मी देव बोलतोय......

All About Satisfaction
कसे आहात लेकरांनो....?
आज माझ्या वर्षांपूर्वी झालेल्या एका चुकीने मला तुमच्या समक्ष येऊन बोलण्यास मजबूर केले आहे. खूप वर्षा आधीची गोष्ट आहे. मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा मी पृथ्वीचे निर्माण केले. हवा, पाणी ,अग्नी ,माती, इ.हे सर्व पृथ्वी निर्माणास मला उपयोगी ठरले. त्यानंतर पृथ्वीवर जीवजंतूं, फुले, झाडे, वेली या सर्वांचा जन्म झाला.ह्या सर्वांनी पृथ्वी अगदी नवरीसारखी नटलेली दिसत होती. काही दिवसांनी मनाला पौत्रप्राप्ती ची तहान भासू लागली.ही तहान भागवायची म्हणून आपला सर्वगुणसंपन्न असा अंश ज्यामध्ये सर्व नवरस समावलेले असतील अशा मानवाच्या निर्मितीस मी सुरुवात केली. अगदी दिवाळीचा दिवस वाटत होता. चोहीकडे आनंदाचे इंद्रधनुष दिसायला लागले. मानव निर्माणाची तयारी करताना माझ्याकडे स्वर्ण पात्र होते, ज्यामध्ये प्रेम ,माया भीती ,निस्वार्थपणा, सुखदुःख, अहंकार ,समाधान, शौर्य, इ. असे अनेक रत्न सांभाळून ठेवले होते. तुम्हा मानवात होईल तितके रत्न ओतायचे मात्र हाच माझा आटापिटा. मी केलेली निर्मिती अगदी छान व सुंदर पृथ्वीला शोभावी अशी असावी याच प्रयत्नात मी होतो. सर्वप्रथम स्वर्ण पात्रातून सुखदुःख, नंतर प्रेम, माया ,असे करून एकएक रत्न मी तुम्हा मानवांत ओतले. सर्व गुण प्रदान केल्यावर स्वर्ण पात्रात एक शेवटचं रत्न उरलं ते होतं "समाधान". ते रत्न घ्यायलाच गेलो तर चुकीने पात्र खाली पडलं आणि समाधानाचं रत्न पृथ्वीलोकात जाऊन पडलं. आणि ते तेथील झाडझुडूपं, पशुपक्षी यांना प्राप्त झालं, आणि कदाचित त्यामुळेच ते आजही त्यांच्याकडे काही नसतानासुद्धा समृद्ध आणि समाधानी आहे.
मुलांनो... तेव्हा आनंदाच्या भरात मी समाधानाचे रत्न प्रदान न करता तुम्हाला पृथ्वीलोकावर जन्म दिला. पण त्या वेळी झालेली ही चूक आज खूप विनाशकारी ठरत आहे. त्यावेळी जेवढा मला आनंद होता तेवढेच मला आज दुःख पण आहे. पण असं नाही की तुम्ही तो रत्न आजही प्राप्त करू शकत नाही... तुम्ही तो करू शकता पण मानवतेच्या व भक्ती भावाच्या मार्गाने.मी तुमच्यात तेवढी शक्ती दिलेली आहे. आणि आज तुम्हाला तो रत्न प्राप्त करून घ्यायची गरज आहे. कारण तुमच्या असमाधानी स्वभावानी ह्या सुंदर पृथ्वीचे खूप नुकसान होत आहे. ह्या जगात मानवतेची जागा हरवली आहे. माझ्या प्रिय मुलांनो... तुम्हाला कल्याणकारी व्हायचे होते तुम्ही विनाशकारी होत आहात. जर आजही तुम्ही समाधानाचे अलंकार घातले नाहीत तर निश्र्चितच तुम्ही स्वतः तुमच्या विनाशाचे कारण बनाल. समाधानी राहून सर्व जीवांना सोबत घेऊन व पर्यावरणाला सोबत घेऊन निस्वार्थपणे जगा. हाच तुमच्या समृद्धी व सुखी जीवनाचा मूलमंत्र आज मी तुम्हाला देत आहे. आशा करतो निश्चितच ही माझी भेट तुमच्या जीवनात महत्वाचे बदल घडवून आणेल.??
                                 ........ विवेक सुभाष देशमुख
                                     -११/०७/२१
                        - instagram Id: deshmukhvivek180