Login

म्हणून जग फसतं!-14

दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, ह्याचा प्रत्यय देणारी हलकीफुलकी मनोरंजक कथा.

म्हणून जग फसतं!-14
©® राधिका कुलकर्णी.


“ तर अशी आहे माझ्या आणि यमूच्या लग्नगाठी मागची थ्रिलिंग स्टोरी. ”

” एऽऽ रंग्या तुझी स्टोरी तर खरंच फिल्मी आहे रे !

आणि ॲम रीअली सॉरी!

मगाशी दुरून तुला आणि शऱ्याला बोलताना बघून मलाही इतरांप्रमाणेच वाटले होते की शऱ्या काय कुणाशीही ओळख करून देतो उगीच. आणि नंतर प्रत्यक्ष तूच रंग्या आहेस कळल्यावर आत्ताही मी मनातून घाबरले होते खरं सांगते. कोणी सांगितले असते ना की तू इतका बदललाएस तरी विश्वास बसला नसता पण आज प्रत्यक्ष तुला भेटून तुझ्याच तोंडून तुझी कहाणी ऐकून पटले की जगात काहीही घडू शकते.
यमूनाला खरंच मानायला हवे हं. तिने तुझ्यातलं माणुसपण निवडलं. रंगरूपासारख्या नश्वर गोष्टींना डावलून असली शंभर नंबरी सोनं कमावलं तिने. एऽ रंग्या तिला का नाही घेऊन आलास रे आज?
तिची माझीही भेट झाली असती नाऽऽ ह्या निमित्ताने. ”


“ अगंऽ, हे ह्या शऱ्याला विचार. हा मला ही ऑर्डर देताना इतकंच बोलला की  *तू स्वतः ऑर्डर घेऊन ये. तुझी एकांशी ओळख करून द्यायचीय, नक्की ये.*

जनरली आम्ही अशी कोणतीही ऑर्डर आली तर डिलिव्हरी बॉईज थ्रू पोहोचवतो पण शऱ्या आपला यार/दोस्त इतकी रीक्वेस्ट केला म्हणून मी स्वतः आलो. आणि तो कुणाला भेटवतोय ही उत्सुकता पण होतीच म्हणून मी पीक अवर्स असूनही स्वतः आलो ऑर्डर घेऊन. आता जे काय विचारायचे यचे ते ह्या शऱ्याला विचार. माझा काही दोष नाही ह्यात. ॲम इनोसंट क्रिचर यू नो! ”



“ अरे वाह! बास का ? हे बरेय तुझं. सगळे खापर माझ्यावर फोडून तू इनोसंट क्रिचर काय?
ह्याला म्हणतात *चोराच्या उलट्या बोम्बा*.
परवा मला जे जे सांगितलस त्यात हा यमूचा टर्न कुठे सांगितला होतास तू मला?
मला काय माहीत, तूमने अपने ही कॉलेज की लडकी को पटाया है शादी के लिये। साल्याऽ करणी करायची तू आणि सूळी मला चढव लेका. एवढी छान तुझी कॉलेज क्विनशी ओळख करून दिली ते गेले डॅश... डॅश मध्ये. सालाऽऽ भलाई का जमाना ही नही रहा। ”
दोघांची लागलेली तूतू-मैमै बघून माला मस्त आतल्या आत हसत एन्जॉय करत होती. शऱ्याचा गोरा चेहरा खोट्या खोट्या रागाने सुद्धा लाल गुलाबी झाला होता. रंग्या त्याला चिडवायला गालातल्या गालात खूसूखूसू हसत होता. आता प्रकरण आटोपते घ्यायला माला मध्ये पडली.

“ अरे एऽऽ, आता ह्यावरून पण भांडणार का तुम्ही? चला बट्टी करा. ह्याचाच अर्थ आता अजून एक फक्त आपली कॉलेज कट्टा भेट व्हायलाच हवी तेही लवकरात लवकर, what say gyes? ”

“ हो नक्कीच भेटूया. असे करा तुम्ही दोघे माझ्या *यमूज् फूडकॉर्नरला* या. आपण यमूला सरप्राईज देऊ. तिला खूप आनंद होईल कॉलेज क्विनला बघून. ”

“ एऽऽ कॉलेज क्विन काय रेऽ.. ? मला नावबीव काही आहे की नाही? एवढे चांगले *माला* नाव, त्याचा पण तुम्ही कचरा केलात. ”

आता रंग्या शरदकडे खाऊ की गिळू नजरेने बघू लागला. *ह्याने सगळेच कॉलेजचे सिक्रेट रीव्हील केले हिच्यापूढे.. काय गरज होती इतक्या डिटेलिंगची?*  ह्या अर्थी ती नजर होती. शरद पण नजर चोरून कधी खाली तर कधी रंग्याकडे बघत होता.
त्यांच्या एकमेकांना चाललेल्या खाणाखुणा आणि हावभाव बघून माला पुढे बोलली,

“ तू त्याला काही खाणाखुणा करु नकोस . मला शऱ्याने तुमचे सगळे उपद्व्याप सांगितलेत. मला काय चीड पाडलेलीत तुम्ही *माला-डी* ?, आणि त्यावर तुझे ते पांचट डायलॉग, सगळे सगळे मला कळलेय शऱ्याकडून. आता काही नजर चोरायची गरज नाहीये, कळलं ना ? ”

“ सॉरी कॉलेज क्विन.. आपलं ते माऽला.. सॉरी फॉर दॅट. पण आमच्या मनात काही नव्हतं गं. फक्त चीड होती ती. उलट जास्त वेळा आम्ही तुला नावाने कमी अन् ‘ *आली कॉलेज क्विन* !’ हेेच संबोधायचो त्यावेळी. म्हणून तेच तोंडात येते सारखे. ”

“ बरं बरं.. कळलं मला. आता बास झालं सॉरी पुराण. यमूला कधी भेटवतोस ते सांग.? ”

“ चालेल आजचा हा ट्रेक झाला की उद्या किंवा परवा नक्की प्लॅन करूयात. बरं चला. खूप वेळ झाला. यमू तिकडे एकटी आहे. आमच्या जॉईंटवर खूप गर्दी असते आणि आत्ता तर पीक अवर्स आहेत जेव्हा मी इकडे आहे. मला निघावे लागेल यार. तुम्ही कंटिन्यू करा. आपण भेटू नक्की. चला अच्छा..टाटा.. ”

रंग्या टाटा बाय बाय करून गेला आणि दोघेही एकदम शांत झाले. त्याच्या जाण्याने उगीचच एक पोकळी निर्माण झाली होती.‌ थोडावेळ कुणीच कुणाशी बोलले नाही.

आता लंचची वेळ होत आलेली. शरद पुढे जाऊन बाकीची तयारी बघायला गेला.
सगळे व्हॉलेंटीयर्स पटापट बूफेचा टेबल लावत होते. सगळे लोक आपापल्या आवडीनुसार पदार्थ निवडून जेवणाचा आस्वाद घेत होते ‌शरद मात्र प्रत्येकाला अगदी घरच्या कार्यात यजमानाने विचारावे तसे सगळ्यांना पर्सनली चौकशी करत होता. जेवण आवडले असेल तर *यमूज कॅची फूडकॉर्नर* साईटवर जाऊन फिडबॅक्स पण द्यायला लावत होता. ज्यांना ह्या गोष्टी जमत नव्हत्या त्यांना तो अतिशय नम्रपणे शिकवत होता. स्वतःचे जेवण सोडून तो हे सगळे अगदी उत्साहाने करत होता.
माला जेवता जेवता त्याच्या ह्या सगळ्या हालचालींना निरीक्षण करत मनातल्या मनात खजील होत होती.
‘ह्या वयाला ह्याच्याकडे इतकी एनर्जी कुठून येत असेल? इतकं आपल्या घरच्यासारखं सगळं काम अंगावर घेऊन करायची उर्मी ह्याला कुठून मिळत असेल?
जनरली लोक फक्त स्वतःपुरते जगत असतात आणि हा सतत आपला इतरांकरता झटत असतो, खरंच मानायला पाहिजे. "
विचारांच्या ओघात तिचे जेवण झाले तसे शरदने तिच्या रिकाम्या पानात पटकन एक गुलाबजाम वाढला.

“ अरे नको होता मला. मी जास्त गोड खात नाही माहितीय ना तुला? ”

“ अगं खा गं. एक खाल्ल्याने काही जाड होत नाहीस तू. खाऽ मित्राच्याखातर. आणि तुझ्या लाडक्या मैत्रिणीच्या किचनमध्ये बनलेला एकदम हायजिनिक आहे, खा गुपचूप. ”

“ सगळ्यांना इतक्या आग्रहाने खाऊ घालतोय आणि तू स्वतः जेवलास की नाही? का लोकांना खाऊ घालूनच पोट भरते तुझे? ”

“ अगं एऽ, बायकोसारखे टोमणे नको मारूस. कळतंय मला. बाकी टीमसोबत जेवतो आता. आम्ही सगळे ऑर्गनायझर्स एकत्र जेवतो सगळ्यांचे झाले की. नको काळजी करुस. ”

“ बरं आता पुढे काय प्लॅन आहे? ”

“ आता इकडे थोडे गेम्स खेळायचे. वरती एक देवीचे मंदिर आहे. तिथे दर्शन वगैरे घेऊन मग परतीला लागायचे.‌ ”

“ एऽ बाबा, मी नाही हं ते गेम्स बीम्स खेळणार. मला फार भीती वाटते. ”

“ अगं आपण काही मैदानी खेळ नाही खेळणार आहोत इकडे. सिनियर सिटीझन्सना खेळता येतील असेच खेळ असतात सगळे. तू बघ.मजा येईल तुला. ”

मग तास दोन तास गाण्याच्या भेंड्या, दमशिराज, कविता वाचन, संगीतखुर्ची, आणि विविधगुणदर्शनांतर्गत कोणी एखादे नाट्यपद म्हणून दाखवले, कोणी छोटीशी नाट्यछटा सादरीकरण केले. कोणी गायन. दोन तास कुणीकडे गेले कळलेच नाही.
शेवटी मंदिराकडे प्रस्थान करण्यास सुरुवात झाली. पुन्हा एकदा गृप करून साखळी साखळीने सगळे जण पायऱ्या चढून जाऊ लागले. मालाही आपल्या गृप बरोबर चाललेली. इकडे तिकडे नजर फिरवून शऱ्याला शोधत होती पण शऱ्या कुठेच दिसत नव्हता. आता हा कुठे अचानक गायब झाला? मनातल्या मनात विचार करतच तिने मंदिरात प्रवेश केला. फारशी गर्दी नव्हती.
बाहेरच्या प्रशस्त आवारात एक मोठी बाव (मोठ्या आकाराची खोल विहीर) होती जिथे भाविकांना हातपाय धुण्याची सोय केलेली. मालाने हातपाय धुवून सभामंडप ओलांडून गाभाऱ्यात प्रवेश केला.
देवी महालक्ष्मीच्या सुंदर रेखीव मूर्तीला खूप छान सजवले होते. लाल काठ पदराची हिरवी साडी, हातात हिरव्या बांगड्या, कानात काप, मोठ्या हिऱ्यांच्या कुड्या, गळ्यात हार.तिचे ते लखलखते तेजस्वी रूप मनाचे पारणे फेडत होते.
मालाने मनोभावे देवीला हात जोडले आणि बाहेर आली. बाहेर दगडी बाक होते भाविकांना बसायला त्यावर बसत मालाने सभोवताली नजर टाकली. सगळे होते पण शऱ्याच दिसत नव्हता. तिला काही समजेना. हा असा अचानक कुठे गायब झालाय?
तेवढ्यात समोरून त्यांच्या गृपचा एक लिडर येताना दिसला. ती घाईघाईने त्याच्यापर्यंत पोहोचली. तो जरासा गडबडीत वाटत होता. तरीही तिने त्याला हटकले आणि शरदची चौकशी केली.
त्यावर तो एकदम गप्प झाला.

तो काही उत्तर देत नाही बघून माला जरा जास्तच चिंतीत झाली. तिने पुन्हा आपला प्रश्न रीपीट केल्यावर तो थोडा गंभीर मुद्रेने जे काही बोलला ते ऐकून मालाच्या पायाखालची जमीन सरकली. भीतीने तिलाच गरगरायला लागले.
तिची ती भिरभिरलेली अवस्था बघून तो मुलगाही घाबरला. आता ह्या आज्जींना काही झाले तर काय करायचे?
त्याने पटकन एक जणांना फोन लावला.
दहा मिनिटात अजून एक मुलगा तिकडे धावत आला. पहिल्या मुलाने दुसऱ्याच्या कानात काहीतरी खूसफूस केली आणि मग तो दुसरा मुलगा त्वरित मालाकडे आला.


“ आज्जी काय होतेय तुम्हाला? बऱ्या आहात ना तुम्ही की मी तुम्हाला घरी सोडू गाडीवर? ”

“ त्याची काही गरज नाहीये. मी बरीय. मला फक्त आत्ताच्या आत्ता शरदकडे घेऊन चला. ”

“ आज्जी तुम्ही इथे शांत बसा. मी आत्ता आलो. थोड्या वेळातच आपण सगळे परतीच्या वाटेला लागणार आहोत. आपण आपल्या सोसायटीजवळ पोहोचलो की मी तुमच्याशी सविस्तर बोलतो. आत्ता मला जरा बाकी सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. मी आलोच. ”

असे बोलून तो मुलगा निघून गेला. पण माला मात्र अस्वस्थ झालेली. कधी एकदा खाली पोहोचतो आणि मी शऱ्याला भेटतेय असे तिला झालेले.
—-----------------------------------------------------------
क्रमशः -14

त्या तरूणाने मालाला असे काय सांगितले असेल ज्यामुळे ती इतकी अस्वस्थ झालीय?
शरद बरा असेल ना?
काय झाले ?
शरद अचानक गायब का झालाय?
हे सगळे जाणून घ्यायला पुढील भाग नक्की वाचा.
कसा वाटला आजचा भाग हे कमेंटद्वारे नक्की कळवा.
धन्यवाद.
@राधिका.

🎭 Series Post

View all