Login

म्हणून जग फसतं! - 18

शऱ्या आणि मालाच्या मैत्रीपूर्ण संबंधांची हलकीफुलकी मनोरंजक कथा.


म्हणून जग फसतं! - 18
©®राधिका कुलकर्णी.


“ हॅलोऽऽऽ…. अरे काय रे रघुपती इतक्या उशिरा कॉल, सगळे ठीक ना? शऱ्याची तब्येतऽऽ …. ? ”

काळजीपोटी मालाने घाबरत घाबरत प्रश्न केला.

“ हो आज्जी, तेच तर कळवायला इतक्या घाईने फोन केला ना. नाहीतर उद्या सकाळी तुम्ही पुन्हा माझे कान उपटले असते ‘ इतकी महत्त्वाची बातमी मी रात्रीच का नाही कळवली ’ म्हणून… ”

“ बरं बरं…कळलं कळलं.. पण आता मूळ बातमी तर सांग. ”

“ अहो गुड न्यूज आहे. एसव्ही आता पुर्णपणे ओके झालाय आणि आज रात्रीच बहुतेक त्याला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे असे गोळे मॅडम बोलत होत्या संध्याकाळी. एकंदर त्याचे सगळे रीपोर्ट्स बघितल्यावर त्यांनी हा निर्णय घेतला. तेच तुम्हाला कळवायला इतक्या रात्री फोन केला. ”

“ अरे वाह! छान बातमी दिलीस की.. बरे झाले.. एकदाचा शऱ्या सुखरूप घरी पोहोचला म्हणजे माझा जीव भांड्यात पडेल. बरे वाटले ऐकून. देवाने माझे गाऱ्हाणे ऐकले म्हणायचे. तुम्ही सर्वांनीही खूप धावपळ केली हं शऱ्यासाठी. तुमचेही अभिनंदन !
आता जरा शांत झोप घ्या. तुम्हीही रात्र रात्र त्याच्या चिंतेत जागून काढलेल्या आहेत. आता आज निवांत झोप घ्या. उद्या घरी आणले की कळव मला.. शुभ रात्री..! ”

“ आमचे कसले अभिनंदन आज्जी.. खरं तर त्यावेळी एसव्हीलाच जाणीव झाली की त्याला काहीतरी वेगळे होतेय. त्यानेच सुचवले की ‘मला ताबडतोब हॉस्पिटलला घेऊन चला’ म्हणून आम्ही घाई करून त्याला अक्षरशः टू्व्हीलरवर डबलसीट बसवून नेले. योग्य वेळी त्याला जर हे सुचले नसते तर आज परीस्थिती खूप वेगळी असली असती. आभार मानायचेच तर ते हॉस्पीटलच्या डॉक्टर आणि नर्सेसचे मानायला हवेत. त्यांनी वेळीच योग्य उपचार केले म्हणून आज आपला एसव्ही वनपीसमध्ये ठणठणीत आपल्या सोबत ह्या जगात दिसतोय. ”

“ खरंय तुझे. त्यांचे तर कौतुक आहेच पण तुमचे विशेष कौतुक ह्यासाठी की तुम्ही त्याला वेळेत तिकडे पोहोचवले ज्यामुळे डॉक्टर्स वेळेत उपचार करू शकले. जर तुम्ही वेळेवर पोहोचवले नसते तर डॉक्टर तरी काय करू शकले असते? त्यामुळे ह्यात जितके श्रेय हॉस्पिटल स्टाफचे आहे तितकेच तुमचेही आहे. एकदा शऱ्या पुर्ण बरा होऊन हिंडा फिरायला लागला ना की माझ्याकडून सगळ्यांना जंगी पार्टी.
मी पण त्या काळात तुम्हाला खूप त्रास दिला ना? एकीकडे शऱ्याने सुचना दिलेली, दुसरीकडे गोळेबाईंची सुचना कुणाला न भेटू द्यायची त्यात मी तुमचे सतत डोके खात होते पण तुम्ही अजिबात न वैतागता, मला न दुखावता आणि गोळेबाईंच्या सुचनांचाही आदर करून प्रसंग सावरण्याचा प्रयत्न केलात.
आम्ही जूनी मंडळी सतत आजच्या नव्या पिढीवर ताशेरे ओढत असतो की आजकालची पिढी खूप गैरजिम्मेदार, कॅज्युअल, प्रसंगाचे गांभीर्य नसणारी, उथळ विचारांची वगैरे वगैरे... पण तू आणि सिनूने तुमच्या वागणूकीतून आमचे हे विचार पुर्णपणे खोडून काढत हे सिद्ध करून दाखवलेत की आजची पिढीही तितकीच काळजीवाहू, प्रसंगानुरूप गांभीर्याने विचार करून वागणारी आहे. फक्त आतून तुम्ही जितके मॅच्युअर असता तितके बाहेरून दाखवत नाहीत. सतत गंभीर असल्याचे कॅरेक्टर घेऊन मिरवत नाहीत स्वतःला म्हणून आम्हाला वाटते की तुम्ही खूप उत्श्रृंखल आहात, तुमच्यात वागण्या बोलण्याचे तारतम्य नाही, पण \"दिसते तसे नसते म्हणून जग फसते!\" हेच खरे.
बरं चल, माझे लेक्चर परत सुरू झाले. तू बोअर होत असशील. आधीच शऱ्याच्या धावपळीत थकला आहात त्यात मी असले काहीतरी बोलून तुझा वेळ खातेय आणि तरीही तू माझ्या आदराखातर संयमाने सगळे ऐकतोय.
त्यामुळे आता अजून लेक्चर देत नाही. ठेवते फोन. पण तू काय होतील त्या बाकी घडामोडी कळवत रहा हं मला.
गूड नाईट! झोप शांत. ”

“ओके आज्जी, तुम्ही पण शांत झोप घ्या. गूड नाईट ! ”

फोन संपला आणि मालाच्या डोळ्यातून नकळत अश्रू ओघळायला लागले. मात्र हे आनंदाश्रू होते. तिचे तिलाच आश्चर्य वाटत होते आपण चक्क शऱ्यासाठी इतके इमोशनल झालोय की त्याच्या काळजीने आपली कित्येक दिवसांची झोप उडाली आणि आता तो सुखरूप घरी परततोय ऐकून आपल्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहताहेत.
कॉलेजात असताना ह्याच शऱ्याकडे आपण साधे ढुंकूनही पाहत नव्हतो. जणू तो आपल्या कुठल्याच स्टेटसला शोभत नाही ह्या ॲटिट्यूडने आपण वागायचो आणि आज तोच माझा इतका जवळचा मित्र झालाय की त्याच्या काळजीने मी आतून हललेय. आयुष्य प्रत्येक वळणावर किती वेगवेगळे रंग दाखवते ना !
आपणच आपल्याला कधीकधी पूर्णपणे ओळखत नाही असे वाटते.
जीवनाच्या कुठल्यातरी टप्प्यावर मग आपणच आपल्याला नव्याने सापडतो किंवा मग जीवनातील वेगवेगळे प्रसंग आपलीच आपल्याशी नव्याने ओळख करून देतात..
त्यावेळची मी आणि आजची मी ह्यात किती जमिन-अस्मानाचा फरक झालाय आणि हा फरक केवळ आणि केवळ माझ्या ह्या शऱ्यामूळे झालाय. मित्रा तुझे लाख लाख धन्यवाद माझीच माझ्याशी एका नव्या पण जास्ती चांगल्या रूपाशी ओळख करून दिल्याबद्दल…
एक वेळ अशीच होती जेव्हा शशी माझ्या आयुष्यात आला. शशीच्या येण्यानेही मी खूप बदलले. कितीही मान मरातब कमावला तरी पाय कसे जमिनीवर टेकवून राहिले पाहिजे हे शशीने शिकवले होते तेव्हा. त्याचे ते साधे राहणे मला तेव्हा मुळीच आवडायचे नाही पण नंतर जसजसे त्याला ओळखत गेले तसतसे त्याला समजू लागले की त्याची साधी राहणी ही त्याच्या व्यक्तित्वाला खरे तर अधिकच उजाळा देत होती. कारण माघारी लोक त्याच्या साधी राहणी उच्च विचारसरणीचे किती कौतुक करत. कसला म्हणून गर्व नसायचा त्याला आपल्या ॲचिव्हमेंट्सचा. त्याच्या उच्च पदस्थ नोकरी आणि रूतब्याचा आपणच माज करायचो चार लोकांत पण हा नेहमी जमिनीवर. जास्त फळं लगडलेले झाडच खाली झुकलेले असते हा नियम आपल्या कधी विचारातही नसायचा. पण हळूहळू त्याच्या संगतीत राहून राहून आपणही बदलत गेलो. आचार विचारांनी समृद्ध होत गेलो.
पण इतका स्वतःच्या शरीरस्वास्थ्याकडे लक्ष पुरवत असुनही त्याला कधीच कसे शरीराने दिलेले संकेत समजले नाहीत!!!
गोळे बाई तर काल म्हणाल्या की प्रत्येक शरीर विपरीत काही घडणार असेल तर तशा आगाऊ सुचना किंवा संकेत देते मग आपल्याला किंवा शशीला ते ओळखता का आले नाहीत !!

जाण्याआधी महिनाभर सतत शशीला ॲसिडिटी, काहीही खाल्ले की पोटात जळजळ वगैरे तक्रारी होत होत्या.
आपण नॉर्मल ॲसिडिटी समजून सतत ॲंटासिड देत राहीलो. तो इतका फिट होता शरीराने की त्यालाच काय मलाही कधी वाटलेच नाही की हीच ॲसिडिटी त्याचा घात करेल.
खरंतर तोच शरीराने दिलेला संकेत होता. अगदी असह्य वेदना आणि त्रास झाल्यावर आपण दवाखान्यात नेले पण काहीच फरक पडला नाही आणि अखेरीस हार्ट ॲटॅकने तो अवेळी मला सोडून गेला. शऱ्यासारखे लवकर लक्षात आले असते तर कदाचित आज शशी सुद्धा आपल्यासोबत जीवंत असला असता…!

असोऽऽऽ… ह्या ‘ जर…..तर ’ ला आयुष्यात तशीही काही जागा नसते. असे झाले असते तर तसे घडले असते वगैरे हे फक्त मनाच्या समाधानासाठी बोलले जाणारे संवाद असतात. जे घडायचे असते ते घडतेच. त्याची वेळ आली होती म्हणूनच कदाचित आपल्या अकलेवर पडदा पडला असावा आणि म्हणून शरीराचे संकेत आपल्याला वाचता आले नाहीत…
पण काही का असेना शऱ्याला मात्र त्याचे बोनस लाईफ मिळाले ह्याहून आनंदाची बाब ती काय!!! निदान त्याला तरी त्याचे संकेत वाचता आले हे काय कमी आहे!
देवा अशीच कृपा असुदेत रे त्याच्यावर. निदान माझा हा सवंगडी तरी तू माझ्यासोबत असाच शेवटपर्यंत ठेव सुदृढ आणि निरोगी…!!! ”

मनोमन देवाचे आभार मानून माला अंथरूणावर लवंडली. आज कित्येक दिवसांनी मालाला समाधानाची झोप लागणार होती. गेल्या काही रात्री शऱ्याच्या काळजीने तिची झोप जणू गायबच झाली होती. सतत मनात नाही नाही ते विचार येऊन कधी रात्र संपते असे व्हायचे मालाला. पण आज मात्र त्या सगळ्या चिंता आणि काळजीतून तिची मुक्तता झाली होती पण आता ओव्हर एक्साईटमेंटमूळे तिला झोप येत नव्हती.

रात्र संपून कधी दिवस उजाडतोय आणि मी कधी एकदा शऱ्याशी बोलतेय असे मालाला झालेले. सतत शऱ्या भेटला की काय बोलायचे, कसे बोलायचे ह्याचेच मनातल्या मनात प्लॅनिंग सुरू.
अखेरीस विचारांच्या ओघात कधीतरी आपोआप निद्रादेवीने आपला पाश टाकला आणि माला झोपेच्या आधीन झाली.
—------------------------------------------------------------
क्रमशः - 18

शऱ्याच्या सुखरूप घरी येण्याच्या बातमीने सैरभैर झालेल्या मालाचे मन जून्या कितीतरी घटनांचा पुन्हा आढावा घेतेय. पण अखेरीस शेवट गोड झाला… आणि शऱ्या घरी परततोय. आता प्रतिक्षा शरद आणि मालाच्या भेटीची. काय होणार पुढे?
हे वाचायला पुढील भाग नक्की वाचा.
हा भाग कसा वाटला ते प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा.धन्यवाद.
@राधिका.

🎭 Series Post

View all