म्हणून जग फसते!-4

वरवर दिसणाऱ्या गोष्टी बघून अनेकदा आपण कुणाबद्दलही एखादे मत बनवून मोकळे होतो परंतु दिसते तसे नसते म्हणून जग फसते हे अनुभवातून कसं पटतं ह्याचा धडा देणारी मनोरंजक कथा.म्हणून जग फसतं!

म्हणून जग फसते! -4
©®राधिका कुलकर्णी.



(साधारण पहाटे तीन चार वाजताची वेळ आणि शरदच्या मोबाईल फोनची रींग वाजतेय.)

"आत्ता ह्यावेळी माला का बरं फोन करतेय? चुकून तर लागला नसेल? "
विचार करून शरद फोन उचलेपर्यंत बंद झाला.
" बरं झालं. कदाचित चुकूनच दबला गेला असेल उशीखाली फोन. "

मनाची समजूत करून घेत शरद कूस वळणार तोच पुन्हा फोन वाजायला लागला. ह्यावेळी त्याने पटकन उचलला.
" हॅलोऽऽ, काय गं एवढ्या पहाटे फोन, सगळे ठीक ना? "

" शरद अंकल, मी कूहू बोलतेय, माला मावशीची भाच्ची. सॉरी अवेळी डिस्टर्ब करतेय पण आज्जीची तब्येत अचानक बिघडलीय. तिला बहुतेक हॉस्पिटल न्यावे लागेल तर तुम्ही जरा लवकर येताल का? मावशी इकडे कुणाला फारशी ओळखत नाही. चांगले हॉस्पिटल पण माहित नाही आम्हाला. मावशी खूप घाबरलीय तुम्ही लवकर या ना. "

" हे बघ बेटा कूहू, अजिबात घाबरू नका. मी सांगायचे विसरलो पण एका लग्नानिमित्त मी गावी आलोय काल रात्रीच. मला प्रत्यक्ष येणे जमणार नाही,पण मी माझ्या पोरांना मदतीला पाठवतो.ते तुमची सगळी मदत करतील. फक्त तोपर्यंत तू आज्जींना लिफ्टने ग्राउंड फ्लोअरवर घेऊन ये सावकाश. सगळे ठीक होईल. वरद हॉस्पिटलमध्ये मी फोन करून ठेवतो. तुम्ही तिकडे डॉ. गोळे मॅडमना भेटा. त्या माझ्या परीचित आहेत, त्या नीट बघतील आज्जींना. काळजी करू नका. चल मी बाकीचे फोनाफोनीचे काम करतो आणि तुला कळवतो. "

घाईघाईत शऱ्याने आपल्या सगळ्या तरूण तडफदार मित्रमंडळाला फोन लावून सविस्तरपणे सगळे सांगितले. वेगाने चक्र फिरली आणि दोन मुले मालाच्या घरी मदतीला गेली. सगळ्यांनी गाडीत घालून आज्जींना वरद हॉस्पिटलमध्ये नेले. अगोदरच सांगून ठेवलं असल्याने गोळे बाई पण झोपाळल्या डोळ्याने क्लिनिकमध्ये दाखल झाल्या. शरदने सुचवलेय म्हणजे डॉक्टर छानच असणार असा विचार करून माला निश्चिंत होती. पण नावाप्रमाणे गोल असलेली गोळे बाई बघून मालाच्या डोक्यात नकळत पाल चुकचुकली. आधी तर ही कोणीतरी नाईट ड्यूटी नर्स आहे असेच वाटलेले मालाला पण तिने स्वतःच स्वतःचा परिचय *मीच डॉक्टर गोळे* करून दिल्याने पुढचा संभाव्य घोटाळा होता होता वाचला. आता ही उपचार तरी नीट करतेय की नाही? अशा शंका मनात पोखरत असुनही मालाने आपल्या मनातल्या शंकांवर पांघरूण घातलं आणि डॉ. काय म्हणतात ह्याकडे लक्ष दिले.
तिने आज्जींच्या जवळ जाऊन भराभर चेकअप करता करता शिताफीने आज्जींना बोलते केले.

"हं, काय आज्जी, रात्री काय जेवलात ?"

"काही नाही गं पोरी. वरणपोळी कुस्करून खाल्ली. आजकाल दुसरं काही जड खायला पचतंय कुठे?"

"ओके. बरं मग शुगरची गोळी? घेतली का?"

"हो. रोज जेवणाआधीच आहे की ती घेऊनच जेवले."

" मग कुठे गडबड केलीत, मी सांगू ? "

त्यावर सगळे एकमेकींकडे टकमक बघू लागले.

इकडे बोलता बोलता तिने आज्जींचे बीपी चेक केले. पटकन नाडी, हार्टबीट्स, ऑक्सिजन लेव्हल बघून एक इंजेक्शन पण दिले. एरवी इंजेक्शन म्हणले की घाबरून गोंधळ करणाऱ्या आज्जींना आज इंजेक्शन दिले तरी कळले नाही. सगळे चेकअप झाले तसे हसतमुख चेहऱ्याने डॉक्टर बोलल्या,
" आज्जी, तुम्ही तर एकदम ठणठणीत आहात की. तुम्हाला तर काहीच झाले नाहीये. तुमचं वय काय आता?"

मालाने लगेच सांगितले.
" ह्या जूनमध्ये तिला एकोणनव्वद संपलं. "

" अरे बापरे!! आज्जी तुम्ही तर अजूनही पन्नाशीच्या वाटतात की. पण आता ही तब्येत अशीच छान रहावी असे वाटत असेल ना तर मी काय सांगते ते ऐकायचे, ऐकणार ना?"

आपण पन्नासचे दिसतो अशी तारीफ ऐकून हुरळलेली आज्जी लगेच म्हणाली, "होऽऽऽऽ ऐकेन की. "


"पण त्या आधी मी काही तरी विचारणार आहे त्याचे खरे खरे उत्तर द्यायचे हं. "

" हो विचार की पोरी. "

"मला सांगा बीपीची गोळी किती दिवसांपासून बंद आहे.?"
ह्या प्रश्नासरशी तिघी एकमेकींकडे आणि नंतर लेक भाच्ची आज्जींकडे नजर फिरवू लागले. आज्जींनीही दोघींकडे बघून नजर चोरली.
आता सगळ्यांनीच आपल्या नजरा खाली वळवल्या.

" घाबरू नका आज्जी. सगळं ओके आहे. आता तुम्ही इथेच पडून रहा. आलेच मी."

आज्जींकडे हसून बघून त्यांनी मालाला इशारा करून आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले.

मालाही पाठोपाठ बाहेर गेली. बाजुच्याच केबिनमध्ये दोघी समोरासमोर बसल्या.
मालाने अधीरपणे विचारले,

" मॅडम, कशीय आईची तब्येत? काही सिरीयस तर नाही ना? आणि अहो रोज तिला तिच्या गोळ्या मी स्वतः हातात देते. गोळ्या स्कीप व्हायचा प्रश्नच नाही. मग हे कसे काय… काही कळत नाही. "

" रीलॅक्स! घाबरू नका. परीस्थिती कंट्रोल मधे आहे. आणि ह्या वयात म्हातारी माणसे कधी कधी लहान मुलांसारखे गोळ्या खाणे स्वतःच बंद करतात. त्या गोळ्यांमुळे तोंड कडू पडते किंवा कंटाळा, किंवा मला काही झाले नाहीये तरी डॉक्टर उगीच अनावश्यक गोळ्या खायला देतात, ह्या पैकी कोणत्याही कारणांनी ही मंडळी अचानक गोळ्या खाणे बंद करतात. माझ्या माहितीप्रमाणे त्या जवळपास तीन दिवसांपासून बीपीची गोळी घेत नाही आहेत म्हणून अचानक बीपी हाय झाला आणि त्यांना घाम फुटला, चक्कर यायला लागली. खरेतर हे खूप थोडक्यात निभावलेय नाहीतर परीस्थिती गंभीर पण होऊ शकली असती.
मी त्यांना झोपेचे इंजेक्शन दिलेय. एक दोन तासांनी त्यांना बरं वाटेल मग तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. आणि ह्या पुढे त्या गोळी पुर्णपणे तोंडात घेऊन गिळेपर्यंत त्यांच्यावर लक्ष ठेवा. नुसती हातात देऊन त्या घेतील असे समजू नका.
आणखी एक, मला वाटते बरेच वर्ष झाले त्यांचे कुठलेच चेकअप झालेले दिसत नाहीत. आय विल सजेस्ट की त्यांचे कम्प्लिट बॉडी चेक अप करून घ्या.  ह्या वयात हालचाली मंदावलेल्या असतात त्यामुळे शरीरातील एखादा अवयव नीटपणे काम करत नसेल तरीही उच्च कोटीचा त्रास झाल्याशिवाय ते कळणे अवघड असते कारण नॉर्मल कंडीशन मधे बॉडी सिंम्प्ट्म्स दर्शवत नाही. कधी कधी अशा पेशंटना अचानक ॠदयविकाराचे झटके यायची शक्यता नाकारता येत नाही त्याकरता दर दोन वर्षांनी तरी किमान चेक अप झाले पाहिजे. तुम्ही शेवटचे चेक अप कधी केले सांगू शकाल?

डॉक्टरांच्या ह्या प्रश्नावर मालाकडे उत्तरच नव्हते. तिच्या कडे येऊन वर्षच होत होते आज्जींना. त्याआधी दादाने कधी चेकअप केल्याचे तिला आठवत नव्हते.
तिने नकारार्थी मान हलवली.

" बरं, हरकत नाही, आता करून घेऊ. म्हणजे सगळे रीपोर्ट्स बघून आपल्याला त्यांची पुढची ट्रिटमेंट ठरवता येईल. मी कोणकोणत्या टेस्ट्स ते पेपरवर लिहून देते. सकाळी सात वाजताच सुरू करू. चालेल ना?"

मालाने होकारार्थी मान तर हलवली पण मनातून मात्र हाच विचार आला, झालं, आता सापडलोय तावडीत तर पंचवीस तीस हजार बील झाल्याशिवाय हे काही आपल्याला इथून जाऊ देणार नाही. आई किती ठणठणीत आहे पण आता मासा लागलाय ना गळाला मग घ्या कापून. सगळे उकळायचे धंदे, दुसरं काय! पण जाऊदे.. त्या निमित्ताने आईचे चेकअप तरी होईल. जाऊ गेले चार पैसे तर. तिच्या पेक्षा जास्त आहेत का पैसे!
मनातल्या मनात हे विचार करत माला केबिनमधून बाहेर आली. आई एव्हाना गाढ झोपली होती. माला आणि कूहू पण तिथेच थोडी डुलकी काढत बसल्या. बघता बघता सकाळ झाली.
डॉ. गोळे बाई सांगितल्याप्रमाणे बरोबर सातच्या ठोक्याला पुन्हा हजर झाल्या. त्यांनी लेटरपॅडवर भल्यामोठ्या टेस्ट्सची यादी लिहून ते रीसेप्शनवर दिले आणि हळूहळू आवाजात तिथल्या रिसेप्शनिस्टला काही सुचना दिल्या.
ह्या दोघीही आलटून पालटून घरी जाऊन फ्रेश होऊन आल्या. सकाळी घाईघाईत फार पैसे पण बरोबर आणले नव्हते पण आता प्रत्येक टेस्टसाठी रक्कम जमा करावी लागणार ह्या हेतूने सर्व तयारीनिशी माला घरून परत आली.येतानाच दोघींसाठी नाष्ट्याचे पार्सलही घेतले. आता टेस्ट्स असल्याने आज्जीला तर काही देणे चालणार नव्हते. आज्जी आता उठून पुढच्या तयारीची वाट पहात होती. त्यांची तब्येत बघता गोळे बाईंनी मुद्दामच सकाळी लवकरची वेळ दिली ज्यामुळे सगळ्या टेस्ट्स आटोपल्या की त्यांना काही खाता येईल. ठरल्याप्रमाणे प्रत्येक काउंटरवर त्या त्या टेस्टसाठी चिठ्ठी दिली जात होती.त्यावर डॉक्टरचे नाव आणि खाली रक्कम असे सगळे लिहून कंप्युटराईझ्ड बील मिळत होते. बिलावरचे आकडे बघून मालाला तर घामच फूटू लागला. तशी तिला पैशांची काही कमी नव्हती पण जे लोक गरीब असतील ते इतक्या महागड्या टेस्ट्स कसे करत असतील? असा क्षणभर प्रश्न तिला पडून गेला. एक एक करता सगळ्या टेस्ट झाल्या तसे गोळे बाईंनी पेशंटला घरी नेण्याची परवानगी दिली. सगळ्या टेस्ट्सचे रीपोर्ट्स दोन दिवसांनी येतील तेव्हा फोन करून या असे सांगून त्यांना जायला सांगितले. मालाला अजूनही रक्कम कुठे जमा करायची विचारल्यावर "रीपोर्ट्स आल्यावर सांगतील मॅडम" असं उत्तर देऊन पाठवणी केली रीसेप्शनिस्टने.
"ही कोणती नवीन पद्धत! "

मालाला नवलच वाटले पण जाऊदे म्हणत ते सगळे घरी पोहोचले.
दोन दिवसांनी अगदी म्हणल्याप्रमाणे रीसेप्शनिस्टने *रीपोर्ट्स कलेक्ट करायला या * असा फोन केला. ह्या वेळी माला एकटीच हॅस्पीटलला गेली. रीसेप्शन काउंटरवर रीपोर्ट्स सोबत बिलाची रक्कम पण लिहीलेली होती. टॅक्सेस सहीत ते बील जवळपास पन्नास हजार झाले होते.
तिने मनावर संयम ठेवला तरी शरदवर तिला प्रचंड राग येत होता. चांगले ओळखीचे हॉस्पिटल, डॉक्टर पण ओळखीतल्या म्हणून इथे पाठवले आणि आता पाच पैशात पण सूट नाही. तिची खूप चीडचीड झाली मनोमन.

" काय उपयोग मग ह्याच्या ओळखीचा? आता भेटू दे प्रत्यक्ष, मग बघते शऱ्याकडे. "

मनोमन असे बोलतच ती गोळे बाईंच्या केबिनमध्ये घुसली.
—---------------------------------------------------------
क्रमशः -4
©®राधिका कुलकर्णी.


अचानक आईच्या बिघडलेल्या तब्येतीने माला घाबरून गेलीय त्यात हॉस्पीटलचे इतके मोठे बील वाचून माला मनोमन शरदवर चीडलीय.
आता रीपोर्ट्समधे नेमके काय आहे? खरंच काही काळजीचं कारण आहे की अजून काही? गोळे बाई मालाच्या शंकेप्रमाणे खरंच ठगवतेय का पेशंट्सच्या परीवाराला ?
आणि जर ही शंका खरी असेल तर माला पुढे काय करेल???
हे वाचायला पुढील भाग नक्की वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.
धन्यवाद.

🎭 Series Post

View all