मी आत्मनिर्भर (भाग-५)

Importance of self sufficiency.

मी आत्मनिर्भर (भाग-५)

© प्रतिक्षा माजगावकर 

     यश चिनू च्या आवडीच्या पदार्थांचे व्हिडिओ बघत बघत तयारी करू लागतो..... आणि चिन्मय खोलीत पूर्ण पणे विचारात गढून बसलेला असतो! त्याच्या डोक्यातलं विचारचक्र सुरूच असतं; "खरंच फक्त मित्र काही बोलले म्हणून मी माझ्या चांगल्या सवयी सोडू का? आई - बाबांना माझ्यावर किती विश्वास आहे, दोघं माझ्यासाठी खूप करतात आणि मी हे असं वागणं कितपत योग्य आहे? सकाळी सुद्धा मी आईला नीट बाय बाय करायला हवा होता, तिचं आता कोणत्याच कामात लक्ष नसेल लागत! उगाचंच मी एवढ्याश्या गोष्टीचा बाऊ केला, आई घरी आली की तिला आधी सॉरी म्हणेन आणि आधी हि खोली आवरून लगेच बाबांना पण जाऊन सॉरी म्हणतो आणि त्यांची मदत करतो!" असा विचार करून तो लगेच त्याने जो काही पसारा घालून ठेवला होता तो आवरायला लागतो.....
******************************
         इथे योगिताच्या डोक्यातून आता घरचा विचार केव्हाच निघून गेलेला असतो! रेशन किट्स मिळाल्यावर वस्तीतल्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जात असतो! त्या लोकांकडे पाहून कळत असतं खरंच किती वाईट वेळ आली आहे या लोकांवर...... अगदी लहान लहान पोरांनी सुद्धा पाणी पिऊन पोट भरलेलं असतं! मोल मजुरी करणारी ती लोकं, हातावर पोट त्यामुळे सध्या हाताला काही काम नाही शिवाय गाठीशी पैसा पण नाही! सरकार आणि अश्या NGO मधून मिळणाऱ्या मदतीवर अवलंबून होती सगळी बिचारी! वस्तीतल्या लहान लहान मुलांना बघून तर योगिता आणि मयुरी दोघींना फार वाईट वाटत होतं! त्यांच्यासाठी हा पहिलाच अनुभव होता! इतके वर्ष गरिबी काय असते हे फक्त पुस्तकात वाचलं होतं आणि टीव्ही वर बघितलं होतं पण, आज ते प्रत्यक्ष पाहायला मिळत होतं! योगिताला चिन्मय जेव्हा त्या लहान मुलांच्या वयाचा होता तेव्हाचे दिवस आठवले, "किती काळजी घ्यायचो आम्ही चिनू ची! त्याला कसलीच कमी भासू नये म्हणून फक्त त्याच्यासाठी राबलो, तो जरा जरी आजारी पडला की लगेच आम्ही त्याला डॉक्टर कडे न्यायचो, आणि हि बिचारी एवढी लहान मुलं किती होरपळून निघतायत या सगळ्यात!" इतक्यात एक लहान मुलगी योगिता जवळ येते; "आंटी थँक्यू" असं म्हणते आणि पटकन पळून जाते..... योगिताच्या शेजारीच मयुरी पण उभी असते दोघींच्या डोळ्यात पाणी तरळत! 
          एव्हाना आता सगळे किट्स वाटून झालेले असतात...... 
निधी:- आजचं काम तरी झालंय! उद्या सुद्धा आपण आजच्या सारखंच आधी स्टेशन वर भेटणार आहोत, उद्या खरंच किती उशीर होईल माहित नाही त्यामुळे डबे घेऊन या घरून.... आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला येईलच सगळं पण तुम्हाला सांगून ठेवतेय..... आणि हो मयुरी मॅडम प्लिझ उद्या वेळेत या उद्या आपल्याला खूप काम आहे.... 
मयुरी फक्त हो म्हणून मान हलवते निधी NGO च्या ऑफिस ला जायला निघते आणि या दोघी घरी यायला निघतात..... 
***************************
          दुपारचा साधारण सव्वा वाजलेला असतो; चिन्मय चा मूड आता छान झालेला असतो! त्याची खोलीची सफाई पूर्ण होण्याआधीच यश चा स्वयंपाक तयार झालेला असतो! चिनू बाहेर येतो, यश ला सुद्धा समजतं याचा मूड आता व्यवस्थित झाला आहे..... 
यश:- जा चिनू हात पाय धुवून ये आपण जेवूया.... 
चिन्मय:- आई?
यश:- अरे ती सकाळीच सांगून गेलीये तुम्ही दोघं जेवून घ्या म्हणून! तिला किती वेळ लागेल माहित नाही..... सकाळी मी तिला भडंग बनवून दिली आहे आल्यावर जेवेल ती! तू ये पटकन तोवर मी पानं घेतो! 
चिन्मय येई पर्यंत यश पानं घेतो.... चिन्मय आल्यावर तो सुद्धा मदत करतो! दोघं जेवायला सुरुवात करतात, अगदी योगिताच्या हातची चव नसली तरी स्वयंपाक छान झालेला असतो! चिनू फक्त सगळं खूप छान झालंय एवढंच बोलतो...... थोडावेळ असाच शांततेत जातो..... यश ने ठरवलेलं असतं जो वर हा स्वतःहून काही बोलत नाही तोवर आपण विषय नाही काढायचा! जेवण होत आल्यावर चिन्मय स्वतःहून बोलू लागतो; "बाबा..... आय एम सॉरी! मी सकाळी असं वागायला नको होतं! उगाचच एवढ्याश्या गोष्टीचा मी बाऊ केला..."
यश:- इट्स ओके! 
चिन्मय:- तुम्ही रागावला आहात का माझ्यावर? विचारणार नाही का मला मी असं का केलं? 
यश:- अरे वेडा आहेस का? रागावलो असतो तर तुझ्या आवडीचा स्वयंपाक केला असता का? आणि हो! नाही विचारणार का असं वागलास म्हणून....... कारण मला खात्री आहे, तुला तुझी चूक समजली आहे आणि म्हणूनच तू सॉरी बोललास.....
****************************
            दुसरीकडे घरी येता येता योगिता आणि मयुरीच्या गप्पा सुरु असतात..... 
योगिता:- वहिनी, एक बोलू का? म्हणजे रागावणार नसाल तर..... 
मयुरी:- हो बोल ना.... आणि प्लिझ वहिनी वैगरे नको...... नावाने हाक मारलीस तरी चालेल!
योगिता:- बरं! मला म्हणायचं होतं की, सकाळी तुम्हाला... अरे सॉरी सॉरी, तुला उशीर झाला कारण घरातली कामं करायची होती मग तू यात सुरज आणि त्याच्या बाबांची मदत का घेत नाहीस? 
मयुरी:- खरं सांगू का, मी पण हाच विचार केला होता....... काल जेव्हा तू व्हाट्सअप स्टोरी ला टाकलं होतंस कि, तुला आज कामातून सुट्टी मिळाली, चिन्मय आणि त्याच्या बाबांनी सगळं काम केलं तेव्हा मला पण असंच वाटलं, सुरज आणि त्याच्या बाबांना पण सांगूया मदत करायला पण,....... मी त्या दोघांशी बोलायला येणार एवढ्यात सुरज ने त्याच्या बाबांना चिन्मय ने टाकलेले फोटो दाखवले यावर आमचे हे म्हणाले; "काय हे! पुरुषासारखे पुरुष हे आणि हि बायकांची कामं करतात!" आणि दोघं हसत होते म्हणून मग मी कोणताच विषय काढला नाही...... 
योगिता:- पण हे चुकीचं आहे ना! आज एक काम कर दोघांना समजावून बघ..... मी पण चिन्मय ला सांगते सुरज शी बोलायला! कदाचित मित्राचं पटकन ऐकेल.... 
मयुरी:- ठीक आहे! बघू आता काय होतंय.... 
एवढ्यात त्या दोघी घराजवळ पोहोचतात..... थोडावेळ गप्पा मारून त्या आपापल्या घरी जायला निघतात.... 
*******************************
       योगिता जेव्हा घरी येते तेव्हा यश आणि चिन्मय च जेवण झालेलं असतं! दोघं मिळून सगळी कामं आवरत असतात..... ते बघून योगिता ला फार बरं वाटतं! ती घरी पोहोचते तेव्हा साधारण २.१५ झालेले असतात..... 
चिन्मय:- आई! आलीस तू.... लवकर हात पाय धुवून ये.... आज बाबांनी खीर पुरी आणि मसाले भात केलाय.... मी आता तुझ्यासाठी गरम गरम पुरी तळतो.... तू पटकन आवर.... 
योगिता:- अरे वा! मूड चांगला दिसतोय वाटतं आत्ता.... 
चिन्मय:- नंतर बोलूया ना आई.... तू आवर आधी.... 
योगिता फ्रेश व्हायला जाते तोवर चिन्मय पुऱ्या करायला घेतो...... ती सगळं आवरून जेवायला येऊन बसते..... चिन्मय किचन मधून गरम गरम देत असतो आणि यश तिला गरम गरम वाढत असतो..... सगळं करून झाल्यावर चिन्मय तिच्या बाजूच्या खुर्चीत येऊन बसतो....
योगिता:- मस्त झालाय हा सगळा स्वयंपाक!
चिन्मय:- सॉरी आई! मी असं नाही वागायला पाहिजे होतं..... कालच्या सूरज च्या बोलण्यात आलो आणि.... 
योगिता:- एक एक मिनीट.... सुरज च्या बोलण्यात म्हणजे? 
चिन्मय:- काल जेव्हा मी व्हाट्सअप वर सगळे फोटो टाकले तेव्हा सुरज आणि बाकी काही मित्र मला खूप चिडवत होते म्हणून मी ठरवलं होतं काही काम नाही करणार.... पण, दुपारी बाबा म्हणाले; मला विश्वास आहे माझ्या मुलावर त्याला काय चांगलं आणि काय वाईट हे समजतं तेव्हा मला जाणवलं मी खूप चुकीचं वागतोय.... सॉरी आई.... पुन्हा असं नाही करणार..... तू जे सांगशील ते करीन मी.... 
योगिता:- इट्स ओके रे बाळा! तुला तुझी चूक समजली हेच खूप आहे.... आणि एक कायम लक्षात ठेव घर सगळ्यांचं आहे ना? मग कामं पण सगळ्यांनी मिळून करायची! तू सुरज ला सुद्धा समजावून बघ एकदा.... 
चिन्मय:- हो चालेल! थोड्यावेळाने बोलतो त्याच्याशी..... 
          योगिताला काहीतरी बोलायचं आहे हे यश च्या लक्षात येतं आणि म्हणून तो चिन्मय ला म्हणतो; "चिनू, तू राहूदे आत्ता! एकदा सुरज शी बोलून घे आधी रात्री सगळं तू कर!" असं म्हणून तो त्याला खोलीत पाठवतो..... 
योगिता:- यश अरे आज सुरज ची आई पण तिथे आली होती.... सुरज आणि त्याचे बाबा घरकामात तिला काहीच मदत करत नाहीयेत..... 
यश:- म्हणजे? 
योगिता सकाळचा सगळा प्रकार यश ला सांगते.... 
यश:- ओके! म्हणून तू चिनू ला सुरज शी बोलायला सांगितलंस का? 
योगिता:- हो! बघू आता काही फरक पडतो का..... नाहीतर कसही करून त्या दोघांना आत्मनिर्भरतेचं महत्व पटवून द्यायला लागेल.. 
यश:- हम्म... 
योगिता:- उद्या पण आम्हाला जायचं आहे तेव्हा मयुरी ला विचारेन ऐकलं का दोघं बाप - लेखाने ते.... 
********************************

सुरज आणि त्याचे बाबा मयुरीचं ऐकतील? कि त्या दोघांना समजवायला वेगळा मार्ग शोधावा लागेल पाहूया पुढच्या भागात.... 
तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा...... 

🎭 Series Post

View all