मी आत्मनिर्भर (भाग-१)

Story is about importance of self sufficiency.

मी आत्मनिर्भर (भाग-१)

© प्रतिक्षा माजगावकर

         दिवसेंदिवस चीन आणि भारत सीमावाद जसा वाढू लागला तशी प्रत्येक भारतीयाला जाणीव होऊ लागली; हीच ती खरी वेळ काहीतरी करून दाखवण्याची! दरवेळी चीनच्या मुखपत्रातून भारतीयांची खिल्ली उडवली जाते; "भारतीय जनता चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकू शकत नाहीत! या आधीही अशी आंदोलने झाली पण, ती सुद्धा फोल ठरली. चिनी वस्तू तर भारतीयांच्या जीवनशैलीतील अविभाज्य भाग आहेत वैगरे वैगरे....." या बातमीने आणि गलवान खोऱ्यात होणाऱ्या चकमकींमुळे प्रत्येक भारतीयाचे मन दुखावले गेले आहे. या घटनेनंतर चिनी वस्तूंवर बहिष्कार आणि आत्मनिर्भर भारत या बातम्यांनी जोर धरला!
योगिता सुद्धा दुपारी बातम्या पाहत होती तेव्हा तिच्याही लक्षात आले खरंच आत्मनिर्भरता आता काळाची गरज बनली आहे! स्वतःच्या मनाशी पक्के करून तिने सुरुवात आता आपल्याच घरापासून करायची असं ठरवलं!
          योगिता चं त्रिकोणी कुटुंबं! ती, मुलगा चिन्मय आणि चिन्मयचे बाबा (यश)! योगिता एक इव्हेंट मॅनेजर होती, यश आय.टी. कंपनीत कामाला आणि चिन्मय १२ वी मध्ये शिकत होता... काम सांभाळून योगिता सगळं घरचं सुद्धा सांभाळत होती! काहीवेळा कामासाठी तिला निदान दोन एक दिवस तरी बाहेर जावं लागायचं! पण, सध्या लॉकडाऊन मुळे सगळे घरातच होते! काही समारंभ नसल्यामुळे योगिताला बाहेरच्या कामांपासून तरी आराम होता.... मात्र घरात ती सतत कामातच अडकलेली असायची! दोघं बाप - लेकाच्या रोजच्या नवीन फार्माइशी असायच्या! आज काय बटाटे वडे, उद्या काय भजी तर परवा काय इडली, मेदूवडा असं सुरूच होतं! हे झालं खायचं पण, त्याबरोबर पडणाऱ्या भांड्यांचा ढीग, सामान घेऊन घरी आल्यावर लगेचच धुवायला पडणारे कपडे, सारखा केर काढणे, लादी पुसणे हे वेगळंच! या सगळ्या कामात पार दमून जायची ती बिचारी! यश च वर्क फ्रॉम होम सुरु होतं! तो बसायचा दोन दोन तास लॅपटॉप घेऊन आणि चिन्मय च काय नुकतीच परीक्षा झाली होती राहिलेले पेपर होणार की नाही याची शाश्वती नाही! तो बसायचा गेम खेळत किंवा टीव्ही बघत! म्हणूनच योगिताने ठरवलं आपण आता यांना आत्मनिर्भर करायचंच! जेव्हा पण मला कामासाठी बाहेर जावं लागतं तेव्हा दोघं बापलेक बाहेरच खातात आणि घराचा तर पार उकिरडा करून ठेवलेला असतो! त्यानिमित्ताने जरा काम पण शिकतील आणि मला पण जास्त काळजी राहणार नाही.
           झालं! ठरल्याप्रमाणे दुसऱ्यादिवशी योगिताने एक आयडिया काढली....
योगिता:- चिनू, यश जरा ऐकता का? माझ्याकडे एक मस्त गेम आहे आपण सगळे मिळून खेळूया.... तुम्हाला दोघांना सुद्धा खूप मजा येईल! जो या गेम मध्ये जिंकेल आज सगळे त्याच्या आवडीचे पदार्थ बनतील त्याचं गिफ्ट म्हणून....
चिन्मय:- ओके! डन... सांग काय आहे गेम?
यश:- येस! मी पण रेडी आहे!
योगिता:- हम्म्म! पण, आता तुम्ही तयार झालात.... जर माघार घेतली तर मी जी पेनल्टी देईन ती करावीच लागेल हा!
चिन्मय आणि यश (एकत्र):- मान्य!
योगिता:- बरं ठीक आहे! म्हणजे तुम्ही चॅलेंज accept केलं तर! चला मग आता आजचा पहिला टास्क चिनू तू तुझ्या खोलीत जायचं आणि सगळ्या जर्म्स चा खात्मा करायचा, यश तू आपल्या खोलीत आणि मी किचन मध्ये! बघूया कोणती रूम चमकते..... जिथे जास्तीत जास्त जर्म्स चा खात्मा झाला असेल तो विनर!
यश आणि चिन्मयच्या हे लक्षात येतं की, हि आपल्याकडून साफसफाई करून घेते आहे पण, गेम मध्ये पटकन होईल आणि काहीतरी नवीन मजा करायला मिळेल म्हणून दोघं तयार होतात. शेवटी चमचमीत पदार्थ गिफ्ट म्हणून मिळणार आहेत ना!
तासाभराचा वेळ सुरु झाला! मस्त म्युसिक च्या तालावर तिघांनी काम सुरु केलं! योगिता किचन मध्ये ओटा, गॅस, किचनच्या खिडक्या, शेल्फ, लादी सगळं करत होती.... रोज किचन व्यवस्थित मेंटेन ठेवलं असल्यामुळे जास्त त्रास होत नव्हता! पण, यश आणि चिन्मय ला खोली आवरताना जाणवत होतं आपण किती पसारा करून ठेवतो आणि योगिताला याचा किती त्रास होतो कारण त्यांना कधी आवरण्याची सवयच नव्हती! योगिताचं पाऊण तासात सगळं करून झालं.... तिने हळूच चिन्मय आणि यश च काय सुरु आहे म्हणून खोल्यांमध्ये डोकावून पाहिलं! तर अजून काही त्यांचं काम झालं नव्हतं! पण, दोघं सुद्धा अगदी मन लावून सगळं करत होते.... म्हणून मग योगिताने ठरवलं आज सगळ्यांची ऑल टाइम फेव्हरेट कुर्मा पुरी बनवूया..... घरात भाज्या होत्याच! मग काय लागली ती कामाला...
           योगिताचा स्वयंपाक झाला तोवर या दोघांची साफसफाई सुद्धा झाली.... योगिताने दोन्ही रूम मध्ये जाऊन पाहिलं...... खरंच खूप मनापासून केलं होतं दोघांनी काम! खोल्या मस्त आरश्यासारख्या चमकत होत्या... कुठेही जराही धुळीचा कण सुद्धा नव्हता! अगदी कपाटातले कपडे सुद्धा नीट घडी करून ठेवले होते; चिन्मय ने त्याला आता जे कपडे होत नाहीत ते वेगळे बाजूला काढून ठेवले होते आणि ते सुद्धा व्यवस्थित घडी करून!
चिन्मय:- आई! सांग आता कोणी जर्म्स चा पूर्ण खात्मा केला?
योगिता:- माझ्या दोन्हीही योध्यांनी! चला आता दुपार झालीच आहे आपण जेवून घेऊया! स्वयंपाक तयार आहे....
यश:- अगं पण जे जिंकेल त्याच्या आवडीचा बेत करणार होतीस ना?
योगिता:- मग नाही कुठं म्हणलं! सरप्राईज आहे! आधी डायनिंग टेबल वर जाऊन तर बघ.....
चिन्मय आणि यश डायनिंग टेबल वर जातात तर कुर्मा पुरीच्या सुगंधाने दोघांना भूक अनावर होते.... त्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली असते! यश भांडी उघडून बघतो आणि कुर्मा पुरी पाहून दोघांना ही आनंद होतो! तिघं मस्त गप्पा मारत मारत पोट भर जेवतात...
योगिता:- उद्या आपण नवीन टास्क ने दुसरा गेम खेळायचा!
असं म्हणून बाकीची कामं आवरायला जाते..... तासाभरात यश ची मीटिंग असते म्हणून तो त्याची तयारी करत असतो.... आणि चिन्मय चक्क कधी नव्हे ते आई ला थोडीफार मदत करतो....  योगिता मानातल्या मनात विचार करते; "चला, प्लॅन कामी येतोय तर!" पण, चिन्मय खूप दमलेला असल्यामुळे तीच त्याला म्हणते; आत्ता जा तू! मी आवरते.... उद्या नवीन टास्क वाट बघतोय त्यासाठी एनर्जी असुदे....
       चिन्मय त्याच्या खोलीत जातो.... स्वच्छ आणि ते ही स्वतः खोली आवरली होती म्हणून त्याला खूप प्रसन्न वाटत असतं! अशीच काही अवस्था यश ची सुद्धा असते.... त्याने स्वतः सगळं अरेंज करून ठेवलं असल्यामुळे आज त्याला त्याच्या सगळ्या फाईल्स नीट मिळतात... एरवी सारखं योगिता माझी ही फाईल दे ती फाईल दे म्हणून त्याला तिला बोलवावं लागायचं पण आज तो स्वतः सगळी तयारी करून मीटिंग साठी तयार झाला होता... यश ची मीटिंग आता तासभर तरी संपत नाही म्हणून योगिता बाहेरच टीव्ही लावून बसते..... आज कितीतरी दिवसांनी ती एवढ्या लवकर कामातुन मुक्त झालेली असते..... त्यामुळे तिलाही जरा आराम मिळतो.... असाच दिवस संपतो... रात्री दोघं बापलेक योगिताचं तोंडभरून कौतुक करतात.... आणि नेहमी स्वतःच स्वतः रूम साफ करण्याचं प्रॉमिस पण देतात....

योगिताचा हा प्लॅन तर काम करतो! पण, आता घरातली अशी बरीच कामं आहेत जी तिला दोघांना शिकवायची आहेत अश्याच गेम्स मधून! जेणेकरून ती जेव्हा कामानिमित्त बाहेर असेल तेव्हा दोघांची अबाळ नको! ती आता हे सगळं कसं करेल पाहूया पुढच्या भागात....
शेवटी आत्मनिर्भर म्हणलं तर सुरुवात आधी या बेसिक गोष्टींपासून केली पाहिजेच ना....
हा भाग कसा वाटला हे सांगायला विसरू नका!

🎭 Series Post

View all