मी कशाला आरशात पाहू गं (कामिनी खाने) भाग ३

सौंदर्य विचारांचं...

  मी कशाला आरशात पाहू गं ( कामिनी खाने ) भाग

विचारात गुंग असलेल्या मनस्वीला आईने हलकीशी चापट मारून भानावर आणलं.

“अगं काय हे, लक्ष कुठे आहे? कितीवेळ आवाज देतेय तर तू स्वतःमध्येच मग्न आहेस. इतका कोणता विचार सुरू आहे?” आई

“काही नाही गं आई.. असंच थोडा कामाचा विचार सुरू होता.”

यावर आईनेही बरं म्हणून फार काही विचारलं नाही. पण झोपायच्या तयारीत असलेल्या मनस्वीच्या मनात मात्र विचारांचं काहूर माजलं होतं. तिला ऑफिसमधील सहकाऱ्यांचं कानावर पडलेलं बोलणं, राहून राहून आठवत होतं.

दुपारनंतर ऑफिसमधून लवकर निघण्याआधी ती फ्रेश व्हायला म्हणून गेली होती. नंतर डेस्क आवरून निघताना काही सहकाऱ्यांचं संभाषण कानावर आलं...

“आज काय व्हॅलेंटाईन डे... तयारी तर जोरदार दिसतेय.”

“हो ना. पण काय नशीब असतात ना एकेकाचे! रंगरूपाचा ठिकाणा नसतो, पण जोडीदार मात्र अगदी भारी भेटतात.”

“नाहीतर काय! ते म्हणतात ना, चांगल्या झाडावर नेहमी....” इतकं म्हणून त्या दोघीही एकमेकींना टाळी देत हसायला लागल्या.

हे बोलणं ऐकून मनस्वीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा उत्साह झरझर उतरला. ती तशीच तिथून निघून ऑफिसमधून बाहेर पडली. बाहेर येताच तिने स्वतःलाच प्रश्न विचारला,

‘खरंच मी विराजच्या योग्यतेची नाहीये का?’

पण याचं उत्तर मात्र तिलाच देता येईना.

असं नव्हतं की या आशयाची वाक्यं तिने पहिल्यांदा ऐकली होती. बरेचदा आडून आडून अशी वाक्यं तिच्या कानावर येत असत. पण दरवेळी दुर्लक्ष करणारी ती, हल्ली मात्र या सर्व गोष्टींचा खूप विचार करायला लागलेली.

योग्य - अयोग्याची सांगड घालतच ती पुढे विराजला भेटायला गेली. पण पुन्हा तिथे सुद्धा विराजसोबत या विषयावर बोलणं झालं. तिने कितीही टाळायचा प्रयत्न केला, तरी ती स्वतःच मनातून काहीशी गोंधळलेली होती. आणि याच गोंधळात ती सतत हा विषय टाळत होती.

पुन्हा एकदा तिला लागलेली विचारांची तंद्री, मेसेजच्या रिंगटोनमुळे दूर झाली. विराजचाच मेसेज होता.

[ विराज : हाय, उद्या पुन्हा भेटायला जमेल का?

मनस्वी : हो ठीक आहे... भेटूयात ना.

विराज : ओके मग ऑफिस सुटल्यावर मी तुला घ्यायला येईन.

            चालेल ना?

मनस्वी : ओके! ]

थोडावेळ असंच गप्पा मारून दोघेही झोपेच्या अधीन झाले.

दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतःचं आवरून ती ऑफिसला गेली.‌ तिथे गेल्यावर पुन्हा तिच्या मनात तेच विचार फेर धरू लागले. पण लगेचच विचार झटकून ती कामाला लागली.

ऑफिसमध्ये तिने तिच्या हुशारीच्या जोरावर स्वतःची जागा तयार केली होती. विराज कधीतरी तिला न्यायला यायचा, त्यामुळे तिचा प्रियकर आणि होणारा नवरा, अशी ओळख ऑफिसमध्ये बऱ्यापैकी माहीत होती. पण काही लोकं मुद्दामहून याचं भांडवल केल्यासारखं तिला आडून आडून चिडवण्यात कसर ठेवत नव्हते.

आता आज विराजने पुन्हा भेटायला बोलावलं आहे, म्हणजे हा विषय होणारच, याची मनस्वीला खात्री होती. पण जास्त विचार न करता तिने कामावर लक्ष केंद्रित केलं.

मनस्वीच्या मनातला कल्लोळ ती विराजला सांगू शकते का.. विराज नक्की काय भूमिका घेतो.. पुढे पाहूया.

क्रमशः 

-© कामिनी खाने.

🎭 Series Post

View all