मी कशाला आरशात पाहू गं (कामिनी खाने) भाग २

सौंदर्य विचारांचं...

   मी कशाला आरशात पाहू गं ( कामिनी खाने ) भाग

“सांग ना मनू, प्रत्येक वेळी असे विचार का करतेस?”

“अरे, कोणी बोलायची काय गरज आहे? मला माझा रंग माहीत नाही का? मी ही अशी सावळी! त्यामुळे मुळात मला कुणाकडून सौंदर्याचं भरभरून कौतुक अपेक्षित नसतंच. ते तर तूच आहेस, जो मला काही ना काही उपमा देतच असतो. खरं सांगायचं, तर हे मलाच पटत नाही.” शेवटची वाक्यं मनस्वीने काहीशी हसतच म्हटली.

“तू रंगाचा विचार कधीपासून करायला लागलीस? कॉलेजला असल्यापासून तुझा कॉन्फिडन्ट स्वभाव सगळ्यांना माहीत आहे. मी दुसऱ्या शाखेत असूनही तेव्हापासून तुला इतकं तर ओळखतोच. पण हल्ली तू स्वतःच्याच त्या विचारांना कुठेतरी हरवलं आहेस, असं मला जाणवतंय.”

विराजला खरंतर तिचं सतत स्वतःला स्वतःच्या रंगामुळे कमी लेखणं आवडायचं नाही. पण आता त्याला या विचारांचं मूळ जाणून घ्यायचं होतं.

“विराज, अरे मला तेव्हा सुद्धा हे वाटायचंच की.. फक्त इतकंच की तेव्हा मी ते बोलून दाखवत नव्हते. आणि आता आपलं नातं पाहता, माझे सगळे विचार तुला माहीत असावेत असं मला वाटतं.”

“हे तुझे विचार? मनू, मी तुला गेली पाच वर्षे जवळून ओळखतो. त्याही आधीपासून थोडीफार ओळख होतीच. तुझ्या या बोलण्यावर मी सहज विश्वास ठेवीन, असं तुला खरंच वाटतंय?”

विराजच्या अशा बोलण्यावर नक्की काय बोलावं, हे आता मनस्वीला सुद्धा कळत नव्हतं. पण तरी आजच्या दिवशी उगीच आनंदावर विरजण पडायला नको, हा विचार करून तिने उत्तर दिलं,

“विराज.. आपण या विषयावर पुन्हा कधीतरी बोलूयात का? आज आपण व्हॅलेंटाईन डे निमित्त भेटलो आहोत ना, मग इतर विषय नकोच.”

यावर थोडा विचार करून विराजने देखील आतापुरता हा विषय नको घेऊयात, असं मनोमन ठरवलं. 

“बरं ठीक आहे.” विराज

तात्पुरता तो विषय बाजूला सारून दोघांनी आजचा दिवस छान साजरा केला. इतर विषयांवर गप्पा मारत बसले. थोडावेळ फिरून, एका हॉटेलमध्ये जेवण उरकून दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. आज बऱ्याच दिवसांनी सोबत छान वेळ घालवल्यामुळे दोघेही खूप खूश होते. अलीकडे त्यांना कामाच्या व्यापात असं भेटून वेळ व्यतीत करणं, शक्यच होत नव्हतं. त्यामुळे एकूणच आजचा प्रेमदिन बऱ्याच अंशी प्रेममय ठरला होता.

घरी आल्यावर फ्रेश होऊन टि.व्ही पाहत असताना मनस्वी मात्र विराजच्या बोलण्याचा विचार करत होती. आजचा दिवस जरी चांगला गेला असला, तरी विराजचं बोलणं तिच्या डोक्यातून जात नव्हतं.‌ असं नाही, की तिला त्याचं बोलणं पटलं नव्हतं. पण काहीतरी होतं जे तिच्या स्वतःच्या विचारांना, स्वतःवरील विश्वासाला, डळमळीत करत होतं.

नक्की काय मनस्वीच्या मनाला पोखरत असेल?

क्रमशः 

-© कामिनी खाने.

🎭 Series Post

View all