Login

म्हणून जग फसतं! -17

दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं हे सांगणारी हलकीफुलकी मनोरंजक कथा.


म्हणून जग फसतं! -17
©®राधिका कुलकर्णी.


माला जबरदस्तीने कुणाचेही काहीही न ऐकता आयसीसीयू वॉर्डच्या दिशेने घाईघाईने निघाली. सिनू आणि रघुपती तिला रोखण्यासाठी प्रयत्न करत तिच्या मागे जात होते. ही सगळी वरात आयसीसीयू विभागाकडे निघाली तोच साक्षात गोळेबाईच आयसीयू वॉर्डच्या दरवाजातून बाहेर आल्या. त्यांनी हा गोंधळ बघून रघुपतीलाच विचारले,

“ अरे हा काय आवाज आहे? हे हॉस्पिटल आहे,मच्छी बाजार नाही आणि सांगितले होते ना इकडे कुणालाही भेटायला घेऊन यायचे नाही, मग ह्या इथे कशा आल्या?? आणि हा कसला गोंधळ माजलाय? ”

गोळे बाईंनी रघुपती आणि सिनूचीच कान उघाडणी केली तशी मालाही जराशी वरमली. पण तरीही हे दोघे काही बोलायच्या आतच माला गोळेबाईंजवळ जाऊन बुजल्या स्वरात आपली कबूली देत बोलली,

“ सॉरी डॉक्टर मॅडम, हा आवाज माझ्यामुळेच झालाय पण ह्याला कारणीभूत ही दोन मुले आहेत. कालपासून माझा मित्र *श्री.शरद वर्तक* इकडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि ही मुले मला काहीच सांगत नाहीएत की नेमकं त्याला काय झालेय आणि तो आयसीयू वॉर्डमध्ये का ॲडमिट आहे?
कालपासून हे वेगवेगळी कारणे देऊन मला त्याला भेटण्यापासून रोखताहेत आणि आधी तर ह्यांनी तो सुखरूप घरी आराम करतोय असे सांगितले आणि मी आज सकाळी त्याच्या घरी भेटायला जाऊ म्हणाल्यावर सांगिताहेत की तो हॉस्पिटलमध्ये आहे. मी इकडे काळजीने पोखरून निघालेय आणि ही मुले मला उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळायचा प्रयत्न करताहेत. आणि काहीच सत्य सांगत नाहीयेत.
म्हणून मग आज मी हट्टाने इकडे हॉस्पिटलमध्ये आले तर, आता इथे आल्यावर कळतेय की तो आयसीयूमध्ये ॲडमिट आहे.
डॉक्टर आता तुम्हीच काय तो गूंता सोडवा. नेमके माझ्या मित्राला झालेय तरी काय?
आणि का एवढी गुप्तता पाळली जातेय ह्याच्या दुखण्याची?? मला तर काहीच कळेनासे झालेय. माझा जीव नुसता टांगणीला लागलाय कालपासून. कोणीच काही धडपणे सांगत नाहीये. प्लीज तुम्ही तरी खरे काय आहे ते सांगा ना मला. ”

मालाने घाईघाईने सगळी मनातली खदखद गोळे बाईंसमोर व्यक्त केली.
त्यावर गोळेबाईंनी मालाच्या पाठीवर हात ठेवून तिला म्हणाल्या,

“ हो, होऽ, होऽऽ, सांगतेऽ. सगळेऽ सांगते. हे बघा इतके पॅनिक होऊ नका. आधी तुम्ही शांत व्हा बघू. इतके एक्साईट होणे तुमच्या तब्येतीला योग्य नाही. कोण आहे रे तिकडे, जरा पाणी आणा. ”

गोळे बाईंनी मागवलेले पाणी पिऊन माला थोडीशी शांत झाली तशी त्यांनी तिला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले.

“ या, आपण माझ्या केबिनमध्ये बसून सविस्तर बोलू.”

म्हणत गोळेबाईं आपल्या केबिनकडे जाऊ लागल्या. त्यांच्या पाठोपाठ मुकपणे मालाही केबिनमध्ये गेली.

डॉक्टर समोरच्या खुर्चीत बसत गोळेबाई आता काय सांगतात ह्याकडे मालाचे लक्ष वेधले होते.
कानांचे द्रोण करून ती ऐकायला उत्सुक झाली होती.
गोळेबाईंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली.

“ प्रथम मला सांगा तुम्ही शरदरावांच्या कोण?
काय नाते तुमचे त्यांच्याशी? ”

“ मी शरदची बालमैत्रिण. आम्ही कॉलेजला एकत्र होतो शिकायला. कर्मधर्मसंयोगाने मी पण शऱ्याच्याच.. सॉरी आय मिन शरदच्याच सोसायटीत रहायला आले मागल्या वर्षी. सहजच एका सोसायटी कार्यक्रमात आमची भेट झाली आणि मग पुन्हा जवळपास ५० वर्षांनी आम्ही एकत्र आलो. आणि आता चांगले मित्र झालो एकमेकांचे.
कालही ट्रेक टूर मध्ये आम्ही सोबतच होतो आणि अचानक तो गायब झाला. तेव्हापासून मी रघुपतीला विचारतेय पण सतत काही ना काही उत्तरे देऊन तो मला सत्य सांगणे टाळतोय अशी मला कुठेतरी शंका येऊ लागली म्हणून मग नाईलाजाने मला हे पाऊल उचलावे लागले. सॉरी. ”

“ ओके. हरकत नाही. तर आता मी तुम्हाला सविस्तर सांगते. त्याचे असे झाले की काल शरदरावांना अचानक छातीत दुखायला लागले. अंगाला किंचित थरथर पण जाणवत होती. ही लक्षणं काही नॉर्मल नाहीत हे त्यांच्या लक्षात येताच ते घाईने इकडे आले. चेक-अप दरम्यान असे लक्षात आले की ही सगळी लक्षणं हार्ट ॲटॅक येण्यापूर्वीची आहेत.
आपलं शरीर फार सेन्सिटिव्ह असते. ते सुक्ष्मातिसूक्ष्म बदल आपल्याला काहीना काही लक्षणांमधून सुचीत करत असते. बऱ्याचदा लोक त्या सुचना समजू शकत नाही आणि त्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणून मग अति झाल्यावर दवाखान्यात जातात पण काही उपचार करायला तेव्हा अवधी मिळत नाही.

पण सुदैवाने शरदराव नियमितपणे व्यायाम करून शरीर तंदुरुस्त ठेवायचे त्यामुळे त्यांना हा बदल पटकन लक्षात येणे शक्य झाले. साधारणपणे ही लक्षणे दिसल्यावर लगेच उपचार मिळाला तर ऋदयविकाराचा झटका आपण रोखू शकतो. शरदरावांच्याबाबतीतही आपण तीच उपचारपद्धती निवडली. एक इंजेक्शन असते जे सात ते आठ तास आधी द्यावे लागते म्हणजे संभाव्य धोका आपण टाळू शकतो. तर काल त्यांना तेच इंजेक्शन देऊन आपण पुर्ण वेळ अतिदक्षता विभागात ऑब्झरव्हेशनमध्ये ठेवले. रात्री साडे बारा ते एकच्या दरम्यान ॲटॅक येण्याची शक्यता होती पण तो धोका सुदैवाने टळला आहे, म्हणजेच आमच्या डॉक्टरांना तो रोखण्यात आत्ता तरी यश आले आहे असे म्हणायला हरकत नाही.
तरीही प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून आपण त्यांना अजुनही अतिदक्षता विभागातच अंडर ऑब्झरव्हेशन ठेवणार आहोत. कदाचित नंतर पुन्हा तसाच धोका निर्माण झाला तर वेळीच त्यावर उपचार करता येईल म्हणून.
बट ही इज मच बेटर नाऊ. नो नीड टू बी वरीड ॲट ऑल.
आणि तुमच्यासारखे प्रेमळ मित्र असताना त्यांना कसं काही होईल !
तुमची प्रार्थना ऐकलीय देवाने आणि तुमचा मित्र एकदम ओके आहे आता. त्यामुळे मुळीच घाबरू नका. फक्त आता हॉस्पिटलमध्ये येऊन गर्दी करु नका. कारण पेशंटला आरामाची गरज आहे. एकाकडून दुसऱ्याला कळले आणि सगळेच भेटायला येऊ लागले तर त्याचा पेशंटला त्रास होऊ शकतो म्हणून मीच ह्या पोरांना ‘कुणाला काही सांगू नका’ अशी ताकीद दिली होती. ती मुले जे काही वागली ते माझ्या सांगण्यावरून वागली. सोऽ, आता त्या मुलांवर राग करू नका.
इकडे जे काही कळेल ते ती मुले तुम्हाला अपडेट करतीलच पण आत्ता मित्राला भेटायची घाई करू नका. ही विनंती आहे माझी. ”

बापरेऽऽ,हे खूपच शॉकींग आणि अविश्वसनीय आहे शरदच्या बाबतीत!
वरकरणी तो किती तंदुरुस्त दिसतो पण आतून काय होते ते कुणालाच कळू शकत नाही. दिसतं तसं नसतं.. म्हणतात ते काही खोटं नाही.
पण डॉक्टर, शरद तर इतका व्यायाम करतो. तब्येतीची काळजी घेतो.आहार पण नियंत्रित घेतो मग तरीसुद्धा त्याला हार्ट ॲटॅक येण्याचे काय कारण असावे??”

मालाने आपली शंका भीतभीतच विचारली. त्यावर गोळे बाईंनी पण न वैतागता छान उत्तर दिले.

“ काय असते की तुम्ही शरीराला बाहेरून कितीही तंदुरुस्त ठेवले तरी काही गोष्टी ह्या तुम्हाला जन्मजात मिळतात. ज्याला आपण हेरीडीटी किंवा जेनेटिक्समधून अनुवंशिकतेतून काही गोष्टी मिळतात असे म्हणू. जर ह्यांच्या आधीच्या पिढ्यांकडून ह्यांना हा अनुवंशिक दोष वारस्याने प्राप्त झाला असेल तर असे घडणे स्वाभाविक आहे. आणि ह्यांच्या फॅमिली हिस्ट्रीत हे आहे. त्यामुळे त्यांना हे अगोदरच सांगून ठेवले होते मी. त्याप्रमाणे ते स्वतःकडे लक्ष ठेवून असत. आणि तसेही आजकालच्या जगण्याची बदलती जीवनशैली, अति किटकनाशक फवारणी केलेल्या भाज्यांचा वापर, स्ट्रीट फूड,जंक फूड, वयोमान, रक्त घट्ट होणे, अशी एक ना अनेक कारणे असू शकतात. फक्त वेळीच शरीराच्या सुचनांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ते त्यांनी केले म्हणून आज ते सुखरूप आहेत अन्यथा काहीही घडू शकले असते. ”

हे सगळे ऐकून माला तर सुन्नच झाली. गोळेबाईंच्या विनंतीला मान देत शऱ्याला न भेटताच ती जायला तर निघाली पण खुर्चीतून उठायला गेली आणि अचानक तिला गरगरल्यासारखे झाले. ती तोल जाऊन पडणार तोच गोळेबाईंनी तिला आधार देऊन पुन्हा खुर्चीत बसवले.
पटकन त्यांनी तिचे हार्टबीट्स, बीपी चेक केले. बातमी ऐकून कदाचित धक्का बसल्याने तिचा बीपी वाढला होता. गोळेबाईंनी ताबडतोब रघुपती आणि सिनूला तिला एका बेडवर झोपवायला सांगितले. तिथेच तिच्यावर योग्य ते उपचार करून तिला जरावेळ आराम करायला सांगून गोळेबाई इतर पेशंटना बघायला निघून गेल्या.
अर्ध्या तासाने तिला जरा बरे वाटले तसे गोळेबाईंनी तिला जायची परवानगी दिली. सिनू तिला जसा आणला तसाच घरापर्यंत सोडवून आला.

आता मालापासून कुठलीच गोष्ट लपून नव्हती त्यामुळे दोघेहीजण मालाला रोजच्या रोज शरदबद्दल सर्व अपडेट्स देत होते. आता मालाच्या दिनचर्येत शऱ्याचे अपडेट्स घेणे ह्या आणखी एका कामाची वाढ झाली होती.
तिला जणू सवयच लागून गेली होती. रोज सकाळ झाली की दोघांना मेसेज करून शऱ्याच्या तब्येतीबद्दल विचारणा करायची आणि मगच अंथरूण सोडायचे.

इकडे मधल्या काळात ठरल्याप्रमाणे यमूज् फूडकॉर्नरला भेटायच्या प्लॅनबद्दल रंग्या पण सतत विचारणा करू लागला होता. "कधी भेटायचे, कधी येताय वगैरे वगैरे…" शरदचा फोन बंद का येतोय? ह्याबद्दलही तो मेसेजेसमधून चौकशी करत होता.

\" तो गावी गेलाय तिकडे फोनला रेंज नसते म्हणून कदाचित फोन स्विच ऑफ लागत असेल ’असे काहीतरी सांगून तिने वेळ मारून नेली.
\" तो गावाहून परत आला की भेटू ’ असे आश्वासनही तिने देऊन टाकले. त्यामुळे रंग्या तरी आता तात्पुरता शांत झाला होता.

करता करता असेच आठ दिवस उलटून गेले आणि अचानक रघुपतीचा रात्री फोन.
मालाच्या काळजात पुन्हा धस्स झाले. हा रघुपती स्वतःहून कधी चुकूनही फोन न करणारा आत्ता का फोन करतोय?
शऱ्याबद्दल तर काही नसेल नाऽ?
शऱ्या बरा तर असेल ना?

मालाच्या मनात शंकाच्या भुतांनी पुन्हा थैमान घालायला सुरुवात केली.
भीतभीत थरथरत्या हातानेच तिने फोन उचलला…..

“ हॅलोऽऽऽऽऽ………! ”

—------------------------------------------------------------
क्रमशः - १७

रघुपती का फोन केला असेल? काय बातमी कळणार आहे मालाला?
पाहूया पुढील भागात.
हा भाग कसा वाटला हे लाईक कमेंटद्वारे नक्की कळवा.
धन्यवाद.
@राधिका.

🎭 Series Post

View all