Login

म्हणून जग फसतं! -19

दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं ही म्हण सार्थ करणारी माला आणि शऱ्याची मनोरंजक कथा.
म्हणून जग फसतं! - 19
©®राधिका कुलकर्णी.


नेहमीप्रमाणेच सकाळ झाली. बरोबर पाचच्या ठोक्याला मालाला जाग आली. देवाला नमस्कार चमत्कार करून ठरलेला योगा करून डोळे चोळतच तिने फोन हाती घेतला. नेट ऑन करताच बऱ्याच साऱ्या मॉर्निंग मेसेजेसच्या गर्दीत एका मेसेजने तिचे लक्ष वेधून घेतले. ती आश्चर्याने अंथरूणावरून पडायचीच बाकी राहीली.
तो मेसेज असा होता….

“ हाय ब्युटी क्विन ! गुड मॉर्निंग ! कॉलेजच्या मित्राला विसरलीस की काय? इतक्या दिवसात ना फोन ना मेसेज!!! ”

आता हे तर सांगायची गरजच नाही की मालाला ‘ब्युटी क्विन’ कोण म्हणायचे. त्यामुळे मालाच्या डोक्यात लगेच ट्यूब पेटली. त्याच्या वाक्यांनी हसावं की रडावं हेच तिला कळेना.
इतकं सगळं होऊनही घटनेला मस्करीचे स्वरूप कसे द्यावे हे मात्र शिकण्यासारखे होते शऱ्याकडून. मनोमन हाच विचार करत त्याच्या मस्करीला तिनेही तोडीस तोड उत्तर द्यायचे ठरवले..

“ ह्यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. स्वतः कुणाला न सांगता स्वर्ग सफरीला जायची तयारी करायची आणि आरोप दुसऱ्यावर करायचे बोलत नाही म्हणून, वाह..!
होऽ, बरोबरच आहे म्हणा, तिथल्या रंभा, मेनका, उर्वशीच्या नाच गाण्यात देहभान हरपून गेल्यावर एका माणसाला कशाला मैत्रिणीची आठवण येइल.?? तिकडे मस्त ठेप ठेवली जातेय म्हणल्यावर इकडे पृथ्वीवर काय चाललेय, कोण आठवण करतेय ह्याचा विचार कशाला येईल ना मनात!!! सगळी मजा मारून झाल्यावर आता आठवतेय होय ब्युटी क्विन?? ”

त्यावर दोन मिनिटं शांतता. शऱ्या अचानक ऑफलाईन झाला. माला थोडी घाबरली.

‘ बापरे! आपली मस्करी जरा जास्तच तर नाही झाली ना? बिचारा इतक्या दिवसांनी बोलायला आला आणि आपण त्याला उगीच जाणीव तर नाही करून दिली ना की तो कोणत्या परीस्थितीला झगडून परत आलाय. चुकलच आपलं.. मी असं स्वर्ग सफर वगैरे बोलायला नको हवं होतं.. पण आता काय करणार! तीर निशाने से पहले ही जा चुका। ’

मनातल्या मनात असे सगळे संवाद चालू असतानाच एक मेसेज येऊन धडकला शऱ्याचा. आणि तिला फसकन हसू फुटले. तो मेसेज असा होता….

“ अगं काय करणार.. खरचंच परत यावसंच वाटत नव्हते त्यांचे विलोभनीय नृत्य बघून, पण तेवढ्यात चित्रगुप्त महाराज आपला लॅपटॉप घेऊन आले (हो, आता चित्रगुप्त पण अपग्रेड झालेत नाऽ.. जून्या चोपड्या जाऊन आता तेही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करू लागलेत. फक्त इंद्राच्या दरबारातला रंभा,उर्वशचा डान्स मात्र त्याच पारंपरिक पद्धतीने दररोज सुरू असतो म्हणे.) असोऽऽ.,तर मी सांगत काय होतो, हाऽऽ, तर अचानक चित्रगुप्त महाराज आपला लॅपटॉप घेऊन माझ्याकडे आले आणि म्हणाले तुमची रॉंग एंट्री झालीय इकडे. कोणी आणले तुम्हाला इकडे? मी गप्प. मला कसे ठाऊक असणार नाऽ. मग त्यांच्याच लक्षात ही गोष्ट आली, तसा त्यांनी आपला मोर्चा माझ्यावरून यमदूतांकडे वळवला. ‘माझी उचलबांगडी कोणी केली?’ म्हणून जशी चौकशी सुरू झाली त्यात असे निदर्शनास आले की नेहमीचे ड्यूटी यमदूत एक व्हायरल फिव्हर आणि एक सर्दी पडस्याने रजेवर असल्याने दोन न्यू रीक्रूटेड यमदूतांना ही ड्यूटी सोपवली होती. बिचारे अनअनूभवी ना,मग म्हणे नाम साधर्म्यातून मलाच उचलून घेऊन आले.
मग काय चित्रगुप्तांनी जे फायरींग केली म्हणतेस दोघांना, की विचारू नकोस. मला तर त्यावेळी माझा बॅंकेतला खडूस बॉसच आठवला त्यांना बघून. तोही असाच तासून काढायचा थोडी जरी चूक झाली की. आज मी मात्र त्या प्रसंगाची मस्त मजा घेत होतो. ते मान खाली घालून बिचारे ऐकून घेत होते. काय करणार? चूक तर केली होती. आता बोलणे न ऐकून सांगता कुणाला!
अखेरीस त्यांचे मन भरेपर्यंत तासून झाल्यावर लगेच त्यांच्या चूक दुरुस्तीची त्यांना ऑर्डर सोडली गेली.
मग काय रंभेचा डान्स अर्धवट सोडून यावं लागलं परत पृथ्वीवर. यमदुतांनी नुसते डोळे मिटून माझे हात हाती धरले आणि दुसऱ्या क्षणाला मी बेडवर हजर ना वनपीसमध्ये.
हांऽऽ, पण मग मी पण थोडी हुशारी केली. चित्रगुप्त महाराजांना मी म्हणालो, ‘मी इकडे आलोय ते माझ्या नाही, तर तुमच्या गलथान कारभारामुळे. मग आता मला त्याचा काहीतरी इन्सेंटीव्ह मिळायला नको का महाराज?’
त्यावर त्यांची मूद्रा गंभीर झाली. एक मिनिटाकरता मला वाटले ‘बाबो, मी काही जास्त आगाऊपणा तर नाही केला ना,नाहीतर रागात येऊन म्हणतील मग आलाच आहेस तर रहा इकडेच कायमचा.’ पण थॅंकफूली तसे काही झाले नाही. ते मला गंभीर मुद्रेने म्हणाले,

‘तुझे म्हणणे रास्त आहे मानवा, बोल तुला काय मोबदला हवाय.. ?’

मग मी माझी मनिषा बोलून दाखवली.

‘फार काही नाही, जोपर्यंत जगणे लिहीलेय ललाटलेखावर, तोपर्यंत मला धडधाकट आणि निरोगी आयुष्य द्या.’

मग काय त्यांनी लगेच \"तथास्तु\" म्हणून आशीर्वाद दिला आणि आमची रवानगी परत पृथ्वीकडे झाली.

चित्रगुप्त महाराजांनी त्यांच्या चुकीच्या भरपाईबरोबरच स्वतःच्या कोट्यातून मला पुढची अजून वीस वर्ष जीवदान देऊन पाठवलंय, आहेस कुठे!!! त्यामुळे आता तुझा मित्र पुढची वीसेक वर्षं तरी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये आणि तुला पिडायला लवकरच एकदम ठणठणीत होऊन येतोय की नाही बघच तू. ”

इकडे हर्षोल्हासाने मालाच्या डोळ्याला धारा लागलेल्या. काय बोलावे सुचत नव्हते तिला. शऱ्याच्या मस्करीवर हसावे की रडावे हेच तिला समजत नव्हते. एवढ्या गंभीर स्थितीत देखील त्याचा स्पोर्टीव्ह स्पीरीट तिच्या मनाचा ठाव घेऊन गेला.

“ अरे ते सगळे ठीक आहे, पण मग रीप्लाय द्यायला इतका लेट का केलास? मला वाटले तुला राग आला माझ्या मस्करीचा.. ऑफलाईन झाला लगेच. किती घाबरले मी! ”

“ अगं बाई, माझी गोळ्यांची वेळ झाली होती. म्हणून वेळ झाला. ”

“ ओह, अच्छा. बरं मग तू आराम कर आता. मीही जरा माझी कामे उरकून मग बोलते तुझ्याशी. एक व्हिडिओ कॉल करू का रे ? त्यानिमित्त तुला भेटल्याचा आनंद मिळेल.. ”

“ अगं नाही गं बाई. व्हिडिओ कॉल नको. इनफॅक्ट आत्ता मला तोंडाने बोलायची देखील परवानगी नाहीये डॉक्टरांची. आज फोन बघायची परमिशन कशीबशी
मिळ्वलीय तेही जास्त वेळ नाही. त्यामुळे सध्या कोणताच फोन शक्य नाहीये. हा पण इकडे चॅट करू शकतो हं आपण. ”

“ अरे बापरे! असे आहे होय. मग ठीक आहे. तू पुर्ण बरा झाला की मी डायरेक्ट भेटायलाच येईन तुला. कशाला व्हिडिओ वगैरे. पाच मिनिटांवर तर तुझे घर आहे. किती वेळ लागतो मला यायला. फक्त तू हो म्हणायचा अवकाश. ”

“ चालेल चालेल. एऽ, आपण असे करूया का! मी रंग्याला पण सांगतो यमूला घेऊन ये म्हणून. आपला प्लॅन तसाही राहून गेला ना, तर तो आता पुर्ण करू. तुम्ही सगळे मिळून माझ्या घरी या. मी डॉक्टरांनी परमिशन दिली की कळवतो मग भेटू.. ”

“ अरे वाह! हा बेस्ट प्लॅन आहे की! अरे शऱ्याऽऽ, पण मी एक गडबड केलीय. ”

“ आता काय केलेस ह्या वयात! ”

“ एऽऽ, गप रे! बकवास पीजे नको ना.. ऐक ना, अरे एक वेगळाच घोटाळा झालाय माझ्याकडून. “

“ काय झाले? ”

“ अरे तू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना मला एकदा रंग्याचा फोन आला होता हेच विचारायला की आपण त्याच्या फास्ट फूड सेंटरवर कधी येणार आहोत. ते सांगता सांगता तो म्हणाला की आधी त्याने हेच विचारायला तुला फोन केला. पण तुझा फोन सतत स्विच्डऑफ लागत होता. तर तो मला त्याबद्दल विचारला की शरदचा फोन बंद का येतोय, काही प्रॉब्लेम झालाय का वगैरे..? तर आता रघुपती आणि सिनू मला देखील सांगत नव्हते तुझ्या दुखण्याबद्दल. कसेबसे मी ते त्यांच्या मागे लागून लागून माहिती काढून घेतली. आणि नंतर गोळेबाईंनी पण सुचवले की तुला आरामाची सक्त गरज आहे त्यामुळे शक्यतो तुझ्याबद्दल कुणाला काही सांगू नका. त्यामुळे मग मी पण त्याला बात मारली की तू कोकणात तुझ्या गावी गेला आहेस जिकडे फोनला रेंज नसते म्हणून कदाचित फोन स्विच्ड ऑफ लागत असेल. त्याचा माझ्यावर विश्वास तर बसला पण आता जर त्याला खरं कारण कळले तर तो जाम भडकेल रे माझ्यावर. आता हा पेच कसा सोडवायचा, त्याची समजूत कशी घालायची हे तुच सांग बाबा ? ”

“ आता काही नाही. जे झालेय ते जसेच्या तसे मी त्याला सांगतो सविस्तर आणि हेही सांगतो की मालाला पण ह्यातलं काहीच माहित नव्हते. माझ्या मित्रांकरवी मीच तिला ही बातमी पोहोचवली की मी गावी कोकणात गेलोय जिथे फोनला रेंज नसते त्यामुळे बोलणे झाले नाही तर घाबरून जाऊ नये. त्याप्रमाणे तिने तुला तेच सांगितले जे तिला कळले होते.. म्हणजे मग तो तुझ्यावर भडकायचा प्रश्नच येणार नाही, ओके ना! ”

“ थॅंक्यू शऱ्या, तू मला किती मोठ्या धर्मसंकटातून वाचवलेस तुला माहीत नाही. खरंच मनापासून थॅंक्यू. पण आता लवकरात लवकर भेटून तुला प्रत्यक्ष पहावे वाटतेय रे मला. कधी येणार हा योग! ”

“ होईल होईल.. लवकरच भेटू. बरं चल. आता जरा आराम करतो.अजून थकवा जाणवतोय. आणि त्या गोळ्यांनी ग्लानी येते. झोपतो जरावेळ. बाय ब्युटी क्विन! ”

“ बरं..कर आराम. मीही जाते कामं पडलीएत. बाय!”

बाय करत दोघांनी गप्पा आवरत्या घेतल्या.

आणि आता लवकरच आपल्याला शऱ्याला त्याच्या घरी भेटायला जायचा योग येणार ह्या कल्पनेने ती आनंदीत झाली. त्या निमित्ताने तिची पहिल्यांदाच त्याच्या पत्नीशी भेट होणार होती जिच्याबद्दल तिने इकडून तिकडून बरेच ऐकले होते पण आजवर ना शऱ्याने तिच्याविषयी काही सांगितले होते ना त्याला त्या विषयावर बोलायला आवडत होते. प्रत्येक वेळी बायकोचा विषय निघाला की शऱ्या शिताफीने तो विषय टाळून वेगळीकडे डायव्हर्ट करायचा. पण आता प्रत्यक्ष घरी गेल्यावर तरी त्याला आपली बायकोशी ओळख करून द्यावीच लागेल.. मग बघू हा कसा टाळतो ते ! काय बरं नेसून जाऊ तिच्या घरी! ”
मनातल्या मनात मालाच्या विचारांची गिरणी पुन्हा नवीन दळण दळू लागली.
—-------------------------------------------------------------
क्रमशः - 19

आता बस काही दिवसांची प्रतिक्षा आणि मालाला अखेरीस शऱ्याच्या त्या तथाकथित गबाळ्या बायकोला
भेटण्याची संधी चालून येत होती. आता ही भेट काय रंगत आणते कथानकात हे पुढील भागात बघू.
कथा आवडत असेल तर लाईक कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
धन्यवाद.
@राधिका.

🎭 Series Post

View all