मी आणि माझा मार्ग..

My way.. no regrets..

मी आणि माझा मार्ग.. 

असं म्हणतात की, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने कधी धावू नये. आपलीच दमछाक होते. खरंही असेल कदाचित. पण मग मला एक प्रश्न पडतो, मेंढरांच्या झुंडी मागे जायला आपण काय मेंढरं आहोत? स्वतः च्या विचारांची पायमल्ली करून एखाद्याच्या मागे धावत राहायचं. सगळे तेच करतात म्हणून आपणही करत राहायचं. का तर प्रवाह त्यादिशेने वाहतोय म्हणून. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेलो तर आपण एकटे पडू या भीतीने.! प्रवाह आपल्याला वाळीत टाकेल या काळजीने.! 


 

कधी कधी ना, आपण एखाद्याच्या मैत्रीपोटी, प्रेमापोटी त्याला समजवायला जातो. त्यांची चूक समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण आपल्याला वाटत असतं की निदान इतका तरी आपला त्यांच्यावर मैत्रीचा, प्रेमाचा अधिकार आहे. आणि आपणच आपल्या माणसांना चूक दाखवून देऊ शकतो. फक्त गोड गोड बोलून बघ्याची भूमिका  पाहणाऱ्यांपैकी आपण नाही. आपण तर जिवाभावाचे. पण खरंतर फार मोठ्या गैरसमजात आपण वावरत असतो. आपण जिवाभावाचे आहोत या भ्रमात जगत असतो.  आपण तिथेच चुकत असतो. आणि मग एक गोष्ट पटू लागते कोण्या महान विचारवंताने म्हटलेली, ‘विचारल्याशिवाय कोणाला सल्ला देऊ नये, कोणाला शहाणपणाच्या गोष्टी सांगायला जाऊ नये’ इतकंही प्रेमाने वागू नये की लोकं आपल्याला गृहीत धरतील. त्या प्रेमाला लोचटपणा म्हणून संबोधतील. कुठे जाणार ही? आपल्याच कडे परत येणार!  हा त्यांचा आत्मविश्वास दुणावेल.. 

परवा मला आलेला असाच एक अनुभव.. माझ्या ऑफिसमधली एक मैत्रीण मला म्हणाली,

“तुझे विचार योग्य आहेत. आम्हाला पटतं तू बोलतेस ते.. पण समोरची व्यक्ती इतकी धूर्त आहे की तिच्या विरोधात जायचं धाडस होत नाही. कारण प्रवाह त्या व्यक्तीच्या बाजूने आहे. मग त्या व्यक्तीशी वैर कोण घेईल?  त्यामुळे तुझे विचार पटत असूनही सहमती दर्शवायलाही मन धजत नाही. इतकंच काय तर तुझ्या वॉलवर लिहलेल्या पोस्टना लाईक, कॉमेंट्स करताना, तुझी बाजू घेतानाही त्या पोकळ झंझावाताची भीती वाटते.” 

मी हसून इतकंच म्हटलं,

“प्रवाहाच्या भीतीने जर कोणी माझ्या विचारांना, मतांना डावलत असेल तर मलाच नकोय अशी ही गर्दी.! मी आहे अशी आहे ज्यांना पटते त्यांनी सोबत राहावं नाहीतर त्यांची मर्जी.. जे सोबत आहेत त्यांचा हात मी कधीच सोडणार नाही पण त्यांना माझा हात सोडण्याची पूर्ण मुभा आहे. माझी काहीही हरकत नाही.” 

पुन्हा एकदा शेवटचं सांगावसं वाटतं. कदाचित प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने धावताना आपली दमछाक होईलही.. पण आपला मार्ग सत्याचा, न्यायाचा असेल आणि आपल्या मनाला पटत असेल तर नक्कीच त्याचा स्वीकार करावा. निदान तो मार्ग आपणच निवडला होता हे समाधान तरी राहील आणि त्याचे परिणाम भोगताना मनात कोणतीही खंत नसेल.  एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते तेंव्हा समजावं त्याचा आणि आपला प्रवास तिथपर्यंतच होता. कदाचित तो त्याचा अंतिम टप्पा असावा. कदाचित त्याला पुन्हा त्या प्रवासाची ओढ वाटली तर नक्कीच आपल्याशी पुन्हा जोडला जाईल. नाहीतर आपण 'हा माझा मार्ग एकला' म्हणत चालत राहायचं. अगदी एकटं चालावं लागलं तरी.. इतकंच आपल्या हाती..

© ® निशा थोरे

२२.०१.२०२१

फोटो : गुगल सौजन्याने..