगितले.


रेखाच्या आयुष्यात काय घडलं होतं? बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all