मी आणि अग्निपंख

माझा आणि अग्निपंखचा खडतर प्रवासतीन वर्षांपूर्वी अगदी वयाच्या 23 व्या वर्षी(वयाचा मुद्दाम उल्लेख करतीय) मी अग्निपंख स्पर्धापरीक्षा अकॅडमी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तो पर्यंत एखादी पोलिस ऑफिसर होऊन समाज सेवा करावी आणि रुबाबात आयुष्य जगावं अस सुंदर स्वप्न बघितलं होत. पण जे सरळ चालेल ते आयुष्य कसलं? कुठं तरी एखादी घटना अशी घडते की तुम्हाला तुमचं ध्येय बदलायला भाग पाडते. असच काहीस माझही झालं. अकॅडमी ची फी भरायला पैसे नाही म्हणून माझा अपमान करून हाकलण्यात आलं आणि माझ्या विचारांचा प्रवाहच बदलला.
पण तेवढाच प्रसंग यासाठी पुरेसा नव्हता. ...
एक अनाथ म्हणून जगताना खाव्या लागलेल्या खस्ता, खूप लहान वयात मोठ करून गेल्या. शालेय जीवनापासूनच थोडीसी हुशार होते. कथा कविता लिखाणाची आणि वक्तृवाची आवड होती.त्यामुळे शिक्षकांची आवडती झाले. म्हणूनच शिक्षण घेत असताना अनेक स्पर्धा गाजवल्या. शिक्षकांनी मदत केली. खूप अभ्यास केला.आज स्वतःची एक ओळख निर्माण केली.
आज मागे वळून बघते तेव्हा अनेक प्रसंग डोळ्याभोवती पिंगा घालतात. त्यातलाच एक असा....
12 वीला असताना आष्टीला राज्यस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धा होती. कॉलेजतर्फे मी आणि आणखी 2 मुले जाणार होते. परळी-आष्टी अंतर लांब आहे. खर्च कॉलेज करणार होतं. मग कॉलेजने जाण्या येण्याचे आणि जेवणाचे पैसे मोजून दिले. मी लहान होते म्हणून सिनियर मुलाकडे पैसे दिले. आम्ही सकाळी लवकर निघालो, वेळेत पोहचलो. स्पर्धा झाली. सोबतची मूलं सिनियर गटातून तर मी ज्युनियर गटातून होते.माझ्या गटातून मी पहिली आले.पण... त्या दोघांचा मात्र नंबर आला नाही. बक्षीस वितरण दुसऱ्या दिवशी होत.आम्ही परत निघालो. बीडमध्ये पोहचलो तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. शेवटची गाडी निघून गेली होती.पहाटे 5 ला गाडी होती. तेव्हा पोरांनी माझ्या तिकिटाचे पैसे माझ्या हातात ठेवले आणि त्यांच्या मित्रांच्या हॉटेलवर निघून गेले. एकटीच बसस्टॅन्डवर बसून होते. आजूबाजूला इतर प्रवासी पण होते. भूक लागली होती. थंडी वाजत होती. जीव कासावीस होत होता.बाजूला कोणीतरी केळी खाऊन साल टाकली होती. इकडं तिकडं बघितलं आणि साल उचलून खायला सुरुवात केली. खूप रडायला येत होत . मला मुक्कामी बसच्या कंडकटर ने बघितलं आणि 1 चपाती आणि भाजी आणून दिली. आणि विचारपूस करून दुसऱ्या दिवशी मला आष्टीच्या गाडीत बसवून दिल.सकाळी बसस्टॅन्डवरच फ्रेश होऊन बक्षीस बितरणाला गेले. ट्रॉफी आणि 5000 चा लिफाफा घेताना मात्र.....डोळ्यातून पाणी गळत होत......
गरिबीने असे अनेक दिवस दाखवले. बदललेले नातेवाईक दाखवले.पण..... मनाने मात्र खंबीर बनवले. म्हणूनच कधी स्वतःच्या गरिबीची लाज नाही वाटली किंवा भांडवल पण करावसं वाटलं नाही.....
पुढे मानवी हक्क अभियान चे ऍड. एकनाथ आव्हाड साहेब (जिजा )यांची भेट झाली आणि त्यांनी मला त्यांच्या संस्थेत "चिंगारी" नावाच्या प्रोजेक्टसाठी फिल्ड ऑफीसर् म्हणून काम दिल. अगदी प्रोजेक्ट संपेपर्यंत तिकडे काम करून पुढील शिक्षण घेतलं.
पुढे स्पर्धा परीक्षेची तयारी करायला पुण्यात आले आणि तिथेच अशोकची भेट झाली. त्याने माझ्यावर प्रेम तर केलच पण माझ्या प्रत्येक निर्णयात खंबीरपणे साथ दिली आणि मी खुशी शिंदे ची खुशी अशोक कांबळे झाले?
अकॅडमी चालू केली तेव्हा त्याने सोसायटीतुन 5 लाखाच कर्ज घेतलं आणि अर्थिक पाठिंबा दिला. तसेच मुलांना ग्राऊंड ट्रेनिंग द्यायची पण तयारी दाखवली.
पण नवीन अकॅडमी आणि जाहिरातीचा अभाव म्हणून जास्त रिस्पॉन्स नाही मिळायचा. त्यावेळी आम्ही काटकसर करून भाड भरायचो. पण हार नाही मानली. हळूहळू मुले येत होती आणि गुणवत्ता बघून मित्रांना पण आणत होती. माऊथ पब्लिसीटी झाली आणि अग्निपंखला ओळख मिळाली.
अशोक च प्रमोशन झालं आर्थिक घडी व्यवस्थित बसली. आज अग्निपंख no 1ला आहे. माझी ओळख आहे. आता आम्ही शिवराज बहु उद्देशिय विकास संस्था स्थापन केलीय्. ज्याद्वारे गरीब, अनाथ मुलामुलींना प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी अल्पदरात प्रशिक्षण द्यायचं आहे........
आज मी भौतिकदृष्टया सुखी आहे.स्वतःच घर आहे. गाड्या आहेत. जीवापाड प्रेम करणारा नवरा आहे.गोंडस मुलगा आहे.
पण.... आजही मनाने मात्र मी तिच अनाथ खुशी आहे जिला स्वतःसारख्या गरीब अनाथ मुलींना सक्षम करायचं आहे.

शेवटी हेच तर माझं आणि अग्निपंख च ध्येय आहे...........
©खुशी अशोक कांबळे
( संचालक)
अग्निपंख अकॅडमी