मी कात टाकली भाग -2
©®राधिका कुलकर्णी.
जे बघितलेय ते खरेय की खोटे ह्यावर अजुनही भागा मावशींचा विश्वास बसत नव्हता.त्यांच्या घशाला कोरड पडली होती.चेहराही भीतीने पांढरा फटक पडलेला होता.
उगीचच पदराने वारा घेत मनावर आलेला आकस्मिक ताण कमी करत त्या लिंबाखालच्या पारावर नवरा येइपर्यंत बसुन राहील्या.
जीवाची तगमग अन् डोक्यात खंडीभर विचार…..
" भागेऽऽ एऽऽऽ भागे अगं कशापायी बोलावुन घेतलस मला इतक्या घाईनं…??"
विचारांच्या तंद्रीत हरवलेल्या भागामावशी नवऱ्याच्या बोलण्याने भानावर आल्या.समोर लहानगी मुक्ताही होती.तिचाही चेहरा प्रचंड भेदरलेला.मुलीसमोर नको तो विषय बोलणे नको म्हणुन त्या मवाळ आवाजात मुक्ताला म्हणाल्या,"मुक्ता बाऽऽऽय...जाय, जरा तुझ्या मामा-मामीला बोलावुन आण."
तशी मुक्ताही धावतच मामाच्या घराकडे पळाली.मुक्ता गेली तसे भागामावशींनी नवऱ्याला खिडकीजवळ बोलवुन आतले दृश्य दाखवले.
आत्तापर्यंत मर्दासारखा चालणारा गडीही भीतीने गारद झाला.हे नसते लचांड आपल्या गळी नको पडायला म्हणुन त्यांनीही दार उघडायची कोणतीच घाई केली नाही.तेवढ्यात मुक्ता तिच्या मामा मामींसह तिथे हजर झाली.एव्हाना सांगोवांगी कुजबुज सगळ्या आळीभर पसरली तसे एकेकजण काय घडलेय बघायला गोळा झाला.
जो तो एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होता.पण बोलत कुणीच नव्हतं.
मामा आला तसा भागाबाईच्या नवऱ्याने त्याला खिडकीशी नेऊन आतले दृष्य दाखवले.मामाच्या चेहऱ्याचाही रंग उडाला.त्याला काय करावे कळेना.पण काहीतरी निर्णय घेणे भाग होते.पटकन आपल्या बायकोकडे जात तो म्हणाला, "तु मुक्ताला घेऊन घरला जाऽऽऽ.
कवाची उपाशी आसलं पोरं.तिला खाऊ पीऊ घाल तोवर मी बघतो इकडचं."
नुसत्या डोळ्यांच्या इशाऱ्यातुनच त्यांनी काहीतरी आक्रित घडल्याची सूचना देऊन पोरीला तिकडुन घेऊन जायला सुचवले.
मुक्ताला तर काहीच कळत नव्हते.जो येतो तो खिडकीशी जाऊन परत येत होता पण दार उघडायचा प्रयत्न कोणीच करत नव्हता…
शेवटी रडतच ती मामाला म्हणाली,"मला नाही कुठं बी जायचं,मला भूक बी न्हाय लागली.मला पहिले आईला भेटायचेय.मामाऽऽ तु दार उघड नाऽऽ रे..आई दार का उघडत नाई??तिला माझा आवाज ऐकु का जाईनाऽऽऽ….?
मला त्या खिडकीवर चढव बरं.मीच आवाज देते आईलाऽऽऽ.."
तिच्या एक एक वाक्यागणिक तिथे उपस्थित सगळ्यांच्या काळजाला घर्रे पडत होते.आपल्या भाच्चीच्या त्या निरागस प्रश्नांनी मामाचं काळीज पिळवटलं.डोळ्यात येणाऱ्या आसवांना कसंबसं थोपवत कशीबशी मुक्ताची समजूत घालुन मामांनी तिला आपल्या घरी धाडलं.
कोणीतरी जाऊन पोलीसात वर्दी दिली.तशी पोलीस गाडी लगेच आली.पोलिसांनीच दार फोडलं आणि आत गेले तर एक भयानक नाट्य घडलेले दिसुन आले.
खाली जमिनीवर मुक्ताच्या बापाचा मुडदा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला.कोणीतरी कोयत्याने त्याच्या डोक्यात जबरदस्त वार केल्याने अति रक्तस्त्रावाने त्याचा जीव गेला होता बहुतेक.आणि वरती घराच्या आढ्याला असलेल्या लोखंडी तुळईला दोरीने गळफास लावुन मुक्ताच्या आईनेही जीव दिला होता.
हा इतका भीषण प्रकार आळीत पहिल्यांदाच घडत होता.जो तो आपापल्या बुद्धीनुसार तर्क लावत होता की हा प्रकार नेमका काय असेल.
तसे म्हणावे तर दोन घरात काही फार अंतर नव्हते पण तरीही एवढे सगळे कांड घडुनही कुणाला ह्या कानाची त्या कानाला खबर लागली नाही हे विशेषच होते.
घरातले सामान इतस्तत: विखुरले होते त्यावरून मरण्याआधी बऱ्यापैकी झटापट झाली असण्याची शक्यता वाटत होती.पण मारहाणीचे नेमके कारण काय असावे ह्याचा अंदाज लागत नव्हता.बाप गेल्याचे कोणाला फारसे काही वाटत नसले तरी जो तो तिच्या आईच्या जाण्याबद्दल हळहळ व्यक्त करत होता..आता मुक्ताच्या आयुष्याचे पुढे काय??
हा ही प्रश्न प्रत्येकाच्या मनात डोकावत होता.
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार मुक्ताच्या आईवडीलांच्यात कशावरून तरी झटापट होऊन आईनेच मुक्ताच्या वडिलांचा खून करून स्वत:ला गळफास लावुन घेतला होता.
हां हां म्हणता बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली.
आपल्या आईचे ते मूक कलेवर पाहुन मुक्ताला आवरणे कठिण होऊन बसले होते सगळ्यांना.
तिचा खूप जीव होता आपल्या आईवर.तिच्यावर प्रेम करणारी जगातली एकमेव हक्काची तिची माय आता तिच्यापासुन इतकी दूऽऽऽर गेली होती की आता तिला आई फक्त आठवणीतच दिसणार होती.तिचा तो हंबरडा काळीज चीरत होता प्रत्येकाचे.कसेबसे भागामावशी आणि मामींनी तिला सावरले.
पोलिसांनी पंचनामा करून पुढील सोपस्कारासाठी दोघांच्याही बॉडीज् तालुक्याच्या हॉस्पीटलला रवाना केल्या कारण गावात शवविच्छेदनाची सोय नव्हती.त्यामुळे बॉडी मिळायला दोन दिवस तरी लागणार होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~
शेवटी सगळे प्रेताचे सोपस्कार उरकले तसे मामा जड अंत:करणाने मुक्ताला आपल्या घरी घेऊन आला.
सुरवातीचे काही दिवस ठिक गेले पण नंतर नंतर मामीला मुक्ताची अडचण व्हायला लागली.
'खायला कहार अन् भुईला भार ' असे तिला मुक्ताबाबत वाटु लागले.
त्याउलट मामाचा मुक्तावर भारी जीव.त्यांना मुलगी नाही म्हणुन तो मुक्तावर मुलीगत प्रेम करायचा.त्यामुळे मनातल्या मनात मामीचा नुसता जळफळाट व्हायचा पण बोलायची सोय नव्हती नवऱ्यापुढं.आतल्या आत धुसफुसत रहायची फक्त.
मग हळुहळु तिने लाडीगोडीतच मुक्ताला घरातली कामं सांगणे सुरू केले.तिलाही कामाची सवय होतीच.ती आनंदाने मामीची सगळी कामं करायची पण तरीही मामीला तिचे शाळेत जाणे,अभ्यास करणे आवडायचे नाही.इकडे तिच्या मुलाचे शाळेतुन लक्ष उडालेले असताना ह्या पोरीचे मात्र नवऱ्याला भारी कौतुक ह्याचाच तिला खरा त्रास व्हायचा.
तिला वाटायचे हिला काय करायचेय शिकुन??
अशी कोणती मोठी ऑफीसर होऊन दिवे लावणार आहे.पण आपल्या नवऱ्यापुढे तिचे एक चालायचे नाही.
मामांनाही आपल्या बायकोच्या मनात मुक्ताविषयी पडलेलं कडू दिसत होतं.आता निदान हिने पोरीला घरकामं सांगितली तरी चालतील पण शिकायला तरी अडकाठी करू नाही ह्याची काहीतरी युक्ती शोधायला हवी पण कायऽऽऽ ह्याचाच ते दिवसरात्र विचार करत होते.
केदार मुक्तापेक्षा वयाने मोठा होता.आताशा तो शाळेलाही भरपूर दांड्या मारून तळ्यावरच्या पारावर मोठ्या वयाच्या पोरांसोबत वेळ घालवायचा.सगळ्या वाया गेलेल्या टुक्कार कार्ट्यांसोबत तोही वाह्यात झाला होता.आईबापाला वाट्टेल तशी उद्धट उत्तरे करायचा.त्याच्या ह्या वागण्यामुळं मामा-मामींच्या जीवालाही चांगलाच घोर लागुन राहीला होता.
ह्याचेच भांडवल करून मग मामांनी एक विचार करून एक दिवस मामीची अखंड बडबड ऐकुन तिला समजावणीच्या सूरात म्हणाले,"अग्ंऽऽऽ,माझी वेडी बाऽऽऽय..जरा माझ नीट ऐकशील का??"
त्यावर मामी घुश्शातच मान वेळावुन म्हणाल्या,"काऽऽय??"
आता मामी थोडी नरमाईत आलीय हे पाहुन मामा लाडीगोडीतच मामीला म्हणाला,"अगंऽऽ आपली मुक्तीऽऽऽ अभ्यासात लई हुशार हायं.तिची मास्तरीण परवा लई कवतिक करत होती पोरीचं.आणखी म्हनली," तुमची मुक्ता अशीच छान अभ्यास वाचत राहीली तर नक्की मोठी ऑफीसर बनेल पण तिचे शिक्षण सोडू नकाऽऽ अर्ध्यातुन."
त्यावर मामी रागातच फणकारून बोलली,"तिचं कवतिक मले नगा सांगुऽऽ..तिला बॅरीस्टर करून आपल्याला काय फायदा…??परक्याच धन.एक ना एक दिस जाईल नवऱ्याच्या घरी अन् आपल्या हाती कायऽऽऽ ?? कोहोळाऽऽऽ..????"
तिची ती कूरकूर ऐकुन मामाही अजुन हळु आवाजात म्हणाले,"अग्ंऽऽ तिला आता आपणच मायबाप.आपलं पोरगं अस शाळा सोडलेलं.त्याचा भरोसा वरचा देव सुदिक द्यायचा नाय मग आपल्याला उद्या म्हातारपणाची काठी कोण होईल सांग?पोरगं होईन का ही पोरऽऽ…?
विचार कर की जराऽऽ…!"
"अगंऽऽ लेकीला माया लावली तर ती आयुषभर आपल्या मायबापाला पाठ दाखवत न्हाई पण ही पोरं लई उलट्या काळजाची असत्यात बघ.आता आपल्या केदारचच बघ..काय कमी केली त्याला,तरी कसा उद्धटासारखा वागतो पण मुक्तीन कधी एक सबुत तरी उलट उत्तर केलं का तुला सांग बरं आठवुन....!"
आत्ता कुठ मामीच्या टाळक्यात उजेड पडला.
नवऱ्याच बोलणं कडू होत पण पटण्याजोगंच होतं हे मामीलाही कळत होतं तरीही आपली र्री ओढत घरातली सर्व कामं मुक्तीनं करायलाच पाहिजे ह्या अटीवरच मामी पाेरीच्या शाळेला तयार झाली.
मामानेही त्यावर होकार भरून तात्पुरता त्या विषयाला विराम दिला.
निदान मामी आता पोरीच्या शिक्षण सोडण्यासाठी तरी कटकट करणार नाही एवढेच काय ते समाधान.
त्या दिवसापासुन मामीच्या वागण्यात रूपयात चार-आणे का होईना फरक पडला.
मामी तशी स्वभावाने वाईट नव्हती पण आपलं पोरगं अभ्यासात कमी अन् परक्याची पोर हुशार हे काही तिला पचनी पडत नव्हत.पण मामांची गोळी बरोबर काम करू लागली.मुक्ता पुर्वीप्रमाणेच लवकर उठुन मामीला सगळ्या कामात मदत करून वर लवकर आवरून शाळेलाही जात असे.
मामीचा कडक स्वभाव,कामाचा धाक त्यात वरच्या वर्गातील अभ्यासाचा अतिरिक्त भार. नाही म्हणले तरी मुक्ताच्या कोवळ्या जीवाची खूप ओढाताण होई पण मनोमन आपल्या गणोबाला आपली सगळी दु:ख सांगुन ती स्वत:चे मन हलके करून घेई.
कधीकधी खूप दु:ख दाटुन आले की तिला राग यायचा गणोबाचा.आपला सगळा राग त्याच्यावर काढत ती प्रश्न करायची,"मी तुला कधी काही मागितले का??उलट नेहमी तुझ्यासाठी गजरा हार करून घातला पण तरी तु माझ्यावर इतका का नाराज झालास की माझी मायच माझ्यापासुन ओढुन नेली.?
काय वाईट केलं होत रेऽऽऽ तिने तुझे?
कीऽऽऽ मग मी काही वाईट केले म्हणुन तु मला अशी पोरकेपणाची शिक्षा दिलीस...,का गणोबा काऽऽ???
माझ्यावर जीव टाकणारी एकमेव व्यक्ति माझी आईऽऽ तिला माझ्यापासुन दूर नेऊन काय मिळाले रे तुला???
बोलता बोलताच कंठ भरून येई मुक्ताचा पण
आईच्या आठवणीने ओघळणारे अश्रु पुसायलाही कोणी नसायचं मायेच.
मामी एखाद्या घरगड्या सारखी वागणूक देई.काम केल तरच खायला मिळंल नाहीतर नाही त्यामुळे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस दुखो-खूपो काहीही होवो पण तिला कुठल्याच कामातुन सुटका मिळत नसे.आई असती तर रात्री निदान कुशीत घेऊन तरी निजली असती तर सगळ्या दु:खांवर हलकेच फुंकर टाकल्यागत वाटलं असतं पण आता तेही सुख नाही.मामी शेजारीच झोपायची पण कधी जवळ नाही घ्यायची.कधी प्रेमाने चौकशी नाही की कौतुकाचा एक शब्द नाही.ह्या सगळ्यामधे एकच गोष्ट समाधानाची होती म्हणजे मामी आता निदान शाळेला जायला कटकट करत नव्हती.
वर्ष सरत होती.आता मुक्ताही मोठी झाली होती. मुक्ताच्या शरीरातील बदल नजरेत भरण्याइतके उठुन दिसत होते.
त्या चार दिवसात मामीकडे वेगळे बसावे लागे.मग कामाला तर खाडा नसे पण सगळ्या गोष्टींसाठी मामीवर अवलंबुन रहावे लागे.कधी कधी खायला तुकडाही दिवस दिवस मिळत नसे.पोटात भुकेने आगडोंब उसळायचा पण मामी मुद्दाम लवकर जेवायला द्यायची नाही.आणि सगळ्यांचे उरकल्यावर उरली सुरली भाकरी विना कालवणाचीच ताटात येई.
डोळ्यातल्या आसवांचेच कालवण करून पाण्यात भाकरी कुरून खाई मुक्ता.
कधी कधी मामा मायेने चौकशी करायचा पण मामीची तक्रार केली तर ती घराबाहेर घालवेल मग आपलं शिक्षण सुटेल ह्या भितीने ती कधीच काही बोलायची नाही.
हे सगळे त्रास तर जणु तिच्या अंगवळणीच पडले होते.
ह्या सगळ्या परिस्थितीवर मात करायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला स्वत:च्या पायावर ऊभे राहायला हवे हाच एकमेव सुटकेचा मार्ग तिला स्वत:साठी दिसत होता.
त्यासाठी कुठल्याही परिस्थितीत शिक्षण सुटले नाही पाहिजे हा विचार तिच्या शिक्षणाची ईच्छा अजुनच बळकट करायचा.
हे सगळे खडतर प्रसंगच तिला शिकण्याविषयी अधिकाधिक ओढ लावायचे.
निमुटपणे सर्व त्रास सहन करत ती मामा मामींबरोबर आला दिवस कंठत होती.पण ह्या सगळ्यात आताशा एका नवीन त्रासाने तिला ग्रासले होते.
ती आजकाल सतत कुढत कुढत भीतीच्या सावटात वावरायची.
तिचा त्रास तिला कुणाला सांगताही येत नव्हता आणि निस्तरताही येत नव्हता.
एका नव्याच विवंचनेने तिला घेरले होते…
आता ही विवंचना तिच्या आयुष्यावर कसा परिणाम करणार होती???
काय घडणार होते पुढे….!!!!
आज तरी हे काळाच्या पडद्याआड दडलेले कोडेच होते तिच्यासाठी………!
------------------------(क्रमश:-2)----------------------------
(क्रमश:-2)
©®राधिका कुलकर्णी.
नमस्कार वाचकहो…..!
मुक्ताच्या आयुष्यात घडणाऱ्या उलथापालथी तिला कुठल्या नविन संकटांच्या समोर उभे करणार आहे????हे जाणुन घ्यायचे असेल तर पुढील भाग नक्की वाचा.
हा भाग कसा वाटला ते कमेंट्समधे जरूर कळवा.
लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत ही कथा कुठेही शेअर करण्यास माझी परनानगी आहे.
धन्यवाद.
@राधिका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा