मी कशाला आरशात पाहू गं (कामिनी खाने) भाग ४ अंतिम

सौंदर्य विचारांचं...

 मी कशाला आरशात पाहू गं ( कामिनी खाने ) भाग अंतिम 

संध्याकाळी ऑफिसमधून निघाल्यावर विराज तिला घ्यायला आला होता. विराजने गाडी समुद्रकिनाऱ्याजवळ थांबवली. दोघे गाडीतून उतरून किनाऱ्यालगत चालू लागले. त्याने आपल्या हातातील गिफ्ट बॅग तिच्या हातात दिली.‌

तिने प्रश्नार्थक नजरेने पाहताच तो उत्तरला, “अगं, काल घाईत गिफ्ट घरीच ठेवून आलो होतो. म्हणून ते आता देतोय. आणि हे पहा, तू काल दिलेलं गिफ्ट आज घालून पण आलोय!” त्याने हात पुढे करतच घड्याळ दाखवत म्हटलं.

“अच्छा! छान दिसतंय.”

इकडचे तिकडचे विषय घेतचं दोघे फिरत होते. एका ठिकाणी बसताच, विराजने तिला गिफ्ट बघायला सांगितलं. एक सुरेख असा कपल स्टॅच्यू पाहून मनस्वीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. काळ्या रंगाच्या त्या स्टॅच्यूला पाहून कोणीही क्षणभर हरखून गेलं असतं.

गिफ्ट आवडलेलं तिच्या चेहऱ्यावर दिसून सुद्धा विराजने विचारलं, “आवडलं?”

“हो. खूपच सुंदर आहे..‌ किती गोड दिसताहेत ना हे.. ”

“हो... पण मला वाटलं होतं की कदाचित तुला आवडणार नाही.”

“अरे, काहीही काय बोलतोय.‌ इतकं सुरेख गिफ्ट कोणाला आवडणार नाही?”

“तसं नाही गं.. पण म्हटलं या गिफ्टचा रंग हा असा आहे. तर तुला आवडेल की नाही. तुला हल्ली 'सौंदर्य' भलतंच आवडायला लागलंय..”

विराजच्या बोलण्याचा रोख मनस्वीला चांगलाच समजला.‌ आज मन मोकळं होऊन द्यावं, हा विचार करून तिने दीर्घ श्वास घेतला आणि विराजला म्हटलं,

“विराज.. मला माहितीये तुझा रोख कुठे आहे. पण माझ्या मनात काय सुरू आहे, हे तुला कसं सांगू असा मला प्रश्न पडतोय.”

“आपलं नातं इतकं कमकुवत नाहीये ना मनू.. जे तुला बोलताना इतका विचार करावा लागतोय..”

“सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. पण मीच काहीशी द्विधा मनःस्थितीत आहे. राहून राहून मनात विचार येतोय, मी खरंच तुझ्या योग्यतेची आहे का?”

“हे काय नवीन? योग्यतेचा प्रश्न आलाच कुठून? इतकी वर्षं आपण एकत्र आहोत, ते एकमेकांना समजून घेऊन आणि एकमेकांना साजेसे वाटलो म्हणूनच ना!”

“अरे म्हणजे बघ ना.. तू इतका देखणा आहेस. मी तर तुझ्यामानाने काहीच नाही. उद्या लग्न झाल्यावर तुला सुद्धा लोकं बोलतीलच ना, की तुझ्यासारख्या मुलाला अजून कितीतरी देखणी, सुंदर मुलगी भेटली असती.”

“लग्न आपण करतोय! जर मला हरकत नाही, तर लोकं काय विचार करतात याचा विचार मी का करावा? आणि कोण म्हणतं तू सुंदर नाहीस? मी आधीही विचारलं होतं तुला, पण तू नेहमीच हा विषय टाळतेस. सुंदरता माणसाच्या रंगावरून स्पष्ट होते, हे वाक्य तुला तरी मनापासून पटतंय का?”

“तसं नाही रे.. पण लोकं..,”

मनस्वीचं बोलणं अर्धवट ठेवतच विराज म्हणाला,

“लोकांचं काय घेऊन बसलेय तू? तुझं स्वतःचं मत विचारात घे ना. अगं, रंग सावळा असला तरी हुशारीचं तेज तुझ्या चेहऱ्यावर झळकतं. तुझ्याजवळ कितीतरी टॅलेंट असे आहेत, जिथे तू कित्येकांना मागे टाकशील. आणि आज मला ही गोष्ट तुला अशी सांगायला लागतेय.. अगं तू कॉलेजमध्ये असताना सुद्धा कधी असा विचार केला नव्हता. इतकी सारासार विचार करणारी तर तू नक्कीच आहेस. मग हल्ली का अशी विचार करतेय?”

“कळतंय रे मला पण.. पण आडून आडून जेव्हा कोणी काही बोलतं ना, तेव्हा कितीही ठरवलं तरी मनाला लागतंच. मला माहितीये, तू असा काही विचार करत नाही.‌ पण त्या उपहासात्मक नजरा पाहणं नकोसं होतं रे!”

“अगं राणी, तू दुसऱ्यांच्या नजरेने स्वतःचं अस्तित्व का ठरवतेय? तुझ्या स्वतःच्या नजरेने एकदा स्वतःकडे पहा. तेव्हा तुला तुझी किंमत कळेल. आणि तेव्हाच तुला तुझं सौंदर्य सुद्धा कळेल. लोकं बाह्य सौंदर्यासाठी भरभरून कॉम्प्लिमेंट देतील, पण निखळ मनाच्या सौंदर्याला समजून घेणारे विरळच!”

तिला पुढे काही बोलू न देता पुन्हा तोच बोलू लागला,

“सौंदर्य म्हणजे नक्की काय गं? बाह्य सौंदर्यावर नातं टिकत नाही. त्यासाठी मन सुंदर असावं लागतं. मनातच मळ असेल तर बाकी काही बोलायलाच नको. मुळात एखाद्या गोष्टीची परिभाषा ठरवणं, हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. तू स्वतः जोपर्यंत स्वतःच्या प्रेमात नाही, तोपर्यंत दुसऱ्यांचे विचार तुला असेच त्रास देत राहतील. मला माहितीये, तू नक्कीच कोणा ना कोणाच्या बोलण्याचा अति प्रमाणात विचार केला आहेस. पण तू हा विचार कर ना, की आजपर्यंत मी किंवा माझ्या घरातील कोणी तुला याबाबत बोललं आहे का?”

“नाही रे... तू किंवा घरचं कोणीही मला कधीच असं काही जाणवून दिलं नाहीये.‌ तू म्हणतोय तेच खरं आहे, मीच नको त्या लोकांचं बोलणं मनावर घेतलं.” आणि तिने ऑफिसमधील सहकाऱ्यांचं संभाषण त्याला सांगितलं.

“बाकीच्यांचं ठाऊक नाही, पण मी तुझ्या स्वभावावर, तुझ्या निरागस मनावर आणि तुझ्या या गोड चेहऱ्यावर मनापासून प्रेम करतो. त्यामुळे पुन्हा असं स्वतःला कमी लेखून माझ्या प्रेमावर शंका घेऊ नकोस.”

“वेडा आहेस का? तुझ्या प्रेमावर शंका घेण्याचा विचारही माझ्या मनाला शिवणार नाही. ते तर माझंच मन कुठेतरी भरकटून, नको नको ते विचार करत होतं. असं पुन्हा होणार नाही ... आता स्वतःच्या सौंदर्यावर मी मनापासून प्रेम करेन. आणि कोणी काही बोललं तर उत्तर पण देईन.” शेवटचं वाक्य ती काहीसं हसतचं म्हणाली.

पुन्हा एकदा त्या गिफ्टमधील जोडीला प्रेमाने पाहतच तिने विराजला थॅन्क्स म्हटलं. एकमेकांसोबत मनसोक्त वेळ घालवून दोघेही आपापल्या घरी निघून गेले.

घरी आल्यावर स्वतःला आरशात निरखून पाहतच मनस्वी विचार करत होती, ‘यापुढे समाजरूपी आरश्यात स्वतःला पाहण्याऐवजी, आधी स्वतःच्याच नजरेच्या आरश्यात मी स्वतःला पाहत जाईन.’

अन् स्वतःच्या भावविश्वात मग्न ती गुणगुणायला लागली,

‘मी कशाला आरशात पाहू गं,

मीच माझ्या रूपाची राणी गं...’

समाप्त.

-© कामिनी खाने.

🎭 Series Post

View all