Login

म्हणून जग फसतं! - 8

जगात अवतीभवती घडणाऱ्या घटना बघून आपण लगेच काहीतरी निष्कर्ष काढतो पण दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं हे सुचवणारी मनोरंजक कथा "म्हणून जग फसतं!"


म्हणून जग फसतं!-8
©®राधिका कुलकर्णी.


लाल काळ्या झिगझॅग स्ट्राईप्सचा शॉर्ट कुर्ता, ब्लू जिन्स आणि त्यावर जॅकेट घालून सॅक खांद्यावर अडकवून माला आपल्या बॉबकटच्या बटा सावरत जशी सोसायटी हॉलमध्ये प्रवेशली तोच अनेक माना नकळत तिच्याकडे वळल्या. पण तिची नजर मात्र शरदलाच शोधत होती.
शरद नेहमीप्रमाणेच आपल्या तरूण गॅंगबरोबर सहलीच्या आयोजनात व्यग्र होता. मालाने त्याला फोन लावला आणि दुरूनच त्याने मालाला बघताच तो दोन मिनिट स्तब्ध झाला.

"बाऽपरेऽ काय दिसते ही आत्ताही !
कॉलेज क्विन म्हणतात ते काही खोटं नाही! ही अजूनही काही कमी नाही.

*शरदराव आपण हलले आहात आतून, हे चेहऱ्यावर दिसू देऊ नका. जा लवकर*. "


स्वतःशीच संवाद साधत, धडपडलेल्या मनाला सावरत लगबगीने शऱ्या तिच्यापाशी आला.

" हे काय किती उशीर लावलास गं.. सगळे वाट पहात होते कोण यायचे राहीले, कोणासाठी थांबलोय म्हणून? मला काही उत्तरही देता येईना. पण का वेळ लागला एवढा ?? ”

शरदने मुद्दामच कॉम्प्लिमेंट द्यायचे टाळत तिच्यावर रागावल्याचा फिल आणला चेहऱ्यावर.

आता ती काय कारण सांगणार होती डोंबल !!!
*हे की - तुझ्याच विचारांत गर्क झाले म्हणून वेळेचे भानच उरले नाही आणि आधीच आवरलेले असुनही लेट झाला.* - हे कारण थोडीच सांगू शकणार होती. तिने लगेच मनात एक स्टोरी तयार केली आणि थाप मारली,

“ अरेऽऽ निघतच होते की दादाचा फोन आला आईसाठी. मग काऽय, आई फोन सोडायलाच तयार नाही. शेवटी मी फोन हाती घेऊन दादाला सांगितले की कुहूच्या फोनवर कॉल कर मला उशीर होतोय तेव्हा कुठे आईला उमगले. आणि मी दाराबाहेर पडतच होते की तुझा फोन, सॉरी माझ्यामुळे लेट झाले. ”

“ इट्स ओके हरकत नाही, पण आता लगेच निघावे लागेल. एकदा फायनल प्रेझेंटी घेऊ आणि ट्रेक सुरु. ”

सर्व हजर असल्याची खात्री पटताच सगळे गृप अनाउन्स केले. मालाला सतत वाटत होते की ह्या ट्रीप मध्ये तरी दोघे एकाच गृपमधे असावेत पण तसा फॉर्मॅटच नव्हता. म्हणजे सर्व स्त्री वर्ग एका गृपमध्ये आणि पुरुष वर्ग दुसऱ्या गृपमध्ये अशी विभागणी झाली जे ऐकून मालाचा चेहरा एकदम बारीक झाला. तिला वाटलं होतं आता खूप दिलखूलास गप्पा होतील रस्ताभर. छान हातात हात घालून गप्पा मारत जून्या स्मृतींना उजाळा देत ट्रेक पूर्ण होईल पण ह्यातली एकही गोष्ट होणार नाहीये ह्या विचाराने तिचे मन खट्टू झाले. उदासवाणे ती इतर स्त्रीयांबरोबर चालू लागली. मधे मधे शरद तिला भेटून तिची आस्थेने चौकशी करून परत त्याच्या गृपमध्ये सामील होत होता.
मुळातच फिट असलेली माला त्या इतर स्त्रियांच्या तुलनेत भराभर पुढे जात होती. वारंवार इंस्ट्रक्टर मुलगा आज्जी संगळ्यांसोबत रहा,गृप सोडून एकट्या पुढे जाऊ नका अशा सुचना देत तिला मागे खेचत होता. त्यांच्या चालीने हळू चालताना तिच्या पायात गोळे येत होते. असे दोन तिनदा घडल्यावर मग तिने इंस्ट्रक्टर जवळ जाऊन आपली समस्या सांगितली,

“ हे बघ मूला, मला नॉर्मलीसुद्धा वेगाने चालायची सवय आहे. मी स्पीड कमी करून चालले की माझ्या पायात गोळे येतात. तुला सर्वांची जबाबदारी दिलीय त्यामुळे तू मला पुढे जाण्यापासून रोखतोएस, कळतेय मला,पण मग मी इतकी संथगतीने नाही चालू शकत. मी त्या पुढच्या पुरूषांच्या गृप बरोबर गेले तर चालेल का?
मी त्यांच्या स्पीडने चालू शकते. कोणीतरी लक्ष ठेवणारे असले म्हणजे झाले, होय ना ? ”

“ ठीक आहे आज्जी जा तुम्ही त्या गृप बरोबर. माझी काही हरकत नाही. मी कळवतो तसं त्या गृपच्या इंस्ट्रक्टरला. तुम्ही व्हा पुढे. ”

पुढच्या गृपमध्ये शऱ्या होता. आता तिला काही नाही तरी निदान त्याच्या गृपमधे सामील होऊन बरोबर राहता तर नक्कीच येणार होते ह्या कल्पनेने तिचा चेहरा खुलला. तिने आपला मोबाईल काढून लगेच शरदचा नंबर फिरवला.
मालाचा फोन पाहून शरद आधी थोडा चिंतीत झाला. त्याने फोन उचलता उचलता मागे वळून पाहिले तर ती तरातरा चालत त्याच्याच दिशेने येत होती.
काय झाले असेल, ही अशी घाईने त्यांचा गृप सोडून पुढे का येत असेल?
मनातल्या विचारांवर आवर घालत शरदने फोन उचलला आणि विचारले,

“ काय गं सगळे ठीक नाऽऽ, अशी एकटीच पुढे का येतेय? Any problem? ”

“ अरे होऽऽऽ, किती काळजी करतोस, मी ठीक आहे पण मला काही त्या बायकांबरोबर हळूहळू चालणे जमेना मग मी तुमच्या गृप मध्ये सामील होण्याची परमिशन घेतली आमच्या इंस्ट्रक्टरकडून. तो हो म्हणाला म्हणून तुला फोन लावला. थांब जरा मी पण जॉईन करतेय तुमच्या गृपला. ”

‘अरे देवाऽऽ! ही आणि आपल्या गृपमध्ये, कशाला?
आधीच तिच्या एंट्रीवर सगळ्यांमध्ये खूसफूस झालेली, आता ती डायरेक्ट सोबत आली तर वाट लागेल. नकोच ते. त्यापेक्षा मीच तिच्याबरोबर चालतो.’

शऱ्याचे स्वगत संपले तसे तो तिच्यापर्यंत मागे चालत गेला.

“ अरे तू कशाला मागे फिरलास, मी येतच होते नाऽऽ. ”

“ काही नाही विचार आला. मीच त्या गृपचा इंस्ट्रक्टर आहे. तर आता तुझ्याबरोबर चालतो म्हणजे गृपकडे पण लक्ष राहील आणि आपल्या पण गप्पा होतील. खरं तर मलाही तुझ्याबरोबर रहायचे होते पण नेहमीची शिस्त भंग होऊ नये म्हणून नियमाप्रमाणे तुला त्या गृपमध्ये टाकले. पण जे होते ते चांगल्याकरता. आता आजचा ट्रेक मी माझ्या बेस्ट फ्रेंड सोबत करणार. It will be a memorable trek of my whole life. ”

“ अच्छा अच्छा, कळतेय मला मस्का मारणे. मग एवढं वाटत होतं तर आधीच का नाही माझ्या बरोबर आलास रे ! जगाला घाबरत होतास ना लोक काय म्हणतील वगैरे वगैरे!?? ”

“ नाही गं. अगदीच तसे नाही पण काय आहे की हे सगळे सोसायटी मेंबर्स, गेली कित्येक वर्षे आम्ही एकत्र राहतोय, वेगवेगळे कार्यक्रम एकत्र साजरे करतोय तर आता एक फॅमिलीच झालो आहोत आम्ही.

आजवर माझ्या आचरणातून ते मला एक सभ्य गृहस्थ म्हणून ओळखतात. त्यांच्या नजरेतील माझी इमेज कुठे धूसर नको व्हायला किंवा ह्या कुटुंबाच्या नजरेतून उतरण्याजोगे आचरण नको व्हायला म्हणून जसे नियम आहे तसेच वागावे असे मी ठरवले. त्यांना नाही माहित ना की आपण आधीपासूनचे मित्र आहोत. ”


“ बरं ते जाऊ दे. पण काल तर तू कसल्यातरी सरप्राईज बद्दल बोलत होतास,कसले सरप्राईज रे? Am damn excited to know that. ”

“ सरप्राईज? कसले सरप्राईज, ते मी असेच तू ट्रेकला यावे म्हणून म्हणालो. बघ आलीस की नाही धावत धावत. नाहीतर फोनवर काय कारणे देत होतीस, पाय दुखतात, गुडघे दुखताएत. त्यातून सुटका करायलाच मी ही आयडिया केली. छान होती ना! ”

“ मेल्या शऱ्या, अरे किती नालायकपणा हा ! तू चक्क खोटं बोललास ? हे अजिबात बरोबर नाही केलेस हं तू. ते काही नाही मला आता सरप्राईज हवे म्हणजे हवेच, नाहीतर तुला खूप मोठ्ठी पेनाल्टी लागेल लक्षात ठेव. ”

“ अगं काय पेनाल्टीच बोलतेस.. जी लागेल ती भरेल बास! डोण्ट वरी ॲट ऑल.. पण आता जरा लवकर हातपाय उचल. बाकी गृप बराच पुढे गेला बघ. मला त्यांच्यावर लक्ष ठेवायचे काम दिलेय आणि मीच गायब माझ्या मैत्रिणीबरोबर असे नको व्हायला. ”
त्याच्या शेवटच्या वाक्यावर आलेले मिश्किल भाव आणि हसू बघून मालाला पण हसू आले. आपले हसू रोखतच ती म्हणाली,
“ शऱ्या अरे आपल्या वयाचा तरी विचार कर, काय कॉलेज गोईंग मुलांसारखा फ्लर्ट करतोय. शोभते का ह्या वयात!! ”

" हे बघ वय शरीराला असते मनाला नाही त्यामुळे तू अजून 80/85 वर्षांची जरी झालीस ना तरी माझ्यासाठी तीच कॉलेजची द मोस्ट ब्यूटीफूल गर्ल असणार. सगळ्यांची ड्रिम गर्ल. जर तुझ्या विषयीच्या त्या भावना आजही बदलल्या नाहीत तर मग विचार कसे बदलतील सांग? आणि असे कुठे लिहीलेय की अमुक वयात अमुक करू नये. ज्यामुळे मनाला आनंद मिळतो, चित्तवृत्ती प्रसन्न,प्रफुल्लित राहतात त्या गोष्टी तर उलट जास्त केल्या पाहिजेत ह्या वयात त्यामुळे तुम्ही वयापेक्षा अधिक तरतरीत आणि तरूण राहता, असे मानसशास्त्र सांगते. ”

“ बास बास. बास झालं तुझं मानसशास्त्रपुराण. ते बघ ,
तिकडे तुझे बाकीचे मानसशास्त्र इकडे तिकडे तुलाच शोधताएत. चल लवकर. ”

“ बरं बरं. लगेच टोमणे नको मारूस अस्सल पुणेरी. चालतोय.”

शरदने एकवार मालावर नजर फिरवली आणि मनातल्या मनात सुचक स्मित केले. सरप्राईज खराब होऊ नये म्हणून त्याने तिची चेष्टा तर खूप केली पण खरंच जेव्हा सरप्राईज समोर येईल तेव्हा माला कशी रीॲक्ट होईल?? काय वाटेल तिला? राग येईल की आनंदी होईल?
जाऊदे. जास्त विचार नको करूयात. वेळ आल्यावर बघू. आणि ती वेळ जवळच येऊन ठेपलीय. गॉड नोज, हाऊ विल शी रीॲक्ट..

------------------------------------------------------------------------
क्रमशः - 8

शरदने नेमके काय सरप्राईज अरेंज केलेय?
बघूया पुढील भागात.
कथा आवडत असेल तर अभिप्राय नक्की कळवा.
धन्यवाद.
@राधिका.

🎭 Series Post

View all