Login

म्हणून जग फसतं! -15

दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं कसं?ते वेगवेगळ्या हलक्या फुलक्या प्रसंगाद्वारे दर्शवणारी मनोरंजक कथा.


म्हणून जग फसतं! -15
©®राधिका कुलकर्णी.

“ हे बघ रघूपती, आता टूरही संपली, आपण सगळे सुखरूप खाली पोहोचलोय आणि सगळे आपापल्या मार्गाने निघून पण गेलेत. आता मला माझ्या प्रश्नाचे उत्तर दे,कुठेय शरद ? ”

अधिरतेने मालाने रघूपतीला विचारले जो एसव्ही म्हणजेच शऱ्याच्या तरूण गॅंगपैकीतला एक उत्साही कार्यकर्ता होता. \"खाली गेल्यावर बोलतो\" असे म्हणून त्याने मगाशी मालाला गप्प केले होते. पण आता मालाने त्याला बरोबर कात्रीत पकडले होते. खाली जाईपर्यंत ह्या विसरतील असे रघुपतीला वाटले होते पण माला काही विसरली नाही. ती आपल्या प्रश्नावर अडूनच बसली होती.
\" ह्या आज्जीची मेमरी पण भारीच शार्प आहे! काय करावे!\" मनातल्या मनात चाललेले विचार चेहऱ्यावर न दिसू देता रघुपतीने अगदी सहजपणे उत्तर दिले.

“ अहो आज्जी, एस.व्ही.ला फक्त जरासं अस्वस्थ वाटत होतं. कदाचित ह्या ट्रेक टूरच्या गडबडीत आज तो बीपीची गोळी घ्यायला विसरला म्हणून त्याला हॉस्पिटलला घेऊन गेला आमचाच एक मित्र आणि आता तो ठीक आहे. त्याच्या घरी आराम करतोय. एक्झर्शन झाले असल्याने डॉक्टरांनी त्याला सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितलीय. बाकी सगळे लोक हे ऐकून एकदम पॅनिक होतील म्हणून एसव्ही.च म्हणाला की \"कुणाला काही सांगू नका.\" तुम्ही निश्चिंत रहा. त्याला काही झालेले नाही. बराय तो. तुम्ही पण घरी जा आणि आराम करा आता. दमल्या असाल ना सगळ्या धावपळीने. मी येऊ का वरपर्यंत सोडायला? ”

त्याने मालाला डायव्हर्ट करण्याचा पुर्ण प्रयत्न केला पण
रघुपतीच्या बोलण्याकडे सबशेल दुर्लक्ष करत मालाने आपला तर्क लढवत विचारले,

“ हे सगळे इतके साधे सरळ होते तर त्याने माझा एकही फोन का उचलला नाही, सांग ? ”

“ ओह्… होऽऽ! ते होय. अहो त्याच्या मोबाईलची बॅटरी ऑफ झाली म्हणून त्याने फोन चार्जिंग करता माझ्याकडे दिला होता.
आम्ही सगळे माझ्याच पावरबॅंकवर सगळ्यांचे फोन चार्ज करत असतो अशा कुठल्याही टूर्झ असल्यावर, म्हणून फोन माझ्याकडेच राहीला खिशात. नंतर तो पण विसरला आणि मी पण विसरलो. बरं झालं तुम्ही आठवण दिलीत ते. आत्ता जाऊन आधी त्याचा फोन परत देऊन येतो. ”

रघूपती देत असलेली कारणे का कुणास ठाऊक मालाच्या मनाला पटतच नव्हती. पण फोन खरंच त्याच्याचकडे असल्याने त्याला खोटं ठरवणही चूकच होते.
पण इतके सगळे योगायोग एकाच वेळी कसे घडू शकतात ?
ह्या क्षणाला तरी त्याच्यावर विश्वास ठेवण्यापलिकडे तिला दुसरा कुठला मार्गही दिसत नव्हता. नाईलाजानेच ती म्हणाली,

“ पण फोन देताना शऱ्याला माझा निरोप आवर्जून सांग की जेव्हा वेळ मिळेल तसा एक मेसेज कर म्हणून. नाहीतर तू तरी कळव फोन करून.,”

“ हो आज्जी, मी कळवतो निरोप आणि जर तो जागा नसेल तर तेही मी तुम्हाला फोन करून कळवतो. नका चिंता करू, येऊ मी? ”

अस्वस्थ मनानेच माला घरी आली. संध्याकाळ झाली होती. कुहूने देवघरात दिवा अगरबत्ती सगळे आधीच केले होते.
मालाने हातपाय धुवून सुचिर्भूत होऊन आधी कुहूने केलेला गरमागरम चहा घेतला. खूप दिवसांच्या भटकंतीने आणि त्यात शऱ्याच्या काळजीने डोकं जड झालं होतं. चहा घेतल्याने जरा तरतरी आली तशी ती देवघरात गेली आणि देवासमोर मनोभावे हात जोडले.

“ देवा माझ्या मित्राला काय झालेय माहीत नाही पण तू मात्र त्याला लवकर बरं कर! ”

तसे म्हणतच रोजचे भीमरूपीस्तोत्र, रामरक्षा अशी सगळी स्तोत्रे तिने पठण केली. दूर्गाकवच,दूर्गास्तोत्र पठणाने एखाद्यावरील संकट दूर होते हे ती ऐकून होती पण कधी वाचले नव्हते. इतकी पापभिरू किंवा देवभोळी माला कधीच नव्हती पण आज तिने ते दूर्गास्तोत्र पण वाचले शऱ्यासाठी.
संपूर्ण संस्कृतातील ते स्तोत्र. त्यामुळे त्याचे उच्चारण शुद्ध असणे अपेक्षित. त्यात मालाला रोजचा त्या वाचनाचा सराव नाही त्यामुळे ते वाचताना तिचा बराच वेळ गेला. सगळे वाचन झाल्यावर अंगाऱ्याचे बोट तिने भिंतीला लावले आणि मनोमन शऱ्याच्या सुस्वास्थ्याची कामना केली.
कुणासाठीही प्रार्थना करत असताना तुम्ही एखादे स्तोत्र, मंत्रपाठ केल्यावर ती व्यक्ती समोर नसेल तर ती समोर आहे असे स्मरून भिंतीला ते भस्म किंवा अंगारा लावला तर आपली प्रार्थना त्या व्यक्तीला पोहोचते असं तिने आज्जीला करताना बोलताना लहानपणी ऐकलेले. आत्ताही ती कृती करत ती देवघरातून बाहेर आली.
तोपर्यंत जवळपास तीन तास उलटून गेले होते. रघूपती फोन करून कळवतो म्हणलेला अजून केला नाही! निदान शऱ्याचा तरी काही मेसेज??
फोन चेक करता करता मालाच्या मनात विचार चालू. वॉट्सॲपवर पण कुठेच काही मेसेज नाही.
हे चाललेय तरी काय? रघूपतीला करू का फोन?
तिने लगेच कृती केली. रींग जात होती.

“ अरे काय हे रघूपती, तू फोन करून कळवतो म्हणाला होतास ना, विसरलास का ?”

“ अरेऽऽ सॉरी आज्जी. खरंच सॉरी. बरं ऐका ना मी आत्ता सोसायटीच्या ऑफिसमध्ये खूप महत्त्वाच्या कामात बिझी आहे, मी तुम्हाला नंतर फोन करू का?
चला, बाय हं…..”

\"अरे प…णऽ पण\" म्हणेपर्यंत त्याने फोन ठेवला सुद्धा…

*काय करावं बाई ह्या आजकालच्या मुलांचं! ना कुठला शब्द पाळायची गरज ना वेळ पाळण्याची गरज वाटत. दुसरे लोक काळजीत असतील ह्याची पण फिकीर नाही. बेफिकीर वृत्ती नुसती! कसं होणार ह्या पिढीचं!*

मनातल्या मनात रघूपतीचा राग समस्त नव्या पिढीवर काढत ती डायनिंग टेबलवर गेली. स्वयंपाकीण मावशी कधीच स्वयंपाक करून गेल्या होत्या पण ट्रीपमध्ये खूप प्रकार खाण्यात आल्याने मालाला विशेष भूक नव्हती. तोंड उष्टावण्यासाठी थोडासा आमटी भात खाऊन ती पानावरून उठली.


अस्वस्थ मनात प्रश्न आणि शंकांच्या गुंतवळांचे पुंजके इतके वेगाने चक्राकार घुमायला लागले की माला त्यात कधी गुरफटत गेली तिचे तिलाही कळले नाही.

एव्हाना रात्रीचे दहा उलटून गेले होते. झोपायची वेळ होत आलेली तरीही \"परत फोन करतो\" म्हणून पुन्हा रघुपतीने फोन टाळला.
काय कारण असेल? सगळेच काहीतरी लपवताहेत का आपल्यापासून?
शऱ्या पण आपल्याला काही न सांगता गेला. खरच काही सिरीयस तर नसेल ना! कदाचित त्याच्या बायकोला आवडले नसेल का त्याचे माझ्याबरोबर असणे? म्हणून काही लफडा झाला असेल आणि हा तिची समजूत काढायला घरी गेला असेल का??
की हे सगळे माझ्याच मनाचे खेळ आहेत?
विचारांच्या भोवऱ्यात मालाची नाव गटांगळ्या खात होती. अस्वस्थ मनाच्या अवस्थेत असाच मालाचा डोळा लागला………

आणि अचानक कधीतरी उशालगतचा फोन वाजला. आपसूक नजर भिंतीवरल्या घड्याळावर पडली. पहाटेचा दोन वाजलेला. एवढ्या अपरात्री कुणाचा फोन!
मालाने धास्तावल्या मनानेच फोनचा स्क्रीन बघितला. रघुपतीचे नाव पाहून ती दचकली. काळजात चर्र झालं. रात्री दोन वाजता हा का फोन करतोय आपल्याला?
तिने घाईतच उचलला.

“ काय रे, इतक्या रात्री का फोन केलास, सगळे बरेय ना… श…ऱ्य ? ”
वरचा प्रश्न विचारताना इकडे तिची जीभ रेटत नव्हती की काही अघटीत तर सांगणार नाही ना हा !

“ नाही आज्जी, सगळे ठीक नाहीये.”

“काय झाले,कसाय शऱ्या?”

“ आज्जी तुमचा शऱ्या गेलाऽऽऽ.”

“ काऽऽऽऽय!! कसे शक्यय हेऽऽ?
नाऽऽऽही.
हे शक्य नाही ! ”
.
.
.
.
.
नाऽऽऽही…… नाहीऽऽ …! असे अस्पष्ट हुंकार उच्चारतच माला खडबडून जागी झाली.
तिचे सर्वांग घामाने थबथबलेले. अंगात किंचित थरथर जाणवतेय. ह्या साऱ्या जाणीवा इतक्या सजीव होत्या की अजुनही मनाला कळत नव्हते की सत्य काय आणि स्वप्न काय?
खात्री करायला तिने फोन हाती घेतला. फोन गॅलरीत कोणताच फोन किंवा मेसेज आलेला नव्हता.
म्हणजे ते एक दु:स्वप्न होते तर!
तिच्या डोळ्यांतून धारा लागल्या होत्या. ते आनंदाश्रू होते की शऱ्याला काही झालेले नव्हते. ती पटकन उठली.देवघरात गेली. एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून देवापुढे हात जोडून प्रार्थना केली की आत्ता जे स्वप्न दाखवलेस ते खोटे ठरू देत आणि शऱ्या अगदी ठणठणीत असू देत.थोडावेळ देवघरातल्या त्या शांत वातावरणात तिलाही शांत वाटले. पण क्षणभरच! पुन्हा विचांरांची गिरणी सुरू.
\"पहाटेची स्वप्न खरी होतात म्हणे!\" मग हा मला मिळालेला संकेत तर नाही?
डोक्यातली शंकेची पाल चुकचुकणे काही थांबवत नव्हती.
\"मन चिंती ते वैरी न चिंती।\" ह्या उक्तीप्रमाणे मालाच्या मनात असंख्य विचारांची जळमटं तिच्या मन:शांतीला गढूळ करत होती. एकदा एखाद्या वाईट विचाराने मनाचा ताबा घेतला की ते भीतीची पिश्शाच्चं आपल्या सर्व सदसद्विवेकबुद्धीचा विनाश करून मन आणि शरीराला फक्त तेच योग्य असल्याचा आभास निर्माण करतात जे मानणे शरीर आणि बुद्धीला जड जात असते.
आत्ता मालाचीही अवस्था ह्याहून वेगळी नव्हती. ती खूप घाबरली होती ह्या स्वप्नाने. काय करावे तिला काहीच सुचत नव्हते. एवढ्या रात्री आपण उठून बसलोय बघून आई पण जागी होईल ह्या विचाराने ती अंथरूणावरच पडून राहीली.
ह्या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत कधी एकदा सकाळ होते ह्याचीच माला वाट पाहत होती………

—---------------------------------------------------------
क्रमशः - 15

उद्याची सकाळ काय घेऊन येते ? मालाचे स्वप्न खरे ठरेल की खोटे? रघुपती मालापासून नेमके कोणते सत्य लपवतोय??
हे वाचायला पुढील भाग नक्की वाचा.
हा भाग कसा वाटला तेही अभिप्राय देऊन नक्की कळवा.
धन्यवाद.
@राधिका.

🎭 Series Post

View all