म्हणून जग फसतं - 9

एखाद्या व्यक्ती विषयी वरकरणी बघून आपण लगेच एक मत बनवून मोकळे होतो पण दिसते तसे नसते म्हणून जग फसते हाच संदेश देणारी हलकी फुलकी मनोरंजक कथा.. म्हणून जग फसतं!
म्हणून जग फसतं! -9
©®राधिका कुलकर्णी.

“ शऱ्याऽऽ अरे अजून किती पायऱ्या आहेत रे. मला दमायला होतेय. काही नाष्टा चहापाणी मिळणार आहे की नाही ह्या जीवाला!! ”

मालाने जरा वैतागूनच शरदला प्रश्न केला. तिची रोजची नाष्ट्याची वेळ झाली तशी भुकेने पोटात कावळे कोकलायला सुरुवात झाली होती तिच्या.

“ अगं हे काय वरती तो टेण्ट दिसतोय नाऽऽ, तिथेच अल्पोपहाराची सोय केलीय. सोबत चहा कॉफी जे हवे ते मिळणार आहे. तसे आपल्या ट्रेकचे इनक्लुझीव्ह पॅकेजच आहे. आता तिथे थोडी विश्रांती खाणंपिणं करून पुन्हा पुढे सुरू ट्रेक. ट्रेक नुसतं म्हणायचं गं, बाकी सगळे खूप एन्जॉय करतात. ”

“ हम्म.. खरंय! ”

हळूहळू सगळे एकदाचे टेण्टमध्ये पोहोचले. बूफेसाठी टेबल लावून उपमा चटणी असा हलका आहार आणि चहा दूध कॉफी ज्याला जे हवे ते ठेवले होते. सगळे आपापल्या डिश घेऊन रांगेत बसून नाष्टा करू लागले तेवढ्यात शरद मालाकडे आला आणि म्हणाला,

“ अगं मालेऽऽ चल ना जरा तुला एक जणांना भेटवायचे आहे. ”

माला आपल्या प्लेटमधला उपमा संपवतच होती की शरदच्या बोलण्याने ती थोडी चक्रावली.

“ आता इथे मला भेटायला कोण इतकं उत्सूक आहे की त्यांच्याशी शऱ्या मला भेटवू इच्छित आहे! त्याची बायको तर नसेल?
पण ती तर ट्रेकला आलेलीच नाही मग आता अशी कोण व्यक्ती आहे! ”
मनातल्या मनात स्वगत करत माला नाष्टा संपवत होती.

“ अगं आवर ना लवकर, काय चेंगटासारखी खात बसलीएस, पटापट खा ना.”

“ अरे होऽऽ, किती घाई करतोस. जरा थांब. मला असं भराभर गिळायला नाही जमत, आणि एवढं कोण मला भेटायला उत्सुक आहे ? तुझं आपलं काहीतरीच चालत बाबा. ”
“ अगं तू चल तर.. तुला एक सरप्राईज आहे. चल लवकर आता, जास्त प्रश्न विचारत नको बसूस. ”

“ आले रेऽऽ. तू हो पुढे.मी जरा हात धुवून येते.”

माला विचार करता करता हात धुवून शरदपर्यंत पोहोचली. तो कुण्यातरी एका काळ्या, जाडेल्या तुंदीलतनू व्यक्तीशी संवाद साधत होता.

“ हा मला ह्या जाडगेल्या माणसाशी ओळख करून देऊ इच्छित आहे! बापरेऽऽ शऱ्या बराय ना. ”

माला हळूहळू चालत त्यांच्याजवळ पोहोचली. तिला पाहून चेहऱ्यावर प्रसन्न हसू फुलवत मालाला उद्देशून शरद म्हणाला,

“ अगं ये ये. तुझीच वाट पाहतोय. ह्याला ओळखलस का! ”

मालाने खूप बारकाईने चेहरा निरखून पाहीला पण कुठल्याच खाणाखूणा जुळत नव्हत्या. कोण असेल ही व्यक्ती. त्याला आपादमस्तक न्याहाळूनही कुठलेच धागे दोरे जुळेनासे झाले तेव्हा ती सरेंडर होत म्हणाली,

“ सॉरी हं, मी ओळखले नाही कोण हे? ”

*कोण हे* असा आदरार्थी उल्लेख ऐकून दोघेही गडगडाटी हसायला लागले. तिला काहीच कळेना की ती असे काय बोलली की हे इतकं हसताएत?
तिच्या चेहऱ्यावर उमटलेली प्रश्नांकीत वलयं पाहून जास्त न ताणता शऱ्या हसू दाबत म्हणाला,

“ अगं मालेऽऽ जर तुला ह्याचा परीचय दिला नाऽ, तर तू त्याला हा आदर का दिला ह्याचा पश्चात्ताप करशील.. आता एवढी मोठ्ठी हिंट दिली, आता तरी ओळख बघू हा कोण? ”

“ अरे आता नमनाला घडाभर तेल नको ना. मला खरंच ओळखू येत नाहीये. तुच सांग ना. ”

मनातली चीडचीड लपवतच माला बोलली.

“ बरं जास्त ताणत नाही आता. सांगतो. तर हा आपला रंग्या उर्फ रंगराव हर्षे पाटील. आठवलं का काहीऽ!”

“ OMG! हा रं….ग्या! तोच ज्याला मी.. भर कॉलेज.. सॉरी ”

“ अगं तू कशाला सॉरी म्हणतेस. मीच सॉरी. मला त्यावेळी कसला माज होता माहीत नाही पण कॉलेजमधली हर मुलगी आपली प्रॉपर्टी समजून मी वागायचो. त्याचप्रमाणे तुझ्यावरही मर्दुमकी गाजवायला गेलो आणि मग मला माझ्या कर्माची योग्य शिक्षा दिलीस तू. हा तेव्हा मात्र मी ह्या अपमानाने प्रचंड पेटलो होतो. तुला असा सोडायचा नाही असेही मनात ठरवलेले पण नंतर तुझी करारी मुद्रा बघून कधी समोर यायची हिंमतच झाली नाही म्हणून मग एकतर्फी प्रेमाचे गोडवे गात मी पोरांना घाबरवायचो त्याचाच शिकार झाला हा शऱ्या. आठवतेय ना ते सगळे. ”

“ अगं माले रंग्या आता बघ किती साळसूद झालाय. किती मृदू बोलतोय. तुझा तरी विश्वास बसतोय का? ”

शरदने डोळे मिचकावत रंग्याला कोपर ढोसत चिमटा काढत मिश्कीलपणे मालाला बोलला.
मालाला तर काय बोलावे तेच समजेना. हाच तो रंग्या ह्यावर तर तिचा विश्वासच बसत नव्हता. कुठे तो कॉलेजचा गुंडगिरी करणारा,सतत मुलींची छेड काढत त्यांना रस्त्यात अडवून चिडवणारा , राकट, वाया गेलेला रोड रोमिओ रंग्या आणि कुठे आत्ताचा संयमीत भाषेत आपली चूक कबूल करणारा जंटलमन रंग्या.. हा आत्ताचा रंग्या खरा की कॉलेजचा गूंड मवाली रंग्या खरा.. कान्ट बिलीव्ह !!!

“ काय मॅडम एवढ्या कसल्या गहन विचारात अडकल्यात? धक्का सहन न झाल्याने बोलती बंद झाली की काय !! ”

शऱ्याने पुन्हा एकदा मस्करीत मालाला शाब्दिक चिमटा काढला.
“ न… नाही. असे काही नाही.. मला खरं तर विश्वासच बसत नाहीये. माझ्या डोक्यातली रंग्याची कॉलेजमधली प्रतिमा जातच नाहीये डोळ्यांपुढून. अरे कसा होता हा तेव्हा आणि आता किती बदललाय…खरंच तोच हा आहे ना की तुझा काही गैरसमज झालाय.चेक केलेस ना.. काही लोक आयुष्यभर बदलत नाहीत. त्यामुळेच विश्वास ठेवणं जड जातंय मला. आणि बाय द वे हा तुला कधी आणि कुठे भेटला? आणि हा आत्ता इकडे काय करतोय? का हा पण माझ्यासारखाच ह्याच अपार्टमेंटमध्ये रहायला आलाय?”

मालाने शऱ्याला जरा एका बाजूला ओढून हळूहळूच हे सगळे विचारले. त्या आवाजात एक शंकीत कंप होता.
त्यांची खुसफूस दुरूनच बघणारा रंग्या त्यांच्या जवळ येत म्हणाला,

“ अग माला, तुझे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरे द्यायला मी आहे ना इकडे, बिचाऱ्या शरदला कशाला डाफरतेस? बिचाऱ्याची अवस्था बघ गं कशी झालीय ! अगदी त्या दिवशी तुला प्रपोज करताना जसा भेदरलेल्या सश्यासारखा झाला होता नाऽ अगदी तसा दिसतोय आत्ता. ”
रंग्याने शरदला मालाच्या तावडीतून सोडवण्याकरता कोपरखळी मारली आणि मालाचीही भीती ह्या चेष्टने थोडी कमी व्हावी हाच त्याचा ह्या मागचा हेतू होता. आणि त्याचा परिणाम अगदी अपेक्षित होता तसाच झाला. रंग्याच्या ह्या विनोदावर तिघेही खळखळून हसले. आता मालाची रंग्याविषयीची भीती थोडी कमी झाली तरीही हा आत्ता इकडे कसा? हा प्रश्न मनात खेळतच होता.

“ चला तिकडे त्या झाडाखाली बसून थोड्या गप्पा मारूया का? इकडे उभ्या उभ्या बोलून माझा हा नाजुक देह थकला बाबा! ”

रंग्याने स्वतःच्या अस्ताव्यस्त शरीराकडे बघून स्वतःवरच विनोद केला. तिघेही हसतहसत झाडाखाली असलेल्या दगडी चौथऱ्यावर बसले. शरद तिघांसाठी मस्त चहा घेऊन आला तोपर्यंत माला फक्त मान खाली घालून बसून राहिली. ह्याच्याशी काय बोलावे असा तिला प्रश्न पडला होता मनोमन. तिची ती अवस्था हेरून रंग्याही गप्प बसला. शरद आला आणि चहाचा घोट घेतच रंग्याला म्हणाला,
“ हिला बरेच प्रश्न पडलेत बाबा तुझ्याविषयी. एक तर तुझे हे सभ्य रूप बघून कोणीही फसेल की तू तो नाहीच. दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं ना पण. आणि रंग्या तुझ्याबाबतीत तर मीही असाच फसलो होतो हं काल.. आज जी अवस्था मालाची आहे तीच काल माझी झालेली. मग विचार केला हिला सरप्राईज देऊ. जो शॉक मला लागला तोच हिलाही द्यावा म्हणून तुलाच हे कॉन्ट्रॅक्ट दिले. ”

“ ए..एक मिनिट. कसले कॉन्ट्रॅक्ट? कोणती भेट.? मला काही समजेल असे बोला रे. डोक्याची मंडई झाली पुरती.”
“ अरे शऱ्या ही बघ आपली कॉलेजवाली टपोरी लॅंगवेज बोलतेय बे. डोक्याची मंडई वगैरे वगैरे. म्हणजे मी म्हतारवयात सुधारलो आणि ही भाईगिरी करायला लागली का कायऽऽ! ”

रंग्या मालाची खेचत शऱ्याला टाळी देत मिश्किल हसू लागला. मालालाही एव्हाना आपली चूक लक्षात आली आणि तिने आपला ओठ चावला. तिचा गोरामोरा चेहरा बघून रंग्या परत म्हणाला..

“ बर आता ना मागच्या गोष्टी विसरून अगोदर माझ्याशी मैत्री तर कर. तेव्हाच आपण सहज गप्पा मारू शकू. काय पटतेय का?”
रंग्या बोलत होता तो शब्द न शब्द खरा होता आणि मालाला पटत होते. जोवर ह्याला पुर्वग्रह बाजूला सारून मोकळ्या मनाने मित्र म्हणून स्विकारणार नाही तोवर आपल्यात सहज संवाद घडणार नाही. तिने हसून मानेनेच होकार देत रंग्याशी हस्तांदोलन केले. मनातले सगळे कुविचार बाजूला सारून मग तिने पहीला प्रश्न विचारला..
“ अरे पण तुम्ही एकमेकांना कधीपासून ओळखता? आणि शऱ्या इतक्यांदा भेटूनही तू मला कधी काही बोलला नाहीस..? ”

“ अगं तीच तर गंम्मत आहे ना. ऐक परवा मी आपल्या ट्रेकच्या टूरचे खाण्यापिण्याचे कॉन्ट्रॅक्ट कुणाला द्यावे ह्यासाठी भटकत होतो. अचानक माझ्या गाडीला मागून एका गाडीने धडक दिली. मी स्लोच चालवत होतो म्हणून धक्का बसला तसे मी थोडा इमबॅलन्स झालो पण त्या चारचाकीतून एक आडदांड व्यक्ती घाबरत खाली उतरून माझ्याजवळ आली आणि आस्थेने माझी चौकशी करू लागली. ती व्यक्ती माझ्याशी बोलत असताना तो आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटला. नीट निरखून पाहिले तर मला का कुणास ठाऊक उगीचच हा तोच रंग्या तर नाही अशी शंका आली. तोपर्यंत ह्याने मला उचलून साईडला बसवले आणि खूप अदबीने बोलू लागला. माझा विश्वासच बसेना हा जर रंग्या असेल तर तो इतका मवाळ भाषेत बोलणे शक्यच नाही.आपलाच काही तरी गैरसमज होतोय.
हा रंग्या असूच शकत नाही. ”

“ मगऽऽ? ”

“अगंऽऽ मग काऽय, मग हा असा साप सुंघल्यासारखा पडलेला बघून मी घाबरलो. त्याच्या तोंडावर चापटी मारून *अहो अहो असे करताना शऱ्याचा चेहरा बघितला आणि मला लगेच कन्फर्म झाले हे तर आपलं कॉलेजचं *पाप्याचं पितरं शऱ्या*. मग मीच विचारले….
अरे तू एस पी ला होतास का 1970बॅच ????? ”

—----------------------------------------------------------
क्रमशः -9

काय असेल रंग्या आणि शऱ्याची स्टोरी?
रंग्या इकडे काय करतोय आत्ता?
हे जाणून घ्यायला पुढचा भाग नक्की वाचा.
कसा वाटला हा भाग? हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा.
धन्यवाद.
@राधिका.

🎭 Series Post

View all