Sep 22, 2020
कथामालिका

मी आत्मनिर्भर (भाग-२)

Read Later
मी आत्मनिर्भर (भाग-२)

मी आत्मनिर्भर (भाग-२)

© प्रतिक्षा माजगावकर

       दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता झाल्यावर योगिता म्हणते; "चिनू सुरुवात तुझ्यापासून! आता तू सगळी भांडी घासून आणि व्यवस्थित पुसून परत जागेवर ठेवायची!... दुपारी मी करेन आणि रात्री तुझे बाबा! आणि जर करायचं नसेल तर पेनल्टी म्हणून सगळ्या घराची साफ सफाई रोज तुला एकट्याला करावी लागेल.... यश तुला हि हा नियम लागू आहे बरं का!"
आधीच आता चॅलेंज स्वीकारल्यामुळे दोघांना हि योगिता जे सांगेल ते करणं भागच होतं! रोज सगळ्या घराची साफसफाई करण्यापेक्षा आत्ता भांडी घासलेली बरी म्हणून चिनू भांडी घासायला जातो..... यश त्याच्या खोलीत जाऊन दुपारची ऑफिस ची कामं सुरु व्हायच्या आत खोलीची झाडलोट करून ठेवतो! इथे योगिता चिन्मयला नीट जमतंय का बघायला त्याच्या सोबत जाते....
योगिता:- चिनू तू रोज तो ट्रेजर हंटिंग चा गेम खेळतोस तेव्हा आजूबाजूची जागा स्कॅन करतोस मग तुझ्या स्क्रीन वर जी जागा स्कॅन केली आहे ती ग्रीन होते अगदी तसंच यात कर! म्हणजे.... व्यवस्थित भांड्याला तू साबण लावलास कि सगळा फेस होईल मग समजायचं आपलं स्कॅनिंग झालं! मग ते भांडं धुवायचं..... तुझं तुलाच हाताला कळेल ते स्वच्छ निघालं कि नाही.... आणि जेव्हा आरश्यासारखं लख्ख दिसेल तेव्हा कट्टयावर उपडं ठेवायचं.... सगळी भांडी घासून होई पर्यंत त्यातून पाणी निथळेल मग व्यवस्थित पुसून शेल्फ मध्ये लाव!
          योगिताने सांगितल्या प्रमाणे चिन्मय सगळं करतो.... आता दुपारची जेवणं होतात... आत्ता योगिता स्वतःच सगळं करणार असते.... यश आणि चिन्मय त्यांच्या खोलीत जातात.... यश त्याच्या ऑफिस च्या कामाची तयारी करत असतो आणि चिन्मय त्याच्या खोलीची आवरा आवरी करतो.... या दोन दिवसात त्याला चांगलंच समजलेलं असतं आपल्यामुळे आई ला किती त्रास होतो..... असाच दिवस संपतो! रात्री आता यश ची टर्न असते सगळं काम करायची! आधी तो जरा कुरकुर करतो..... पण, योगिताने ठाम पणे "तुला हे करावंच लागणार आहे, मी सुद्धा इतकी वर्ष काम सांभाळून घरची सगळी जबाबदारी पार पाडली आहे! तू तर सध्या ऑफिस च काम सुद्धा घरातूनच करतोयस ना! मग जरा चार कामं शिकून घेतलीस, तुम्ही दोघं स्वावलंबी झालात तर काही नुकसान होणार नाहीये त्यामुळे मला काहीही कारणं ऐकायची नाहीयेत! आजच नाही तर सगळी कामं जोवर तुम्हा दोघांना येत नाहीत तो वर हे धडे सुरूच राहणार आहेत!" असं सांगितल्यामुळे त्याचं सुद्धा काही चालत नाही! मग निमूटपणे तो बरं बाबा आता काय होमेमिनिष्टरच ऐकावंच लागेल! असं म्हणून सगळं करतो!
          तिसऱ्या दिवशी सकाळी लवकरच यश ला ऑफिस मधून फोन येतो.... त्याला आज काही कामानिमित्त थोडावेळ ऑफिस ला जावं लागणार होतं!
यश:- योगिता! मला जरा अर्जंट काम आहे, म्हणून मग ऑफिसला जाऊन येतो! हवंतर आल्यावर खोलीची स्वछता करतो! काही आणायचं आहे का मी चाललो आहेच तर घेऊन येतो...."
योगिता:- हो! गिरणीत दळण टाकलं होतं काल तेवढं फक्त घेऊन ये.... आणि घरातली लिंबं संपत आली आहेत ती पण आण!
यश:- ओके बॉस! अजून काही ऑर्डर्स?
योगिता:- गप रे! मी काय तुझ्या बॉस सारखी वागते का?
यश:- मग काय! आता दोन दिवस मला आणि चिनू ला तर तू कामाला च लावलं आहेस ना!
योगिता:- अच्छा म्हणून होय! मग तर मी खडूस बॉस आहे समज! विचार केला होता छान गेम्स गेम्स मध्ये तुम्हाला दोघांना आत्मनिर्भर करेन! पण, काय आता कोणालातरी बॉस - एम्प्लॉयी सारखं रिलेशन पाहिजे तर आता मी तरी काय करणार? आता तर बुवा मी काही न शिकवताच टार्गेट दिल्यासारखं काम सांगणार ते करा मग! मग नाही यायचं मदत मागायला!
यश:- सॉरी बाबा चुकलो! बाय द वे तू रागावलीस कि क्युट दिसतेस!
असं म्हणून तो हळूच योगिताला डोळा मारतो!
योगिता:- जा आता ऑफिस ला! आपल्याला एवढा मोठा एक मुलगा आहे आणि तुला काय सुचतंय! 
यश:- असुदे कि मग! त्याला काय होतंय? माझ्याच बायकोला डोळा मारलाय मग काय झालं? आणि राहिला प्रश्न कामाचा तर आम्ही दोघं आनंदाने शिकून घेऊ सगळी कामं! पहिल्याच दिवशी आम्हाला अंदाज आला तुला किती त्रास होतो ते.... बनू आम्ही दोघं सुद्धा आत्मनिर्भर! चल आता येतो मी..... दुपारी जेवायला घरीच येतो... तोवर होईल काम....
योगिता:- बरं! सावकाश जा.... मास्क आणि सॅनिटायझर घेतलास ना?
यश:- हो घेतला... चिनू बहुतेक अजून झोपला आहे म्हणून मग त्याला उठवलं नाही मी... सांग त्याला पण, चल येतो....
असं म्हणून यश कामाला जातो.....
       योगिता चिनू ला उठवायला जाते तर तो नुकताच उठलेला असतो.....
योगिता:- गुड मॉर्निंग चिनू!
चिन्मय:- गुड मॉर्निंग.... आई मी पटकन फ्रेश होऊन येतो तोवर बाबांना पण बोलाव आपण एकत्र चहा घेऊ.... मी अलार्म लावला होता पण जागचं नाही आली...
योगिता:- अरे! बाबा आत्ताच गेले कामाला... त्यांना ऑफिस मधून कॉल आला होता... तू घे आवरून तोवर मी चहा टाकते आपल्याला....
थोड्यावेळात चिन्मय आवरून बाहेर येतो... चहा नास्ता झाल्यावर चिन्मय म्हणाला; "आई... बाबांनी डबा नेला ना? कि नेऊन देऊ?"
योगिता:- नाही रे! ते येणार आहेत दुपारी... दुपार पर्यंत होईल काम तुझ्या लाडक्या बाबांचं!
चल आता मी दुपारच्या स्वयंपाकाला लागते... तू तुझे कपडे धू जाऊन....
चिन्मय:- काय? अरे यार आई.... मशीन मध्ये धू ना गं.... तुला पण त्रास नाही....
योगिता:- पहिली गोष्ट मी हे माझ्या भल्यासाठी नाही तर तुमच्या दोघांच्या भल्यासाठी करतेय... किती दिवस असे माझ्यावर अवलंबून राहाल... निदान स्वतःची तरी बेसिक कामं माणसाला यायला हवीत ना! आणि दुसरी गोष्ट, सध्या मला काम नाहीये.... आपण तुझ्या बाबांच्या पगारात सगळं भागवतोय.... त्यातून आपण गरजू लोकांना सुद्धा मदत करणार आहोत... परत तुझ्या ऍडमिशन साठी सुद्धा पैसे लागणार आहेत! त्यामुळे आपल्याला होईल तितकी बचत करत जगायचं आहे.... असं फक्त रोजच्या कपड्यांसाठी मशीन लावलं तर लाईट बिल किती खंडीभर येईल..... म्हणून सध्या मशीन मध्ये कपडे धुणं बंद!
चिन्मय:- हम्म... पटतंय मला.... तू सांग काय करू? तू म्हणशील तसं करेन मी... नाही सारखी भुणभुण करणार....
योगिता:- गुड! बघ आता थोडावेळ कपडे भिजवून ठेव आणि खोलीतला कचरा काढून घे... तोवर कपडे भिजतील... मग ते ब्रश ने घासून धू... टी-शर्ट उलटा करून धू.... नाहीतर त्याच्यावरची प्रिंट खराब होईल.....
            अश्या सगळ्या टिप्स देऊन योगिता तिच्या कामाला लागते आणि चिन्मय तिने सांगितल्या प्रमाणे सगळं करतो.... एव्हाना दुपार होत आलेली असते, साधारण १२.१५ झालेले असतात... यश सुद्धा घरी येतो....
योगिता:- बरं झालं लवकर आलास! जा पटकन अंघोळ करून ये... मी पोळ्याच करायला घेतेय... मस्त गरम गरम जेवून घेऊया....
यश सुद्धा पटकन आवरून येतो... तिघं जेवून घेतात... पोळी, भाजी, भात, आमटी असा साधाच बेत असतो पण सगळं चविष्ट झालेलं असतं! यश आणि चिन्मय तिचं तोंडभरून कौतुक करतात....
यश ऑफिस मधून आलेला असतो तरी तो थोडावेळ आराम करून सकाळी त्याने सांगितल्या प्रमाणे त्याचा खोलीतला सगळा पसारा आवरतो... चिन्मय ने त्याला कापड्यांबद्दल सुद्धा सांगितलेलं असतं! म्हणून तो त्याचे कपडे पण धुवून टाकतो.... इतक्यात योगिता किचन मधून रूम मध्ये येते...
योगिता:- अरे हे काय? आज मी धुतले असते तुझे कपडे.... तू ऑफिस मधून आला होतास ना... आणि चिनू ने पण तुला हे लगेच सांगितलं वाटतं!
यश:- अगं असुदे! तू पण तर कामावरून दमून येऊन सगळं करत होतीस कि इतके दिवस! मी तर फक्त हाफ डे काम करून आलोय आणि तेही बसून.... तूझं काम तर एवढं धावपळीचं असून तू कधी तक्रार केली नाहीस.... आता तू थोडा आराम कर.... आणि हो उद्या तुला आमच्याकडून एक सरप्राईज आहे....
योगिताला आता फार बरं वाटत असतं! तिच्या अपेक्षे पेक्षा जास्त सपोर्ट तिला मिळत असतो.... चिनू आणि यश ला आत्मनिर्भर बनवण्याचा तिचा निर्णय दोघं एवढा सिरिअसली घेतील हे तिला वाटलं नव्हतं!

आता पुढच्या भागात पाहूया यश आणि चिन्मय तिला काय सरप्राईज देणार आहेत! आत्ता पर्यंत चा हा आत्मनिर्भयतेचा प्रवास कसा वाटला हे नक्की कमेंट मधून सांगा......

Circle Image

Pratiksha Majgaonkar

Student

I like reading stories and poems... Also like to writting ... I have my small side business of handcraft. I make moti (pearl) toran, rangoli, paper earrings, cotton bags, artificial jewellery etc.