मी चुकलो! (भाग १)

भूतकाळात केलेल्या चुकांची माफी मागणे योग्य की अयोग्य?


भाग १
****************************
सत्तरी ओलांडलेला शंकर खाटेवर पडून होता. अर्ध टक्कल पडलेले, जे काही थोडे केस होते तेही पांढरे झालेले. दोन्ही गाल आत गेलेले  कारण तोंडात फक्त मोजून दोन चार दात उरलेले, डोळे कपारीत गेलेले त्यावर भिंगाचा चष्मा.

सरला आली आणि आवाज दिला,
"अहो... अहो...चहाची वेळ झाली, घ्या चहा."


मात्र शंकर एकटक गोल गोल फिरण्यार्या पंख्याकडे बघत होता. शेवटी सरलाने चहाची कप बशी खाली ठेवली आणि त्याला हलवलं.


"अहो कुठे हरवलात? आता डोळ्यांनी काही दिसत नाही तरीही स्वप्न बघताय का?"


"सरला, तुझ्या माहिती साठी म्हणून सांगतो स्वप्नांचा आणि डोळ्यांनी चागलं दिसण्याचा काहीही संबंध नाही. डोळे जरी गेले तरीही माणूस मस्त चांगली स्वप्न बघू शकतो, त्याला डोळ्यांची गरज नाही."


सरलाने शंकरला हाथ धरून उठवलं आणि मागे उशी लावली. चहाची कप बशी त्यांच्या हातावर ठेवली. मात्र आज सरलाचा स्पर्श काही वेगळाच वाटला. तिने चहा पण जरा रागात दिला असं शंकरला वाटलं.


"सरला, अगं कसला राग आलाय तुला?"


"मला कशाला येतोय राग! जेव्हा यायला पाहिजे तेव्हा तर गप्प होते मी."

"अगं एवढी वर्ष संसार केला तुझ्या बरोबर तुला ओळखायला मला वेळ नाही लागत."


"अरे वा! मग मला राग का आला हे ही कळलचं असेल. तरुण होती तेव्हा मात्र काहीही दिसत नव्हतं, समजत नव्हतं तुम्हाला , फालतू प्रेमाची झापड होती डोळ्यावर."


"अगं आता कशाला त्या गोष्टीची आठवण करून देते, शेवटी तूच माझी अर्धागिनी."

"अहो फक्त अर्धागिणी म्हणून चालत नाही तसं वागावं लागतं. आठवते का काही की वयमानाने सगळं विसरलात?"

"नाही ग डोळ्यांना जरी भिंगाचा चष्मा घातला असला ना तरीही सगळं डोळ्यासमोरून तरळत आहे बघ. असं वाटत काल परवाची गोष्ट आहे. बस ना इथे!!..... बघ! आठवतेय का काही?"

दोघे भूतकाळात शिरले.

शंकर हा एका ऑफिसात कारकून होता. त्याचं लग्न जुळलं सरलाशी. सरला  गावाकडची अत्यंत साधी मुलगी. राहणीमान साधं, सरळ  विचारांची डावपेच तिला अजिबात माहीत नव्हते.

लग्न करून सासरी आलेली सरला सासरच्या लोकांमध्ये गुंतली. कधी सासू तर  कधी सासरे याच्या आवडी निवडी प्रमाणे सगळं काही घरात व्हायचं. शंकराला  तिने कधी विचारलं नाही की तुम्हाला काय आवडते? आणि त्याने कधी सांगितलं पण नाही.


दोघांचा संसार असाच चालला होता. एक एक दिवस निघत होता आणि मावळत होता. एक दिवस सासूबाई म्हणाल्या,

" अगं सरला तुझ्या लग्नाला दोन तीन वर्ष झाले पण तुमच्या दोघांमध्ये पाहिजे तसं नातं जुळलं असं वाटत नाही. तुझ्यापेक्षा वयाने थोडा मोठा जरी असला तरीही तुझा नवरा आहे तो."

"म्हणजे सासूबाई ..मला समजलं नाही."


"अगं तेच तर आहे तुला काही समजत नाही. कधी तरी बायको सारखं वागावं  माणसानं. नवऱ्याला खुश ठेवावं, तुझ मात्र नवरा सोडून बाकी लोकांकडे लक्ष जास्त."


आता मात्र सरलाला प्रश्न पडला.

" खुश ठेवायचं म्हणजे नेमकं काय करायचं सासूबाई?"


" आता ते ही मीच सांगू? कशी राहते काकूबाई सारखी, एवढी तरणी ताठी पोरं आहेस जरा चांगलं राहत जा .बघावं तेव्हा तोंड लटकलेले, केसांचा भारा झालेला कधी पावडर नाही, ते काय म्हणतात काजळ नाही आणि काय नवरा बाहेर जाणार नाही तुझा."


सासूबाई बोलता बोलता जे बोलायचं नव्हतं ते ही बोलून गेल्या.


" सासूबाई काय बोलल्या तुम्ही?"


" अगं काही नाही ...मी जरा शेजारच्या मावशी कडे जाऊन येते."


सरलाच्या डोक्यातून ते वाक्य गेलेच नाही. दिवसभर त्याचा विचार करत बसली. तिला हे ही माहित होत की सासूबाई खरं ते काही सांगणार नाही. पण तिला तर ते जाणून घ्यायचं होतं. म्हणून तिने विचार केला की आज आपण शंकरला विचारायला हवं. तसा तिने मनाशी निर्धार केला.पण मनात भीती पण होती?


सरला विचारेल का मनात आलेला प्रश्न शंकरला की  नाही? बघू या पुढच्या भागात.
धन्यवाद!
क्रमशः
©®कल्पना सावळे

🎭 Series Post

View all