स्पर्धा : अष्टपैलू लेखक महासंग्राम
दुसरी फेरी : जलद कथालेखन
विषय : मी कशाला आरशात पाहू गं
मी कशाला आरशात पाहू गं ( कामिनी खाने ) भाग १
मनस्वी बागेत एका बाकावर बसून आजूबाजूचं निरीक्षण करत होती. खूप सारी जोडपी दिसत होती. जोडप्यांच्या आणि त्यांच्याकडे असणाऱ्या गुलाबाच्या फुलांच्या गर्दीला जणू उधाणच आलं होतं. आणि का नसेल... आज प्रेमाचा दिवस जो होता!
मनस्वी सुद्धा अशीच तिच्या 'त्या'ची वाट पाहत होती.
इतक्यात समोरून तो जरा धावतच आला आणि धापा टाकतच, “सॉरी यार मनू, मला जरा उशीरच झाला. खरंच सॉरी गं!”
“अरे हो हो, जरा दम खा. आल्या आल्या हे तुझं सॉरी पुराण कसलं सुरू करतोयस... तू आधी इथे बस.” तिने असं बोलून त्याला पाणी प्यायला दिलं.
तो थोडं रिलॅक्स होताच,
“तू अशी कशी गं? जरा बाकीच्या मुलींकडे बघ. रागावून बसतील असा उशीर झाला तर... आणि एक तू आहेस!”
“मग तसं तर तू पण बाकीच्या मुलांसारखं वागायला हवं होतंस ना. नाही म्हणजे दुसरा कोणी असता तर बोलला असता बरं झालं ही रागावली नाहीये... उगीच रुसवा काढण्याची मेहनत वाचली.” मनस्वी काहीशी हसतच उत्तरली.
“असो! हॅपी व्हॅलेंटाईन डे डियर मनू.” त्यानं गुलाबाचं फूल मनस्वीला देतचं म्हटलं.
मनस्वीने प्रेमाने गुलाबाच्या पाकळ्यांना काहीसं कुरवाळताच त्यानं बोलायला सुरुवात केली.
“मनू, तुला माहितीये... हा लाल रंगाचा गुलाब जसं पाहताक्षणी मनाचा ठाव घेतो, माझं पण तुझ्या बाबतीत काहीसं तसंच होतं. प्रत्येक वेळी तू नव्याने मनात घर करतेस. आपल्या प्रत्येक भेटीत तुला पाहताच दिवसभराचा थकवा जणू नाहीसा होतो.”
“विराज,अरे पुरे आता... मला इतकंही हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस. मला ठाऊक आहे की मी काही इतकी सुंदर नाही, जे तू अगदीच माझ्या सौंदर्याचे गोडवे गात राहशील.”
“आता हे काय तुझं भलतंच? आणि कोण म्हणतं तू सुंदर नाहियेस?”
विराजचं वाक्य ऐकताच मनस्वीच्या मनात काहीतरी आलं, पण सध्या तो विषय नकोच म्हणून तिने विषयाला बगल देतच म्हटलं,
“आपण पण काय विषय घेऊन बसलोय. चल बागेत फेरफटका मारायला जाऊयात. तिथे कॉर्नरवर मस्त कॉटन कॅंडीवाले आहेत. चल ना, जाऊन घेऊयात.”
मनस्वीने असं म्हणताच विराजने मान हलवूनच आपला होकार कळवला. आणि दोघे त्या दिशेने चालू लागले.
हे दोघं म्हणजे मनस्वी आणि विराज.
मनस्वी देशमुख; अतिशय हुशार, चुणचुणीत मुलगी. कॉलेजमध्ये टॉपर आणि सध्या इंजिनिअर म्हणून एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होती.
विराज महाडिक, हा सुद्धा अगदी टॉपर नसला तरी हुशार आणि आर्किटेक्ट म्हणून नावाजलेल्या कंपनीत चांगली नोकरी करत होता.
दोघांनी कॉटन कॅंडी घेतल्या आणि तिथेच शेजारी जागा पाहून बसले. तिथे जवळच एक मुलगा त्याचं प्रेम व्यक्त करत होता. विराज आणि मनस्वीचं सहजच त्यांच्याकडे लक्ष गेलं. तो मुलगा तर अगदी मुलीच्या सौंदर्यवर्णनाचे इमले बांधत होता.
ते पाहून विराजने पुन्हा आधीचा विषय छेडला.
“मनू, अगं जरा यांना बघ. तो कौतुक करतोय तर ती किती खूश होतेय. पण तू मात्र नेहमीच स्वतःला कमी लेखतेस. असं का? हे बघ मी काही तुलना करत नाहीये. पण तुझं स्वतःला कमी म्हणवून घेणं मला पटत नाही.”
काय उत्तर देईल मनस्वी? काय दडलं असेल तिच्या मनात?
क्रमशः
-© कामिनी खाने.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा