Login

मी चुकलो! ( अंतिम भग)

भूतकाळात केलेल्या चुकांची माफी मागणे योग्य की अयोग्य?


भाग अंतिम
***************************
ती धावतच  हॉस्पिटल मध्ये गेली. त्याला बराच मार लागला होता.

त्याचे ऑपरेशन करण्यात आले आणि दुःखाची बाब म्हणजे त्याचे दोन्ही पाय हे गाडीच्या खाली आल्यामुळे कट करावे लागले. त्याला  बघुन सरला खूप रडायला लागली.कारण शेवटी कसाही असला तरीही तिचा नवरा होता तो.

दोन दिवसानंतर तो शुध्दीवर आला. साधारण एक महिना तो हॉस्पिटल मध्ये होता. त्याच्यासाठी  सरला रात्र अन् दिवस जागी राहायची.

काही दिवसानंतर त्याला घरी आणलं.आता मात्र त्याला बाहेर जाता येईना,नोकरीवरून कमी केलं. ढीगभर  मित्र असणारा शंकर त्याला मोजकेच मित्र भेटायला यायला लागले. ज्या बायकांवर तो पैसे उडवायचा त्या एकीनेही त्याची चौकशी केली नाही.


एक दिवस रात्री...

" सरला अगं मी तुझ्याशी एवढ्या वर्षात एकदाही चांगला वागलो नाही मग तरीही तू माझ्यासाठी एवढं का करतेस?"


तिने त्यांच्याकडे बघितलं पण बोलली मात्र काहीच नाही.


एक एक दिवस चालला होता. आता शंकरच्या तब्येतीत सुधारणा झाली होती, त्याच्या स्वभावातही बराचं बदल झाला होता. चिडचिड,अरेरावी करणारा शंकर आता खूप शांत आणि समजदार झाला असे वाटत होते.

एके दिवशी सरलाचा भाऊ आणि वहिनी आले होते. शंकर इकडे झोपला  होता आणि तिकडे हे तिघे गप्पा मारत होते.


" सरला, अगं किती दिवस असं सहन करणार आहे? किती दिवस पोसणार आहेस तू नवऱ्याला? आता काही कामाचा नाही राहिला. तसाही खूप त्रास दिला आहे त्यांनी तुला."

"हो ना ताई!! अहो अजून तुमच्या पुढे संपूर्ण आयुष्य पडलं आहे. पुढचा विचार करा जरा."


" वहिनी ....होतात चुका माणसांकडून तो ही शेवटीं माणुसचं आहे ना!"

"धन्य आहे सरला तू अगं किती त्रास दिला त्यांनी तुला पण तरीही तू ..."

"अरे मी तशी वागली तर त्यांच्यात आणि माझ्यात फरक काय राहिला सांग ना?

हे शंकर सगळं ऐकत होता. त्याला त्याची चूक कळून आली.


असेच अनेक वर्ष गेले आता शंकर व्हील चेअरवर बसून तिची बरीच मदत करू लागला. आता त्यांची खानावळ बरीच फेमस लागली होती. भरपूर काम वाढलं होतं.

दोघांच्यामध्ये आता बरं जमायला लागलं होतं.

" सरला, अगं किती काम करशील? जरा आराम करत जा."


" कामाशिवाय पर्याय आहे का सांगा आता? कोण देणार आपल्याला घर बसल्या आणून?"


" तू इथून जा असं मला वाटतं उगाच माझं ओझं तुझ्यावर. मला स्वतःच काहीच करता येत नाही सगळ्या गोष्टीसाठी मी तुझ्यावर अवलंबून आहे. मलाच कंटाळा आला आहे या जीवनाचा मग तुला नसेल का आला?"


" नाही अजिबात नाही. आपली माणसं कधीच ओझ नसतात. तुमची सोबत ही मला लाख मोलाची आहे."

" खरचं मी किती नशीबवान आहे मला तुझ्यासारखी बायको भेटली."

शंकर एवढं बोलून सरलाला आवाज दिला,
.

" सरला...अगं ए सरला ...बस झाल्या आता भूतकाळातल्या आठवणी."
अजूनही सरला भूतकाळात हरवून गेली होती,परत शंकर बोलला,

"अगं किती वेळ बसू मी आता देतेस का चहा?""


" अं!!! हम्म!!!!घ्या ना...हा तर फार गार झाला आहे ,थांबा मी गरम करून आणते."


"नको ...बस..खूप दमली ना माझं करून करून. मला काही तरी बोलायचं आहे."


"आता नको खूप उशीर झाला आहे, खूप काम पडली."


"पडू देत... आधीच खूप उशीर झाला आहे गं  या गोष्टीला. कधी देव नेईल ते सांगता येत नाही."

"अहो  काय  बोलत  आहात आज?"


"मला माफ जर सरला, मी चुकलो खरं तर मी  आधीच माफी मागायला हवी होती पण अहंकार आड येत होता, नवरा आहे ना मी मग पुरुषाची पडती बाजू  सहन नाही झाली मनाला. पण खरचं तू सर्वच बाबतीत श्रेष्ठ आहेस माझ्या पेक्षा. मी कधीच तुझ्याकडे लक्ष दिलं नाही किंवा प्रेमाने दोन शब्द बोललो नाही. तुझा फक्त गरजेपुरता वापर केला असं म्हणायला हरकत नाही. खरचं मला माफ कर...सरला मला मग कर."

आणि शंकरच्या डोळयात पाणी आलं.

"अहो, मी तुम्हाला केव्हाच माफ केलं म्हणून तर थांबले तुमच्याजवळ. मी ही तुमच्या सारखं वागले असते तर तुमच्यात आणि माझ्यात फरक काय राहिला असता?"

सरला उठली, चहा गरम करून आणला आणि शंकरने तो पीला. थोडा वेळ झाला असेल सरला जेवायला काय बनवू हे विचारण्यासाठी आली पण शंकर काहीच बोलला नाही.

तिने त्याला हलविले पण तो काहीच रिस्पॉन्स देत नव्हता म्हणून तिने डॉक्टरांना बोलावले.
डॉक्टर आले त्यांनी त्याला मृत घोषित केलं. शेजारी पाजारी जमले. सरालाच्या डोळ्यात पाणी आलं.


भाऊ वहिनी आली, शेजारच्या मावशी सगळ्या जणी आल्या. शंकरचा अंत्य संस्कार केला. सगळी लोक आपापल्या घरी निघून गेली. जाताना मावशी म्हणाली,


"सरला, अगं काळजी घे एकटी पडली तू आता."


सरला मनातच बोलून गेली,
" एकटी नाही पडले, सुरुवाती पासून मी एकटीच होते."

समाप्त.....

माझी ही कथा कशी वाटली नक्की कळवा. धन्यवाद!
©® कल्पना सावळे
0

🎭 Series Post

View all