Login

म्हणून जग फसतं! अंतिम भाग - 20

दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं ह्याची अनुभूती वारंवार देणारी मनोरंजक कथा..
म्हणून जग फसतं! - 20
©®राधिका कुलकर्णी.

मनातल्या मनात विचार एकीकडे तर दुसरीकडे मालाची दैनंदिनी सुरू झाली. एक मात्र झाले. आता शऱ्याशी कामाच्या मधून चॅट पण सुरू झाला. त्या चॅटिंगमधे सकाळची दूपार आणि दूपार कधी रात्रीत बदलत होती पत्ताही लागत नव्हता. तिकडे शऱ्या आणि इकडे माला दोघांनाही आता चॅट करायची इतकी सवय जडली की एकमेकांशी बोलल्यावाचून त्यांना करमेनासे झाले. शऱ्या कधी परत पुर्वीसारखा हिंडता-फिरता होतोय ह्याची माला आतुरतेने वाट पाहू लागली. त्याच्याबरोबर कॉफी शॉपमध्ये घेतलेली भेट तिला वारंवार आठवू लागली. किती अविस्मरणीय क्षण होते ते! तो आपल्याला बाईकवर डबल सीट घ्यायला काय आला, आपणही शोडषवर्षीय मुलीसारख्या त्याच्या पाठीमागे बसून गेलो काय, नंतर कॉफी,नाष्टा आणि गप्पा… कसा वेळ गेला कळलं देखील नाही.. परत तसे भेटायची संधी मिळण्याआधीच शऱ्या आजारी पडला.. आता पुन्हा अशीच भेट कधी होतेय परमेश्वर जाणे!
विचारांच्या तंद्रीत माला काम करत होती. मधेच फोन तपासून शऱ्याचा काही मेसेज येऊन पडलाय का चेक करणे चालू. सकाळच्या चहा ब्रेकफास्टपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सगळे अपडेट्स एकमेकांना देणे चालू होते. बेडवर पडल्या पडल्या शऱ्याला घर खायला उठत होते. सतत धावपळ आणि कुठल्या ना कुठल्या कामात गुंतवून बिझी राहण्याच्या सवयीच्या एकदम विपरीत आता त्याला चोवीस तास अंथरूणावर काढणे अवघड होऊन बसले होते. पण मालाशी गप्पा मारण्यामूळे आता त्याला त्या सक्तीच्या विश्रांतीचा काळ सुसह्य होत होता.
असेच दिवस चालले होते. हळुहळू शऱ्याच्या तब्येतीत बरीच सुधारणा होत होती. आता कधीकधी अगदी दोन तीन सेकंद का होईना पण दोघे व्हिडिओ कॉलवर पण भेटू लागले. फूल ना फुलाची पाकळी तसे प्रत्यक्ष नाही तर नाही अशा व्हर्च्युअल भेटीतही ते आनंद मिळवत होते.
आणखी काही दिवस गेले आणि एक दिवस मालाच्या वॉट्सॲप अकाऊंटवर एक मेसेज आला शऱ्याचा. जो वाचून माला हरखून गेली.

तो मेसेज होता..

“ हे ब्युटी क्विन ! आता मी पुर्ण बरा झालो आहे. डॉक्टरांनी मला थोडी हिंडाफीरायची परवानगी दिली आहे. पण खूप नाही. आता बोलण्यावरची पाबंदी पण उठली आहे. आता आपला खूप दिवसांचा पेडींग प्लॅन आपण वर्क आऊट करू शकतो.
तू आणि रंग्या कधी येताय मला भेटायला ते ठरवा. तुम्ही आपापसात चर्चा करून मला तुमचा दिवस कळवा.. म्हणजे तसे मी घरी सांगून ठेवतो माझ्या बायकोला. तिची तुमची अधिकृत भेट अजून घडलेली नाही तर ही योग्य वेळ आहे तुमचा एकमेकांशी परीचय करून देण्याची.. काय कशी वाटतेय आयडिया! ”

त्याच्या मेसेजने माला तर फुलपाखरूच झाली जणू. मनाने तर ती केव्हाच विहरायला लागली होती इकडून तिकडे. तरी मनातील अति आनंदावर संयम ठेवत माला म्हणाली,

“ अरे वाह! ही तर खुपच छान बातमी दिलीस की. चला आता तू पुर्ववत हिंडाफीरायला मोकळा झाला की काही दिवसांत. हे खूप छान झाले आणि भेटीचे म्हणशील तर तू सांगशील तेव्हा आम्ही येऊ. तू तुझ्या सवडीनूसार वेळ सांग. आम्ही मॅनेज करू. तू एकदा बायकोशी बोलून घे आणि मग दिवस सांग. ”

“ ओके.”

फोन मेसेजेस संपले तशी माला तर अत्यानंदात नाहून गेली. आता शऱ्याच्या बायकोवर इम्प्रेशन पाडण्यासाठी काय काय करायचे ह्याचा ती विचार करू लागली. भराभर कपाटाकडे जाऊन काय पोषाख परिधान करावा ह्याचा विचार करू लागली.

‘ शरारा घालू की साधा चूडीदार की जीन्स टॉप घालू !
की मस्त साडी नेसू?
आपल्या कपाटाच्या सर्व खणांना सभोवार न्याहाळत ती संभ्रमीत झाली की नेमकं काय घालू ज्यात मी द बेस्ट दिसेल. यमू पण इतक्या वर्षांनी भेटतेय. तिलाही स्वीट सरप्राईज मिळायला हवे मला बघून… ’
मनातला गुंता काही केल्या सुटत नव्हता. जेव्हा माणसाकडे खूप ऑप्शन्स असतात तेव्हाच त्याची अशी अवस्था असते. ज्यांच्याकडे काहीच नसते तेव्हा आहे त्यात ॲडजस्ट करून वेळ साजरी करतात लोकं, नाही का?
पूर्वी अशी कपड्यांनी भरलेली कपाटंच नसायची. एक दोरीवर एक मोरीवर अशी अवस्था. ठेवणीतल्या अगदी मोजक्या दोन साड्या. वर्षाकाठी नेसायच्या दोन साड्यांची खरेदी व्हायची. आतासारखे प्रत्येक इव्हेंटला वेगळे कपडे असे फॅड नव्हतेच मुळी. त्यामुळे सणसमारंभात तीच ती साडी घातली तरी कोणी खिल्ली उडवत नसत. पण आता तर जमाना इतका बदललाय की रोजच्या कपड्यांना सुद्धा लोक रोज तेच ते घालत नाहीत.
असो, पण ह्या चंगळवादी संस्कृतीमुळेच सगळे ढीगाने असुनही मालाची अवस्था सेक्सपिअरच्या \"टू बी ऑर नॉट टू बी\" सारखी झाली होती.
नजर आणि हात कपाटातल्या विविध खान्यात फिरत असताना अचानक एका साडीवर तिची दृष्टी स्थिरावली.
तिने अलगद त्या साडीवरील कपडा दूर हटवला आणि ती मऊसूत तलम साडी आपल्या हाती घेतली. ती साडी तिच्या खूप खास आठवणींपैकी एक होती. ही साडी तिच्या नवऱ्याने शशीने तिला गिफ्ट आणली होती. मोतीया कलरची इंदूरी साडी त्याला अगदी नाजूक लाल फुलाची किनार. पांढरे फिके रंग आपल्या गोऱ्या रंगावर खुलत नाही अशा समजूतीने मालाने कधीच पांढऱ्या किंवा मोतीया रंगात कधीच काही खरेदी केले नव्हते. त्यामुळे ह्या साडीला बघून पण तिने नाक मुरडले होते तेव्हा तिच्या नवऱ्याने तिला सांगितले..
“ दरवेळी तू तुझ्या पसंतीने कपडे घालतेस, आज माझ्या पसंतीची साडी घालून तर बघ, नाही लोक वळून वळून तुझ्याकडे बघितले तर मला विचार.. ”

त्यावर ‘इश्यऽऽ’ असे लाजत मालाने स्वतःच्या मनाविरुद्धच ती साडी नेसून त्यांच्या मित्राच्या पार्टीला गेली. आणि शशी बोलला तसे प्रत्येकजण एकदातरी मालाकडे वळून बघत होते. त्यानंतर मालाने नवऱ्याच्या आवडीनेच खरेदी सुरू केली ती आत्ता आत्तापर्यंत चालू होती. मागच्या वर्षी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून तिने मोठ्या आवडीने हीच त्याने दिलेली पहिली भेट म्हणून साडी नेसली आणि त्यानंतर शशी जो आजारी पडला ते पुन्हा माणसांत परतलाच नाही. त्या कटू आठवणी नको म्हणून ती साडी आणि त्या सोबतच्या साऱ्या नकोशा आठवणी तिने तळकप्प्यात दडवल्या होत्या. आज तीच साडी तिच्या अचानक हाती लागली.
का कुणास ठाऊक शऱ्याकडे जाताना तीच साडी नेसावी असे सारखे वाटत होते तिला. अखेर मनाचा विचार पक्का करून तिने तीच मागे टाकलेली इंदूरी साडी बाहेर काढली. त्यावर मॅचिंग एक छान मोत्याचा सेट बाहेर काढला. सगळी तयारी झाली तशी ती मनातून खुष झाली.
तेवढ्यात फोन वाजू लागला. आपल्या जून्या स्मृतींच्या कोंदणातून बाहेर येत तिने फोन घेतला. फोनवर रंग्या बोलत होता.
तोही तेच बोलत होता जे शऱ्या बोलला होता. त्याला भेटायला जाण्यासाठी कोणता दिवस, कधी भेटायचे ह्यावर चर्चा करायला हा फोन होता. अखेरीस दोघांच्या सवडीनुसार शनिवारी भेटायचे ठरले. शनिवार ह्यासाठी की त्या दिवशी ‘यमूज किचन’ला सुट्टी असते आणि शऱ्याला पण शनिवारच हवा होता. एकंदर सगळा प्लॅन ठरला. संध्याकाळी सातची वेळ फायनल झाली. तसे शऱ्याला पण कळवण्यात आले. मधे फक्त दोन दिवस जायचे होते.
पुढले दोन दिवस हां हां म्हणता निघून गेले आणि आज जायचा दिवस उजाडला. सकाळपासूनच माला प्रचंड एक्साईट होती. कधी एकदा संध्याकाळ होते आणि आपण शऱ्याच्या घरी जातो असं मालाला झालेले. जसजशी वेळ जवळ आली तसे मालाने आवरायला सुरवात केली. कितीतरी दिवसांनी आज ती ड्रेसिंग टेबल समोर बसून स्वतःला आरशात पाहून आवरत होती. नाहीतर शशी गेल्यानंतर तिनं इतकं निरखून आरशात बघून आवरणे सोडूनच दिले होते. पण आज मात्र तिला पुन्हा त्याच उत्साहाने सजावं नटावं वाटत होतं.
तिने छान मोतीया कलरची साडी नेसली. त्यावर लाल काठाचं स्लिव्हलेस ब्लाऊज. गळ्यात मोत्याचा कंठा. हातात एक मोत्याची बांगडी.दुसऱ्या हातात घड्याळ. केसांवरून कंगवा फिरवून हलकीशी लिपस्टीक ओठांवर फिरवून ती छानशी तयार झाली. इतक्या सिंपल लूक मध्येही ती खूप सुंदर दिसत होती. तिचे तिलाच लाजायला झाले क्षणभर. सगळे आवरून तिने घड्याळाकडे पाहिले तर अजून अर्धा तास वेळ होता. काय करावे असा विचार चालूच होता की शऱ्याचा फोन आला..
“ अगं रंग्याचा फोन आला नुकताच, त्याला निघायला थोडा वेळ लागेल तर तोपर्यंत तू ये ना.. तुला एकटीला पायी सुद्धा येता येईल आणि ते येईपर्यंत आपल्या निवांत गप्पा पण होतील. ”
शऱ्याच्या बोलण्याने मालाला तर काय करू न काय नको असे झाले. आंधळा मागतो एक डोळा, अन् देव देतो दोन… तशी तिची अवस्था झाली होती.
तिलाही खरं तर एकट्याने शऱ्याच्या घरी जायचे होते पण त्याने स्वतःहून रंग्याला पण बोलावल्यावर तिला कांहीच बोलता आले नाही तेव्हा. पण आता मात्र तिची थोडी तरी इच्छा पूर्ण होताना दिसत होती.

‘ बरं येते ’ म्हणत ती तयार झाली आणि चप्पल पायात सरकवून लगबगीने घराबाहेर पडली.
काही वेळातच ती शऱ्याच्या बिल्डिंग मध्ये पोहोचली. लिफ्टचे बटन दाबून ती शऱ्या रहात असलेल्या मजल्यावर पोहोचली.
आता तिचे ऋदय अचानक धडधडायला लागलं. तिने दाराची बेल वाजवली. थोड्या वेळातच दार उघडले गेले. तिच्या अपेक्षेप्रमाणे शऱ्याच तिचे हसतमुखाने स्वागत करेल असे तिला वाटलेले पण झाले भलतेच..
दारात उभी असलेली व्यक्ती आणि तिचा अवतार बघून मालाचे डोळे पांढरेफटक पडले.
दारात चक्क गोळे बाई विटक्या रंगाच्या गाऊनमधे हसतमुखाने मालाच्या स्वागतासाठी उभ्या होत्या.

“ या या माला मॅडम, शरद तुमचीच वाट पाहतोय.”

ह्या एका वाक्याने मालाच्या मनातील साऱ्या प्रश्नांची उकल तिला न सांगताच झाली हे वेगळं सांगायची गरज नाही,होय ना???

*दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं..!*

—---------------------------------------------------------
(समाप्त)
©®राधिका कुलकर्णी.

नमस्कार मंडळी,
लेखक म्हणून या कथेचा इथेच शेवट मला योग्य वाटला. पण वाचकांच्या भुमिकेत शिरल्यावर तुम्हा वाचकांना अनेक प्रश्न पडले असतील जसं की
गोळे बाईच शऱ्याची बायको आहे का?
मग ही गोष्ट आजवर कित्येक निमित्तं आली तरी त्याने का नाही सांगितले मालाला?
हे असे एक ना अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील ना?
आणि जे प्रश्न तुम्हाला पडलेत तेच प्रश्न मालाच्याही डोक्यात घुमत आहेत..
म्हणून मी लेखक म्हणून मला एक युक्ती सुचलीय..
जे जे प्रश्न तुमच्या डोक्यात आहेत ते सर्व तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. येत्या दोन चार दिवसात. कारण तुमचे आणि मालाचे प्रश्न सारखेच आहेत. आणि मग ह्याची उत्तरे तुम्हाला गोळे बाईंच्या तोंडून ऐकायला नक्कीच आवडतील, नाही का!!
मग चला सुरवात करा तुमच्या शंका विचारायला.
त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी एक स्पेशल बोनस पार्ट लिहून (जो गोळे बाईंच्या जुबानीत असेल) देण्याचा प्रयत्न करेन..
फक्त एक विनंती आहे. प्रश्न कथेशी संयुक्तिक असावेत. आणि तेच तेच प्रश्न रीपीट करू नका.. प्रत्येकाने नवीन काहीतरी विचारा.. दोन दिवसांत जितके प्रश्न, शंका जमा होतील त्यांनाच पुढच्या एपीसोडसाठी ग्राह्य धरून कथेत अंतर्भूत करून घेतले जाईल…
धन्यवाद मंडळी..मग लागा कामाला आता.. ऑल द बेस्ट..
एकुण कथा कशी वाटली? हे प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा.
@राधिका.

🎭 Series Post

View all