Login

म्हणून जग फसतं!-10

कुठल्याही घटना प्रसंग व्यक्ती बाबतीत आपण वरकरणी पाहून काही शिक्के मारतो पण प्रत्यक्षात तसे नसतेच ही शिकवण देणारी हलकीफुलकी मनोरंजक कथा म्हणून जग फसतं!

म्हणून जग फसतं!-10
©®राधिका कुलकर्णी.



“ मी 1970 बॅच का? विचारल्यावर शऱ्याचे डोळे लगेच विस्फारले. मी सहज म्हणालो *पाप्याचं पितरं!??*
आणि ह्याने लगेच तेवढ्या वेदनेत पण हो हो म्हणत मुंडी हलवली. मग ह्यानेही चाचरतच मला विचारले

" तू  रं….ग्या का ??"

च्यायलाऽ तेव्हा मला खरंच शऱ्याचे जाम कौतुक वाटले. काही म्हणा साले तुम्हा बामणांचा भेजा लईच तल्लख असतोय. अगं आत्ता मला बघून कोणीही मी तोच रंग्या आहे हे ओळखले नसते पण ह्याने अचूक ओळखले. तिथेच कडकडून गळाभेट घेतली आणि मग बाजूच्याच हॉटेलात दोन तास २० कप चहा ढोसत अखंड गप्पा झाल्या. जून्या स्मृतींना उजाळा देऊन झाला. त्यात बोलता बोलता तुझा विषय निघाला. आता तू कुठे असशील वगैरे सहज बोललो तर हा म्हणाला  *तुला भेटायचेय का तिला?*
मला वाटलं मस्करी करतोय पण खरंच भेटवेन म्हणल्यावर मी टरकलो. आता ह्या वयात कोण मुस्काड फोडून घेईल बे नकोच ते .. म्हणून मी नको बोललो तर मग ह्याने सगळा तुमच्या भेटीचा किस्सा ऐकवला. आता काही तू तेव्हासारखी जमदग्नी अवतारात अंगावर धावून येत नाही हे कळल्यावर धीर एकवटून इकडे आलो. आणि बरं का आत्ता जो नाष्टा तुम्ही केलात ना तो आमच्याच *यमूज कॅची फूडकॉर्नर* चा आहे. कशी वाटली चव आणि प्रिपरेशन, आवडली का? ”

“अरे वाह! ते *यमूज कॅची फूडकॉर्नर* तुझे आहे ? मला माहितच नव्हते. माझी भाच्ची खूपदा ऑनलाईन फूड ऑर्डर करते त्यात बरेचदा तुझ्या जॉइंटवरून पण आम्ही फूड ऑर्डर केलेय. खूप अप्रतिम चव असते पदार्थांची. काय पण योगायोग आहे ना !!
पण काय रे रंग्या म्हणजे राग येणार नसेल तर एक विचारू का? ”

“ मला माहितीय तू काय विचारणार, हेच ना की मी इतका कसा सुधारलो? ”

आपल्याच विनोदावर रंग्या गडगडाटी हसायला लागला.

खरंतर त्याने मालाचा प्रश्न अचूक ओळखला होता हे जाणून माला खजिलही झाली आणि त्याच्या हसण्याने थोडी कावरीबावरीही झाली.
स्वतःच स्वतःवर हसणे आणि विनोद करणे हे फार कमी लोकांना जमते आणि ज्यांना ही कला अवगत असते ते मनाने फार दिलदार असतात. दुसऱ्यांतील कमतरतेवर हसण्याऐवजी हे लोक आपल्याच कमतरतेवर हसून टीका करतात. आत्ता रंग्याने नेमके तेच केले. इथेच मालाला रंग्याच्या स्वभावाची खरी ओळख पटली.
आता तीही खुलून मोकळी होत त्याला म्हणाली,

“ किती मनकवडा आहेस रे, तुला कसं कळलं मला काय विचारयचेय? ”

“ अगं मग तुझ्या मनातलं आम्ही नाही ओळखणार तर कोण ओळखणार! जोक्स अपार्ट पण तुला खरं सांगू मला बदलवण्यात माझ्या बायकोचा खूप मोठ्ठा वाटा आहे. ”

“ दॅट्स वंडरफुल! अशी कोण व्यक्ती आहे बुवा जिने तुझ्यासारख्या गुंडांशी लग्न करायचे धाडस केले! की तिलाही तुच बळजबरीने लग्न करायला भाग पाडलं? ”

“ आता ह्या कहाणीत अजून एक ट्विस्ट आहे. आणि इकडे तुला अजून एक शॉक मिळणार आहे. गेस हू मॅरिड टू मी? ”

“ बापरे यू मिन मी ओळखते का तिला?”

“ यस ”

“ कोण माझ्याबरोबर, आपल्यासोबत होती का?”

" हो. "

“ बापरे तू तर मला कोड्यातच टाकलेस की. कोण रे आठवत नाही आता. काही तरी हिंट तर दे. ”

“ अगं तू भर कॉलेजमध्ये जेव्हा माझ्या श्रीमूखात भडकावली होतीस ना तेव्हा ही *चपटीच* रडायला लागली होती घाबरून. ती तुला सारखं समजावून सांगत होती की नको त्याच्या नादी लागूस ,आता तो तुला सोडणार नाही म्हणून. "

“ मला नाही आठवत रे. नाव सांग ना. ”

“ अगं ती नाही का शाळेतल्यासारख्या लांब दोन वेण्या घालून, परकर पोलक्यात यायची कॉलेजला पण. सगळे तिला खूप हसायचे. एकदम बहेनजी अवतारात यायची, आठवलं? ”

“ ओऽहोऽहोऽऽ! आत्ता आठवलं. नाव काय बरं तिचं?? आता आठवत नाही पण ती कायम माझ्यासोबतच असायची कॉलेजला. आमच्या फॅकल्टीज वेगळ्या होत्या पण तरीही ती माझ्या सोबत सतत रहायची. सगळ्यांना वाटायचे आम्ही जिग्री दोस्त आहोत वगैरे पण तसे काही नव्हते. ती खूप घाबरट होती म्हणून तिला कोणी त्रास देऊ नये म्हणून माझ्या मागे मागे रहायची.
पण काय रे रंग्या तुझं सूत तुझ्या टाईपची नसलेल्या ह्या बहेनजीशी कसं काय जुळलं ?
आणि तुझे इतके प्रताप माहित असूनही तिने तुझ्याशी लग्न बरं केलं?
नाही म्हणजे त्यावेळी तू जसा होतास ते बघता सभ्य घरातील कोणतीच मुलगी तुला होकार दिली नसती मग हा चमत्कार घडला कसा? ”

“ अरे मेरी कहानी किसी फिल्मी स्टोरी से कम नहीं।
खरंतर माझ्या आयुष्यातील चढउतार बघून मागे वळून पाहताना माझे मलाच आश्चर्य वाटते की मी खरंच असा आहे का?
पण कधी कधी एक प्रसंग, एक ती ठिणगी तुमचं आयुष्य उजळायला पुरेशी असते. तसंच माझं झालं.

माझे वडील गावचे पाटील सरपंच होते. त्यांना गावात खूप मान होता. सरपंच पाटलांचा मुलगा म्हणून मलाही तो मान मिळायचा. तो तोरा बघून माझ्या डोक्यात हवा गेली. आपण काही केले तरी आपल्याला कोणी बोलू शकत नाही. मग तिथूनच अंगात रगेलपणा वाढायला लागला. कॉलेजला ॲडमिशन ह्याचसाठी घेतली कारण मला मनासारखे स्वच्छंदी जगायला मिळावे. गावात कॉलेजची सोय नाही म्हणून बापाने कॉलेज हॉस्टेलवर सोय करून ॲडमिशन करवून दिली. तिकडे कोण विचारणार मला काय करतो म्हणून वहावत गेलो. मला गावात पहिल्यापासून जोरबैठका कुस्ती वगैरेची आवड होती. त्यामुळे शरीर पिळदार झालेले. मला माझ्याच बॉडीवर खूप नाज असायचा. मुलं टरकायची माझी बॉडी बघून. मग मी त्याच्या जोरावर पोरांना रॅगिंग करायचो हॉस्टेलवर. कॉलेजच्या कट्ट्यावर बसून हर एक मुलीची छेड काढणे त्यांच्या चिडा पाडणे असले धंदे करण्यात मी टाईम पास करू लागलो. आणि एक दिवस कॉलेजला तुझी एन्ट्री झाली. मला तू खूप आवडायचीस. तुझ्या तुलनेत बाकी मुली खूप साध्या काकूबाई होत्या त्यामुळे माझी नजर सतत तुझ्यावर असायची. सगळ्यांना माहीत होते की मला तू आवडतेस.त्यामूळे इतर कोणीही मुलगा तुझ्याशी साधं बोलला जरी तरी मी त्याला कॉलेज संपल्यावर धुवून काढायचो. आधीच मी एकेका क्लासमध्ये दोनदोन वर्ष राहिलेलो त्यात गुंड प्रवृत्ती, त्यामुळे कोणी माझ्याशी पंगे घेत नव्हते. पण तू काही मला घास घालत नव्हती. एक दिवस सगळ्या पोरांनी भरीस घातलं *वहिनीला प्रपोज कर , वहिनीला प्रपोज कर* म्हणून..
मी पण कोणत्या धूनमध्ये त्यांचे ऐकून तुला प्रपोज मारला. त्यानंतर तू जे केले ना,आजवर त्या हाताची बोटं मला माझ्या गालावर अद्रूष्य स्वरूपात दिसतात. तेव्हा मी खूप म्हणजे खूप पेटलो. तुला चांगली अद्दल घडवायची हे पण ठरवलं पण जेव्हा जेव्हा काही प्लॅन करायचो तो फसायचा. त्यात ह्या शऱ्यानं पण माझ्या दुखती रग वर हात ठेवून मला डिवचले मग मी ठरवले ह्याला पण तसाच थोबडवायचा. पण आमचा तोही प्लॅन फसला.

म्हणता म्हणता कॉलेज संपले आणि सगळे आपापल्या मार्गाने निघून गेले. मी मात्र गटांगळ्या खात तिथेच पडून होतो. नंतर नंतर माझे सगळे पंटर मित्र पण कॉलेज सोडून, मला सोडून काहीना काही धंदा पाण्याला निघून गेले. मग मी कसंबसं ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि गावी आलो. आता पुढे काय करायचं ? हा विचार डोक्यात असताना बीपीएड ची जाहिरात बघितली. मला तो विचार पटला कारण स्पोर्ट्समधे मला पुर्वीपासून इंटरेस्ट होता. मग लगेच फॉर्म भरून ॲडमिशन घेतली. मनापासून कॉलेज अटेंड करू लागलो आणि विशेष म्हणजे त्या कॉलेजला मी दरवर्षी पहिल्या क्रमांकावर पास झालो. मग मात्र मी जास्त सिरीयसली लक्ष दिले माझ्या भविष्याकडे. मी कॉलेजात पहीला आलो म्हणून गावाने माझा सत्कार केला. यशाची चव चाखायला मिळाल्यावर कळले की ह्याची नशा किती भारीय. मग मी बीएड कोर्सला पण प्रवेश मिळवला. आयुष्यात कधी केला नाही तितका अभ्यास तिकडे केला आणि तिकडेही डिस्टिंक्शन मधे पास झालो. मग शाळेच्या जाहीराती वाचून अर्ज, इंटरव्ह्यू सोपस्कार सुरू झाले आणि एका शाळेत स्पोर्ट्स टीचर म्हणून नोकरीला सलेक्ट झालो. आणि बीएड झाले होते म्हणून मेथड सब्जेक्ट पण शिकवायला मिळाला. मी माझ्या कामात इतकी मेहनत घेतली की काही वर्षांत मला तिथल्या हेड स्पोर्ट्स सुप्रीटेंडंटची पोस्ट मिळाली. दरम्यान आता नोकरीत स्थीर झालो.माझ्या सगळ्या वाईट गोष्टी बंद झाल्या बघून बाबांनी स्थळं आणायला सुरुवात केली. तोपर्यंत माझं वय जवळपास तिशीला पोहोचले होते.
त्यांच्या एका जिगरी दोस्ताला त्यांनी शब्द दिला होता की जर मला मुलगा झाला आणि तुला मुलगी तर आपण आपल्या मुलांची एकमेकांशी लग्न लावून देवू पण माझा वाह्यातपणा ओळखून त्यांनी त्यांच्या मित्राला कधीच ही आठवण दिली नाही. तो शब्द खरा करायला ते मला मुलगी दाखवायला त्यांच्या मित्राच्या घरी घेऊन गेले. मला अगोदरच बजावले असल्याने मी तर नकार द्यायचा प्रश्नच नव्हता पण त्या मुलीला उगीच माझ्याशी पसंत नसताना बळजबरीने लग्न करायला लागेल ह्याचं दुःख वाटत होतं.
आम्ही रीतसर त्यांच्या घरी गेलो. बाबांच्या मित्राने हसून स्वागत केले. चहापाणी इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि नंतर मुलीला बोलावण्यात आले.
मुलीला मी बघितले आणि मी तिथेच गर्भगळीत झालो. अंगाला घाम फुटू लागला. घशाला कोरड पडली. काही सुचेना… …….
हे काय घडतेय माझ्यासोबत? नशिब बरोबर तुम्हाला तिथेच आणून सोडते जिथं असण्याची तुम्ही कल्पनाही केलेली नसते. आज माझ्या आयुष्यात तो टप्पा येवून ठेपला होता. …… …..


—-------------------------------------------------------
क्रमशः -10

असे काय झाले असेल की रंग्या सारखा मल्लगडी घाबरला किंवा त्याला घाम फुटला???

जाणून घ्यायला वाचत रहा म्हणून जग फसतं! चा पुढील भाग.
कथा आवडत असेल तर अभिप्राय नक्की कळवा.धन्यवाद.
@राधिका.


🎭 Series Post

View all